Sunday, July 6, 2025
Homeलेखबिच्चारे पुरुष

बिच्चारे पुरुष

पुरुषांबद्दल फार कमी लिहिले व बोलले जाते. खरे तर अनेक वेळा त्यांना गृहीतच धरले जाते.

तो एक मुलगा, नवरा, दिर, पिता, काका, मामा, दादा अथवा एक मित्र अशा अनेक भूमिका पार पाडत असतो.

तसे पाहिले तर पुरुष हा दिसायला कणखर जरी असला तरी मनाने अतिशय भावनिक व संवेदनशील असतो. पुरुष तसा फार कमी बोलतो. स्वतःच्या भावना लवकर व्यक्त करत नाही. स्त्री चा स्वभाव बोलका असल्याने ती सर्व सांगून मोकळी होते अथवा रडून तरी व्यक्त होते.

पण पुरुषांनी रडले की त्यांना दुबळे समजले जाते. पुरषाने रडू नये हा सर्वात मोठा गैरसमज समाजात अगदी लहान पणापासून निर्माण केला आहे. रडल्याने आपण मोकळे होतो. दुःख काही प्रमाणात तरी कमी होते. मन हलके होते आणि हे मानसिक दृष्टीकोनातून फार महत्वपूर्ण आहे.

एक मुलगी अथवा स्त्री रडायला लागली की सर्व तिच्या जवळ येतात. तिला समजून सांगतात. मात्र जर एखादा पुरुष अथवा मुलगा रडत असला तर सहज बोलतात, काय मुलींसारखा रडतो ? पुरुषांना रडण्याचे स्वातंत्र्य नाही. म्हणजे दोघांच्याही भावना सारख्या मात्र प्रतिक्रिया वेगवेगळ्या ! विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना ?

पुरुष आपल्या भावना आतल्या आत दाबून ठेवतो. त्यामुळेच तर मुलीच्या लग्नाच्या दिवशी खरे तर वडील सगळ्यात जास्त रडतात पण एकांतात ! आपली मुलगी आपल्या पासून दूर जाणार हे त्यांना सहन होत नाही…..ते अतिशय भावनिक होतात तरी सुद्धा ते रडत नाही. शांत राहतात. ते सर्वांसमोर दाखवत नाही म्हणजे तसे दाखवायला ही मनाई आहे.

स्त्री ही दिसायला कोमल असली तरी मनाने अतिशय कणखर असते. म्हणूनच तर ती लग्न झाल्यावर आपले आई वडील, भाऊ बहीण अशी रक्ताची नाती सोडून पतीच्या घरी येते. हे केवळ स्त्रीच करू शकते. म्हणूनच बहुदा ही परंपरा रुजली असावी. नाही का ?

आज शिक्षणामुळे अथवा नोकरीमुळे अनेक मुलं आई वडिलांपासून दुरावले आहेत पण मनाने मात्र परिवाराशी कायम जोडलेले असतात. सुरवातीला हे फार जड जाते. मग हळूहळू त्याची सवय होते. मुलांच्या, पित्याच्या, नवऱ्याच्या, भावाच्या जबाबदाऱ्या अनेक असतात व ते त्या चोख निभावतात. मात्र पुरुषांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर नसतो. अनेक वेळा त्यांना गृहीत धरले जाते. मग कौतुक तर फारच लांब राहिले.

अनेक वेळा तर घरच्या जबाबदारी मुळे लहान वयातच मुलगा प्रौढ होतो. अनेक इच्छा सोडून देतो. अनेक निर्णय त्याला मनाविरुद्ध देखील घ्यावे लागतात. आज करू उद्या करू म्हणत आयुष्याचे महत्वाचे क्षण हातातून निसटून जातात.

जबाबदारी पार पाडता पाडता स्वतःसाठी जगायचे राहून जाते मात्र हे कोणाला दिसत नाही. कारण याची फारशी चर्चा अथवा विषय होत नाही.

महिला दिन अगदी उत्साहात साजरा केला जातो मात्र पुरुष दिन असे काही नसते ना ? आणि हो, याचा विचार ही कोणी करत नाही.

हक्कासाठी, न्याय मिळवण्यासाठी बोलले जाते. मग स्त्री व पुरुष असा भेदभाव का ? मानसिक दृष्टीकोनातून विचार करता असे का नाही बोलले जात ?

आज समाजात पुरुष आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. याला कारणीभूत कोण ? आपण ? आपला समाज ? आपल्या रुढि परंपरा ? आपली संकुचित विचारसरणी ? का अजून काही ?

खरंच पुरुषांनी बोलले पाहिजे. व्यक्त झाले पाहिजे. शांत राहणे, सहन करणे हा उपाय नाही. अन्यथा याचे परिणाम भयंकर होतात व कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण होऊ शकते.

हे कुठे तरी थांबले पाहिजे. मात्र सुरवात ही आपल्यापासूनच केली पाहिजे.

जेव्हा आपण स्वतःला त्यांच्या जागी ठेवून त्यांच्या दृष्टीकोनातून विचार करू तेव्हाच हे लक्षात येईल. म्हणून तर भाऊ, वडील, पती, मामा, काका, दादा, मित्र वाचता आला पाहिजे तेव्हाच हे शक्य होईल व समाजात एक सकारात्मक परिवर्तन घडू शकेल व पुरुष ही व्यक्त होतील……..

पुरुषांनाही मन आहे त्यांना ही भावना आहेत ना !

अनेक लेख अथवा कविता मुलींवर, बहिणीवर, आईवर, बायको, महिला शक्ती वर रचल्या गेल्या आहेत.

मात्र पुरुषांच्या नशिबी हे फारसे नसते.तो काय सक्षम आहे, स्वावलंबी आहे मग त्याचा काय एवढा विचार करायचा ? असे अगदी सहज बोलले जाते.

पुरुषी अत्याचार, पुरुषी अहंकार असा आरडाओरडा ही होतो. मात्र प्रत्येक वेळी तोच चुकत असेल असे ही नाही ना ?

जशा प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात तसे काही पुरुषांच्या नशिबी असेही होऊ शकते की त्याची बायको ही अपमान करणारी, अत्याचार करणारी असू शकते. म्हणजे त्यांच्या वर देखील अत्याचार होऊ शकतात, होत आहेत. हे एक कटू सत्य आहे.

मात्र तो बोलत नाही. कारण जर का तो बोलला तरी त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार ? हा पहिला प्रश्न अथवा पुरुष असून असे अत्याचार सहन करतो म्हणून त्याच्या नशिबी अवहेलना येते अथवा त्यांची कुचेष्टा केली जाते.

पुरुषांना समजून घेणारे, त्यांची बाजू घेऊन बोलणारे कोणी नसते. त्यामुळे, अनेक वेळा ते सर्व एकटे सहन करतात व एकटेपणाचे अथवा मानसिक आजारांचे बळी ठरतात. त्यांचे मानसिक अथवा भावनिक खच्चीकरण झाल्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो व अनेक वेळा ते आत्मविश्वास ही गमावतात. एकाकी आयुष्य जगतात ही गोष्ट सर्वात घातक आहे.

जीवनात स्त्री व पुरुष दोघांचे तेवढेच महत्व आहे. दोघेही आपली भूमिका आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडतात.

मग तो संवेदशील असणे हा त्याचा दुबळेपणा आहे असे का म्हणून समजले जाते ? प्रेम, माया, काळजी ही पुरुषांना देखील तेवढीच असते जेवढी की एका स्त्रीला असते म्हणून तर जो पर्यंत आपली मुलं स्वावलंबी होत नाही तो पर्यंत तो राबतो कष्ट करतो त्यांना शिकवतो मोठे करतो.

पुरुष ना…… न बोलून अनेक गोष्टी करत असतो. आई, वडील अथवा बायको आजारी असली की त्यांची मनापासून काळजी घेतो. स्वतःच्या परीने त्यांना काहीही कमी पडून देत नाही. मुलांसाठी तर तो सर्वस्व पणाला लावतो. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करतो.

“पुरुषांची जातच वाईट” असे सहज बोलले जाते. मात्र सगळे पुरुष वाईट नसतात. एक तराजूत सर्वांना तोलने हे कितपत योग्य हे मात्र आपणच ठरवले पाहिजे.

सरसकट पुरुषांवर आरोप करणे हे चुकीचे आहे. त्यांनाही मन आहे. त्यांना ही समजून घेतले पाहिजे. जसे हाताची सर्व बोट सारखी नसतात तसे सर्व पुरुष वाईट नसतात.

स्त्री व पुरुष दोघेही समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे. आई व वडील यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. पती पत्नी ही रथाची दोन चाके आहेत त्यामुळे ती दोनीही चाके भक्कम असणं तेवढेच महत्त्वाचे आहे.

आपल्याला काय वाटते ? ते जरूर कळवा.

रश्मी हेडे.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments