Thursday, July 3, 2025
Homeकला'भावलेली गाणी' ( ८ )

‘भावलेली गाणी’ ( ८ )

एक अकेला इस शहर में
इथे अमेरिकेत १८ जुलै, २०२२ चा सोमवार उजाडला आणि भूपिंदर सिंगजी अनंतात विलीन झाल्याची धक्कादायक बातमी येऊन थडकली. खूप शॉक बसला. ‘अचानक असे कसे झाले ?’  या विचाराने मन त्रस्त झाले. कारण मीडिया मध्ये त्यांच्या आजारी असल्याच्या काहीच बातम्या वाचल्या नव्हत्या, त्यामुळे अधिकच अस्वस्थ वाटले. मग हळूहळू गोष्टी समजत गेल्या. ८२ वर्षीय या गायकाला कोलन कॅन्सर झाला होता आणि त्यातच कोविड-१९-संबंधित गुंतागुंतांमुळे व्हेंटिलेटर वर असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन ७.४५pm ला मृत्यू झाला हे कळले. काही काळापासून लघवीच्या समस्यांसह आरोग्याच्या अनेक समस्यांनी ते त्रस्त होते. सोमवारी मुंबईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा त्यांची पत्नी, सौ. मिताली सिंघ या त्यांच्या सोबत होत्या. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मिताली सिंग आणि २३ वर्षांचा मुलगा, (संगीतकार आणि गिटार वादक) आनंददीप सिंग उर्फ निहाल आहेत.

‘भावलेली गाणी’  या लेखमालेतल्या आजच्या लेखातून मी भूपिंदर सिंघजींना माझी शब्दसुमंनाची श्रद्धांजली अर्पण करीत आहे.

६ फेब्रुवारी १९४० रोजी अमृतसर, पंजाब येथे जन्मलेल्या भूपिंदर सिंग यांचे जन्म नाव भूपिंदर सोईन होते. ते एक भारतीय संगीतकार होते, मुख्यतः गझल गायक आणि बॉलीवूड पार्श्वगायक देखील होते. त्यांची संगीताशी ओळख करवली त्यांचे वडील, नाथा सिंगजी, जे खुद्द स्वतः संगीतकार होते. संगीताचे परिचयकर्ता असणारे भूपिंदरचे वडील अतिशय कठोर शिक्षक होते आणि त्यामुळे भूपिंदर सिंगजींच्या आयुष्यात असा एक काळ आला जेव्हा त्यांना संगीत आणि त्यातील वाद्यांचा तिरस्कार निर्माण झाला होता. पण आपले सौभाग्य की ती भावना जास्त काळ टिकली नाही, अन्यथा इतका प्रतिभावान गायक, वादक आणि संगीतकार आपल्याला कधी भेटलाच नसता.

भूपिंदरजींनी सतीश भाटिया यांच्या दिग्दर्शनाखाली ऑल इंडिया रेडिओसाठी प्रासंगिक कलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. प्रासंगिक कलाकार हा कायमस्वरूपी कर्मचारी नसतो, तर कंत्राटी कर्मचाऱ्यासारखा तात्पुरता येऊन काम करून जात असतो.

त्यांनी दूरदर्शन केंद्र, नवी दिल्ली येथे काम केले. ते गिटारही शिकले. १९६२ मध्ये, संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांना या हिऱ्याचा शोध लागला. दिल्लीमध्ये सतीश भाटिया यांनी मदन मोहनजींच्या सन्मानार्थ एक डिनर आयोजित केला होता. सतीश भाटिया त्या काळी आकाशवाणी दिल्लीमध्ये निर्माता होते आणि भूपिंदरजी त्यांच्या हाताखाली गिटार वादक म्हणून काम करत होते. तर त्या डिनरमध्ये मदन मोहनजींनी भूपिंदरजींना गिटार वाजवताना आणि गझल गाताना ऐकले आणि त्यांच्या आवाजाने भारावून मुंबईला बोलावले.

भूपिंदर सिंघजींना चेतन आनंदच्या १९६४ च्या “हक़ीक़त” या हिंदी चित्रपटात मोहम्मद रफी, तलत महमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत “होके मजबूर मुझे उसने बुलाया होगा” हे गाणे गाण्याची संधी देण्यात आली आणि त्यांना पहिला ब्रेक मिळाला. याच गाण्यात त्यांनी एका सैनिकाची भूमिका देखील केली होती.

हक़ीक़त हा चित्रपट १९६२ च्या भारत-चीन युद्धावर आधारित आहे. चेतन आनंद यांनी हा चित्रपट तत्कालीन पंतप्रधान, श्री. जवाहरलाल नेहरू यांना समर्पित केला होता. परंतू हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच नेहरूजींचे निधन झाले.

या गाण्यात जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनाची काय अवस्था होत असेल याची कल्पना येते. घरापासून दूर सीमेवर लढत असताना, मन मात्र घरी ठेवून आलेले ही दिलेर माणसं, आपल्या प्रिय जनांना होणाऱ्या क्लेशाने इतक्या दूर युद्ध भूमीवर अस्वस्थ होत असतात. याचा खूप सुंदर भावनिक संघर्ष या गाण्याच्या शब्दांमधून साकारला आहे. तलत महमूद, मन्ना डे, आणि मोहम्मद रफी यांच्यासोबत भूपिंदर सिंग यांच्या दर्दभऱ्या आवाजात हे गाणे चितारले आहे.

विचार करा, त्या वेळी भूपिंदरजी खूप लहान वयातले होते आणि इतक्या मोठ्या दिग्गज गायकांसोबत त्यांना मदन मोहन साहेबांनी गायला उभे केले, म्हणजे त्यांच्या आवाजात काय ताकद होती बघा! शिवाय भूपिंदरजींच्या हिमतीची दाद द्यायला हवी. अहो, दुसरे कोणी असते तर घसा कोरडा पडला असता, आवाजच निघाला नसता, हात पाय थरथरले असते, पण असे काही यांच्या बाबतीत घडले नाही. त्यांनी आपले पहिलेच गाणे त्या दिग्गजांच्या पातळीशी जुळवून गायले.

मदन मोहन, रफ़ी, भूपिंदर, मन्ना डे, तलत मेहमूद (होके मजबूर मुझे च्या रेकॉर्डिंगला)

होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
ज़हर चुपके से दवा जान के खाया होगा
होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
होके मजबूर मुझे

(भूपिंदर सिंघ)
दिल ने ऐसे भी कुछ अफ़साने सुनाए होंगे
दिल ने ऐसे भी कुछ अफ़साने सुनाए होंगे
अश्क़ आँखों ने पिये और ना बहाए होंगे
बन्द कमरे में जो ख़त मेरे जलाए होंगे
एक इक हर्फ़ जबीं पर उभर आया होगा
होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
होके मजबूर मुझे

(मोहम्मद रफी)
उसने घबरा के नज़र लाख बचाई होगी
उसने घबरा के नजर लाख बचाई होगी
दिल की लुटती हुई दुनिया नज़र आई होगी
मेज़ से जब मेरी तस्वीर हटाई होगी
मेज़ से जब मेरी तस्वीर हटाई होगी हाय
हर तरफ़ मुझको
हर तरफ़ मुझको तड़पता हुआ पाया होगा
होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
होके मजबूर मुझे

(तलत महमूद)
छेड़ की बात पे अरमां मचल आए होंगे
छेड़ की बात पे अरमां मचल आए होंगे
ग़म दिखावे की हँसी में उबल आए होंगे
नाम पर मेरे जब आँसू निकल आए होंगे
नाम पर मेरे जब आँसू निकल आए होंगे
सर ना काँधे से
सर ना काँधे से सहेली के उठाया होगा
होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
होके मजबूर मुझे

(मन्ना डे)
ज़ुल्फ़ ज़िद कर के किसी ने जो बनाई होगी
ज़ुल्फ़ ज़िद कर के किसी ने जो बनाई होगी
और भी ग़म की घटा मुखड़े पे छाई होगी
बिजली नज़रों ने कई दिन ना गिराई होगी
रंग चहरे पे कई रोज़ ना आया होगा
होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा
ज़हर चुपके से दवा जान के खाया होगा
होके मजबूर मुझे

भूपिंदरजींचा आवाज पार्श्वगायनातील दुनियेत सगळ्यात अद्वितीय आहे. मुकेशजींच्या आवाजातील उदासपणा आणि किशोरजींच्या आवाजाची खोली यांचा सुरेख मिलाफ त्यांच्या आवाजात होता. त्याच बरोबर एक मधाळपणा आणि तितकाच इंग्रजीत म्हणातात तसा longingness त्यांच्या आवाजात होता. तळमळ असलेला खूप भावपूर्ण आवाज होता. त्यात प्रचंड ठेहराव होता, कुठेही जायची गडबड नाही. ते गाताना असे वाटायचे की तो क्षण पूर्णपणे श्वासात भिनवून घेऊन संपू लागला की मग तिथून भूपिंदरजींचे स्वर उमटायला सुरूवात होई.

त्यांच्या विषयी श्रद्धांजली अर्पण करताना संगीतकार जतिन पंडित असे म्हणाले की भूपिंदरजी अतिशय मृदू भाषी व्यक्ती होती. त्यांच्या आवाजात बॅरिटोनसह स्मोकी टोन ही होता. एकमेव अद्वितीय असा आवाज होता त्यांचा.

१९५० च्या दशकात ऑल इंडिया रेडिओवरून कारकिर्दीची सुरुवात करणारे सिंग यांना “मौसम”, “सत्ते पे सत्ता”, “आहिस्ता आहिस्ता”, “दूरियाँ ”, “हकीकत” आणि अनेक चित्रपटांमधील त्यांच्या संस्मरणीय गाण्यांसाठी लक्षात ठेवले जाते.

“होके मजबूर मुझे, उसने बुलाया होगा”(मोहम्मद रफी, तलत मेहमूद, मन्ना डे यांच्यासोबत), “दिल धुंधता है, फिर वही” “दुक्की पे दुक्की हो या सत्ता पे सत्ता” (एकाहून अधिक) ही त्यांची काही गाजलेली गाणी आहेत.

नंतर, भूपिंदर सिंग यांनी अनेक संगीतकारांसाठी गायले. त्यांच्या काही लोकप्रिय गाण्यांपैकी आहे : “किसी नजर को तेरा, इंतज़ार आज भी है” (“ऐतबार”, आशा भोंसले, संगीतकार बप्पी लाहिरी). त्यानंतर “बीती ना बितायी रैना” (“परिचय”, संगीतकार आर. डी. बर्मन), “नाम गम जायेगा” (“किनारा”, संगीतकार आर. डी. बर्मन), “एक अकेला इस शहर में” (“घरोंदा”, संगीत जयदेव), “हुजूर इस कादर भी ना इतरा के चलिए” (मासूम – संगीत आर. डी. बर्मन), “जिंदगी मेरे घर आना” (“दूरियां”, संगीत जयदेव) “कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता” (“आहिस्ता आहिस्ता”, संगीत खय्याम).

अनेक हिट गाणी दिली आणि गाण्याव्यतिरिक्त अनेक गाण्यांसाठी गिटार आणि व्हायोलिन देखील वाजवले.

गिटार वादक म्हणून “दम मारो दम” (हरे रामा हरे कृष्ण), “वादियाँ मेरा दामन” (अभिलाषा), “चुरा लिया ” (यादों की बारात). “चिंगारी कोई भड़के” (अमर प्रेम), ” चलते चलते” ( पाक़ीज़ा), “मेहबूबा ओ मेहबूबा”(शोले), ” तुम जो मिल गये हो” (हंस्ते जख्म) अशी अनेक गाणी केली. पाक़ीज़ाच्या ‘चलते चलते’ मध्ये तर त्यांनी अविस्मरणीय गिटार वाजवली आहे.

झाले असे की तेव्हा संगीत वाद्ये असणाऱ्या एका कंपनीने त्यांना hire केले आणि गिटार वादक बनवले. त्यांनी व्हायोलिन, बेस गिटार (bass guitar), 12 string guitar, अशी अनेक वाद्ये त्या दरम्यान शिकली. ते एकमेव गायक होते ज्यांना इतकी वाद्ये वाजवता येत होती. हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी स्पॅनिश गिटारची ओळख करून दिली. त्यांना गिटार वादक पेक्षा गायक म्हणून ओळखले जाणे अधिक पसंत होते. पण तरी यातली बरीच गाणी त्यांनी दोस्ती खातर केलेली आहेत. यावरून त्यांचा दिलदारपणा दिसून येतो.

राहुल देव बर्मन, गुलज़ार साहेब, मदन मोहनजी यांच्या बरोबर खूप दोस्ती होती. गुलज़ार साहेब आणि भूपिंदरजी यांच्यात पंजाबी आणि उर्दूमुळे नाळ जोडली गेली होती. आर. डी. बर्मन यांच्या तर प्रत्येक गाण्यात ते टीम सोबत असेलच पाहिजेत असा आर.डींचा हट्टच असायचा. मदन मोहनजींसोबत सुद्धा त्यांची खूप सुंदर ट्यूनिंग जमली होती.

बदलत्या काळानुसार सिंग यांना चित्रपटांच्या ऑफर कमी होत गेल्या. एक कारण होते की ढिशूम दिशूम करणाऱ्या ॲक्शन हिरोंसाठी त्यांचा आवाज योग्य नव्हता. १९८० च्या पुढे अशाच सिनेमांचा बोलबाला वाढला.

१९७० आणि १९८० च्या दशकात बहुसंख्य नवीन अभिनेत्यांच्या पसंतीस उतरलेल्या रफी किंवा किशोर कुमारच्या विपरीत, भूपिंदरसिंग नवीन तेवढे भाग्यवान नव्हते. मात्र त्यांनी ज्यांना पार्श्वगायन केले आणि जेवढी म्हणून गाणी गायली तेवढी सगळी क्लासिक हिट्स ठरली, जी आजही जनमानसात तेवढीच प्रसिध्द आहेत.

सिंग यांनी संजीव कुमारजींसारख्या प्रस्थापित स्टार्ससाठी गायले, त्याचप्रमाणे मिथुन चक्रवर्ती, सुरेश ओबेरॉय, सईद जाफरी, जितेंद्रजी आणि अमोल पालेकरजींसाठी अनेक लोकप्रिय गाणी गायली. त्यापैकी बरीच गाणी अशी होती की जी कदाचित इतर कोणाच्याही आवाजात अकल्पनीय होती.

१९८० च्या दशकात, सिंग यांनी आपली पत्नी, मिताली मुखर्जी यांच्यासोबत गझल सादरीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, गुलजार यांनी त्यांचे दीर्घकाळचे स्वप्न, मिर्झा गालिब या चित्रपटात जगजित सिंग व भूपिंदर सिंग गायले होते.

भूपिंदर सिंगजींचा शेवटचा मोठा चित्रपट ‘बदलों से काट काटके’ हे सत्या (१९९८) चित्रपटातील शेवटचे पार्श्वगायन केलेले गाणे होते. गुलजार यांनी ते लिहिले आणि विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केले होते.

१९८३ मध्ये बंगालमधील मिताली मुखर्जी यांच्याशी लग्न केल्यानंतर, दोघांनी दूरदर्शनवर (दूरदर्शन) आणि मैफिलींमध्ये गझल गायला सुरुवात केली. ही जोडी लोकांमध्ये झटपट हिट ठरली कारण मिताली गाताना नेहमी हसतमुख असायच्या आणि सिंग मात्र शांत, धीरगंभीर; मोठे तरल, स्वप्नाळू डोळे आणि भावनाप्रधान आवाज. त्यांच्या नॉन-फिल्मी हिट गझलांपैकी, “राहों पे नजर रखना” ही खूप हिट झाली होती.

मिताली सिंग यांचा जन्म मिताली मुखर्जी म्हणून बांगलादेशातील मयमनसिंग (Mymensingh) शहरात अमूल्य कुमार मुखर्जी आणि कल्याणी मुखर्जी यांच्याकडे झाला. त्यांनी पं. मिथुन डे यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. नंतर बडोदाच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात संगीताचे शिक्षण घेतले. त्यांचा पहिला अल्बम ‘साहिल’ होता, जो HMV ने केला होता. तमिळ आणि गुजरातीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. सा रे ग मा पा आणि शेरा कोंथो सारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन शोज् मध्ये परीक्षक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांचे भूपिंदरजींशी लग्न झाले.

त्या दोघांची भेट कशी झाली याचा पण खूप मस्त किस्सा आहे !

भूपिंदरजींनी मितालीजींना जेव्हा पहिल्यांदा आरोही, दूरदर्शनवर पाहिले, तेव्हा तिच्या आवाजाने खूप प्रभावित झाले. ते सांगतात, “तिचा आवाज मी आधी ऐकलेल्या कोणत्याही गोष्टीसारखा नव्हता – भावपूर्ण आणि सुरात.” मितालीजी एका संगीतमय कुटुंबात वाढल्या होत्या. “माझ्या भावाने मला भूपीने गायलेल्या बांगला गाण्याची ओळख करून दिली. मी तेव्हा खूप प्रभावित झाले होते.” जेव्हा ते पहिल्यांदा ते भेटले आणि त्यांनी स्वतःची ओळख करून दिली, तेव्हा भूपिंदरजी त्यांना म्हणाला, “हो मिताली, मी तुला टीव्हीवर ऐकले आहे आणि मला तुझा आवाज आवडतो.” हे ऐकून अर्थात मितालीजी आपले हृदय भूपिंदरजींना देऊन बसल्या !

त्यांच्या ३८ वर्षांच्या सहजीवनाचे रहस्य मिताली जी सांगतात,  “मला विश्वास आहे की संगीताने आम्हाला जवळ आणले आणि इतकी वर्षे आम्हाला एकत्र ठेवले. अर्थातच नेहमीचे “नोक-झोक” आणि “भांडणे” होत असतात, पण मला वाटते की हे छोटे वाद आपल्याला जवळ आणतात.” “ मी वाद आणखी कोणाशी घालणार ?” असे एका मुलाखतीत भूपिंदरजींनी प्रांजळपणे सांगितले होते !

अतिशय सुंदर समन्वय असलेले जोडपे एकमेकांच्यासाठी नेहमी छोट्या मोठ्या गोष्टी करत राहायचे. त्यांना मितालीजींच्या हातचे बंगाली सरसों मासे खूप आवडायचे, पण काटे काढायचा खूप कंटाळा यायचा. मग मिताली जी आपल्या हातांनी काटे काढून त्यांना मासे भरवत असत. तर भूपिंदरजींनी आपल्या प्रिय पत्नीला वाढदिवसाची भेट म्हणून थेट एक गझलच लिहिली आणि संगीतबद्ध करून गायली देखील. “यादों को सर-ए-शाम बुलाया नहीं करते” केवळ त्यांच्यासाठी, स्टेजसाठी नव्हे. केवढ्या खुश झाल्या होत्या मितालीजी ! अर्थात खूप वर्षांनी ते स्टेजवर गायला लागले ती गझल, पण तेव्हाही प्रत्येक वेळी मितालीजींना खूप स्पेशल वाटायचे !

जिथे प्रेम असते तिथे जादू असते असे म्हणतात आणि मिताली आणि भूपिंदर सिंग यांच्या प्रेमातील जादू शेवटपर्यंत अखंड राहिली. ते केवळ लग्नाच्या पावित्र्याने बांधलेले नव्हते, तर त्याहूनही महत्त्वाच्या म्हणजे संगीताच्या पवित्र बंधनाने बंधले होते.

या दोघांच्या प्रेमाची जादू इतर जोडप्यांपर्यंत ही पोचली. इथे एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. १९९१ मध्ये, कॅनडामध्ये, त्यांच्या आवडत्या, “शम्मा जलाये रखना जब तक के में ना आऊं,” या गाण्याच्या परफॉर्मन्सनंतर, प्रेक्षकांमधील एक भारतीय जोडपे आले आणि त्यांनी कबूल केले की ते घटस्फोटाच्या मार्गावर आहेत, परंतु भूपी-मितालीची केमिस्ट्री पाहून स्टेजवर, त्यांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. “आम्ही आश्चर्यचकित झालो की या जोडप्याला संगीताने इतका स्पर्श झाला आणि आम्ही त्यांच्यावर इतका प्रभाव टाकू शकलो,” मितालीजी म्हणाल्या.

गीत : एक अकेला इस शहर में
चित्रपट : घरौंदा (१९७७)
दिग्दर्शन : भीम सेन
गीतकार : गुलज़ार
संगीतकार : जयदेव
कलाकार : अमोल पालेकर
गायक : भूपिंदर सिंग

आज मला भावलेल्या गाण्यांमध्ये मी भूपिंदरजींचे “एक अकेला इस शहर में” विषयी बोलणार आहे. हे गाणे लहानपणापासून अतिशय आवडते. आणि खरं सांगायचं तर, ज्यांनी कोणी हे गाणे ऐकले, मग ते अगदी सेलिब्रिटीज् पासून सामान्य माणसापर्यंत प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर हे गाणे आपल्यासाठीच बनले आहे, असे वाटल्याशिवाय राहणार नाही.

अमोल पालेकर यांच्या अभिनयाने अक्षरशः हृदय पिळवटून निघते हे गाणे बघताना. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा हा अनुभव असेल. मला वैयक्तिक रित्या हे खूप जवळचे आहे गाणे. आम्ही लहानपणी वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने मुंबईहून पुण्याला आलो आणि मग बरीच वर्षे भाड्याच्या घरात राहिलो. कित्येक वेळा घर मालकाला खाली करून हवे असले की मग बाड बिस्तारा उचलून आमचे बिऱ्हाड निघाले दुसऱ्या घरी. एकाच शहरात राहूनसुद्धा, शहरात इतर नातेवाईक असूनसुद्धा इथे आपले कोणीच नाही असे उगाच कायम वाटत राहिले.

एकच ठिकाण जे मला अखेरीस घरासारखे वाटले होते तो म्हणजे निगडी प्राधिकरण येथील आमचा बंगला, “आशियाना.” तिथे मात्र खऱ्या अर्थाने आशियाना म्हणजे घरकुल सापडल्यासारखे वाटायचे. मात्र आई गेली आणि तो आशियाना हरवला तो कायमचाच…

लग्नानंतर शहर बदलले, मग देश. मुंबईच्या गर्दीत अगदी एकटे व्हायला झाले. लोक नवीन, जागा नवीन, चाली रिती नवीन, मित्र – मैत्रिणी नवीन. आयुष्याचा जणू ध्रुवच बदलून गेला होता. त्या काळी आपल्याला समजून घेणारे हे एक गाणे आहे असे प्रकर्षाने वाटायचे. अमोल पालेकर आणि भूपिंदर सिंग आणि मी.

एक अकेला इस शहर में
रात में और दोपहर में
आब-ओ-दाना ढूँढ़ता है
आशियाना ढूँढ़ता है

*आबो ओ दाना (उर्दू शब्द) – पाणी आणि अन्न.
*आशियाना – घरटे.

दिवसाचा कोणताही प्रहर असो, मुंबई सारख्या शहराचा आत्मा अशांतच वाटतो. माणसांच्या गर्दीतही एकटेपण देते हे शहर. ट्रेन, बस, ऑफिस, मॉल, पार्टी, असंख्य माणसे म्हणायला सोबत आणि तरी आपण मात्र एकटेच! अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी शोधार्थ सतत फिरत असतो. प्रत्येक जण इथे आपले एक छोटेसे घरकुल असावे असे स्वप्न बाळगून येतो. आणि मग कळतं की हे तर चंद्राला गवसणी घालण्याइतके कठीण आहे. स्वप्नपूर्तीचा हा रस्ता खूप लांबचा आहे आणि टेकायला विसावा मिळणेही कठीण!

दिन खाली खाली बर्तन है
और रात है जैसे अँधा कुआँ
इन सूनी अँधेरी आँखों में
आँसू की जगह आता है धुआँ
जीने की वजह तो कोई नहीं
मरने का बहाना ढूँढता है

इथे गुलज़ारजींनी किती सुंदर रित्या विविध उपमा आणि विरोधाभास अलंकार वापरला आहे पहा. दिवसाला ते एक मोकळे भांडे म्हणतात. किती मोठा विरोधाभास आहे पहा. आपला दिवस हा वरवर पाहता कामांनी खचाखच भरलेला असतो. पण याच दिवसात मन मात्र एकटेपणात अडकलेले असते. एखाद्या मोकळ्या भांड्यात जसे कोणताही आवाज घुमतो, थोडेसे काही टाकले की टणाटण उडते आणि त्याचा मोठा आवाज होतो, तसेच हे विचार मनात घुमत राहतात.

शहरातली रात्र ही एखाद्या अंधाऱ्या खोल विहिरीसारखी भासते. बस अंधारच अंधार आणि न संपणारी खोली. आत पडतोय, पडतोय, पण तळ मात्र दिसत नाही. कधी संपणार आहे हे एकटेपण काहीच अंदाज येत नाही.

माणसांच्या गर्दीतही डोळ्यासमोर एखाद्या अंधाऱ्या, निर्जन जंगलात असल्याचा भास होतो. सहन होत नाही. ओरडावेसे वाटते, रडावेसे वाटते, पण हाय हे दुर्दैव! नजरेत हा निरेशाचा धूर इतका भरून राहतो की शेवटी स्वतःचेच अश्रू दिसेनासे होतात..

फसवणारे प्रत्येक वळणावर लचके तोडायला टपलेलेच आहेत. कोण आहे आपले या शहरात? जगण्याचे एकही कारण दिसत नाही. काय करायचे जगून? कशासाठी? कोणासाठी? मरून जावे हेच बरे, असे वाटून मरण्यासाठी वेगवेगळे बहाणे शोधू लागतो. स्वप्ने उराशी बाळगून एखाद्या शहरात येणाऱ्या माणसाची काय ही शोकांतिका व्हावी ! भूपिंदरजींचा आवाज अगदी आपल्याला खरंच रडवून जातो या कडव्यात. हा क्षण केव्हातरी काही सेकंद का होईना आलेला असतो आपल्या आयुष्यात. तो क्षण प्रत्येक वेळी हे गाणे ऐकताना समोर येतो हे निश्चित !

इन उम्र से लंबी सड़कों को
मंज़िल पे पहुँचते देखा नहीं
बस दौड़ती, फिरती रहती हैं
हमने तो ठहरते देखा नहीं
इस अजनबी से शहर में
जाना पहचाना ढूँढता है

असं वाटतं की आपल्या स्वप्नांचे गंतव्यस्थान माहीत असले तरी तिथे पोचणारे अनेक अनेक रस्ते तर आहेत. पण या रस्त्यांवरचा प्रवास जणू न संपणारा असतो. कितीही कष्ट केले तरी कधीकधी वाटते की एक पाऊल पुढे जातोय अन् चार पावले मागे येतोय. ही ध्येय साध्य करण्याची जीवघेणी दौड जणू संपतच नाही. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा सामान्य माणूस अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या शोधार्थ, मायेच्या त्या जंजाळात अविरत फिरत राहतो. एक ओळखीचा चेहरा शोधतच राहतो. एक असा चेहरा, एक असा माणूस, जो आपल्याला खरेच ओळखतो, आणि काही झाले तरी आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. नशीबवान माणसांना अशी माणसे मिळूनही जातात. ज्यांना नाही मिळत ते एकटेच या शहरात तो मायेचा ओलावा शोधत राहतात.

भूपिंदरजी गेल्यानंतर मितालीजींना त्यांच्या मागे हीच उणीव प्रचंड जाणवत असणार नाही का ?…

इतक्या एकटेपणाची, एकाकीपणाची वेदना भूपिंदरजींच्या आवाजातून व्यक्त झाली आहे.

भूपिंदरसिंग यांचा मधुर आवाज अद्वितीय होता. गायक आणि संगीतकार म्हणून त्यांनी गझलांच्या दुनियेत आपल्या पत्नीसोबत एक नवीन स्थान निर्माण केले ज्यामुळे ते दिग्गज बनले. भूपिंदर सिंग हे भारतातील सर्वात लक्षणीय सांस्कृतिक चिन्हांपैकी, ज्यांना आपण cultural icon म्हणतो, त्यापैकी एक आहेत.

भूपिंदरजी तुमचे कार्य अविस्मरणीय आहे. तुमचा आवाज अविस्मरणीय आहे. पण काळ कोणासाठी थांबत नसतो आणि वेळ आली की तर नाहीच नाही. १८ जुलै, २०२२ ला अखेर ती वेळ आली. तुम्हाला घेऊन जाणे अगदी जिवावर आले असणार त्या यमाच्या. त्यानेही केवळ त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी मजबुरीनेच तुम्हाला सोबत नेले. कारण त्या परमेश्वराने ही खूप वाट बघितली तुमची…

शेवटी जाता जाता एकच म्हणीन सगळ्या चाहत्यांच्या वतीने, जे तुमच्या पहिल्या गाण्याच्या बोलावरून सुचले…

होके मजबूर…तुम्हें… उसने बुलाया होगा.. होके मजबूर

तनुजा प्रधान

– लेखन : तनुजा प्रधान, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. तनुजा ताई,लेख अत्यंत सुरेख उतरला आहे.गाण्याची आवड आणि साहित्यिक प्रतिभा दोन्हींचा संगम तुमच्याकडे आहे.

  2. “NewsStoryToday”च्या👌👍अक्षरशः मी प्रेमात पडलो आहे !! अत्यंत धावपळीच्या व धकाधकीच्या या काळात श्री देवेंद्र भुजबळ व सौ. अलका भुजबळ हे दांपत्य समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करीत आहेत हे पाहून समाधान वाटले व खूsssप आनंद झाला. या दांपत्याचे मनापासून अभिनंदन !! व अनंत शुभेच्छा !! 🌹💐🚩🕉️👌👍😊☺️🤗🙏 अजूनही खूsssप लिहावेसे वाटते परंतु आता थांबतो. *ईती लेखनसीमा* 🌹💐🚩🕉️😊☺️🤗🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments