ज्येष्ठ समाजसेवक, लेखक, नामांतर आंदोलनातील लढ्वैये नेते, महाराष्ट्र शासनाचे समाजभूषण पुरस्कार प्राप्त, सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी सयाजीराव वाघमारे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आज, सोमवार दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात अभिष्टचिंतन सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली ही बातचित.
श्री वाघमारे यांना आपल्या पोर्टल तर्फे हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
कोणत्याही प्रकारची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वाने या दोन्ही क्षेत्रांत आपला वेगळा ठसा निर्माण करुन आतापर्यंत जी वाटचाल केली, काही प्रकरणात न्यायालयीन लढाई लढवून न्याय प्राप्त करून दिल्याचे समाधान व्यक्त करीत यापुढेही समाज कार्यासाठी जे जे करता येईल ते ते करीत राहू, असा ठाम विश्वास सयाजीराव वाघमारे व्यक्त करतात.
‘मी प्रथम भारतीय, अंतिमतः भारतीय‘ असा संदेश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. प्रत्येक भारतीयाची हीच भूमिका असली पाहिजे, असे सांगतानाच हे अभियान जिद्दीने पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सयाजीराव वाघमारे यांनी आपल्या आयुष्याचा एक मोठा टप्पा पूर्ण करीत ५ जानेवारीला वयाची ७५ वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना शुभेच्छा तर दिल्याच पाहिजे. शिवाय त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली पाहिजे.
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे १९४८ साली सयाजीराव वाघमारे यांचा जन्म झाला. आपल्या मुलाने शिकून सवरुन मोठे व्हावे, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. तशी त्यांच्याही आई-वडिलांची इच्छा होती. ती इच्छा सयाजीराव वाघमारे यांनी पूर्ण केली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९७० साली, वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर खात्यात नोकरीला लागून त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली. मात्र नोकरीत असतानाच त्यांच्या १२ मागासवर्गीय सहकार्यांना नोकरीतून कमी करण्यात आले, उद्या आपल्यावरही अशीच वेळ येऊ शकते, हे गृहीत धरुन त्यांनी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची स्थापना केली. एम.एस.मंडपे हे या संघटनेचे संस्थापक होते. तसेच मोठे आंदोलन केले. त्यामुळे नंतर या सर्व लोकांना शासनाच्या इतर विभागात सामावून घेण्यात आले. पहिलीच लढाई जिंकल्याचे अपार समाधान त्यांना लाभले. तेव्हापासूनच आपण स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हायस्कूलमध्ये शिकत असताना जातीचे चटके बसल्याचे सांगत गावामध्ये उच्च जातीचे लोक होते, ते मला पाहून हिणवत असत. तेव्हापासूनच सामाजिक न्यायासाठी आपण लढले पाहिजे, अशी मनाशी खूणगाठ बांधली आणि आजपर्यंत हे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
संघटनेत काम करीत असतांनाच वाघमारे दलित पँथर संघटनेशी जोडल्या गेले. अरुण कांबळे हे या संघटनेचे अध्यक्ष होते. मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे यासाठी हा लढा होता. गटागटाने हे आंदोलन लढल्या गेले. अखेरीस या लढ्याला यश आले.
दरम्यानच्या काळात गिरीशबाबू खोब्रागडे यांना वाघमारे यांची माहिती मिळाल्यानंतर ते भेटायला आले आणि खोरिपा या पक्षामध्ये येण्याची त्यांनी ऑफर दिली. अशा प्रकारे त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. ‘जयमित्र‘ या टोपण नावाने ते काम करु लागले. १९८६ ते १९९० पर्यंत या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत २००५ पर्यंत ते काम करीत होते. जवळ्पास १५ वर्ष ते राजकीय कार्यात सक्रिय होते.
खोरिपाचे आमदार उपेंद्र शेंडे यांनी नामांतराच्या आंदोलनावर निर्णायक लढा देण्यासाठी उपोषण सुरू केले. हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यात वाघमारेही सहभागी झाले होते. या लढ्याला अखेरिस यश आले. मात्र त्याचा पक्षाला पाहिजे तेवढा फायदा झाला नाही, असे त्यांनी सांगितले.
भारतीय राज्य घटनेचा अंमल सुरू झाल्यापासून १३-७-४ प्रमाणे नोकरभरती करताना राखीव जागा भरल्या जातात.
मागासवर्गीयांसाठी वरच्या वर्गाच्या जागा होत्या. परंतु उमेदवार नव्हते. तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या जागा भरल्या जात परंतु वरच्या वर्गाच्या जागा २०-२५ वर्षे भरल्या गेल्या नाहीत. मागासवर्गीयांचा हा बॅकलॉग भरला जावा यासाठी पदोन्नतीमध्ये आरक्षण हे धोरण शासनाने स्वीकारले. यासाठी विद्यमान खासदार उदित राज यांच्या परिसंघाच्या माध्यमातून या प्रश्नासाठी त्यांनी लढा दिला. वर्ग १ च्या पहिल्या स्टेजपर्यंत हे आरक्षण होते.
श्री सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना, पदोन्नतीमध्ये आरक्षण हे धोरण २००४ मध्ये कायदा करुन सर्व कॅडरला हे लागू झाले. पण त्यास फार विरोध झाला. मग त्याविरुद्ध ते सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे त्यांना अपेक्षित निकाल लागला. हा प्रश्न सोडवण्यात यश आले, याचे आपणास समाधान असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
दुसरा महत्त्वाचा प्रश्न महार इनाम वतनी जमिनीचा होता. १९५८ साली यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी महार इनाम वतनी जमिनी खालसा करण्याचा कायदा केला. हीच मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली केली होती, याची आठवण करून देत वाघमारे म्हणाले की, या जमिनीवर शासनाची मालकी होती. शासनाने या जमिनी आम्हाला देऊ केल्या होत्या परंतु त्या बदल्यात १३ पट रक्कम भरावी ,असे सांगितले. परंतु महार समाजाने त्यांच्यातील अज्ञानामुळे त्यात रस दाखवला नाही. मात्र धनदांडग्यांनी या जमिनी बळकावल्या व त्या मालकी हक्काच्या करुन घेतल्या. हे बेकायदेशीर हस्तांतरण रद्द व्हावे म्हणून २००६ सालापासून आपण हे आंदोलन चालवत असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
१९७८ साली नामदेव ढसाळ यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना हा प्रश्न समजावून सांगितला. त्यानुसार त्यांनी शासकीय धोरण जाहीर करीत सर्व जिल्हाधिकारी यांनी या जमिनी परत करण्याबद्दलची कार्यवाही सुरू करावी, असे आदेश दिले. परंतु समाजाचे अज्ञान आणि शासनाची उदासिनता यामुळे हा प्रश्न रेंगाळत पडला असल्याचे सयाजीराव वाघमारे म्हणतात. यासाठी समाजातील तरूणांनी पुढे आले पाहिजे, असेही वाघमारे यांचे म्हणणे आहे. हा प्रश्नही आपण आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळल्याचे समाधान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भूमीपुत्रांना त्यांच्या जमिनीपासून वंचित केले जावू नये, असे यूनोला वाटते आणि तसे जागतिक धोरण असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
साहित्य लेखनास कशी सुरवात झाली ? असे विचारले असता ते म्हणाले, वाचनाची मला सुरवातीपासूनच आवड होती. सामाजिक, राजकीय प्रवासामधून मला जे वाटले ते समाजाला कळावे, हाच माझ्या साहित्य निर्मितीचा पाया आहे. ‘भावकी,’ ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे खुले पत्र,’ ‘एका भीम सैनिकाचे पतन’, ‘महार इनाम वतनी जमिनी आणि सरकार’, नामांतर आंदोलनावर ‘घडलं हे असं’ आदी पुस्तकांचे लेखन वाघमारे यांनी केले आहे.
‘यसकर’ ही कादंबरी आणि ‘दलित पँथरचे वास्तव चित्र’ अशी दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन मुली व एक मुलगा असा वाघमारे यांचा परिवार आहे. मोठी मुलगी वकील आहे, तर मुलगा फोटोग्राफीचा स्वतंत्र व्यवसाय करीत घरची शेती सांभाळत आहे.
श्री वाघमारे यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
श्री.वाघमारे यांस त्यांच्याअमृतमहोत्सवीच्या लाख लाख शुभेच्छा ! त्यांच्या पुढील वाटचालीस यशोमय शुभेच्छा !
छान माहिती वाचनास मिळाली.
धन्यवाद सर !
साहेब,सयाजी वाघमारे यांच्या कर्तबगारीचा आलेख आपण सुंदर पद्धतीने मांडला… त्यांच्या संघर्षाला सलाम अभिनंदन 🙏🙏🙏
Nice Article.अत्यंत समर्पक वर्णन 👌👌👌
Sirjee.
We had met before…
My no. 8169881559
Would like to Speak to you.