स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात ऊंच, 182 मीटरचा पुतळा गुजराथमध्ये केवाडिया येथे उभारला गेला.त्याचे उद् घाटन आपल्या पंतप्रधानांच्या म्हणजे मोदीजींच्या हस्ते झाले.त्या कलाकृतीचे वर्णन ऐकून, माहिती वाचून कधी एकदा तो पुतळा पाहते असे झाले होते.जे जे लोक तिथे भेट देऊन आले त्यांच्याकडून तिथले छान वर्णन ऐकून उत्सुकता आणखी वाढतच चालली होती.पण तिथे जाणं एवढं सोयीच नव्हतं कारण खूप चालावं लागतं असं ऐकल होतं.
पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग.झालं काय,आमच्या शाळेतल्या मैत्रिणींचा एक ग्रृप आहे.त्यांतल्या आमच्या सुनिलाने आपण हुरडा पार्टी करण्यासाठी सुरतला जाऊंया असं सुचवलं.कारण ती सुरतला बरीच वर्षे राहिली होती.आणि दरवर्षी हुरडा पार्टीची मजा लुटत होती.तिच्या तिथे ओळखीही खूप होत्या.
हुरडा पार्टी,सुरत हा विचार येतांच मी त्यांना म्हटलं की जर गुजराथमध्येच जायचयं तर आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीलाही भेट देऊया.मी असं म्हणताक्षणीच सा-याजणी तयार झाल्या इतकेच नाही तर त्यांचे नवरेही तयार झाले.हा विचार कुणालाच सुचला नव्हता आणि हा स्टॅच्यू तर सर्वांनाच पाहायचा होता.याला म्हणतात योगायोग!मग काय,लागा तयारीला!
आमच्या तीन मैत्रिणी पुण्याहून,एक जुहूवरून आणि मी बदलापूरवरुन पण आता ठाण्याहून येणार.तेव्हां सर्वांनी मिळून जायचं तर एक वाहनच हवे या विचाराने एक अकरा सीटर बस ठरवली.बस सुंदरच होती.सर्व सीटस् खिडकीपाशी. म्हणजे प्रत्येकाला बाहेरील निसर्ग सौंदर्य बघता येईल आणि हो,सीटस् पण हवे तसे मागे सरकणा-या!म्हणजे आरामात आडवे पडून बाहेरील गंमत पाहता येणार होती.एक मात्र बरे झाले.सर्व ठिकाणची रिझर्वेशन,एन्ट्रीफी याची जबाबदारी नव-यांवर सोपवलेली.त्यामुळे आम्ही एकदम फ्री!इतकचं नाही तर वाटेत चहापान,जेवण यासाठी कुठे थांबायचं हेही त्यांच्यावरच सोपवलेलं!चला तर,झाली तयारी आणि आम्ही 17 जानेवारीला निघालो. मजल दरमजल करीत रात्री आठ वाजतां आम्ही गरुडेश्र्वर येथे पोहोचलो.तेथे एका बिल्डिंगचे दोन ब्लाॅक आम्ही भाड्याने घेतले.जवळच छान रेस्टाॅरंट होतं.तिथे जाऊन जेवलो आणि ती रात्र भाड्याच्या घरात घालवली.
सकाळी उठून, आवरून केवाडिया या ठिकाणी निघालो वल्लभभाईंना भेटण्यासाठी ! सर्वप्रथम आम्ही जंगलसफारी करण्यासाठी तयार झालो.नानाप्रकारचे पक्षी जवळून पाहिले. फोटो काढले.नंतर हरणांचे कळप,पांढरी हरणं,छोटा बिबळ्या, पांढरा वाघ, सिंह सिंहिण आणि त्यांचा बछडा अशी सगळी जंगली जनावरं पाहून,फोटो काढून आम्ही पुढे सरकलो.
आतां लांबूनच पुतळा दिसत होता पण पुतळ्याचा चेहरा नर्मदा नदीच्या सरोवरांकडे वळलेला होता त्यामुळे त्यांचा संपूर्ण चेहरा पाहण्यासाठी आम्ही बोटीत बसलो. ती बोटसफारी खूपच छान झाली. नर्मदा नदीवर धरण बांधून मोठमोठी चार सरोवरे तयार केलेली आहेत.आणि त्या सरोवरांचे पाणी संपूर्ण गुजराथला पुरवले जाते. त्या चारही सरोवरांमधून आम्ही फिरलो.पुतळ्यास प्रदक्षिणा घातली.नर्मदेचे पाणी धरण बांधून सरोवरात जमा करुन गुजराथला पुरवायचे ही वल्लभभाईंची इच्छा होती.म्हणून त्यांचा चेहरा सरोवराकडे वळवलेला आहे.
बोटसफारी संपवून आतां आम्ही त्या पुतळ्याकडे वळलो.इतका उंच पुतळा,182 मीटर उंची.जगात सर्वात उंच पुतळा पाहून अभिमानाने मान उंचावली आमची! आणि दुसरे विशेष म्हणजे पुतळा हा जिवंत वाटावा अशी त्याची उभारणी.म्हणजे काय? असा प्रश्र्न आला असेल ना मनांत? तर म्हातारे होता होता शरीरावर,चेह-यावर सुरकुत्या येतातच ना.त्या सुरकुत्या या पुतळ्यावर इतक्या हुबेहुब कोरल्या आहेत की पुतळा जिवंत वाटावा.पुतळ्याची पाऊले चप्पल घातलेली आणि प्रत्येक बोटसुध्दां व्यवस्थित कोरलेले. ती कलाकृती पाहून तिथून हलूच नये असं वाटत होतं. L&T च्या सर्व कर्मचारी वर्गाचे वैशिष्ट्य घेऊन हा पुतळा उभा होता.तो कसा बनवला गेला याची झलक आम्हांला एल् अँड टी च्या ऑफिसात पाहावयास मिळाली. कारण सुनिलाचे यजमान तेथे वरच्या पदावर कामाला होते त्यांना ओळखणारी माणसे तेथे होती.त्यांच्याच एका कर्मचा-याने आम्हांला पुतळ्याची पूर्ण माहिती दिली.या पुतळ्याच्या पायातून एक लिफ्ट जाते.त्यांतून आपण वल्लभभाईंच्या हृदयापर्यंत पोहोचतो.तेथून बाहेर पडून नर्मदेचं सौंदर्य पाहू शकतो.हा पुतळा बनवण्यासाठी जे लोह लागले ते शेतक-यांनी दिलेल्या कुदळ,फावडे,कोयते अशा लोखंडी वस्तूंतून निर्माण केले आहे.या लोहाला जराही गंज चढू नये म्हणून त्याची साफसफाई दर आठवड्याला केली जाते.त्यासाठी लिफ्टमधून आम्ही जसे पुतळ्याच्या अंतर्भागात शिरलो तसे कामगार येतात आणि आणखी खोल खोल उतरून सफाई करतात. ही योजना आखणा-या आणि पूर्ण करणा-या मानवांना मुजरा !
आतां पुतळा बाहेरुन,आंतून बघून झाला.त्या परिसरातल्या इतर बागा पाहण्यासाठी आम्ही निघालो. बटरफ्लाय गार्डन, कॅक्टस् गार्डन आपण ब-याच ठिकाणी पाहतो पण विश्र्ववन ही नविनच संकल्पना होती.जगातल्या सर्व देशांभधील झाडे इथे लावलेली आहेत आणि त्या त्या झाडांपुढे त्यांच्या देशाचे नांव लिहिलेले आहे.
आरोग्यवन म्हणजे आयुर्वेदामध्ये ज्या ज्या वनस्पती औषधांसाठी वापरल्या जातात त्या त्या वनस्पतींची ही बाग.तसेच येथे प्रवेशद्वारावर सूर्यनमस्कार कसे घालतात त्या प्रत्येक हालचालीची माहिती देण्यासाठी पुतळे उभारले आहेत.यानंतर गार्डन ऑफ कलर्स ! या बागेत नाना रंगांची, नाना प्रकारची, नाना आकारांची पाने, फुले, झुडपे, झाडे पाहावयास मिळाली. सर्व रंगसंगती मनी प्लांट, पोनीटेबल पाम,अमरेक बौना, हंसराज, मोंडोग्रास, पेन्सिल पाईन अशा नवनवीन नांवांची झाडे बघण्यात वेळ कसा गेला ते कळलेही नाही. यांतून unity with nature ही संकल्पना मांडली गेली. इथे एक दुसरी मजा म्हणजे टेकडीवर चढून आजुबाजूचे दृश्य पाहण्यासाठी दोन जिने बांधलेले आहेत.पण त्या जिन्यांच्या मधल्या भागात अनेक वेगवेगळी झाडे लावलेली आहेत. तसेच जिन्यांच्या पाय-यांवर रंगीबेरंगी झाडांच्या कलाकृती झळकत आहेत.वर पोहोचताच आजूबाजूची सुंदर सृष्टी पाहावयास मिळते. तेथून खाली उतरुच नये असे वाटत होते.
आता आम्ही एक नवीनच जंगल पाहावयास गेलो.त्याचे नांव मियावकी फाॅरेस्ट.इथे एक नवीनच संकल्पना राबवली गेली आहे. एकमेकांसोबत वेगवेगळ्या प्रकारची झाडे इथे लावलेली आहेत.सर्व झाडे एकमेकांवर मात करुन जोरजोरात वाढतात.झाडे शेवटी सजीवच ना. त्यांच्यातही तूतू मीमी ! तुझ्यापेक्षां मी अधिक वाढतो की नाही बघच असं म्हणत सगळीच भराभर वाढतात.त्यांना फळेफुलेही भरपूर येतात.पण झाडे खूप उंच वाढल्याने त्या फुलाफळांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही.या फळांवर फक्त पक्षांचाच हक्क! निसर्गाने निसर्गाशी केलेली गट्टी !
आतां थोडी विश्रांती, जेवण करून आम्ही संध्याकाळी परत वल्लभभाईंकडे गेलो लाईट अँड म्युझिक शो पाहण्यासाठी! वल्लभभाईंच्या जीवनकार्याचा आलेख त्या शोमध्ये पाहून खूप छान वाटले. तेथून निघून आम्ही नर्मदेच्या काठावर आलो.गंगापूजनासारखे येथेही नर्मदापूजन होते. नर्मदेची आरती चार साधु हातात तबक घेऊन निरांजने ओवाळीत म्हणत होते.वातावरण एकदम शुध्द,पवित्र वाटत होते. सर्वात महत्वाचे म्हणजे इथे रोज पांच हजारापेक्षां जास्त पर्यटक येतात आणि सुट्टीच्या दिवशी तर ही संख्या पंधरा ते वीस हजारांपर्यंत वाढते.पण इथे कुठेही तुम्हांला थोडीशीही अस्वच्छता दिसणार नाही. सर्व परिसर एकदम स्वच्छ !
आता केवाडियाला नमस्कार करून आम्ही सुरतला जायला सज्ज झालो.अरे हो! पण एक गोष्ट राहून गेली होती.आमची मैत्रिण मीना नर्मदा परिक्रमा करून आली होती. ती म्हणाली की आपण इथे आलोच आहोत तर गरुडेश्र्वरचे दत्तमंदिर आणि टेंभे स्वामींचे समाधिमंदिर पाहू या आणि आम्ही ते दत्तमंदिर पाहिले. स्वामींची समाधि त्या देवळापासून खूप खाली होती. तेथून नर्मदानदीवरील प्रचंड धरण सुंदर दिसत होते. दत्तगुरुंचे आणि स्वामिसमाधिचे दर्शन घेऊन आम्ही निघालो.
सुनिलाची मैत्रिण शहा व तिचे मिस्टर यांनी आम्हांला सुरत दाखविण्याचा विडाच उचलला होता.दोघेही उत्सुकतेने आम्हांला जैनमंदिर, पार्श्र्वनाथ मंदिर, अक्षरधाम, स्वामी नारायण मंदिर इथे घेऊन गेले. सर्व मंदिरे सुशोभित केलेली होती. त्यानंतर नीलकंठ मंदिर पाहिले. मंदिरात प्रवेश नव्हता कारण ते मंदिर ठराविक वेळातच दर्शनासाठी खुले असते.पण आजुबाजूचा परिसर एवढा अप्रतिम होता की इथे बघू कां तिथे बघू असे होऊन गेले होते. श्रीकृष्णाचे गोप,गोपींबरोबरचे खेळ,कारंजांचे नयनमनोहर नृत्य, नटराजाची मूर्ती, सुंदर पिसारा फुलवलेले मयूर,नीलकंठवन,प्रवेशद्वारावर हत्तींची गर्दी असे शिल्पकलेचे एक एक नमुने बघतांना खूपच छान वाटत होते.इथून हलूच नये असं वाटत होतं. आता आम्ही सुरतचा किल्ला पाहावयास गेलो.गड,किल्ला म्हटलं की डोंगरावरील तटबंदी ,उंची डोळ्यापुढे उभी राहते.पण हा किल्ला खूप उंच नाही.पण तेथील नगरपालिकेने त्या किल्ल्याची दुरुस्ती करून तो पर्यटकांसाठी एक स्थळ म्हणून खुला केला आहे.
चला तर आता हुरडापार्टीला जाऊ या.पूर्वीप्रमाणे आतां इथे हुरडापार्टी होत नाही.पण हुरडा खाण्यासाठी एक गाव आहे रांधेर! आमच्या स्वा-या आता हुरडा कसा करतात ते पाहण्यासाठी उत्सुक झाल्या होत्या.कारण आमच्यातल्या कुणीही बहुदा हा अनुभव घेतलेला नसावा.बाजरीची कणसे एका चुल्हाणावर ठेवून शेकवित होते.नंतर त्यांतले बाजरीचे दाणे काढून ते एका यंत्रात टाकतात.तेथून ते भाजून बाहेर पडतात.हा झाला हुरडा! या हुरड्यावर शेव घालून आपल्याला खायला देतात आणि जोडीला खुसखुशीत भजी! खूप मजा आली हुरडापार्टीला ! आता तर जेवणासाठी पोटात जागाच नव्हती.आता सुरत फिरून झालं.
दुस-या दिवशी सकाळीच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.टूर संपली पण कधीच न विसरणारी! आमच्या पुणेकर मैत्रिणी रात्री अकरा,साडेअकरापर्यंत सुखरुप घरी पोहोचल्या.
— लेखन : स्वाती दामले. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800