बोध तुला भेटला जिथे
झाला होता बोधीच तिथे
सुबुद्ध झाला, प्रबुद्ध झाला
अधिक उन्नत मानव झाला
त्या वृक्षांची पाने सारी
त्यांच्या फांद्या, खोड तयांचे
दिसतच नाही, डोळेच अधू
दृष्टीने इथून तिथवर ज्यांचे
पिवळे सारे केवळ दिसते
चकाकणारे सोने त्यांना
पिकण्याचा, टिकण्याचा
अर्थच ठाऊक नाही ज्यांना
अस्थिर, चंचल, हिंस्त्रच सारे
करून सोडले ज्यांनी वारे
गुंडाळून ती करूणा, प्रज्ञा
करून सोडले अज्ञच सारे
ग्रहच वाटतो त्यांना आता
अपरिग्रह दूर कोठला
आग्रह सारा दुराग्रहाचा
जीव जीवाचा घेतच सुटला
शांतही असतो, मूकही असतो
संवाद उन्नतीचा
विकास नसतो तेथे वाढत
कुठल्या कोण्या अनीतीचा
पुनः एकदा वळून मागे
खोल शिरा रे आत आपल्या
बोट धरा रे त्या प्रज्ञेचे, जी तर
आतच वसे आपल्या
– रचना : श्रीपाद भालचंद्र जोशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800