स्त्री मुक्ती संघटनेनं प्रकाशित केलेल्या प्रा वृषाली मगदूम यांच्या ‘भवताल’ या पुस्तकाचे, नवी मुंबईतील स्त्री मुक्ती केंद्रात नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना
ज्येष्ठ पत्रकार तथा ग्रंथाली वाचक चळवळीचे प्रवर्तक दिनकर गांगल म्हणाले, ‘ हे पुस्तक आपल्याला इतकं अंतर्मुख आणि अस्वस्थ करतं की आतापर्यंत आपण जगून काय केलं ? हा प्रश्न आपल्याला भेडसावतो. यातली प्रत्येक गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. माझ्या मनात आलं की उद्यापासून काहीतरी ऍक्शन प्लॅन सुरु करावा.
वृषाली एव्हढी सेन्सिटिव्ह कशी – कामातही आणि लिखाणातही ? सगळ्या समस्या मला कळतात. पण यावर तोडगा काय ? या घडीला मला सुचलेलं उत्तर म्हणजे उत्तम गव्हर्नन्स हे होय. यातूनच जगण्याचा हेतू सापडेल, असा विचार त्यांनी मांडला.
लेखिका शिल्पा कांबळे, या पुस्तकावर आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, या पुस्तकातील ज्या बाया, मुली यांचं जे जगणं आहे ते मी पाहिले आहे, जगले आहे. बायकांचा सकाळ, दुपार, रात्र रेशनचा विचार डोकं खात असतो. रेशनिंगच्या रांगेत उभं राहून अनेक बायकांना मी रेशन आणून दिले आहे.वृषालीताईचं लेखन प्रथम दर्जाचं की दुय्यम हा प्रश्न नसून ते प्रथमच्या पुढचं विशेष श्रेणीतील आहे असं मला म्हणावसं वाटतं. कारण साहित्यिक लिहितो आणि गप्प बसतो. रस्त्यावर येणं, कुणासाठी लढणं हे टाळण्यासाठी मी लिहिते असं माझ्याबद्दल मला वाटतं. राधा या मरणासन्न अवस्थेतल्या लहान मुलीच पुनर्वसन असो, गव्हाण येथील कुमारवयात गरोदर राहिलेल्या नीलूला न्याय देण्यासाठीचा संघर्ष असो, या सगळ्या प्रसंगातून त्यांची तळमळ किती प्रामाणिक आहे हे दिसते. स्त्री पुरुष नात्यातले खूप बारकावे त्यांच्या लेखनात आले आहेत. अनेकदा त्या आपल्या प्रदीर्घ अनुभवामुळे व्यवहार्य काय आहे हेही शोधत असतात. ज्येष्ठांचे, समलिंगीचे प्रश्न मांडले आहेत. वृषाली
या दोनदा या ताणाचा, संघर्षाचा अनुभव घेतात. प्रत्यक्षात एकदा आणि नंतर लेखन करताना. आम्ही लेखक एकदाच या ताणातून जातो आणि मोकळे होतो. भवतालातला अंधार दाखवताना त्या प्रकाशाचा मार्ग दाखवतात’ असं सांगत त्यांनी या पुस्तकाची बलस्थाने दाखवून दिली.
आपल्या मनोगतात प्रा वृषाली मगदूम यांनी आपल्या सुरुवातीच्या काव्य लेखनापासून ते कथा, कादंबरी आणि आताच्या या कृतिशील सामाजिक- वैचारिक लेखनापर्यंतचा प्रवास हा संवेदनशील मन आणि आंतरिक उर्मीचा भाग असल्याचं सांगितलं. ‘मी माझ्या प्रदीर्घ सामाजिक कामात चुकत, शिकत गेले. नाउमेद न होता पुढे जात राहिले.जीवनात काही मूल्ये घेऊन जगत आले. जे गैर आहे, चुकीचे आहे त्याला नाही म्हणण्याची हिंमत माझ्यात आहे. सामाजिक कामात मी झोकून देते. कोणतेही काम तडीस नेणं हे माझ्या स्वभावातच असल्याने त्याचा रिझल्ट मिळतो.
एकदा असं झालं की ‘शायनिंगच्या दिवसातले रेशनिंग’ या माझ्या महाराष्ट्र टाईम्स मधील लेखाचा परिणाम म्हणून, दुसऱ्या दिवशी नरिमन पॉईंट येथील कार्यालयातील अधिकारी येऊन त्यांनी ७० बायकांना एका दिवसात रेशन कार्डे दिली ! असे काम झाल्याचे समाधान मिळते. तेच कागदावर उतरवण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नाही. मग मी पहिल्या फळीतील लेखिका की दुसऱ्या फळीतील हा विचार मला कधी शिवत नाही.’ असं सांगत त्यानी साहित्य निर्मिती प्रक्रिया आणि प्रांजळ लिखाणाचा प्रभाव विशद केला.
याप्रसंगी स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर यांचा पर्यावरणावर केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मटा सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय वेब पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने महाराष्ट्र महिला परिषदेच्या अध्यक्ष नीला लिमये यांनी त्यांचा अतिशय सुहृदयतेने परिचय करून दिला.
स्त्री मुक्ती संघटनेच्या संस्थापक शारदा साठे आजच्या परिस्थितीवर भाष्य करीत आपल्या समारोपीय भाषणात म्हणाल्या, ‘अनेक विचारांच्या संस्था, चळवळी आहेत त्या सगळ्या एकाच दिशेने जाणाऱ्या आहेत. त्याच त्याच गोष्टीं ज्या बिंबवल्या जातात त्याविरुद्ध आपण विद्रोह केला पाहिजे.आजची
परिस्थिती जातीधर्माच्या भिंतीत चिणून मारणारी आहे असं आपल्याला वाटत असेल तर आपण त्याला विरोध केला पाहिजे’. प्रत्येकाला स्वतंत्रपणे चालता
आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. . माझेच ऐकले पाहिजे, असेच केले पाहिजे या प्रवृत्तीमुळे समाज घडत नाही. सर्वांचं स्वतंत्र अस्तित्व टिकवत एकत्र येणारा समाज आपण घडवू या ‘
या कार्यक्रमात आदरणीय मधू मंगेश कर्णिक, लोकसत्ता चतुरंग पुरवणीच्या संपादक आरती कदम, प्रसिद्ध लेखिका आणि मौज प्रकाशनच्या संपादक मोनिका गजेंद्रगडकर आणि साहित्यिक इंदुमती जोंधळे यांचीही मनोगते व्हिडिओद्वारे प्रदर्शित करण्यात आली.
स्त्री मुक्ती संघटनेच्या या इमारतीत सुरु असलेल्या विविधांगी उपक्रमांचा उहापोह करत वृषाली मगदूम ही फिल्डवर काम करणारी सर्जनशील लेखिका असल्याचं ज्योति म्हापसेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं.
दूरदर्शन निवेदिका डॉ मृण्मयी भजक यांनी कार्यक्रमाची सुंदर गुंफण केली तसेच शेवटी उपस्थितांचे आभारही मानले.
नवी मुंबई परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.
कोरोनाच्या कहरामुळे दीड वर्षानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने घराबाहेर पडल्याचा आनंद अनेकजण व्यक्त करीत होते. त्यामुळे कार्यक्रम संपल्यावर आपसात भेटीगाठी, विचारपूस करत श्रोते रेंगाळताना दिसत होते.
– टीम एनएसटी 9869484800.