काळ्या मातीत रमणारा काळ्या मातीत मळणारा काळ्या मातीत तळपणारा
काळ्या मातीत जळणारा.
बारा महिने ओझे घेऊन खांद्यावर
काळी नांगरतो उन्हाचा तडाखा
हिवाळी गारवा आभाळ पांघरतो.
जग पोशिंद्याचे कोडे त्याला
कष्ट करणार्या शेतकर्यांला
एक दिवस आनंदात पहावे.
काळ्या मातीत राबणाऱ्या
सर्जा राजाचा सन बैल पोळा
रंगीबेरंगी रंगाचा रंगीत साज
सर्जा राजाचा रंगतदार सोहळा.
ऐटीत थाटामाटात बैल जोडी
रंबी ठिप ठिपक्यांची दिसणार
तीन रंगांनी रंगवलेली शिंगे अन्
कपाळी बाशींग, गोंडे चढणार.
सर्जा राजाच्या घामाने घरात
येते रास धान्य धनाची झोळी
राब राबाणार्या सर्जा राजाला
भरवूया गोड पुरणाची पोळी.

– रचना : भागवत शिंदे पाटील, उक्कडगांवकर.