देवा हो देवा गणपती देवा
गीत : देवा हो देवा गणपती देवा
चित्रपट : हमसे बढ़कर कौन (१९८१)
दिग्दर्शन : दीपक बहरी
गीतकार : रविंद्र रावल
संगीतकार : राम लक्ष्मण
कलाकार : मिथुन चक्रवर्ती, विजयेंद्र घाटगे, रंजीता, अमजद खान, डॅनी डेन्झोंगपा, काजल किरण, पद्मिनी कपिला आणि रणजीत.
गायक : मोहम्मद रफ़ी, आशा भोसले, भूपिंदर सिंघ, शैलेंद्र सिंघ, सपना चक्रबोर्ती
देवा हो देवा गणपति देवा
तुमसे बढ़कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कौन
और तुम्हारे भक्तजनों में हमसे बढ़कर कौन
या गाण्या शिवाय गणेशोत्सव पूर्णच होऊ शकत नाही असे मला वाटते! सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने मी आज याच गाण्यावर लिहायचे ठरवले. पहिली गोष्ट म्हणजे मला या गाण्यामुळे आपल्या मायदेशी जाऊन आल्यासारखे वाटते आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे लहानपणात एक फेरफटका मारून आल्याचा आनंद मिळतो !
मला आठवतंय प्रत्येक गणेशोत्सवाच्या आधी घरी सगळी साफसफाई सुरू व्हायची. आमच्या घरी गणपती आणि गौरी दोन्ही असल्याने त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी फराळाच्या पदार्थांची तयारी तीन चार दिवस आधी सुरू व्हायची. पण सजावट, मखर यावर जितका हल्ली प्रत्येकाच्या घरी भर दिला जात असतो, तसे माझ्या माहेरी नव्हता. अतिशय साध्या पद्धतीने केवळ दोन फ्लॉवर पॉट मध्ये घराच्या ताज्या फुलांचा गुच्छ आणि समोर काढलेली रांगोळी एवढीच काय ती सजावट असायची.
गौरी गणपती साठी पाट स्वच्छ पुसून ठेवणे, रोज पूजेसाठी फुले, दुर्वा, तुळस इत्यादी बागेतून आणणे ही माझी जबाबदारी असे. फळे सुद्धा बागेतली असायची. लागतील तेवढीच बाहेरून आणायची.
बाहेर मात्र गल्लोगल्ली रस्ता खणून मांडव घातले जायचे. वर्गणीसाठी दर वर्षी कोणीतरी यायचे आणि मग वडिलांकडून लाऊड स्पिकरच्या वरून बोलणी खायचे! वडील द्यायचे वर्गणी पण त्या पोरांना चार चांगल्या गोष्टी ऐकवूनच! ती मंडळाची पोरं कितपत ऐकायची कोण जाणे, कारण एकाही वर्षी आवाज कमी झाल्याचे कोणालाही जाणवले नाही !
या लाऊड स्पिकरच्या गाण्यांमध्ये सकाळी सकाळी लागणारे एक गाणे म्हणजे हेच – देवा हो देवा गणपति देवा
मुळात हे गाणे तसे ठीक होते, पण आम्ही मोठे व्हायला लागलो तसे सगळे बदलायला लागले. असे जाणवायला लागले की भलती सलती गाणी लागायला लागली होती. कित्येक वेळा प्रेमालाप, किंवा बीभत्स शब्दांकन असलेली गाणी पण वाजू लागली. एक वेळ पन्नास वेळा लागणारे हे गाणे तरी देवाचेच होते, पण बाकीची गाणी केवळ असह्य व्हायची. मग मात्र माझ्या वडिलांना फार राग यायचा यांचा. ते म्हणायचे की एवढ्या बेंबीच्या टोकापासून ओरडून ओरडून असली गाणी हे लोक लावतात, ती ऐकून तो गणपती काय येणार आहे का ? अशाने पळून जाईल तो. पण हे ऐकायला दहा दिवस हक्काचे कान आमचेच असायचे! असो.
माझे वडील काही एकटे नाहीत बरं का ! माझी एक मैत्रीण जी आता रिटायर्ड आहे तिचाही हाच आक्षेप. ती मला सांगत होती की प्रत्येक गणपती उत्सवात हे गाणं ऐकून ऐकून कान किटायचे. दिवसातून कमीत कमी २५ वेळा तरी लागायचे आणि तेही full volume मध्ये. अक्षरशः घराच्या भिंतीवर त्यांचे vibration जाणवायचे. म्हणजे हेच गाणं नाही अशी बरीच गाणी होती. त्यात चोली के पीछे क्या है ह्या वरून तयार केलेले.. सुंड के नीचे क्या है, हे ही गाणे ! पुढे अजून काही विचारायची मी हिंमतच केली नाही. कारण अशा प्रकारची गाणी ऐकून मीही नंतर वैतागायला लागले होते. एकीला तर हे गाणेच आवडत नव्हते कारण या चित्रपटात चोरी, डकैती वगैरे होते. (चित्रपटाची कथा सांगिनच नंतर.) अजून एक मैत्रीण सांगत होती की दारु पिऊन अश्लील गाण्यांवर वाट्टेल त्या अवस्थेत लोक गणपतीपुढे नाचत असायचे, म्हणून तिला गणपतीसमोर गाणी वाजवणे हा प्रकारच आवडत नाही.
या गाण्यासंबंधी अजून एकीने तर वेगळाच अनुभव सांगितला ! खरे तर आता तिला सांगताना हसू येत होते आणि मलाही ऐकताना हसू आले. पण त्या वेळी नक्कीच मुली घाबरल्या असणार ! झाले असे की त्यांच्या कॉलेजमध्ये एका समारंभात देवा हो देवा या गाण्यावर नाच होता. तर एक मुलगा सारखा रेवा ओ रेवा म्हणून नाचत राहिला ! ही गोष्ट वास्तविक पाहता गंभीर प्रकार आहे. गणपती बाप्पाच्या गाण्यावर एका मुलीची छेड काढणे हे किती असभ्य वर्तन आहे आणि विचार करा तिला किती त्रास झाला असेल. आणि ही गोष्ट आहे ८० च्या दशकातली.
आज भारत जो बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये अव्वल क्रमांकावर आहे, ते अचानक एका दिवसात घडलेले नाही. हा सामाजिक बदल गेले अनेक दशके होत आहे आणि दुर्दैवाने ही गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नाही. बॉलिवुडच्या गाण्यांवर थिरकत कधी आपल्या समाजाने नैतिकतेची वेस ओलांडली हे कोणाच्याच ध्यानी आले नाही. अर्थात्, त्यात या गाण्याचा दोष नाही, तर त्या गाण्याचा अयोग्य वापर करणाऱ्या माणसांच्या मानसिकतेचा आहे.
खरं सांगू, मला वाटतंय की म्हणूनच रात्रीचे देखावे बघायला मला कधी घरून परवानगी नसायची. अर्थात्, लाऊड स्पीकर आणि वडिलांचे समीकरण न जमल्याने आई मला एकटीला घेऊन जायची संध्याकाळी गणपती बघायला, पण जेवणाच्या वेळेपूर्वी परत यायचे हा मात्र अलिखित नियम! कदाचित त्यांना हे सगळे घडणारे अपप्रकार माहीत असावेत आणि मला संरक्षण देण्यासाठीच त्यांनी हे सगळे नियम घातले असावे.
मला मात्र हे गाणे खूप आवडायचे आणि अजूनही आवडते. अतिशय दृत गतीचे असलेले हे गाणे तुम्हाला नाचायला भाग पाडतेच ! शिवाय त्यात जो भक्तिभाव प्रकट केला आहे, त्यामुळे मला ते भक्तीगीत आहे असेच वाटायचे. माझ्या मते जितकी मंगेशकर भावंडांनी गायलेली गणपतीची गाणी असतील तितकेच त्या काळी हे गाणेही वाजवण्याची प्रथा पडली होती.
आठवतंय का सकाळी सकाळी भूपाळ्या सुरू व्हायच्या उठा उठा हो सकळिक, आणि मग एकेक करून सुखकर्ता दुःखहर्ता, गणराज रंगी नाचतो, इत्यादी गाणी लागायला सुरुवात व्हायची, मग मधेच देवा हो देवा ही लागायचे आणि खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचे वातावरण आहे असे वाटायचे. अर्थात, कर्णकर्कश आवाज ठेवण्याची गरज नव्हती म्हणा. त्या बाबतीत मी सगळ्यांशी सहमत आहे, पण तरी मला वाटते की वातावरण निर्मिती होऊन एक वेगळीच ऊर्जा संचारायची.
गेली ४० वर्षे बॉलिवूडमध्ये गाजत असलेले हे गणेशगीत, १९८१ साली प्रदर्शित झालेल्या “हमसे बढकर कौन” या चित्रपटातील आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला नसला तरी चार दशकांनंतरही हे गाणे आजही प्रसिद्ध आहे. या गाण्याच्या यशानंतर अशा प्रकारची गाणी अनेक चित्रपटांमध्ये घेण्यात आली. एकप्रकारे हे गाणे ट्रेंडसेटर म्हणता येईल. गणेशजी हे चित्रपटांचे लाडके दैवत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
हे गीत १९८० च्या मिथुन पटांच्या जमान्यात तुफान गाजले होते. या गाण्यावर नाच करण्यात तत्कालीन दिग्गज म्हणजे गरिबांचा अमिताभ अशी ख्याती असलेला मिथुन चक्रवर्ती होता. डॅनी आणि विजयेंद्र घाटगे हे कलाकार होते. दीपक बहरी दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन चित्रपट आहे. मिथुन चक्रवर्ती, विजयेंद्र घाटगे, रंजीता, अमजद खान, डॅनी डेन्झोंगपा, काजल किरण आणि रणजीत.
गंमत म्हणजे गणपती बाप्पाने बॉलिवूड इंडस्ट्री मधल्या सगळ्यात नावाजलेल्या खलनायकांना, अमजद खान, डॅनी डेन्झोंगपा आणि रणजीत यांना या सिनेमात आणि खास करून या गाण्यात एकत्र आणले.
बॉलिवुडचे one and only गब्बर सिंग म्हणजेच अमजदखान हे चक्क आरती करताना दिसतात. ज्या थोड्या सकारात्मक भूमिका अमजद खान यांनी केल्या, त्यातली ही एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटात अतिशय भोळे भाबडे, पाप भिरू, सन्मार्गी व्यक्तिमत्त्व चितारले आहे, ज्याला थोडी कॉमेडीची सुद्धा (विनोदी भूमिकेची) झालर आहे.
प्राणलाल मेहता यांच्या या चित्रपटातील हे गाणे गाजले ते मुख्यत्वे मराठी ढंगाचा संगीतकार राम-लक्ष्मण यांच्या संगीतामुळे. ठेकेबाज गाणी देणे हे राम-लक्ष्मण यांचे संगीताचे वैशिष्ट्य असल्यामुळे या गाण्यावर नाचायला कलाकारांना फारशी मेहनत घ्यायला लागलीच नसेल, असे वाटते.
मोहम्मद रफी, भूपेंद्रसिंग, शैलेंद्रसिंग, सपन चक्रवर्ती आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे मल्टीस्टारकास्टसाठी गायलेले आणि चित्रित केलेले गीत हा चित्रपट कालबाह्य झाला किंवा कुठे पाहायला मिळेनासा झाला, तरी गाण्याच्या रूपाने जिवंत आहे. गेली तीस र्वष या गाण्याशिवाय गणेशोत्सव साजरा होतच नाही. हे गीत रवींद्र रावल यांनी लिहिले आहे.
हे गाणे अमजद खान, पद्मिनी कपिला, रंजीता, मिथुन चक्रवर्ती, डॅनी, विजयेंद्र इत्यादी अनेक कलाकारांवर चित्रित केले आहे. बहुतेक पुरुष कलाकारांना त्यांचे स्वतःचे पार्श्वगायक मिळाले आहेत. उदा. रफीच्या आवाजात अमजद खान, शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात मिथुन, भूपिंदरच्या आवाजात डॅनी वगैरे. पण आशा भोंसलेचा आवाज सर्व महिलांना शेअर करावा लागला. पुरुष गायकांना घेतल्यावर निर्मात्याचे बजेट संपले की काय म्हणून एकच गायिका घेतली, असा प्रश्न मनात चमकून गेला!
आधी म्हटल्याप्रमाणे चित्रपटाचे कथानक थोडक्यात सांगते. राधा (पूर्णिमा दास वर्मा – मूळ नाव मेहरबानो मोहम्मद अली) तिचा पती मोहन (कलाकाराचे नाव कळले नाही) आणि चार मुले, चंदन, राजू, बबलू आणि पप्पू यांच्यासोबत गरीब जीवनशैली जगते.
मोहन हा श्रीमंत कुटुंबातून आला असला तरी त्याच्या वडिलांनी त्याच्या लग्नाला नकार दिला होता आणि त्या दिवसापासून तो त्यांना भेटला नाही. शेवटी त्याचे वडील खूप आजारी पडतात आणि संपूर्ण कुटुंब त्यांना भेटायला जाते, आणि त्यांचे स्वागत खुल्या हातांनी केले जाते. ते मरण्यापूर्वी, मोहनला एका मंदिराखाली लपवलेला सोन्याचा आणि दागिन्यांचा कुटुंबाचा खजिना दाखवतात, जो फक्त चार वेगवेगळ्या चाव्यांनी उघडता येतो. मोहन त्याच्या मुलांना (एकेक चावी गपचुप) एकेक लॉकेट गळ्यात घालून ठेवायला सांगतो. मग त्याचे वडील मरण पावतात, आणि लालचंद, (रणजीत) एक कर्मचारी, ज्याने वडील आणि मुलाचे संभाषण ऐकले आहे तो खजिना स्वतःकडे ठेवण्यासाठी मोहनला मारून टाकतो. त्याला अटक आणि दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा होते. राधा तिच्या मुलांपासून विभक्त होते आणि मानसिक संतुलन गमावते.
काही वर्षांनंतर मुलगे मोठे झालेले असतात. चंदन (अमजद खान) स्वतःला भोलाराम म्हणवून घेतो आणि डेअरी फार्म चालवतो; राजू उर्फ जॉनी (डॅनी) चोर आणि घरफोडी करणारा होतो; बबलू उर्फ विजय (विजयेंद्र घाटगे) हा पोलिसांचा डीएसपी होतो; तर सर्वात लहान असलेल्या पप्पूनेही (मिथुन चक्रवर्ती) गुन्ह्याचे जीवन स्वीकारले आहे आणि तो स्वत:ला टोनी म्हणवतो. या चार तरुणांपैकी कायद्याच्या बाजूने भोलाराम आणि विजय, आणि जॉनी आणि टोनी कायद्याच्या विरुध्द. मनात प्रश्न येतो की या आयुष्यात चार भावांना त्यांच्या आईला भेटायला मिळेल का आणि मंदिराच्या खाली अजूनही दडलेल्या खजिन्याचे काय ? या भोवती हा सिनेमा गुंफलेला आहे.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
अर्थ – वक्र असलेली सोंड, विशालकाय शरीर, करोडो सूर्यांसारखे महान प्रतिभावान असलेल्या हे देवा, माझे सर्व कार्य कोणत्याही व्यत्ययाशिवाय (कृपया) पूर्ण करा.
आपल्या सर्वांना माहीत असलेल्या या मंत्राने गाण्याची सुरूवात होते. आपल्या संस्कृतीत प्रथम पूजेचा मान हा श्रीगणेशाचा आहे. इथेही त्याने सर्व विघ्ने दूर करून आपल्याला आपल्या इच्छित काम होऊ द्यावे ही विनंती आहे. आता गडबड ही आहे की इथे सज्जन आणि दुर्जन दोघेही तीच प्रार्थना करीत आहेत! बिचारा बाप्पा! असे परस्पर विरोधी भक्त असल्यावर बाप्पाचे अवघड आहे बुआ! किती कठीण आहे ना देव होणे!
देवा हो देवा गणपति देवा
तुमसे बढ़कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कौन
और तुम्हारे भक्तजनों में हमसे बढ़कर कौन
देवा हो देवा गणपती देवा, तुमच्यापेक्षा या सृष्टीत दुसरे कोणी मोठे असूच शकत नाही. तुम्ही आमचे स्वामी आहात. आणि आम्ही तुमचे भक्त. पण आम्ही काही साधे सुधे भक्त नाही. आम्ही सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहोत.
अदभुत रूप है काया भारी महिमा बड़ी है दर्शन की
बिन मांगे पूरी हो जाये जो भी इच्छा हो मन की
गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया
देवा हो देवा गणपति देवा
तुझे रूप अद्भुत आहे, देह विशाल आहे. तुझ्या दर्शनाची महिमा इतकी मोठी आहे की न मागता ही आमच्या मनातल्या इच्छा न मागता ही पुऱ्या होऊन जातात.
छोटी सी आशा लाया हूँ छोटे से मन में दाता
माँगने सब आते है पहले सच्चा भक्त ही है पाता
गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया
देवा हो देवा गणपति देवा
मी एक छोटीशी इच्छा तुझ्यासमोर प्रकट करतो देवा! माझे मन काही तुझ्या इतके विशाल नाही, त्यामुळे या छोट्याशा मनात तशाच छोट्याशा आशा निर्माण होतात. पण मला एवढे माहीत आहे की जो कोणी तुझा खरा सच्चा भक्त आहे, त्याला तू नक्कीच आधी त्याची इच्छा पूर्ण करतोस.
भक्तो की इस भीड़ में ऐसे बगुला भगत भी मिलते है
भेस बदलकर के भक्तो का जो भगवान को छलते है
गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया
देवा हो देवा गणपति देवा
भक्तांच्या या गर्दीत असेही फसवे लोक असतात जे वेष बदलून देवाला फसवायला जातात! अजाण, मूढच म्हणायचे, दुसरे काय?! सर्वव्यापी, सर्वज्ञानी देवाला फसवणे शक्य तरी आहे का?!
*एक डाल के फूलो का भी अलग अलग है भाग्य रहा
दिल में रखना डर उसका, मत भूल विधाता जाग रहा
गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया
देवा हो देवा गणपति देवा
जीवनाचे खूप मोठे सत्य या कडव्यातील दोन ओळीत सामावले आहे. एकाच फांदीवर उगवलेल्या प्रत्येक फुलाचे जसे भाग्य वेगळे असते, तसेच एकाच कुटुंबात जन्मलेल्या माणसांचे भाग्य वेगळे असते. प्रत्येक जण आपापल्या कर्मानुसार भाग्यरेषा लिहून आणतो. त्यामुळे आपण काय कर्म करत आहोत, या बाबत जागरूक रहावे.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की विधाता सतत जागा असतो आणि आपली प्रत्येक हालचाल त्याला दिसत असते. म्हणून आपण त्याला घाबरून राहिले पाहिजे, कारण शेवटी आपल्या प्रत्येक कर्माचे फळ तो आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही.
या गाण्याकडे आता चित्रपट गीत म्हणून पाहिले जात नाही. आता त्याचे स्वरूप खरे तर गणेशोत्सवात गायले जाणारे नेहमीचे भजन असे बनले आहे! कालाय तस्मै नमः !
|| गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया ||

– लेखन: तनुजा प्रधान, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप खूप धन्यवाद! 🙏💐🌿
🌹अतिशय सुंदर वर्णन 🌹
धन्यवाद