आई कुठे काय करते ? या मालिकेतील ईशा अशी का वागते ? हा लेख काही महिन्यांपूर्वी लिहिला होता. अशा लेखनाचे समाजावर फारसे काही परिणाम होत नसतात, हे बऱ्याच पदव्या घेऊनही आम्हाला कळलेले नाही. कारण या ईशाचे मालिकेतील वागणे दिवसेंदिवस सूधारण्याऐवजी तोल ढळल्यासारखे घसरपट्टी वरून दरीत कोसळते आहे.
आता तर तिच्या सोबतीला पुण्याचे एक अती श्रीमंत लाडावलेले बाळ सामील झाले आहे. या सहा महिन्यांनी अल्पवयीन असलेल्या बाळाचे प्रताप आता सर्वश्रुत झालेले आहेत. या अन् अशा सारख्या सातत्याने होत असलेल्या घटना न्यायसंस्थेला, पोलीस यंत्रणेला, कुटुंब व्यवस्थेला, शिक्षण प्रक्रियेला हजारो प्रश्न विचारीत आहेत. कोण कोण, कुठे, नेमके काय चुकते असे हे प्रश्न आहेत. आपले आर्थिक मान वाढल्याने सर्वच समाज वर्गात सुबत्ता आली. भारतातील गरीबी आता नव्याने तपासावी लागेल इतका चंगळवाद बोकाळला आहे. कुणाचेच कुणावर नियंत्रण नाही अशी परिस्थिती आहे. विद्यार्थी शिक्षकाचे ऐकत नाहीत, घरी मुलं पालकाचे ऐकत नाहीत, नागरिक कायद्याला जुमानत नाहीत, पोलीसच नियमानुसार वागत नाहीत. मंत्री, अधिकारी, लोकनेते यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. सत्तेपोटी आपण काहीही करू शकतो, आपल्या हाती अनिर्बंध सत्तेने मोकळे रान दिले आहे धुडगूस घालायला, अशी या लोक प्रतिनिधींची धारणा आहे.
एकूणच समाज व्यवस्थेत अनागोंदी आहे. एकीकडे तंत्रज्ञानाची झेप, मूलभूत सुधारणा, जन हिताची कामे, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा याचे नगारे पिटले जात असले तरी समाजाचे आरोग्य मात्र पार बिघडले आहे. न्याय नीतिमत्तेच्या, चारित्र्य संवर्धनाच्या बाबतीत चक्क काळोख अंधार आहे !
काळानुसार सगळे काही बदलत असताना कायदे का बदलत नाहीत ? अल्पवयीन, नाबालीग कुणाला म्हणायचे ? दोन तीन महिने कमी असणाऱ्या अल्पवयीन बाळाने म्हणजे सोळा सतरा वर्षांच्या मुलाने दारू पिऊन, नशापाणी करून जर दोन तीन तरुणी वर बलात्कार केला, नंतर त्यांचा खून केला, हे सारे सिध्द झाले, तरी अल्पवयीन म्हणून त्याला बालसुधारगृहात पाठवून वर पिझ्झा बर्गर खाऊ घालायचे का ? हे सारेच संतापजनक आहे. केवळ पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो हा गर्भ श्रीमंतांना आलेला माज, अन् पैशाची देवघेव करून त्यांना मदत करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचा सत्तेचा कैफ उतरविण्याची गरज आहे. यासाठी आता सुजाण समाजाने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. एरवी साध्या सुध्या फालतू गोष्टी साठी रस्त्यावर उतरणारे राजकीय पक्षाचे युवानेते म्हणा किंवा महिला मोर्चा म्हणा, यांनी सरकारला, तपास यंत्रणेला, न्याय व्यवस्थेला जाब विचारणे गरजेचे आहे.
हे प्रश्न राष्ट्राच्या सुरक्षे इतकेच, सामाजिक आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. समाज अशा विषाणू नी रोगी असेल, अन् दुबळा असेल तर राष्ट्र बलाढ्य कसे होणार ? अर्थात वयात येणाऱ्या या मुलामुलींना समझवायचे कसे, त्यांचे फालतू लाड नियंत्रित करायचे कसे, त्यांना शिस्तीत वाढवायचे कसे हे खरे प्रश्न पालकांपुढे, शिक्षक पुढे आज आ वासून उभे आहेत. केवळ पदव्या मिळवून कुणी शिक्षित होत नाहीत. संस्कार, उत्तम चारित्र्य, भल्याबुऱ्याची विवेकी समज जास्त महत्वाची आहे. आपापल्या कमाई च्या विश्वात रममाण असलेल्या पालकांचे तर याकडे दुर्लक्ष होतेच आहे किंवा समजून उमजूनही ते पाऊले उचलण्यास असमर्थ आहेत.
शिक्षकांची वृत्ती तर मला काय त्याचे अशी बेपर्वाईची आहे ! शिक्षण पद्धतीत होणारे बदल या कौटुंबिक नीती शास्त्राची, संस्कार संवर्धनाची दखल देखील घेत नाही हे दुर्दैव म्हंटले पाहिजे.
याआधी आपण पाश्चात्य संस्कृतीला नावे ठेवीत होतो. वाहवत चाललेल्या तिकडच्या हिप्पी विचारसरणीकडे पाहून बोटे मोडत होतो. आजचे आपले चित्र काय सांगते ? आपण त्यांच्यावरही मात करतो की काय अशी भीती वाटते. हे अतिशय गंभीर होत चालले आहे. सिरीयल मधील ईशा काय किंवा पुण्याचा गर्भ श्रीमंत बाप, आजोबांचा बाळ काय, यांची संख्या कोरोनाच्या विषाणू सारखी वेगाने वाढताना दिसते आहे. आपण कोरोनाची लढाई यशस्वीरित्या लढलो. आता या नव्या तरुणाईत शिरलेल्या, वेगाने वाढणाऱ्या अप प्रवृत्तीच्या विषाणूचा सामना करायचा आहे.
हे एकट्या दुकट्या चे काम नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील. मुलांना किती टक्के गुण मिळतात, कुठे प्रवेश मिळतो/मिळत नाही याची चिंता करीत बसण्या पेक्षा त्याचे घरी दारी वागणे बोलणे कसे आहे, तो किंवा ती कुठे जातात, काय करतात, कुणाशी कसे बोलतात यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लक्ष ठेवणे याचा अर्थ पोलिसी नजर नाही. नको ती दखल देखील नाही. पण मुले तुम्हाला उत्तर दायी असायला हवीत. आमचे आयुष्य आहे, आम्ही वाटेल तसे वागू हे घरातून बाहेर पडल्यावर.. मोठे, कमावते, स्वतंत्र झाल्यावर.. आपण जेव्हा कुटुंब म्हणून एकत्र राहतो, तेव्हा घराच्या शिस्तीचे काही नियम असतात. खाण्या पिण्याच्या वेळा पाळणे, कुठे जातो, कशाला जातो हे खरे सांगणे, दररोज घरात एकमेकाशी सर्वांनी संवाद साधणे, परस्परांच्या अडचणी समजून घेणे, तार स्वरात न बोलता, समंजसपणे संवाद साधणे, एकमेकाच्या चुका शोधीत बसण्या पेक्षा, आहे त्या समस्येवर सर्व मान्य तोडगा, सोलुशन, शोधण्याचा प्रयत्न करणे, एकमेकाचे अधून मधून कौतुक करणे, पण फालतू लाड न करणे.. या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण अमलात आणू शकतो..
परिस्थिती हाताबाहेर गेलीय असे मुळीच नाही.समस्या कोणतीही असो त्यावर उत्तर हे असतेच. आपण समस्येचा भाग न होता उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर एक नव्हे अनेक उत्तरे सापडतील. पण समस्याच नाही म्हणून दुर्लक्ष केले तर काही खरे नाही. वेळेतच सावध झाले पाहिजे सर्वांनी.
— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे.
माजी कुलगुरू. हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुरेख विवेचन.