Sunday, July 13, 2025
Homeयशकथाभावलेले भावे

भावलेले भावे

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी 9 ऑक्टोबर 2021 रोजी वयाची 81 वर्षे पूर्ण करून 82 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या सहस्त्रचंद्रदर्शन पूर्तीनिमित्त महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे या संस्थेने बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्यांच्या नागरी सन्मान सोहळ्याचे आज आयोजन केले आहे.
त्या निमित्ताने हा विशेष लेख…..

साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी रोहा जि. रायगड येथील खाणीतून मधुकररुपी हिरा 1959 साली शोधून मुंबईत आणला आणि मराठा मध्ये तो घडविला. पुढे 1970 च्या दशकात या हिऱ्यावर अधिक पैलू पाडण्याचे काम जवाहरलालजी दर्डा यांनी लोकमतच्या माध्यमातून केले आणि मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये हा कोहिनूररुपी हिरा नेहमीच सर्वांचे आकर्षण राहिला आहे.

सामान्य कार्यकर्त्याच्या, सामान्य माणसाच्या मनातील भावना ओळखून गेली 60 वर्षे सातत्याने लिहित्या राहिलेल्या मधुकर भावे यांच्या कार्यकर्तृत्वाला प्रणाम.

भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख तसेच आध्यात्मिक क्षेत्राला कृतीशीलतेचे संस्कार देणारे स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले हे रोह्याचे. याच गावातील गोपीनाथशास्त्री भावे यांच्याकडे त्यावेळी नारायण नागू पाटील यांच्या कृषिवल या साप्ताहिकाचे वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या मुलाची मागणी आचार्य अत्रे यांनी केली. त्या मधूकरला 1959 साली आचार्य अत्रे मुंबईत घेऊन आले आणि मुंबईतील एका रेल्वे स्थानकाच्या फलाटावर सोडून देऊन दुसऱ्या दिवशी मराठा वृत्तपत्राच्या कचेरीत ये असे सांगून निघून गेले.

रात्र फलाटावर काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते मराठा वृत्तपत्र कचेरीमध्ये दाखल झाले. 60 रुपये महिना पगारावर वार्ताहर म्हणून त्यांचे काम सुरू झाले. दिवसभर बातमीदारीसाठी पायपीट करायची, दिवसा वडा पाव आणि रात्री राईस प्लेट खाऊन मराठाच्या कचेरीतील टेबलावर पेपर अंथरूण रात्री आराम करायचा अन पुन्हा कोंबडा आरवल्यावर बातमीदारीचे काम सुरू व्हायचे. पुढे कामगारनेते जॉर्ज फर्नांडिस आणि मधुकर भावे अनेक वर्षे एका खोलीत वास्तव्यास होते.

आचार्य अत्रे यांच्या कठीण परीक्षेत पात्र ठरल्यानंतर अत्रे साहेब जेथेजेथे गेले तेथेतेथे भावेंना बरोबर घेऊन गेले. तो काळ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने भारलेला काळ होता. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मराठी माणसाचे महाराष्ट्र हे राज्य दिलेच पाहिजे यासाठी सर्वत्र प्रचंड आंदोलने सुरू होती. या मागणीसाठी होणाऱ्या लाखोंच्या सभा आचार्य अत्रे यांच्या भाषणांनी दणाणत होत्या. या सभांचे वृत्तांकन करण्याची अविस्मरणीय कामगिरी मधूकर भावे यांनी केली आहे.

आजही त्या काळातील मराठाचे अंक वाचावयास घेतले तर त्यातील वृत्तांकन वाचून साक्षात त्या सभेचे जसेच्या तसे दृश्य डोळ्यासमोर उभे राहील.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश यशवंतराव चव्हाण घेऊन येण्यात यशस्वी झाले. यानिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्कवर पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रचंड जाहीर सभेचे वार्तांकन करण्याचे भाग्य देखील मधुकर भावे यांना लाभले आहे. मराठाचा दि 2 मे 1960 चा अंक वाचला की त्या सभेचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
मराठी राज्याचे नाव प्रारंभी मुंबई राज्य असे ठेवण्याचा विचार सुरू होता त्यावेळी आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्र हेच नाव मराठी राज्याचे राहील असा आग्रह धरला. त्यावेळी मुंबई हे नाव ठेवून कंसात महाराष्ट्र असा पर्याय सुचविला गेला तेव्हा आईच्या पोटात मूल की मुलाच्या पोटात आई असा खडा सवाल आचार्य अत्रे यांनी विचारला आणि अखेर त्यांचा आवेश पाहून केंद्र सरकार हादरले आणि महाराष्ट्र याच नावाने मराठी राज्याची निर्मिती झाली. या प्रसंगाचे साक्षीदार होण्याचे भाग्य देखील भावे यांना लाभले आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे अलोट प्रेम भावे यांना लाभले आणि त्यामुळे प्रारंभापासून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक इत्यादी क्षेत्राच्या प्रगतीचे प्रारंभापासून साक्षीदार असलेले मधुकर भावे यांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व घडत गेले. कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आदींपासून विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे काम तसेच विरोधी पक्षनेते उध्दवराव पाटील, एस. एम. जोशींपासून गोपिनाथ मुंडेंपर्यंत विरोधी पक्षनेत्यांचे काम अनुभवण्याची संधी भावे यांना मिळाली आणि त्यातून त्यांचे एक अभ्यासू पत्रकार असे व्यक्तिमत्त्व घडत गेले.

1970 च्या दशकात मधुकर भावे लोकमत वृत्तपत्रात मुंबईचे वार्ताहर म्हणून दाखल झाले. त्याकाळी त्यांचे दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे मुक्काम पोस्ट मुंबई हे सदर वाचण्यासाठी वाचक अतिशय उत्सुक असत. पुढे 1990 च्या दशकात लोकमतचे नवी दिल्ली येथील प्रतिनिधी म्हणून मधुकर भावे यांची नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांचे दिल्लीतील राजकीय हालचाली टिपणारे उत्तर-दक्षिण हे सदर अतिशय लोकप्रिय झाले होते. त्यानंतर पुढे भावे यांची लोकमतच्या नागपूर, जळगाव आवृत्तीचे संपादक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. पुढे 1997 मध्ये लोकमतच्या नाशिक आवृत्तीचे तर 1998 मध्ये लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक म्हणून भावे यांनी काम पाहिले आणि लोकमतच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये बहुमोल योगदान दिले.
तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या सूचनेवरून भावे यांनी पेटलेल्या पंजाबचा 24 दिवस दौरा केला आणि गृहमंत्र्यांना महत्वपूर्ण माहिती पुरविली. या अनुषंगाने बुलेट ते बॅलेट ही लोकमतमधली त्यांची वृत्तमालिका अतिशय गाजली. महाराष्ट्र विधानसभेचे मुंबई, नागपूर अधिवेशनाचे सलग तीस वर्षे वृत्तसंकलन करण्याचे काम त्यांनी केले. आजवर त्यांचे सुमारे 5 हजार लेख विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

लोकमतबरोबरच त्यांनी विलासराव देशमुख यांच्या एकमत, रामशेठ ठाकूर यांच्या रामप्रहर आणि नारायण राणे यांच्या प्रहार या दैनिकाचे संपादक म्हणून काही काळ काम केले. गेली 15 वर्षे मुक्त पत्रकार म्हणून ते कार्यरत आहेत.
सुमारे 15 वर्षांपूर्वी दैनिक वृत्तपत्राच्या व्यापातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी विविध विषयांवर सुमारे 20 पुस्तके आजवर लिहिली आहेत. त्यापैकी यशवंतराव ते विलासराव हे आजवरच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणारे पुस्तक तर अनेक अभ्यासू व्यक्तिमत्वांसाठी संदर्भ ग्रंथ ठरले आहे. महाराष्ट्र-50, महाराष्ट्र-60, महाराष्ट्र काल, आज आणि उद्या, आचार्य अत्रे यांच्या जीवनावरील मंतरलेले दिवस, यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील सह्याद्री ते हिमालय, वसंतदादा पाटील यांच्या जीवनावरील सर्वांचे दादा, शंकरराव चव्हाण यांच्या जीवनावरील भगीरथ, शरदराव पवार यांच्या जीवनावरील महानायक, राजारामबापू पाटील यांच्या जीवनावरील बापू तर विलासराव देशमुख यांच्या जीवनावरील राजहंस व मुद्रा ही पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली असून अनेक मान्यवर अभ्यासकांच्या वैयक्तिक ग्रंथालयात विराजमान झाली आहेत.

कृतज्ञ भावनेचा वस्तुपाठ

मधुकर भावे यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा अफाट जनसंपर्क. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात भावेंच्या विश्वासातील माणसं पाहायला मिळतात. विधानभवन अथवा मंत्रालयात त्यांच्या सोबत फेरफटका मारायला निघालो तर खेड्यापाड्यातून आलेला एखाद्या सामान्य माणसापासून आमदार , खासदार मंत्र्यांपर्यंतच्या व्यक्तींचा त्यांच्याभोवती गराडा पडतो. या गर्दीत एखाद्या अनोळखी माणसाने देखील सांगितलेले रास्त काम मार्गी लावण्यासाठी भावे कामाला लागतात.
आपला एखाद्या सहकाऱ्याला वैद्यकीय मदतीची गरज आहे हे समजल्यावर ती व्यक्ती चांगल्या रुग्णालयात दाखल होण्यापासून पूर्ण बरी होईपावेतो भावेंचा पाठपुरावा सुरू असतो.
आचार्य अत्रेंची जयंती असो अथवा स्व. जवाहरलाल दर्डा यांचा स्मृतिदिन असो दरवर्षी भावे वरळीच्या अत्रे पुतळ्याजवळ किंवा यवतमाळ मधील दर्डा उद्यानात वंदन करण्यासाठी न चुकता उपस्थित असतात. एव्हढ्या निष्ठेने आणि कृतज्ञ भावनेने काम करणारी माणसं पाहायला मिळणं विरळच !

काँग्रेस विचाराचे सच्चे पाईक

विविध धर्मांचा, अठरापगड जातींचा आणि असंख्य भाषांनी बहरलेला भारत देश एकसंघ ठेवण्याची ताकद केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षाच्या विचारातच आहे यावर भावे यांची ठाम निष्ठा आहे. त्यामुळेच ते सातत्याने सांगत असतात की मी पु. भा. भावे नव्हेतर विनोबा भावेंच्या विचारांचा पाईक आहे.
केंद्रात झालेल्या सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर अनेक ज्येष्ठ पत्रकारांच्या लिखाणात झालेले वैचारिक बदल ठळकपणे पाहायला मिळतात. परंतु भावेंनी काँग्रेसचा विचार कधीही सोडला नाही, लपविला नाही.
वसंतदादा, शंकरराव, शरदराव, विलासराव आदी ज्येष्ठ नेत्यांनी कधीनाकधी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आणि कालांतराने ते पुन्हा पक्षात आले त्याला अपवाद फक्त स्व. जवाहरलाल दर्डा. दर्डाजींनी अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा विचार कायम बाळगला.
काँग्रेसचा विचार सोडणाऱ्या नेत्यांवर भावेंनी टीकेचे आसूड ओढले आणि चांगले काम करणाऱ्या नेत्यांवर कौतुकाचा वर्षावदेखील केला.
भाजप, मोदी, शहा, फडणवीस यांच्यावर जहरी टीका करण्यात भावे कधीही कचरले नाहीत. नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर जुलै 2014 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले त्यावेळी मोदी-जिनपिंग एका झोपाळ्यावर झोका घेत असल्याचे छायाचित्र प्रसिध्द झाले. या पार्श्वभूमीवर त्यावेळीच भावेंनी लिहिलेल्या लेखाचा मथळा होता,”जिनपिंगला झोका-भारताला धोका”. दुर्दैवाने द्रष्टा पत्रकार असलेल्या भावेंचे हे विधान खरे ठरल्याचे आपण गेल्या काही दिवसांपासून अनुभवतो आहोत.

वक्ता दससहस्त्रेशू

पुढीलवर्षी शतक महोत्सव साजरा करणाऱ्या नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेचे काम मी गेल्या 30 वर्षांपासून करतो आहे. 1 मे ते 31 मे अशी 31 दिवसांची आमची व्याख्यानमाला असते. त्यामुळे मी गेल्या 30 वर्षात 930 नामांकित वक्त्यांना व्याख्यानमालेत बोलविले आहे.
आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर, पु. ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन. वक्ता दससहस्त्रेशू ही बिरुदावली या वक्त्यांना शोभते. याच रांगेत मधुकर भावे यांचा देखील समावेश करावा लागेल.
एखाद्या विषयावर भावेंचे भाषण सुरू झाले की सभागृहात असंख्यवेळा हंशा- टाळ्यांचा पाऊस पडत असे. एखादा गंभीर प्रसंग कथन करून ते श्रोत्यांच्या डोळ्यात पाणीदेखील आणतात आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे बोट सोडल्याने महाराष्ट्र आज भरकटलेल्या अवस्थेत दिसतोय असे विधान करून ते श्रोत्यांना विचारमग्न अवस्थेत घेऊन जात असतात.
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भावे यांनी सन 2012-13 मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात 100 व्याख्याने देऊन नवीन पिढीसमोर चव्हाण साहेबांच्या विचारांचा जागर केला. या विषयावर त्यांची अमेरिकेत देखील 5 व्याख्याने झाली. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन “महाराष्ट्र : काल, आज आणि उद्या” या विषयावर व्याख्याने देऊन महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि कमतरतेबद्दलची कारणमीमांसा देखील केली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी कामगारांनी, शेतकऱ्यांनी बलिदान दिले पण त्यांची आज काय अवस्था आहे असा खडा सवाल ते विचारत असतात. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी लढले कोण आणि गब्बर झाले कोण ? हा त्यांचा सवाल सगळ्यांनाच विचारमग्न अवस्थेत घेऊन जात असतो.

गोवर्धन- सामाजिक कार्य

पत्नी मंगला भावे यांचे गेल्यावर्षी निधन झाल्यानंतर भावेंची प्रकृती खालावली. पाठीच्या मणकेतील एक शीर आखडल्याने त्यांना चार पावलं टाकणे देखील अवघड बनले. सतत भटकंतीची सवय असलेल्या भावेंना हे जगणं अवघड वाटू लागलं. वयोपरत्वे या आजारावरील शस्त्रक्रिया करणेदेखील अवघड बनले होते. अशा अवस्थेत किशोर अग्रहरकर हा मित्र भावेंना जोधपूर येथे
डॉ. गिरीधर पाराशर यांच्याकडे घेऊन गेला. पाराशर यांनी भावेंच्या पाठीतील दबलेली नस हाताच्या दोन अंगठ्याच्या साहाय्याने 10 मिनिटात मोकळी केली आणि भावे पूर्ववत चालू लागले.
या पार्श्वभूमीवर डॉ. पाराशर यांच्या उपचार पद्धतीबद्दल “दो अंगुठेका कमाल” हा भावे यांनी लिहिलेला लेख सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. देशाच्या विविध भागांतील वर्तमानपत्रांनी त्यांच्या त्यांच्या भाषेत हा लेख प्रसिध्द केला.
परिणामतः पाठीच्या आजारांनी, पायांच्या आजारांनी त्रस्त असलेले हजारो रुग्ण जोधपूरला पोहोचले आणि डॉ. पाराशर यांच्या उपचारांनी बरे देखील झाले.
महाराष्ट्रातून येणाऱ्या रुग्णांची एव्हढी गर्दी जोधपूरला होऊ लागली की डॉ. पाराशर यांना अखेर भावेंच्या पुढाकाराने मुंबईतील मालाड भागात उपचारकेंद्र सुरू करावे लागले.
मधुकर भावे यांनी डॉ. पाराशर यांच्या जीवनकार्यावर लिहिलेल्या गिरीधर या पुस्तकाचे प्रकाशन येत्या 9 मार्चला मुंबईत होत आहे.
अशा विचारवंत पत्रकार मधुकर भावे यांच्या नागरी सत्कार समारंभानिमित्त त्यांना दीर्घायुषी आरोग्यदायी शुभेच्छा.

– लेखन : श्रीकांत गजानन बेणी. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments