देशात चाललेल्या महामारीच्या युद्धात शस्त्रांची नाही, तर मनोधैर्य वाढवण्यासाठी बलाढ्य इच्छाशक्तीची गरज आहे.
भिती म्हणजे काय? घरात बाबांचा राग तापला, की घरातील सर्व मंडळी शांत होते. कारण त्या रागाने काही विपरीत घडू नये, याची भिती सर्वांना वाटते. शाळेचा गृहपाठ राहीला, की शिक्षकांची भिती वाटते. परीक्षा म्हटली, की भितीने पोटात गोळा येतो. परीक्षेत कमी गुण मिळाले, की पालकांची भिती वाटते. चुकून आपल्या हातून काही हरवले, की मोठ्यांना ती गोष्ट सांगण्याची भिती वाटते.
तारुण्यात तर अनेक गोष्टी लपून केलेल्या असतात. त्या घरात सांगणे भितीदायक वाटते. कामचोरपणा करताना स्व:तालाच स्व:ताची भिती वाटते.
भितीने भले भले दिशाभूल होत असतात. कोणत्याही गोष्टीची मनात भिती बसली, की तिचे प्रथम दर्शन त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर होते. रेल्वेचा तिकीट चेकर अवाढव्य गर्दीतून, घाबरलेले चेहरे पारखतो, नि त्यांना जवळ बोलावतो. कारण तिकीट न काढल्याचे भय त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटलेले असते. सत्य घटनेचा छडा लावताना पोलिस अधिकारी खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव व भितीची लकीर अचूक ओळखतात.
अनावश्यक भितीचे गंभीर परिणाम दिसून येतात. व्यक्तीचे मनोधैर्य ढासळते, खचून जाते. ती व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसते. हळूहळू ती पराजयाकडे सरकू लागते. पुढे पडणारे पाऊल आपसूक मागे येतं. अखेर भितीचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होत जातो. मुलांना अति भिती दाखवल्यामुळे ती मनाने कमजोर होतात.
मानसिक भयरुपी रोगावर कोणतेही औषध जलद काम करत नाही. त्यावर एकच औषध म्हणजे सकारात्मक विचार!
मानसिक भयाने होणारे रोग म्हणजे रक्तदाब वाढणे, मनाला बेचैनी येणे, जीवनातील आनंद लोप पावला असे वाटणे, छाती धडधडणे, शांत झोप न लागणे, नैराश्य अशासारखे होत.
मित्रांनो, आज आपल्या डोळ्यादेखत तेच चालू आहे. आपल्या देशावर आलेल्या महामारीमुळे बरेच रुग्ण दगावत आहेत. माणूस म्हटला की त्याला आजार हा येणार. आजतागायत कित्येक माणसांनी आजारपणं झेलली असतील. प्रत्येक व्यक्तीची शरीराप्रकृती वेगवेगळी असते. काहींना जास्त त्रास होतो तर काहींना सौम्य होतो. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती कमी-जास्त असते. आज मात्र उलट चित्र दिसत आहे. प्रत्येक जण भितीच्या दडपणाखाली आहे. ताप, सर्दी, खोकला झाला की वाटतं आपल्याला ह्या विषाणूने विळखा घातला की काय? ह्या भयाने शरीरातील प्रतिकार शक्ती कमी होवू लागते. हृदयावर ताण येतो व सकारात्मक विचार करण्याची शक्ती गळून पडते. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक विचारसरणी जोपासली पाहिजे. एकमेकांना सकारात्मक बळ देणे काळाची गरज आहे. हे सुद्धा दिवस संपतील, अशी दृढ इच्छा प्रत्येकाच्या मनात कोरली पाहिजे.
सकाळ-संध्याकाळ योगासने, ध्यान धारणा केली पाहिजे. सकाळ व संध्याकाळी प्रार्थना म्हटली पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. सकस आहार घ्यावा. चांगली झोप घ्यावी. विनोद निर्मितीवर पोट धरून हसावे.
शेवटी हे, लक्षात ठेवावे की भित्यापोटीच ब्रह्म राक्षस असतो. म्हणून विनाकारण भिऊ नका, मनात आत्मविश्वास बाळगा आणि आनंदी रहा.
-लेखन : वर्षा महेंद्र भाबल.
-संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
भीती!!! खूप छान लेख. लेखिकेने खूप सुंदर लेख माडला आहे. विनंती अजून काही नवी लेख वाचायला आवडेल.