बघ बहु रूढ ते भारुड ! म्हणजे समाजात जे परंपरेने ऐकलं जातं ते भारुड असते किंवा भारुड नावाचा दोन तोंडाचा पक्षी असतो. तर दोन अर्थी संदेश देणारे ते भारुड असं म्हटलं जातं.
मनीं नाही भाव म्हणे
देवा मला पाव
देव अशानं पावयाचा नाही रे
देव बाजारचा भाजीपाला नाही रं !!धृ!!
दगडाचा देव त्याला वडराचं भेव
लाकडाचा देव त्याला अग्निचं भेव
देव अश्यां न पावयाचा नाही रं
देव बाजारचा भाजीपाला नाही रं !!1!!
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव
सोन्याचांदींचा देव त्याला चोरांचं भेव
देव अश्यां न पावयाचा नाही रं
देव बाजारचा भाजीपाला नाही रं !!२!!
देवाचं देवत्व आहे ठाई ठाई
अहंकार मेल्याविण अनुभव नाही
तुकड्या दास म्हणे ऐका ही द्वाही
देव अश्यां न पावयाचा नाही रं
देव अश्यां न पावयाचा नाही रं
देव बाजारचा भाजीपाला नाही रे” !!३!!
मानवमुक्तीसाठी केले जाणारे प्रबोधन जे प्रतीकात्मक दृष्टीने केले जाते, त्या कलाप्रकाराला भारूड म्हणतात. आयुष्यभर शिकूनही होणार नाही इतका भारुडाचा विविधांगी अभ्यास आहे. शुभ कार्याच्या सुरुवातीला गणरायाची आराधना विघ्नहरण करते. कोणत्या गणरायाला नमन करू ? अशी प्रार्थना होते.
गजानन पूजन करून भारुड सुरु होते. ज्यामुळे मग वातावरण निर्मिती होते. सृष्टीतील एकही घटक वंचित राहता कामा नये. मानवी प्रकृती, कुत्रे, टिटवी, पिंगळे, बैल, गाय, लग्नकार्य या सर्व विषयांवर भारुड लिहिली गेली आहेत. आपण संकटात वेगवेगळ्या देवांकडे देव ऋषींकडे जातो अर्था पेक्षाही अनर्थ होतो. तो तुझ्यासाठी होतो. देह म्हणजे ५ धारेचे लिंबू आहे. या पाच धाऱ्या म्हणजे पंचेंद्रिय होय. देहाला काहीच किंमत नाही म्हणून तर आत्मा निघून गेल्यावर देह विसर्जित केला जातो. त्या देहातली आत्म्याची सद्बुद्धीची किंमत आहे. ज्ञान मिळाले की देव मिळतो. नामस्मरण केले की देव मिळतो. भारुड हेच शिकवते.

आपण नारळ फोडतो का ? खर तर आपण मायारूपी नारळ फोडायचे व अहंकार रुपी कोंबडा मारायचा आहे. संमोहित झाल्यासारखा मानव भ्रमित होतो. मोहाचा पडदा त्याच्या डोळ्यावर पडला की फसतो. आपला परका वय काळ, वेळ निती मानव विसरून जातो. त्यामुळे आधी विकार शांत व्हायला हवा. अपघात वेळेच्या आत सुयोग्य वेळी तो विकार शांत व्हावा. कर्माचे फळ मिळाले की उशीर होतो. नामस्मरण केले की देव मिळतो. भारुड हे शिकवते. आपण नारळ फोडतो तसा आपण मायारूपी नारळ फोडायचा व अहंकार रुपी कोंबडा मारायचा आहे संमोहित झाल्यासारखा होतो, मोहाचा पडदा त्याच्या डोळ्यावर पडला की आपला परका वय काळवेळ निती मानव विसरून जातो. त्यामुळे आधी विकार शांत व्हायला हवा. वेळेच्या आत सुयोग्य वेळी तो शांत व्हावा. अपकर्माचे फळ मिळाले की उशीर होतो.
नामस्मरण केले की देव मिळतो भारुड हे शिकवते. जीवनात दुःख सागराऐवजी दुग्ध सागर बनवा. रक्त मासात आपण गोचडी प्रमाणे घट्ट चिकटून बसतो. नाथांनी संदेश दिले आहेत. मनाच्या मांडीवर बसून आपण मनातच मांडे खातो आहोत. हे अधोगतीचे भूत ही असू शकतो किंवा आत्मोन्नतीचा दूत ही असू शकतो. भूत चांगली अथवा वाईट दोन्ही भावना देते. त्यामुळे “भूत जबर मोठ ग बाई” असं सुद्धा एक एकनाथांनी भारुड लिहिले आहे. भावना श्रद्धेने राहीले नाही तर माणूस विकृत बनतो. सूप चाटू या वस्तूंनाही नाथ महाराज देव मानतात. कारण मन स्थिर नाही पण या वस्तू स्थिर आहेत. काही तरी हवे म्हणून मानव देवाला साकडं घालत सुटला आहे. तो क्षणिक हवा आनंद हवा आहे. जी वस्तू हातात आली की आसक्ती संपते. उदाहरणार्थ लग्न झालं, घर मिळाले, नोकरी मिळाली की आसक्ती संपली की नव्या सुखाच्या मागे माणूस जाऊ लागतो. दैवी परम आनंदाची ओढ कुणालाच नसते. जीवन असंच संपून जातं.
“पावसा तू असा मी असा“ अशी गाणी गाणे, पाऊस हवा त्यावेळी, त्या साठी बेडकाचं लग्न लावणे. कणकेचे दिवे करणे अशा गोष्टी अंधश्रद्धा आहेत. उदाहरणार्थ भारुड “गव्हाची दिवे शिजली मावशी” एकाच वस्तू पासून अनेक वस्तू बनवणे. एकाच विचारा विकाराअंतर्गत सर्व क्रिया आहेत.
सरूपता, समीपता, सलोखा, संयोजकता भारुडात आहे. या चार भक्तिमार्गाचा पायऱ्या आहेत. त्याही मानवाने विकल्या. सिकंदराने जग जिंकलं पण एका तत्त्वज्ञान अभ्यासकाने सांगितलं, “तू तुझ्या आत्म्यासाठी काय केलं ?” त्यावेळी वेळ निघून गेली होती. प्रत्येक सिकंदराचे प्रेताचे हात मृत्यूनंतर रिकामे लटकत राहतात. तिरडी ही बांबूची राहते. दोन बांबू आणि पाच पायऱ्यांच्या मध्ये मानवाचा देह, शरीर स्मशानापर्यंत नेले जाते आणि संपते. हात हलवत शेवटी वर जावं लागतं. देवाने दिलेल्या बुद्धीने कोणाचे भले होणार नाही का? ती बुद्धी वापरली तर होते. मनुष्य आठवणीने खाण्यासाठी गहू का आणतो ? ते त्याच्या लक्षात राहते. प्रत्येक वस्तूसाठी आपण तडफडतो. नवा मोबाईल हवा म्हणून तडफडतो. पण आत्मा मात्र विसरतो. बाह्य सुखात आत्मा रमत नाही. वासना तृप्तीचे खाण्याची मजा करण्याचे अनेक प्रकार असूनही त्या आत्म्याला या गोष्टींबद्दल आसक्ती वाटत नाही. पण उपभोग मात्र आत्म्याऐवजी इतरच कोणीतरी म्हणजे शरीर घेते. विषाचा प्याला प्यायची पायरी जी पार करते ती मीरेची भक्ती होय. या जगात स्वयं भु काहीच नसतं. जे असतं ते मानव निर्मित असतं. कर्म करून माणूस देव होतो. माणसाचा देव होईल या आशेने भारुडात देवाला देह, मानवी देह दिला आहे.
“तुम्हाला सांगते वेगळे निघा वेगळे होऊन संसार करा” या भारुडात वेगळ्या विचाराने जग बघा. सर्व गैरसोयी मध्ये सुद्धा वेगळ्या नजरेने तुम्ही या जगाकडे बघा.
“तुम्हा सांगते वेगळे निघा वेगळे निघून संसार करा” हे सुद्धा एकनाथ महाराजांचे एक भारुड आहे. संयोजकता म्हणजे विधी नाट्यासाठी लागणाऱ्या सुखसोयी जमवणे. संसारात न मिळालेल्या गोष्टी तुम्ही मिळवा, असे नाथ महाराजांनी सुचवले आहे. एका पारड्यात श्रीकृष्ण देवाला तराजूत तोललं पण देवच इतर ऐहीकाहून श्रेष्ठ ठरला असेही भारूड आहे.
नवरासुद्धा दुसऱ्याचा असतो. मुलं परक्याची असतात. ऐहिक सुख मागण्यासाठी नवस करून देवाला साकडे घातले जाते. काहीतरी देऊन त्याच्या बदल्यात काही तरी मागितले जाते. नवस देऊन साम-दाम-दंड-भेद रुपाने देवा कडून वसूल केली जाते. देवाला आपल्या मनासारखे वागायला भाग पाडलं जाते. असा आपण गैरसमज करून घेतलेला असतो. मनुष्याचे प्रत्येक रूप वेगळे प्रत्येक देह वेगळा माणूस जात एकच असते. तसेच रूप वेगळे असले तरी देवाची रूपे निराळी तरी त्यातील आदिशक्ती एकच असते. नित्य दर्शनात येणाऱ्या पिंगळा वासुदेव सेवक यांच्यातर्फे यापैकी काही भारुड एकनाथ महाराजांनी ही भारुड जनमानसात पसरवली.

संवत्सरे बदलतात. काळ बदलतो. सुरवंटाचे फुलपाखरू जेव्हा कोषातून बाहेर पडते तेव्हा ती तडफड बघवत नाही. पण ती धडपड प्रत्येकाला स्वतःची स्वतः करावी लागते. पण त्यामुळे त्या धडपड्याचे पाय मजबूत होतात. जगण्यासाठी ही धडपड जन्मापासूनच करावी लागते.
भारूडांमध्ये नाथ महाराजांनी पुढे स्त्रीभ्रूणहत्या होतील ही भीती त्या काळी व्यक्त केली होती. सुंदर फुलपाखरू बनण्यासाठी वेदना सोसा असे भारुड सांगतात. खायला जेवणावळीला लोक फुकट जमतात आणि भूत दिसले की पळून जातात. हे भूत म्हणजे संकट, आजार, गरज सुद्धा असू शकते. एका गोष्टी पाठीमागे दुसऱ्या गोष्टीची ओढ लागते. मानव हा भाडेकरू आहे. परमेश्वर या देहरूपी घरातून मानवाला कधी बाहेर काढेल, तेही सांगता येणार नाही. माणसाची वॉरंटी गॅरंटी नाही आणि प्रेत रुपी देहाला नंतर काहीही किंमत नाही. जीवन कथेच्या मधले शब्द बदलण्याचे स्वातंत्र्य देव मानवाला देतो. पण चित्रपटाचा अंत क्लायमॅक्स देवाने ठरवलेला असतो. ते जीवन सात्विक राहावे. अध्यात्मिक साधनेने प्रबोधन होत रहावे. जीवन म्हणजे मनोरंजन नसून त्यात नैतिक अधिष्ठान हवे. शब्दांचे मनाशी नाते ठेवावे असे एकनाथ महाराज भारुड त्यांच्या भारुडात सांगतात.
सुरुवातीला प्रत्येकच गोष्ट अवघड वाटते, पण पुढे सराव आणि अनुभव यामुळे ती सोपी वाटते. भारूडामध्ये मानवाचे विकार, देवावर टाकले जातात व शेवटी सद्गुणांचा संदेश देतात.
उदा: अति दानाने इतरांवर अधिक दया करून स्वतःला रस्त्यावर आणायचे का ?
म्हणून थोडे दान करावे व विषय रुपी भूतांपासून दूर रहावे. देव मिळणे सोपे नाही तो बाजारातला भाजीपाला नाही की जो बाजारात विकत मिळेल असे भारुड सांगतात.
१ भूत जबर मोठ ग बाई,
२ विंचू चावला,
३ काट्याच्या अणीवर वसली तीन गाव,
ही लोकप्रिय आणि प्रसिद्ध भारूड आहेत. एक तरी भारुड हा लेख वाचल्यावर जरूर ऐका. त्यातला आनंद वेगळाच असतो.

— लेखन : शुभांगी पासेबंद. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
धार्मिक साधनाने सामाजिक प्रबोधन करण्याचे भारूड ही अनोखी महाराष्ट्रीयन माध्यम .लेख अभ्यासपूर्ण.