तीस वर्षांपूर्वी गावी एक्झिबिशन हा प्रकार नव्हता. लग्नानंतर मात्र मुंबईत आल्यावर एक्झिबिशन म्हणजे काय ? हे समजू लागले. कारण वांद्रे रेक्लेमेशनला प्रत्येक वर्षी एक्झिबिशन भरत असे आणि बर्याच वेळा मी एक्झिबिशन बघायला जाई. भारतातील सर्व राज्यातील विविध वस्तू पहायला आणि खरेदी करायलाही मला खूप आवडे.
आता तर गावागावात प्रदर्शन भरू लागली आहेत. बचत गटाचे जेंव्हापासून जाळे विणले जाऊ लागले तसतसे गावातील महिला लोणची, पापड, पिशव्या, परकर एक ना अनेक वस्तू बनवू लागल्या. भारतात इतक्या जाती धर्माचे लोक असल्याने विविधताही तितकीच आहे. प्रत्येक राज्याची, तेथे रहाणार्या लोकांची संस्कृती जशी वेगळी, तसेच तिथे बनणाऱ्या वस्तूही वेगवेगळ्या आहेत जसे – सरहानपूर मधील लाकडी कलाकुसरीचे सोफा सेट, बनारसच्या बनारसी साड्या, पश्चिम बंगालमधील चटई विणतात त्या गवतापासून बनविलेल्या पर्सेस, कलकत्त्याची साडी असे एक ना अनेक वस्तू पहातच रहाव्यात अशा असतात.
माझी मुलगी डिझायनर असल्याने ती एकदा सलमान खान च्या “नोट बुक” या चित्रपटासाठी श्रीनगरला गेली होती. तिथे बनणाऱ्या स्वेट मटेरीयलच्या पर्सेस तिला फार आवडल्या. त्यावर केलेले काश्मिरी वर्क खूपच सुंदर दिसते. तिने तिथून आणलेली पर्स मलाही आवडली. तिथल्या महिला सुंदर भरतकाम करून कापडी पिशव्या, पर्सेस तयार करतात. त्याही छान होत्या. मी विचार केला तिथे बनणाऱ्या या सुंदर पर्सचा व पिशव्यांचा आपणही बिझनेस करावा ! मी काही पर्सेस मागविल्यादेखील, पण या विकायच्या कुठे हा प्रश्न होता.. अश्यात समजले की पुण्यात दि. 22 ते 26 डिसेंबर 2021अशी पाच दिवस “भीमथडी जत्रा ” भरणार आहे.
पुण्यात लोणी काळभोर येथे स्वर्गीय राजकुमार काळभोर यांनी महिलांसाठी तेजस्विनी संस्था सुरू केलीच होती… सुरूवातीपासून मी त्या संस्थेची सभासद असल्याने त्या संस्थेच्या अध्यक्ष असणाऱ्या त्यांच्या पत्नी श्रीमती शुभांगीताई काळभोर व अनेक महिला बचत गटाचे प्रतिनिधित्व करणार्या श्रीमती संगीताताई काळभोर यांनी मला या जत्रेत भाग घेण्याचे आमंत्रण दिले.
माझी मैत्रिण डाॅ. अलका नाईक व मी, अशा आम्ही दोघी पुण्यात या जत्रेत भाग घेण्यासाठी गेलो. ते एक जत्रा वजा प्रदर्शनच होते. त्या ठिकाणाची व्यवस्था खूप छान होती. सुंदर पांढर्या रंगाचे फोल्डिंगचे स्टाॅल उभारले होते. टेबलांना पांढर्या सॅटीनच्या कापडाची झालर लावलेली होती. पूर्ण जमिनीवर ब्राऊन रंगाचे कार्पेट अंथरलेले असल्याने तिथे धुळीचा प्रश्न नव्हता. प्रत्येक स्टाॅलच्या मध्ये दोन फुटाचे अंतर सोडलेले.
मधोमध बराच मोठा पॅसेज गिर्हाईकांना येण्याजाण्यासाठी ठेवला होता. महाराष्ट्राची संस्कृती दाखविण्यासाठी वासुदेव, आदिवासी नृत्य, लोक नृत्य, करत मधून मधून फेरी मारत होते. अनेक विद्यार्थी अनेक कर्मचारी सुरक्षारक्षक तिथे तैनात होते.
चारशे स्टाॅल तिथे लावले गेले होते. खाद्यपदार्थाची एक संपूर्ण ओळ होती. बचत गटांच्या अनेक ओळी (स्टॉल्स) होत्या. चटणी, लोणची, पापड, घाण्यावर काढलेले तेल, पिशव्या, काचेचे बनविलेले दागिने, मण्यांचे दागिने, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात पश्चिम बंगाल, वस्तूंची इतकी विविधता की पहातच रहावे.
महाराष्ट्र बँकेने बराच मोठा स्टाॅल घेतला होता व तो तेजस्विनीच्या बचत गटासाठी दिला होता. त्यावर पाचजणींनी आपापल्या वस्तू ठेवल्या होत्या. स्टाॅलचा एक कोपरा मला मिळाला. आमच्या बाजूला पुण्यातीलच एका महिलेला चटणी पापड ठेवण्यासाठी जागा मिळाली होती.
पहिल्या दिवसाच्या दुपारपासूनचा वेळ स्टाॅल सेट करण्यातच गेला. गिर्हाईकांची यायची सुरूवात झाली होती. मी हौसेने स्टाॅल तर लावला पण विक्री कशी करायची ? हा प्रश्न होता. कारण आतापर्यंत बरेच उद्योग केले होते. आर्डरची बिर्याणी करून दिली, कांदा- लसूणचा कोल्हापूरी (माऊली) मसाला अजूनही विकते आहे. उर्जीता जैन यांचे प्राॅडक्टस, काॅटनचे गाऊन हे सर्व घरी राहून विकत होते…पण इथे स्टाॅलवर उभी राहून वस्तू विकणे आतून कुठेतरी मला अवघड वाटू लागले.
अश्यावेळी अलकाने पुढाकार घेतला. एकेका महिलेला बोलावून पर्सेस किती चांगल्या, सुंदर आहेत हे ती पटवू लागली. मी तिच्याकडे पहातच राहिले. अलका प्राध्यापिका व कॉलेजची प्रिन्सिपॉल म्हणून काम करत होती. स्वत:ची आवड निवड जपण्यासाठी तसेच समाजोपयोगी कामे करायला मिळावी म्हणून तिने पदाचा राजीनामा दिला. प्रत्येकांच्या अडीनडीला उपयोगी पडताना अलकाला मी पाहिले आहे पण अशा पध्दतीने विक्रीसाठी युक्ती वापरणारी अलका मी प्रथमच पहात होते.
मग तिने स्पष्ट केले “अगं फरझाना मुंबईत मुलगी लहान असताना मी स्वतः तयार केलेल्या कपड्यांची बरीच प्रदर्शन केली आहेत आणि आता तर मी महिला उद्योजिकांसाठी कार्य करतच आहे”. मला तिचे कौतुक वाटले. श्रीमंत असणे वेगळे व आपल्या कृती कौशल्याने कमाविणे याची बातच कुछ और असते ! हे माझे अन् तिचेही मत. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही पर्सेस जाऊ लागल्या.
आमच्या शेजारी मीरा नावाच्या ताईंनी चटणी मसाला, पापडाचा स्टाॅल लावला होता .पण संध्याकाळपर्यंत त्यांची बोहनी देखील झाली नाही. दिवसभर दुस-याच्या शेतात काम करून दोनशे रूपये मिळवणाऱ्या त्या जोड धंदा म्हणून कांदा लसूण मसाला बनवून विकत होत्या. मला त्यांचे वाईट वाटत होते.
दुस-या दिवशी आम्ही उत्साहाने प्रदर्शनला सुरूवात केली. आदल्या दिवशी आम्ही दिवसभर काही खाल्ले नव्हते हे पाहून त्या ताईंनी आमच्यासाठी घरून डबा करून आणला. ज्वारीच्या भाकर्या, चपाती, सुकी हरबऱ्याची पातळ भाजी, हुलग्याची उसळ, हे बघून माझ्या नकळत डोळ्यात पाणी तरळले.. कारण त्यांची आणि आमची फक्त एका दिवसाची ओळख होती. हातावर पोट असणाऱ्या, तरीदेखील त्यांनी इतक्या प्रेमाने आमच्यासाठी जेवण आणले होते. माणसाची श्रीमंती कश्यावरून ठरवायची ? त्याच्या पैश्यावरून की वागण्यावरून ?
आमचा दुसरा दिवस खूप छान गेला. चांगल्याप्रकारे विक्री झाली. अलकामुळे माझी ही भीड चेपली.
आमच्या दुस-या बाजूला मोठा स्टाॅल होता. त्या बाईं जळगावहून मसाले आणि दहा प्रकारची लोणची घेऊन आल्या होत्या .बोलता बोलता सहज म्हणाल्या, ताई बघा ना.. अकरा हजार रू. ट्रान्सपोर्ट खर्च, स्टाॅलचे पाच दिवसाचे पंधरा हजार भाडे ! कसा धंदा करायचा?
आमच्या शेजारी तयार कपडे विकणाऱ्या ताईची तर पर्सच कुणीतरी चोरली. त्यावेळी त्यांची ती घालमेल बघून अशा वृत्तीचा खूप राग आला. जत्रा म्हणा किंवा प्रदर्शन म्हणा, हे एका लाॅटरीप्रमाणे असते असे मला वाटू लागले. ज्यांचा बिझनेस झाला तो जिंकतो आणि ज्यांचा बिझनेस झाला नाही तो काहीतरी शिकतो..
आपण मात्र एक करू शकतो ते म्हणजे किमती अगदीच पाडून न मागता बचत गटाच्या महिलांना योग्य किंमत देऊ शकतो, त्यांच्या नफ्याला हातभार लावू शकतो.
आतापर्यंतच्या प्रदर्शनात मी वस्तूंचे भाव करीत खरेदी करीत फिरत होते. या प्रदर्शनात मात्र मी विक्रतीचा अनुभव घेतला. कष्ट करून आणलेला माल विकला गेला नाही तर काय भावना, दु:ख असते ते जाणविले.
या जत्रेत आम्ही दोन दिवस सहभागी होतो, आम्हाला मुंबईला दुसरे कार्यक्रम असल्याने आम्ही लगेच निघून आलो. मात्र या प्रदर्शनात अनेक लोकांना भेटता आले, त्यांच्या ओळखी झाल्या. महाराष्ट्र बॅंकेच्या पदाधिकारी व स्वाती मॅडम यांचे खूप सहकार्य मिळाले. अनेक मैत्रिणी जोडल्या गेल्या.
गावाकडे अनेक जत्रा बघितल्या आहेत. लहान मुलांनी आणि मी सुध्दा लहानपणी वाजविलेला पिपाणीचा आवाज अजूनही गुंजतो आहे.
गावाकडील जत्रा ही टिपीकल जत्रा असते. आपल्या गावरान गावा सारखी, ओबडधोबड धुरळा उडणारी, जिलबीचा खमंग वास देणारी, चुरमुरे वाटाणे फुटाणे विकणारी, शेंबड पोर रडणारी, बारा बलूतेदारांना कमाई करून देणारी, तमासगीरांना पोटासाठी सुपारी मिळवून देणारी, तंबूत सिनेमा लावणार्यांची गल्ला भरणारी मजे-मजेशीर. पण ही जत्रा मात्र नीट- नेटकी स्टँडर्ड तरीही सर्वांना सामावून घेणारी वाटली.
एकंदरीत आमच्या साठी आपुलकीने भरलेली ही भीमथडी जत्रा आम्हाला खूपच आनंद देऊन गेली.

– लेखन : फरझाना इकबाल
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
भीमथडी यात्रे बद्दल बरेच दिवस ऐकते आहे. इकबाल ह्यांनी छान वर्णन केलं आहे. गावाहून येणाऱ्या कष्टकरी महिलांचं वर्णन ऐकून कमाल वाटली त्यांची. गावाकडून येणाऱ्या भाज्या आणि गोधड्या हे जत्रेच वैशिष्ट्य आहे अस ऐकल होत पण त्याचा उल्लेख नाही, कदाचित आता हे बदल झालेही असतील. परंतु एका नावाजलेल्या प्रदर्शनाची उत्तम ओळख झाली, धन्यवाद..