उच्चशिक्षित, मनमिळाऊ, हुशार, जिथे कमी तेथे आम्ही हा मूलमंत्र जोपासणारे मुंबईच्या बेस्ट उपक्रमातुन उपमुख्य अभियंता या वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेले अधिकारी श्री अशोक जगन्नाथ जवकर यांची प्रेरणादायी कथा….
श्री अशोक जवकर यांचा जन्म १६ मार्च १९६३ रोजी त्यांच्या बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर ह्या मुळ गावी झाला. तिथेच त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले. दहावीत, शाळेतून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता.
वडील जगन्नाथ गोविंदराव जवकर हे स्वातंत्र्य सैनिक होते. महाराष्ट्र शासनातर्फे स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांचा बांगडी व भांड्याचा व्यवसाय होता. आई यमुनाबाई अतिशय शिस्त प्रिय होती. एकदा त्यांचे मोठया भावाबरोबर भांडण झाले असताना आईने त्यांना रांजणामधील गार पाण्यात बुडवले होते तर मोठया भावाला उन्हात उभे रहाण्याची शिक्षा केली होती. त्यावेळी मुलं आई वडिलांच्या डोळयांच्या धाकावर होते. पण हेच संस्कार, हीच शिस्त भविष्यातील यशाची गुरुकिल्ली असते हे नंतर जाणवते.

अशोकजींनी त्यांच्या बालपणीच्या एक प्रसंग सांगितला जो त्यांच्या दृष्टीने एक अविस्मरणीय क्षण आहे. त्यावेळी टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने शाळेत वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता आणि विशेष म्हणजे ते भाषण त्यांनी इंग्रजीत दिले होते. फारसे शिक्षण नसताना देखील त्यांच्या वडिलांचे इंग्रजीवर अतिशय प्रभुत्व होते, त्यामुळे वडिलांनी खुश होऊन, बक्षीस म्हणून त्यांना पहिली फुल पॅन्ट घेतली होती. ती कौतुकाची थाप, त्या प्रेरणादायी आठवणी आजही आशिर्वादाच्या रूपाने त्यांच्या सोबत आहेत.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील अशोकजींनी अतिशय जिद्दीने व चिकाटीने अंबेजोगाई आणि औरंगाबाद येथे उच्च शिक्षण घेऊन बी.ई. मेकॅनिकल ही पदवी प्राप्त केली. इंजिनिअर झाल्यानंतर अशोकजी स्वबळावर, १९८५ साली आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त मुंबईच्या, बेस्ट परिवहन उपक्रमात डेप्युटी इंजिनिअर म्हणून रुजू झाले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ते २००४ साली अधीक्षक अभियंता, २००७ साली कार्यकारी अभियंता तर २०१६ साली उप-मुख्य अभियंता झाले. सेवेत त्यांची दिवसेंदिवस प्रगती होत गेली, बढती मिळत गेली हीच त्यांच्या प्रामाणिकपणा, कार्यक्षमता, कल्पकता, लोकप्रियता या गुणांची पोच पावती आहे.
अशोकजींना उत्कृष्ट सेवेमुळे, अनेक मान सन्मान मिळाले. एप्रिल २०१६ मध्ये मुंबई येथील हॉटेल ट्रायडेंटमध्ये ब्रिक्स ही आंतरराष्ट्रीय वाहतूक परिषद आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले होते. भारत, रशिया, चीन, ब्राझील, साऊथ आफ्रिका या देशांचे मंत्री, राजदूत, प्रतिनिधी परिषदेस उपस्थित होते. तिथे बेस्ट उपक्रमाचे प्रतिनिधी म्हणून श्री अशोक जवकर यांनी भाग घेतला होता.
ब्रम्हकुमारी माऊंट अबू येथे जून २०१६ मध्ये देश विदेशातील ४ हजार प्रतिनिधींसमोर त्यांनी उत्कृष्ट भाषण केले होते.
बेस्टच्या अत्याधुनिक एसी मिनी(डिझेल) बसचे लोकार्पण पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते २ जानेवारी २०२० रोजी झाले. याप्रसंगी या बसचे डिझाईन केल्याबद्दल श्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
बेस्टच्या अत्याधुनिक एसी इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२० रोजी झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी या बसचे डिझाईन केल्याबद्दल श्री अशोक जवकर यांचे कौतुक केले.
आपली सेवा बजावत असतानाच त्यांनी बेस्टच्या कामगारांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे व विशेष म्हणजे व्यसनमुक्तीसाठी सतत प्रयत्न केले. विविध प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवले. कामगारांचे कल्याण हा नेहमीच त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे.
ज्या समाजात आपण जन्मलो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो हा विचार कायम मनात ठेवून त्यांनी नेहमी हिरीरीने पुढाकार घेतला.
मुंबईच्या सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज मंडळाचे सचिव असताना त्यांनी वार्षिक स्नेह संमेलन, मुंबईतील पहिला वधू वर मेळावा आयोजित करण्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांचे काम पाहून २०१४ मध्ये श्री श्रीकांत इटकर यांनी मुंबई विभागीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली. पुढे त्यांनी मुंबई व ठाणे येथे महिला, युवकांना एकत्र आणून जिल्हाध्यक्ष नेमले व महिला व युवक यांची संघटना स्थापन केली.
अशोकजींनी महिला व युवक मेळावा देखील आयोजित केला होता. या मेळाव्यास तत्कालीन माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांचे सुंदर मार्गदर्शन लाभले ह्याचा अशोकजीं आवर्जून उल्लेख करतात.
७ जुलै २०१९ रोजी माजलगाव येथील अधिवेशनामध्ये अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष श्री शरदजी भांडेकर यांनी अशोकजींची मुंबई विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

श्री क्षेत्र द्वारका येथे २, ते ४ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित केलेल्या, ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी जाणारे भाविक, पूर परिस्थितीमुळे मुंबईतच अडकून पडले होते. अशोकजींनी त्यांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथे संध्याकाळी ५.३० ते रात्री ट्रेन सुटेपर्यंत मदत कक्ष कार्यान्वित केला. त्यांनी भाविकांच्या चहा, नाश्ता व बसण्याची व्यवस्था केली. तत्कालीन परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते यांच्याशी बोलून सर्वांसाठी बसेसची व्यवस्था केली.
सर्व भाविकांच्या रेल्वे तिकिटांच्या रकमेची परतफेड केली. भाविकांची सर्व व्यवस्था करण्यासाठी सर्व पदाधिकारी व बेस्टचे सहकारीं यांची टीम त्यांनी तयार केली होती.

भागवताचार्य कु.अनुराधा दीदी शेटे यांच्या मुंबई येथील कार्यक्रमादरम्यान त्यांची निवास व्यवस्था देखील अशोकजींनी केली होती. द्वारका येथे पारायण सोहळ्यात दीदींच्याहस्ते त्यांचा व पत्नी सौ कल्पना यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबईत चेंबूर येथे २९ डिसेंबर २०१९ रोजी भव्य कासार मॅरेथॉनचे त्यांनी यशस्वी आयोजन केले होते. या मॅरेथॉनला उत्तम प्रतिसाद मिळाला, तर १२ जानेवारी २०२० रोजी मुंबई येथे भव्य स्नेहसंमेलन आयोजित केले होते.
कोरोना काळात लॉक डाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या समाज बांधवांना त्यांनी मदत पोहोचवली व त्यांच्या गावी जाण्यास मदत ही केली.
अशोकजीं त्यांच्या आयुष्यातील यशस्वी प्रवासाचे सर्व श्रेय, श्री सिद्धिविनायकाची कृपा, आई-वडिलांचे आशीर्वाद, वडील बंधू श्री नारायणराव यांचे मार्गदर्शन व पत्नी सौ कल्पनाची अखंड साथ याला देतात.

मुलगी सौ सायली व जावई श्री प्रतिक वरळीकर दोघेही बी ई (कॉम्प्युटर) एमबीए असून उच्च पदावर नोकरीला आहेत.

अशोकजीं १ एप्रिल २०२१ बेस्ट उपक्रमातून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले. बेस्टचे अध्यक्ष व सहकारी अधिकारी व कामगार वर्ग यांच्यातर्फे त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
अशोकजींना वाचायची, गाणी गायची फार आवड आहे. आपले छंद जोपासताना त्यांना खूप आनंद मिळतो.
क्षेत्र कोणतेही असो, नोकरी अथवा व्यवसाय तरुणांनी त्याचे सखोल ज्ञान मिळवले पाहिजे व समाजात देखील सहभागी झाले पाहिजे असे त्यांचे मत आहे.
असे हे अशोकजी, ज्यांनी आयुष्यभर सर्वांना मदतीचा हात दिला. पुढे देखील सामाजिक काम करण्याची त्यांची इच्छा आहे. निवृत्तीचा वेळ खऱ्या अर्थाने सत्कारणी लावायचा आहे. स्वतःसाठी, कुटुंबासाठी व समाजासाठी कार्य करायचे आहे.
वाचनाची, गायनाची आवड असलेले, सकारात्मक विचारसरणी असलेले अशोकजी हे युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
श्री. अशोक जी जवकर ची अगदी छान माहिती.
रश्मी चे लेखन खुप छान 👌👌
खुप छान, सळसळता उत्साह आणि प्रत्येक वेळी एन्जॉय करून वातावरण आनंदी ठेवणे, हे त्यांनाच जमतं. सामाजिक कार्यामध्ये आदर्शवत काम आहे.