◆ आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये ◆
गीत : आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये
चित्रपट : उसने कहा था (१९६०)
दिग्दर्शन : मोनी भट्टाचार्य
गीतकार : शैलेंद्र (शंकरदास केसरीलाल)
संगीतकार : सलील चौधरी
कलाकार : सुनील दत्त, नंदा
गायक : तलत मेहमूद, लता मंगेशकर
आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये… ऐकल्या क्षणीच पाय थिरकायला लागले आणि बोटे तालावर नाचायला लागली ना ? गाण्याचे बोल, ताल, ठेका इतका मस्त आहे की, आपणही त्यासोबत बागडत, नाचत निघालो आहोत असे वाटते.
नंदाचा साधेपणा आणि निरागसता, या दोन गोष्टींनी बॉलिवूड मध्ये हे गाणे अजरामर केले आहे. त्याचप्रमाणे सुनील दत्तने साकारलेला अजाणत्या वयातला कोवळे प्रेम करणारा प्रियकर आपले मन जिंकून घेतो. खरं सांगायचं तर या गाण्यात दाखवलेले संयमी प्रेम बघून आजकालच्या अधीर प्रेमाच्या पाऊसधारांमधून बाजूला जाऊन थंड हवेची एक नाजूकशी अवखळ झुळूक अनुभवल्यासारखे वाटले.
नंदा माझ्या आईला खूप आवडायची. माझी आई तिच्यासारखीच अगदी साधी होती. तिच्यासारखे माझ्या आईचे पण एके काळी लांबलचक काळेभोर केस होते. या गाण्यात जशा तिने कानात रिंगा घातल्या आहेत ना, तशा खूप वर्षे माझी आई घालायची. त्यामुळे मलाही नंदा खूप आवडते. अर्थात माझी आई मला नंदापेक्षा सुंदर होती, असे मला वैयक्तिकरित्या वाटते, त्याला माझा काहीच इलाज नाही !
या गाण्यात किंबहुना या चित्रपटात जशी नंदा साधी वेशभूषा आणि केशभूषा केलेली आहे, तशीच तिच्या बऱ्याच सुरुवातीच्या चित्रपटात होती. आणि मला तिचं तेच रूप खूप भावते. मला वाटतं की तिचे सौंदर्य हे तिच्या साधेपणात दडलेले होते.
बॉलिवूड मध्ये नंदा या एकेरी नावाने प्रसिध्द असलेल्या या अभिनेत्रीचे मूळ नाव, नंदा कर्नाटकी
(८ जानेवारी १९३९ – २५ मार्च २०१४) होते. तिने मराठी, गुजराती व हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी म्हणून तिची कारकीर्द ३० वर्षांपेक्षाही जास्त आहे.
नंदा यांचा जन्म तेव्हाच्या कोल्हापूर संस्थानात, विनायक दामोदर कर्नाटकी (मास्टर विनायक), या यशस्वी मराठी अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक यांच्या घरी झाला. मास्टर विनायक यांचे भाऊ वासुदेव कर्नाटकी हे सिनेमॅटोग्राफर होते, तर प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्व बाबुराव पेंढारकर (१८९६-१९६७) आणि भालजी पेंढारकर (१८९७-१९९४) हे त्यांचे सावत्र भाऊ होते. ते दिग्गज चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचे मामेभाऊही होते.
नंदा आठ वर्षांची असताना तिचे वडील १९४७ मध्ये ४१ व्या वर्षी मरण पावले. त्यांच्या कुटुंबाला खूप कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ती बाल अभिनेत्री बनली. तिने १९४८ मध्ये मंदिर या चित्रपटातून पदार्पण केले. रुपेरी पडद्यावर “बेबी नंदा” यांचे चित्रपटातील व्यस्ततेमुळे घरीच प्रशिक्षण झाले. चित्रपटांमध्ये करिअर करून तिने तिच्या सहा भावंडांना वाढवले.
तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. शांताराम आठवले दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगातील बहिणीच्या भूमिकेसाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नंदा यांचा सन्मान केला होता.
त्या काळातील नूतन, वहिदा, आणि साधना सोबत सर्वाधिक मानधन घेणार्या ३-४ अभिनेत्रींपैकी एक होत्या.
नंदाजींनी त्या काळातल्या सगळ्या टॉप हीरोंसोबत काम केले पण त्यांच्या रोमान्सच्या चर्चा कधीही कोणत्याही हीरोसोबत ऐकावयास नाही मिळाले.
नंदा जी शेवट पर्यंत अविवाहित राहिल्या. त्यांना तरुणपणी लग्नासाठी अनेक प्रस्ताव आले, पण त्यांनी ते सर्व नाकारले. असे म्हणतात की नंदाजी आणि मनमोहन देसाईंचे एकमेकांवर प्रेम होते. पण पारिवारिक जबाबदारी असल्याने त्यांनी कधी ते व्यक्त नाही केले आणि देसाईंना व्यक्त करण्याची संधीही नाही दिली. नंतर मनमोहन यांचा जीवनप्रभा यांच्याशी विवाह झाला. मात्र नंतर त्यांच्या पत्नीचे निधन झाले.
शेवटी नंदाचे एकटेपण सहन न होऊन, त्यांचे भाऊ बहीण आणि रेहमान यांनी आग्रह करून, तेव्हा विधुर असणाऱ्या मनमोहन देसाईंशी त्यांचा साखरपुडा केला होता. परंतु बाल्कनी चे रेलिंग निखळून देसाईंचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे नंदाजी पूर्णपणे तुटून गेल्या. त्यानंतर त्यांनी सामाजिक वर्तुळातून आणि चित्रपटांमधून कायमची निवृत्ती घेतली.
त्यानंतर फक्त कुटुंब आणि जवळच्या मित्रांशी संवाद साधत होत्या. चित्रपट उद्योगातील तिच्या जवळच्या मित्रांमध्ये वहिदा रहमान, नर्गिस, आशा पारेख, हेलन, सायरा बानो, माला सिन्हा, साधना, शकिला आणि जबीन जलील यांचा समावेश होता. बर्याच काळानंतर, त्यांनी वहिदा रहमानसोबत नटरंग (२०१०) या मराठी चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी सार्वजनिकपणे हजेरी लावली.
नंदाजी रोज सकाळी आपला नाश्ता स्वतःच बनवत असत. त्या दिवशी सुद्धा असाच नाश्ता बनवायला त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि हार्ट अटॅक येऊन पडल्या. घरात एकट्याच असणाऱ्या नंदाजी अशा काही पडल्या की पुन्हा उठल्याच नाहीत. २५ मार्च २०१४ रोजी या प्रतिभावान अभिनेत्रीच मुंबईत तिच्या वर्सोवा येथील निवासस्थानी वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मला नंदा यांच्या आयुष्याचा पट तुमच्यासमोर मांडावासा वाटला कारण वयाच्या पाचव्या वर्षापासून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. आठव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले. रेडिओ शोज्, स्टेज शोज् व चित्रपट करण्यास सुरुवात केली. त्यांनी कुटुंबाच्या सुखासाठी त्यांनी आपले सुख बाजूला ठेवले आणि शेवटी आयुष्यभर एकटे राहण्याची वेळ आली.
एवढ्याशा लहानग्या त्या पोरीला आपण एवढी मोठी सहा भावंडे आणि आईची जबाबदारी खांद्यावर पेलून धरण्यासाठी निघालोय याचा जराही अंदाज तरी असेल का ? की अख्खे आयुष्य भावंडांसाठी वेचत शेवटी आपले हक्काचे माणूस आणि आपले हक्काचे सुखाचे क्षण मिळायचेच राहतील याची पुसटशी शंका तरी आली असेल का ? या गोष्टीचा विचार केला की जीव गलबलून निघतो.
अशा अनेक मुली आहेत ज्या कोवळ्या वयात कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलत पेलत, त्यांचे आयुष्य समृध्द बनवत असताना, शेवटी आपले अख्खे आयुष्य मात्र रणरणत्या वाळवंटातल्या हळूहळू शुष्क होत चाललेल्या वृक्षाप्रमाणे कंठीत असतात.
त्यातल्या त्यात जमेची एक बाजू म्हणावी अशी होती की त्यांच्या सगळ्या भावांनी राखीचे बंधन इमाने इतबारे निभावले. हे वाचून तुम्हाला सगळ्यांना नंदाचे प्रसिद्ध गाणे आठवले असेलच ना…”ओ भैय्या मेरे, राखी के बंधन को नी निभाना.”
पण शेवटी कितीही धन दौलत असले तरी त्याने एकटेपणा घालवून हक्काच्या माणसाची सोबत विकत घेता नाही. त्यांच्याच एका गाण्यासारखे, “कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता” त्यांचे आयुष्य गेले.
अगदी असेच नाही, पण काही अंशी असे आयुष्य सुनील दत्त यांचेही गेले. सुनील दत्त (६ जून १९२५ – २५ मे २००५) एक भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि राजकारणी होते. ते मनमोहन सिंग सरकारमध्ये (२००४-२००५) युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री होते. ते मुंबईचे माजी शेरीफ होते. ते अभिनेता संजय दत्त आणि राजकारणी प्रिया दत्त यांचे वडील होते.
बलराज दत्त म्हणून जन्मलेल्या सुनील दत्त यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतात झाला. त्यांच्या पाचव्या वर्षी, वडील, दिवाण रघुनाथ दत्त यांचे निधन झाले. अठरा वर्षाचे असताना फाळणीच्या दरम्यान आधी हरयाणा, नंतर लखनौ येथे आले. मुंबईमध्ये कॉलेज शिक्षण करत बेस्ट (BEST) मध्ये नोकरी केली. पदवी संपादन केल्यावर त्यांनी ‘लिप्टन की मेहफिल’ हा रेडिओ सिलोन (Radio Ceylon) वर उर्दू भाषेत शो करण्यास सुरुवात केली. याच शोच्या दरम्यान त्यांचा आवाज आणि व्यक्तिमत्व बघून त्यांना रमेश सैगल यांच्या १९५५ सालच्या ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. बलराज सहानी यांच्यासोबत नावाचा गोंधळ होऊ नये म्हणून त्यांचे नाव सुनील दत्त असे ठेवले गेले.
दत्त १९५७ च्या मदर इंडिया या चित्रपटात प्रकाशझोतात आले. मिळवला ज्यामध्ये त्यांनी नर्गिससोबत तिचा रागीट मुलाचे काम केले होते. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान सेटवर आग लागली होती. असे मानले जाते की दत्त यांनी नर्गिसला वाचवण्यासाठी आगीशी खेळले होते आणि साहजिकच तिचे प्रेम जिंकले. १९५८ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगा संजय दत्त, जो आणि दोन मुली, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त. त्यांची मुलगी नम्रता यांनी राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव याच्याशी लग्न केले. कर्म धर्म संयोगाने दोघांचे वडील मदर इंडियामध्ये सहकलाकार होते.
चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सिनेसृष्टीच्या सेवेसाठी त्यांना १९९५ साली फिल्म फेअर तर्फे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाले.
१९८१ मध्ये आपली नर्गिस दत्त हिच्या कर्करोगाने झालेल्या निधनानंतर दत्त साहेब तुटून गेले होते. परंतू त्यांनी समाजसेवा आणि राजकारण यात सवतःला पूर्णवेळ झोकून दिले. अनेक फिल्म फेअर पुरस्कार, पद्मश्री, राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार मिळूनही नर्गिस गेल्यानंतर त्यांचे आयुष्य खूप एकाकी झाले होते.
पंडित चंद्रधर शर्मा “गुलेरी” यांच्या याच नावाने लिहिलेल्या प्रसिद्ध हिंदी लघुकथेवर “उसने कहा था” हा चित्रपट आधारित आहे. गुलेरीजींना संस्कृत, पाली, प्राकृत, हिंदी, बंगाली, इंग्रजी, लॅटिन आणि फ्रेंच भाषा अवगत होत्या.
ही कथा तत्कालीन इंडीयन प्रेसच्या सुप्रसिद्ध हिंदी मासिक, “सरस्वती” यात १९१५ साली प्रकाशित झाली. सरस्वती हे भारतातील पहिले हिंदी मासिक आणि सर्वात प्रभावशाली नियतकालिक होते.
इंडियन प्रेसचा उल्लेख अशासाठी करावासा वाटला कारण हे मासिक रवींद्रनाथ टागोर यांच्या कार्याचे सर्वात पहिले प्रवर्तक आणि प्रकाशक होते. प्रेमचंद, मैथिली शरण गुप्त यासारख्या दिग्गज लेखकांचे साहित्य इथे प्रकाशित केले गेले होते.
अशा दर्जेदार मासिकात प्रसिद्ध झालेली ही कथा “तंत्र, व्यक्तिचित्रण आणि परिणामाच्या परिपूर्णतेसाठी” समीक्षकांकडून प्रशंसनीय ठरली. मात्र उत्तम कथा, प्रतिभावान स्टार कास्ट असून देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.
नंदू त्याच्या विधवा आई, पारो (दुर्गा खोटे) सोबत एका छोट्या गावात राहत असतो. कमली (नंदा) शी त्याची मैत्री होते. कमलीचे वडील आजारी पडतात आणि तिचे कुटुंब अंबाला येथे स्थलांतरित होते. कमलीच्या वडिलांचे निधन झाल्यावर ते इथे परतात.
नंदू आणि कमली प्रेमात पडतात. त्यांना लग्न करायचे असते. पण नंदूची आई कमलीच्या मामांना भेटायला जाते तेव्हा त्यांच्या गरिबीमुळे तिचा अपमान होतो. नंदू सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतो, या आशेने की तिचे काका त्याला कमलीशी लग्न करण्यासाठी योग्य समजतील. पण तो परत आल्यावर कमलीचे दुसऱ्याशी लग्न ठरले आहे हे समजते. कमलीला विसरण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो परत सैन्यात जातो. त्याचा वरिष्ठ अधिकारी राम सिंग हा कमलीचा नवरा आहे हे पाहून तो दुःखी होतो.
लवकरच युद्ध सुरू होते. युद्धावर जाण्यापूर्वी, कमली त्याच्याकडून तिच्या पतीचे रक्षण करण्याचे वचन घेते, जे तो पूर्ण करतो. जेव्हा रामसिंग (कमलीचा नवरा) एका मरणासन्न नंदूला विचारतो की त्याला वाचवण्यासाठी त्याने आपला जीव का धोक्यात घातला, तेव्हा त्याचे शेवटचे शब्द असतात, “उसने कहा था” म्हणून ते या चित्रपटाचे नाव.
“उसने कहा था” हा एक उत्कृष्ट चित्रपट होता, पण शोकांतिका असलेला. गावाच्या सीमेला लागून असलेल्या शेतात, पावसाने भिजलेल्या संध्याकाळी गायलेल्या या गाण्यावरून तुम्हाला त्याचा अंदाज येणार नाही. अगदी आपल्या आयुष्यासारखेच, नाही का? आपण आपल्याच धुंदीत जगत असतो आणि पुढच्या वळणावर काय वाढून ठेवले आहे याचा जराही आपल्याला अंदाज नसतो. पण त्यातच तर या क्षणाला मिळत असलेला आनंदाचा मनापासून पूर्णानुभव घ्यावा.
चित्रपटात हे गाणे नंदू आणि कमलीचे प्रेम बहरत जात असताना येते. प्रेमाच्या हिंदोळ्यावर असलेले हे प्रेमी जीव बघून फार आनंद होतो. असे वाटते जणू तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाने अगदी आनंदाचे झरे उडवले आहेत त्या पौर्णिमेच्या रात्री ! इतक्या उंच आणि मोठ्या झोक्यावर मी कधी बसले नाही, पण खरंच खूप मज्जा येत असेल ना अशा झोक्यावर कोणत्याही वयात !
आहा, रिमझिम के ये प्यारे-प्यारे गीत लिए
आई रात सुहानी देखो प्रीत लिए
मीत मेरे सुनो ज़रा, हवा कहे क्या
सुनो तो ज़रा, झिंगुर बोले चिकी-मिकी चिकी-मिकी
आहा, रिमझिम के ये प्यारे-प्यारे गीत लिए
शेतातून मस्त बागडत, पारंब्यांशी खेळत, गाणी गात, प्रेम व्यक्त करत, हे प्रेमी युगुल स्वप्न सजवत जात असते. अगदी ढगांवर स्वार झालेल्या उनाड वाऱ्याप्रमाणे त्यांच्या स्वप्नांचे मुक्त महाल बांधत जात असतात.
खोई-सी भीगी-भीगी रात झूमे
आँखों में सपनों की बारात झूमे
दिल की ये दुनिया आज बादलों के साथ झूमे
आहा, रिमझिम के ये प्यारे-प्यारे गीत लिए …
कुठेही उगाच हाथ पकडायची घाई नाही इतके संयमी प्रेम. आपल्याही एकदाही गाणे बघताना असे वाटत नाही की अरे बाबा, जा लवकर पकड तिचा हात. आपणसुद्धा त्यांच्या संयमी तरंगांमध्ये तेवढेच एकरूप होतो.
आ जाओ दिल में बसा लूँ तुम्हें
आँखों का कजरा बना लूँ तुम्हें
ज़ालिम ज़माने की निगाहों से बचा लूँ तुम्हें
आहा, रिमझिम के ये प्यारे-प्यारे गीत लिए …
शैलेंद्र यांचे बोल, कोणत्याही दोन जीवांची प्रेमाची कबुली देताना, प्रेमाची वचने देताना जे सामान्यतः बोलतात, तेच आहेत या गाण्यात. मात्र सलील चौधरींनी त्यात अक्षरशः दिवाळीत उडणाऱ्या कारंज्यांसारखी जणू आनंदाची अख्ख्या गाण्यात जागोजागी पेरली आहेत!
हाथों में मेरे तेरा हाथ रहे
दिल से जो निकली है वो बात रहे
मेरा-तुम्हारा सारी ज़िंदगी का साथ रहे
आहा, रिमझिम के ये प्यारे-प्यारे गीत लिए …
या गाण्याच्या हलक्या-फुलक्या गोडव्यासोबत आज तुमची रजा घेते. तुम्हा सर्वांच्या आयुष्यात असाच प्रेमाचा गोडवा असू दे हीच सदिच्छा !
– लेखन : तनुजा प्रधान, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूपच छान 👌👌👌👌
संगीताजी! खूप खूप धन्यवाद!🙏🌺🌿
अप्रतिम
कविताजी, खूप खूप धन्यवाद!🙏🌺🌿