खूप होतोय आनंद
ऊर्जा तुमची पाहून
केले जोरात स्वागत
दुर्वा मोदक वाहून
केली सजावट भारी
हार विविध रंगांचे
प्रकाशले ते मखर
दिवे विशेष ढंगांचे
कुंकू बुक्का नि गुलाल
लावियला तो कपाळी
आरतीचे ताट शोभे
निरांजनी दिपकांनी
मखरात बैसुनिया
मनी विचारांची लाट
आहे उपाशी गरीब
माझे पक्वानांचे ताट
कुणी बेकार ते झाले
हरवला रोजगार
दुष्ट कोरोनाच्या पायी
त्यांना मिळेना पगार
कुण्या घरातील कर्ता
भाऊ बहीण वा आई
गेले दूर दूर जगी
कुणी बुवा कुणी बाई
दुःख त्यांच्या डोळ्यांतील
मला पाहवेना आता
कसे करता येईल
दुःख दूर त्यांचे आता
दैन्य, दुःख नि वेदना
अंतरीच्या त्या मिटवू
आणू मुखावर हास्य
त्यांच्या यातना हटवू
साधेपणा तुम्ही करा
करा थोडक्यात विधी
धान्य वाचवा जरासे
गोळा करा काही निधी
करा साखळी तयार
हात हातात घेऊन
करा मदत तयांना
घरी तयांच्या देऊन
मास्क घालूनच पडा
तुम्ही बाहेर घराच्या
ठेवा थोडेसे अंतर
ओळखी न् परक्याच्या
करा जाणीव जागृती
अंधश्रद्धा साऱ्या सोडा
करा विचार बुद्धीने
त्याच प्रगतीत खोडा
साबणाने धुवा तुम्ही
सतत तुमचे हात
मग करू शकू सर्व
त्या बिमारीवर मात
शेतकऱ्यांच्या डोळ्यांत
कधी अश्रू येऊ नये
निसर्गाने शासनाने
त्यांना त्रास देऊ नये
व्हावे सर्वांचेच भले
सर्व राहोत सुखात
आनंदाने मग माझ्या
घास जाईल मुखात
मुखी पडेल सर्वांच्या
पुरे पोटभर अन्न
मग खात्री देतो तुम्हां
होई तेव्हा मी प्रसन्न
– रचना : प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे