स्वातंत्र्य सेनानी तथा घटनातज्ञ बॅ.नाथ पै यांचा काल स्मृती दिन झाला. त्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार श्री प्रकाश कथले यांनी अर्पण केलेली ही भावांजली…
– संपादक
बॅ.नाथ पै हे वयाच्या जेमतेम ४९ व्या वर्षी गेले. ज्या पायावर डोके ठेवायची इच्छा होती, ते पाय निसटून गेले.
बॅ.नाथ पै यांचे भाषण ऐकायला मिळावे म्हणून दुसऱ्या तातडीच्या कामकाजाकरीता निघालेले पंतप्रधान
पंडित जवाहरलाल नेहरू पुन्हा संसदेत परत आले, त्याच्या भाषणातील शब्द न् शब्द टिपून घेत असल्यासारखे नाथचे भाषण ऐकत बसले. याची बातमी त्यावेळी वृत्तपत्रात आली होती. त्यामुळे बॅ.नाथ पै यांना एकदा भेटलेच पाहिजे, ही मनीची आस होती. त्यांना पाहता आले पण नाथ पै सोबत बोलण्याची संधी मिळाली नाही. ही खंत आजही मनात कायम आहे.
त्याचे मराठीतील बोलणे एकदा त्याच्यासोबत थेट बोलून ऐक, हा मित्रांनी मला दिलेला सल्ला अनुभवता आला नाही. त्याला तू सहजतेने भेटशील, मगच तुला नाथ कोण आहे, ते कळेल, असे मला सांगितले गेले होते. पण त्याला दुसऱ्यांदा भेटायला जाण्याच्या आतच नाथ कायमचा निघून गेला होता.
काही क्षण कायमच अस्वस्थ करतात. त्यातलीच ही घटना आहे. नाथ गेला तेव्हा मी वयाच्या विशीत होतो. मुंबईला बाबूजी मोहोड यांच्यामुळे जाणे येणे वाढले होते. त्यामुळे काही मोठी माणसे अनुभवता आली, यामागे माझ्या वडिलांच्या जागीच नव्हे तर सर्वेसर्वा असणारे बाबूजी मोहोड होते. हे ही नम्रपणे नोंदविलेच पाहिजे.
बाबूजींनी समाजसेवेत सर्वस्वाचा त्याग केला होता. तोच संस्कार आम्हालाही दिला. त्यामुळे त्या धारेतील गोतावळा जमत होता. त्यातच एक बॅ.नाथ पै होता. पण त्याला मनसोक्त भेटता आले नाही. ही आजही खंत कायम आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू खुल्या दिलाचे होते. बॅ.नाथ पै कोकणातून खासदार झाले होते. शासनावर घणाघाती टिका करायचे. पण पंडित जवाहरलाल नेहरू, गोविंदवल्लभ पंत, लालबहादूर शास्त्री यांनी बॅ.नाथ पै, यांनी विरोधात भाषण करूनही त्यांचे अभिनंदन केले होते. नाथ पै बॅरिस्टर झाले होते त्यावेळी कोकणात पूर आला होता. शासकीय अधिकारी पोहोचायच्या आत दिल्लीतून आलेला खासदार बॅ. नाथ पै समुद्राच्या खाडीत पोहून पुराने उद्ध्वस्त झालेल्यांना धीर देत होता. हे सारे मला वृत्तपत्रात वाचून कळले आणि नकळत बॅ.नाथ पै माझ्या हृदयसिंहासनावर विराजमान झाला.
त्याला भेटायला उसनवार पैसे घेऊन मी मुंबईत गेलो होतो. नाथ मुंबईत येतो, ही माहिती कळल्यावर मी गेलो, पण तो कार्यकर्त्यांच्या गराड्यात झपझप पावले टाकून निघून जाताना दिसला. येवढेच त्याचे दर्शन.
एरव्ही तो कलेचा आस्वादक होता. म्हणूनच त्याने कुमार गंधर्वाचे गाणे दिल्लीत ठेवले होते. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर, गांधीजी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या तिघांच्या विचार प्रेरणेच्या मुशीतून त्याचे व्यक्तीमत्त्व घडले होते. वसंत बापटांची त्याची खास मैत्री होती. नाथच्या खांद्यावर हात टाकून वसंत बापट त्याच्याशी बोलतानाचे एक छायाचित्र त्यांच्यातील मैत्रीचा धागा कसा होता, हे सांगते.
नाथला त्याची आई राजा म्हणायची. तो राजाच होता, जनतेच्या हृदयसिंहासनावर राज्य करणारा !
जैतापूर मतदारसंघातील शाळेच्या रौप्यमहोत्सवाला तो दिल्लीतून विमानाने येत हजर राहातो, यातून त्याचे जनतेचे नाते स्पष्ट होते.
मी वाचले, लोकसभेतील चर्चेत सेनापती बापटांना श्रद्धांजली द्यायचा विषय चर्चेला आला होता. लोकसभेत हा श्रद्धांजलीचा ठराव घेण्याची काही गरज आहे काय, असे कोणीतरी बोलले. त्यांना सेनापती बापट काय हेही माहित नसावे. त्यावेळी नाथ कडाडला. तो म्हणाला, `अध्यक्ष महाराज, आपल्या संसदेचा पाया लिटन आणि बेकर यांनी घातलेला नाही तर सेनापती बापटांसारख्या मंडळीच्या त्यागाच्या पुण्याईने ही संसद आपल्याला लाभलेली आहे. त्यांनी जो त्याग केला, त्यांनी जे क्लेश सोसले, त्यामुळेच ही संसद उभी राहिली आहे.
जनसामान्याच्या हृदयसिंहासनावर विराजमान असलेल्या बॅ.नाथ पै याच्यावर हृदयविकाराने हल्ला चढविला होता. तो शेवटच्या अवस्थेत पोहोचला होता. डॉक्टरांनी त्याला कोठेही जाण्यास मनाई केली होती. त्याचवेळी बेळगावातील नागरिकांवर कर्नाटकी अत्याचार वाढले होते. डॉक्टरांनी मनाई केल्यानंतरही नाथ बेळगावकडे निघाला. त्याची पत्नी त्याच्या सहकाऱ्यांना ओरडून म्हणाली, यू आर किलिंग हिम. त्या माऊलीचे म्हणणे खोटे नव्हते. पण नाथ कोणाचे ऐकेल तर ना ? अन्याय दूर करण्यास जीवन समर्पणाचा जीवन यज्ञ होता. तो बेळगावला जाऊन परतला. हृदयविकाराने जबरदस्त ठाण मांडत घर केले होते. पण नाथ ऐकायलाच तयार नव्हता.
पु.ल.देशपांडे म्हणाले, “जनतेच्या कामात जीव समर्पण करताना नाथने तर हृदयविकाराला सर्दी खोकल्याच्या आजारापलिकडे हृदयविकाराला स्थानच दिले नव्हते”. खरे होते ते. अखेर हृदयविकाराने त्याच्या हृदयावर हल्ला चढविला. नाथ पै यांना विनम्र अभिवादन.

– लेखन : प्रकाश कथले. जेष्ठ पत्रकार, वर्धा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800