१. भाऊबीज
आला सण दिपावली
नातलग झाले गोळा
भावा बहिणीचा स्नेह
दिस भाऊबीज आला
नाते भाऊ बहिणीचे
देते प्रेमास उजाळा
येते बहिण माहेरा
भाऊबीज सणसोहळा
ओवाळीते भाऊराया
नाही कसलाच हट्ट
सुखी ठेव भाऊराया
मनी सदा हाच घाट
ओवाळून भाऊराया
औक्षवंत हो म्हणते
त्याच्या सुखी संसाराची
भीक देवास मागते
बहिणीची माया न्यारी
भाऊ जीव ओवाळीतो
बहिणीच्या रक्षणार्थ
उभा पाठीशी राहतो.
— रचना : चंद्रशेखर कासार. धुळे
२. भाऊबीज
जपावे प्रेम बंध निरामय भावनेनं
बंधुभावाची शिकवण भाऊबीज सण IIधृII
सूर्यनारायण छायाचे यम यमुना संतान
यमुनानं बंधू यमास केले बोलावणं
यमाने घेतले ओवाळून दिले वस्त्राभूषण II1II
कार्तिक मासी शुद्ध पक्षातील द्वितीया दिन
तेजस वर्धमानता दावी द्वितीयेचा चंद्र
वैर संपून भावबंधन होते वृद्धिंगत II2II
शालू चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटास
वस्त्राहरणाचे वेळी येतो धावून श्रीकृष्ण
वसु चांदण्याच्या ज्योतीने करी चंद्रऔक्षण II3II
भाऊ जातो भगिनीकडे भाऊबीज निमित्त
बहिण गोड खाऊ देत करिते औक्षण
बंधू घाली ओवाळणी करी अभिष्टचिंतन II4II
बंधू भगिनींच्या प्रेमाचे संवर्धन दिन
समाज धर्मातील पवित्र धार्मिक सण
जपती आपापसातील नैतिक स्नेहबंधन II5II
–– रचना : अरुण गांगल. कर्जत–रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
