सगळीकडे काल हनुमान जयंती साजरी झाली. त्या निमित्ताने जाणून घेऊ या हनुमान माहात्म्य…
संपादक
रामकथेबरोबर हनुमानाचा उल्लेख इतरही अनेक प्रसंगांतून आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत, ऐकत आलो आहोत. रामायणातील दोन गोष्टींचा इथे उल्लेख करतो. अनेकांना त्या माहितही असतील.
सीतेच्या शोधात राम आणि लक्ष्मण दंडकारण्यात पोहोचतात. रावणाचं साम्राज्य दंडकारण्यापर्यंत होतं. सीमेवर रावणानं हजारो राक्षसांना तैनात केलं होतं. राम लक्ष्मणाने आपल्या पराक्रमानं त्या राक्षसांचं पारिपत्य केलं आणि ते दक्षिणेकडे निघाले.
सुग्रीवाला हे समजलं. दंडकारण्याजवळच्या एका पर्वतावर तो निर्वासिताचं जीणं जगत होता. किष्किंधा राज्यातून त्याचा भाऊ वालीनं सुग्रीवाचा पराभव करून राज्य आणि सुग्रीवाच्या पत्नीला बळकावून त्याने सुग्रीवाला किष्किंधा राज्यातून हद्दपार केलं होतं.
राम आणि लक्ष्मण यांना वालीनं आपलं पारिपत्य करायला पाठवलं नसेल ना ? अशी सुग्रीवाला शंका आली. याची माहिती काढण्यासाठी त्याने आपला प्रधानमंत्री हनुमंताला पाठवलं. हनुमंत हा शक्तिबरोबर अनन्यसाधारण बुद्धिवान होता. त्याने सुग्रीवाला सांगितलं की, उत्तरेकडून आलेले हे राजपुत्र अतिशय पराक्रमी असून दोघांनी रावणाच्या हजारो सैनिकांचे पारिपत्य करून ते दक्षिणेकडे निघाले आहेत. ते आर्यपुत्र असून अशा पराक्रमी भावांशी आपण जर मैत्री केली तर त्यांची आपल्याला निर्वासित जीवनातून सुटका व्हायला मदत होईल.
सुग्रीवाने त्यांच्या पराक्रमाची परिक्षा घेऊन राम लक्ष्मण यांच्याशी युती केली. रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला किष्किंधा राज्य मिळवून दिलं. याबदल्यात किष्किंधाचे सैन्य सीता मुक्ततेसाठी रामाच्या मदतीला आलं. युध्दात रामाचा विजय झाला. यात हनुमंताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
हनुमंताच्या मुत्सद्दीपणाचा रामायणातील हा एक उल्लेख. सीतामुक्ततेनंतर लक्ष्मण आणि सीतेबरोबर राम अयोध्देला निघाले. अगदी चौदा वर्षाची सत्ता माणसाच्या मनात त्या सत्तेचा मोह निर्माण करते. भरताने तर अयोध्देवर चौदा वर्षे राज्य केले होते. रामासाठी राज्य सोडताना त्याच्या मनात खिन्नता आली का ? याची चाचपणी करण्यासाठी रामाने आपला विश्वासू हनुमंताला पुढे पाठवलं आणि सांगितलं की, “भरताला सांग की वनवास संपवून राम येत आहे”. हे सांगताना त्याची चर्या नीट पहा. जर त्याच्या चेहर्यावर थोडीजरी उदासीनता दिसली तरी मला येऊन तसं सांग. मी अयोध्देला जाण्याऐवजी परत वनात निघून जाईल”. पण तसं झालं नाही. भरत, राम परतण्याचीच वाट पहात होता.
पुढे हनुमंतानं रामसेवक याच भावनेतून जीवन व्यतीत केलं. बुध्दीवान, मुत्सद्दी असलेल्या हनुमंताच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्वाचा गुण रामायणात आढळून येतो. कुशाग्र बुध्दीचा हनुमंत हा प्रचंड शक्तिशालीही होता. राम आणि लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर नेणाऱ्या हनुमंताची चित्रं अनेक घरांतून पहायला मिळतात. याच्या सुरस कथाही आपण ऐकल्या आहेत. असं असूनही एक नम्र आणि विश्वासू सेवक याच भूमिकेतून हनुमंत जगला. आपली भूमिका ओळखून त्याच्याशी ठाम रहाणे हे यशस्वी जीवनाचे महत्वपूर्ण इंगित असते. हनुमंताने ते प्राणपणाने निभावले.
जीवनाच्या पूर्वार्धात सुग्रीवाचा आणि उत्तरार्धात रामाचा ‘विश्वासू सल्लागार’ही त्याची ओळख ठसठशीतपणे दिसून येते.
— लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800