Wednesday, June 18, 2025
Homeकला'भावलेली गाणी' ( २ )

‘भावलेली गाणी’ ( २ )

“ज़िंदगी का सफ़र है ये कैसा सफ़र
कोई समझा नही कोई जाना नहीं”
या गाण्यापासून सुरू झालेला प्रवास कधी
“ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना
यहाँ कल क्या हो किसने जाना”
पर्यंत पोचला हे समजलेच नाही !

ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना
यहाँ कल क्या हो किसने जाना

आणि त्यासोबत किशोरदांचे वर्ल्ड फेमस योडेलिंग (yodelling)! किती जणांनी त्यांच्या सारखे योडेलिंग करायचा प्रयत्न केला असेल, पण किशोरदा ते किशोरदा ! त्यांच्या आवाजाची आणि अदाकारीची उंची गाठणे दुसऱ्याला अवघडच !

हेमा मालिनी आणि राजेश खन्नावर चित्रित झालेले हे गाणे १९७१ च्या अंदाज़ या चित्रपटातले आहे. गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन. दृत गती मधले संगीत हे या जोडीचे वैशिष्ट्य! या जोडीने संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट होता. त्याच वर्षी जयकिशनजी यांचा लिव्हर सिरॉसिस ने मृत्यू झाला. ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना हे त्यांनी रेकॉर्ड केलेले शेवटचे गाणे होते.

हे मला जेव्हा कळले तेव्हा खूप धक्का बसला. आयुष्याचा हा प्रवास किती सुंदर आहे हे सांगणाऱ्या माणसाचा असा वेदनात्मक मृत्यू व्हावा हे मला पचलेच नाही. उडत्या चालीची इतकी आनंददायी गाणी देणारा माणूस स्वतः किती वेदनेतून जात होता याची ना या झगमगत्या दुनियेला कल्पना होती ना त्याचे काही सोयर सुतक. असो. मायावी दुनियेचा हाच जणू नियम आहे नाही का ?

एक मात्र सांगते की या गाण्याने मला जगायला शिकवले. स्वप्न बघायला शिकवले. आपण गाठलेली उंची मागे टाकून अजून काहीतरी भन्नाट मिळवू शकतो हा विश्वास ठेवायला शिकवले.

चाँद तारों से चलना है आगे
आसमानों से बढ़ना है आगे
अरे चाँद तारों से चलना है आगे
आसमानों से बढ़ना है आगे
पीछे रह जायेगा ये ज़माना
यहाँ कल क्या हो किसने जाना
ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना
यहाँ कल क्या हो किसने जाना

या कडव्यातल्या शेवटच्या दोन ओळींनी मनाला साद घातली. म्हटले तर अगदी उत्साहवर्धक आहेत या ओळी. तुम्ही पुढे जात रहा, तुम्हाला अडवणारे जग, पाय खेचणारे लोक शेवटी मागेच राहणार आहेत. तुम्ही तुमचे ध्येय कोणत्याही परिस्थितीत सोडू नका अशी प्रेरणा देणाऱ्या या दोन ओळी आहेत. आणि अधिक खोलवर जाऊन विचार केला तर आयुष्याचे एक अंतिम सत्य समोर आणतात या दोन ओळी. शेवटी आपण एकटेच पुढे जाणार आहोत… सगळ्यांना मागे ठेवून; हे लक्षात आणून देतात. तेव्हा हे लक्षात ठेवून तुम्ही पुढे चालायचे सोडू नका, आपले ध्येय विसरू नका. दोन्ही बाजूने विचार केला तर प्रेरणादायक असणाऱ्या या ओळी हसरत जयपुरी यांच्या लेखणीची ताकद दाखवतात.

हँसते गाते जहाँ से गुज़र
दुनिया की तू परवाह ना कर
हँसते गाते जहाँ से गुज़र
दुनिया की तू परवाह ना कर

आता हसतमुख राहण्याची कला म्हणा किंवा स्वभाव तसा आहे म्हणून म्हणा, पण “जगावे तर हसतमुखाने जगावे,” हे ब्रीदवाक्य ठेवून जगायला शिकवले या गाण्याने. पण “दुनिया की परवाह ना कर” हे काही जमले नाही बुआ ! आपण सामाजिक चौकटीत राहून आयुष्य जगावे, हे संस्कार अगदी घट्ट असल्यामुळे, अवघड जात असेल कदाचित. पण मी आजन्म विद्यार्थिनी असल्यामुळे शिकण्याचा प्रयत्न चालूच आहे !

मुस्कुराते हुए दिन बिताना
यहाँ कल क्या हो किसने जाना
ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना
यहाँ कल क्या हो किसने जाना

आला दिवस खरा आहे. आजचा दिवस मस्त एन्जॉय करत घालवावा. जे काम कराल ते आवडीचे नसले तरी आनंदाने केले तर त्याचा त्रासही होत नाही आणि लवकर करून संपते. आणि मग पुढेमागे ते आवडूही लागते; स्वानुभवावरून सांगते !

या गाण्यात राजेश खन्नाचा पेहराव पण अगदी गाण्याच्या चालीला साजेसा, अगदी रंगीबिरंगी आहे, ज्याला आपण इंग्रजीत “फुल्ल ऑफ लाईफ” असे म्हणतो. पण त्याच्यापेक्षा मला हेमा मालिनी खूप आवडून गेली या गाण्यात. कसली गोड दिसतेय ना अगदी! तिचे ड्रेस, एकूण पोषाख, रंगसंगती सगळेच खूप आवडले मला.

मौत आनी है आयेगी इक दिन
जान जानी है जाएगी इक दिन
अरे मौत आनी है आयेगी इक दिन
जान जानी है जाएगी इक दिन
ऐसी बातों से क्या घबराना
यहाँ कल क्या हो किसने जाना
ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना
यहाँ कल क्या हो किसने जाना

इतक्या हलक्या फुलक्या चालीच्या गाण्यात हसत हसत बिनधास्त त्या फटफटीवर राजेश खन्ना जेव्हा ह्या ओळी म्हणतो, तेव्हा त्या गायक, कलाकार, दिग्दर्शक सगळ्यांनाच सलाम करावासा वाटला. मरण तर येणारच आहे ना, त्याची काय भीती बाळगायची हे अगदी बाईकवर राईड मारण्या इतक्या सहजपणे सांगून गेले! मला त्या गोष्टीची भारी गंमत वाटली! इतका गहन, गंभीर विषय इतक्या सहजपणे सांगून गेले हे गाणे. याहून सोपी शिकवायची पद्धत काय असणार ना ?

शेवटी जाता जाता एकच सांगेन. कोणत्याही गोष्टीचा भरवसा नसतो. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. म्हणूनच कितीही दुःख संकटे आली तरी त्यांना तिथेच मागे सोडून, आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणे हे नक्कीच आपल्या हातात असते. यातून काय घडेल हे माहीत नसताना, आहे ते स्वीकारून मस्त आनंदी राहणे ! आयुष्य सुंदर बनवण्याची हीच तर खरी गुरुकिल्ली आहे, नाही का ?

तनुजा प्रधान

– लेखन : तनुजा प्रधान, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा