मराठी पुस्तके हा मराठीवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. लहानपणापासून आपण या पुस्तकांवर प्रेम करत असतो. बालवयात लहान लहान गोष्टी वाचायची आपल्याला गोडी लागते ती वाढत जाऊन मग मोठेपणी सर्व प्रकारची पुस्तके वाचली जातात.
लहानपणी आणखी एक आवडणारी गोष्ट म्हणजे आईने किंवा आजी आजोबांनी रंगवून रंगवून सांगितलेल्या राजकुमाराच्या, परीच्या जादूच्या किंवा अगदी भूताखेताच्या गोष्टी. या गोष्टी ऐकत ऐकत तल्लीन होऊन मुल कधी पेंगू लागत कळतही नसे.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वाचनाची ही आवड जीवंत ठेवायची तर वेळेची फार पंचाईत झाली आहे. घरात पुस्तक असली, वाचनालयाचे वर्गणीदार असलो तरी वाचायला सवड मिळतेच असं नाही.
मग नाईलाजास्तव ॲाडीओ पुस्तकांकडे वळावे लागते. पण त्यातही कृत्रीमता जाणवते. मग अशा वेळी अगदी घरगुती आवाजात आपल्याला कुणी पुस्तक ऐकवलं तर ? अगदी आपल्या घरातल्या व्यक्तीने वाचवं तसं ! ते ही रोज १० मिनिटे फक्त. रोज वेळ काढायला नाही जमलं तरी दोन दिवसाआड किंवा जमेल तस आपण अनेक पुस्तेक ऐकू शकतो ते ही विनामुल्य !
पुणे येथील सौ.निलिमा नातू आणि सौ. वैशाली दंडवते या दोघी मैत्रीणी. दोघीनी बी.एस.एन.एल. मधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. कोविड परिस्थितीत वैशालीताईंच्या मनात एक अभिनव कल्पना आली. पुस्तक अभिवाचन ग्रूप सुरू करण्याची. आणि या दोघींनीही ही कल्पना आमलात आणली. मग ५ ॲाक्टोबर २०१९ पासून ‘बोलकी लेखणी’ हा व्हाट्सएप समूह तयार केला. यामधे प्रथम सौ.मिनाक्षी देशमुख लिखित ‘गांधारी’ ह्या पुस्तकाचे वाचन केले. सुरवातीला एक ग्रूप तरी पूर्ण भरेल का अशी चिंता असणाऱ्या या दोघींच्या उत्तम वाचनामुळे बोलकी लेखणीचे १३ च्या वर ग्रूप झाले आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढतेच आहे.
प्रत्येक समूहामधे देशविदेशातील २०० च्या वर सदस्य आहेत. यामधे आत्तापर्यंत मंदोदरी, तारा, सीता, अहिल्या अशा पंचकन्यांच्या लेखांचे वाचन झाले. मग नर्मदे हर हर म्हणत ‘नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा’ या पुस्तकाचे वाचन झाले. पुस्तक वाचनाबरोबरच हा केवळ अध्यात्मिक प्रवासच नव्हता तर तो श्रोत्यांना अंतर्मुख करून गेला. या वाचिका इथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी भारती ताई ठाकूर नर्मदा काठी करत असलेल्या कार्याचीही दखल घेत त्यांच्या कार्याची ओळख श्रोत्यांना करून दिली. मग अहिल्यादेवी या पुण्यश्लोक अहिल्या बाईंच्या जीवनावरील पुस्तक वाचले गेले. दिग्विजय स्वामी विवेकानंद यांच्यावरील पुस्तकही श्रोत्याच्या पसंतीस उतरले.
अ प्रिन्सेस रिमेंम्बर्स (प्रिन्सेस गायत्रीदेवी यांच्या जीवनावरील पुस्तक), मग रामदास स्वामींवरील पुस्तक, गोपिकाबाईंवरील पुस्तक ते थेट सुबोध भावेंचे घेई छंद व इटालिआनो ह्या पुस्तकांचे वाचन झाले. आणि आत्ता चालू असलेले केतकर वहिनी हे पुस्तक.
पुस्तक वाचनाबरोबरच आपल्या श्रोत्यांना सतत उत्तम काही द्यावं या हेतूने रविवारी जरा हटके लेखांचे वाचन त्यांनी सुरू केलं. त्यातही काही लेख खूप गाजले.
सोलापूरच्या “नापास मुलांची शाळा “ह्या लेख वाचनानंतर त्याला श्रोत्यांचा देणगी रुपी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातून त्या संस्थेला भरपूर देणगी मिळाली आणि अजूनही मिळतेच आहे. ही खरंच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे.
एरव्ही जरी ग्रूपचे सेटींग ॲडमिन ओन्ली असले तरी पुस्तक व लेख वाचनानंतर मात्र समूह सर्वांसाठी खुला होतो आणि श्रोते मुक्तपणे संवाद साधू शकतात. पुढच्या पुस्तकाची फर्माईश सुद्धा करू शकतात. या शिवाय आजुबाजूच्या जगात काय घडतय याच भान ठेवत रविवारच्या लेखाची निवड केली जाते. उदाहरणार्थ श्रीमति लता मंगेशकर यांच्या निधनानंतर वाचलेला त्यांच्यावरील लेख.
निलिमाताई आणि वैशालीताई या दोघींचीही वाचनाची शैली इतकी घरगुती आणि बोलकी आहे की समूहाचे ‘बोलकी लेखणी’ हे नाव शोभून दिसते.
माझ्यासारख्या मायदेशापासून दूर असणाऱ्या व्यक्तिला अस्खलित मराठी आवाज कानी पडल्यावर जो आनंद मिळतो तो शब्दात सांगणे कठीण आहे. ही पुस्तकं ऐकता ऐकता आपण रंगून जातो. पुस्तकांची निवडही अगदी जाणीवपूर्वक केलेली असते. लेखकाची रितसर परवानगी घेऊन. नाहीतर स्वतःच्या मनाने कुठलीही परवानगी न घेता पुस्तक अभिवाचनाचे व्हीडीओज टाकणारे कमी नाहीत.असो ..
एखादा उदात्त विचार मनात आल्यावर ताबडतोब त्यावर कृती करून आज असंख्य श्रोत्यांना वैशाली ताई आणि निलिमा ताई अनेक पुस्तकांतून, लेखांतून ज्ञानदानाचे आणि अभिजात मराठी टिकविण्याचे तसेच एक अमोल ठेवा वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत आणि ते ही एकही पैसा न घेता. हे एक उत्तम सामाजिक कार्यच आहे.
जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलकी लेखणी चे ऑडिओ ऐकवण्यात येतात.
ई लायब्ररी ठाणे ह्या ग्रुप वर पण बोलकी लेखणी चे ऑडियो ऐकवले गेले.
आपल्या स्वेच्छानिवृत्तीचा अतिशय उत्तम वापर या दोघी करत आहेत. वैशालीताई उत्तम चित्रकार आहेत. प्रसंगानुरूप त्यांची चित्रेही मधूनमधून येत असतात.
ही सर्व पुस्तके टेलिग्राम लिंकवरही उपलब्ध आहेत.
ही पुस्तके ऐकताना आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकल्याचा भास होतो. याला कारण दोघींचेही उत्तम आवाज व उत्तम वाचन. आज ही माहिती वाचकांपर्यंत पोहोचवताना मला अतिशय आनंद होत आहे. दोघींनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

– लेखन : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
फारच छान कल्पना वास्तवतेत उतरवली आम्हाजेष्ठ म़डळींना तर खुपचं सोयिचं वाटतं…चावुन खायचे कंटाळा तेंव्हा फक्त द्रवपदार्थ प्यावेसं सुखावह वाटतं तसं हे तुमचं आडिओ वाचन आनंद देतं….जय श्रीकृष्ण!!
बोलकी लेखणी या ग्रुपची मी एक सभासद आहे. यावरील ऑडिओज ऐकणे हा एक अवर्णनीय आनंद असतो.आत्ता सध्या केतकर वहीनी चे वाचन सुरू आहे. मी स्वतः कोकणात रहात असल्याने त्यातील काही अनुभव ही घेतले आहेत. दोघींच्याही बोलण्याचा ढंग प्रत्यक्षानुभवासारखा असतो.आणि पुढील भागाची उत्सुकतेने वाट पहायला लावणारा! ….खूप शुभेच्छा वैशाली ताई आणि निलिमाताई !!
Thanks for doing great social work. Please continue. Enjoying. Nice to see you through your photo.
SARITA Karandikar
बोलकी लेखणी अभिनव उपक्रम
अतिशय चांगला उपक्रम…!
मराठी भाषा ही सर्वसामान्य मराठी माणसांच्या व्यवहारातून आणि विशेषतः नवीन पिढीच्या बोलण्यामधून खळाळत राहायला हवी …
त्यादृष्टीने या उपक्रमाचं मोल फार मोठं आहे…
… प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007