हैदराबाद येथे २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान झालेल्या आयएजीए – आयएएसपीईए ( IAGA – IASPEI – Joint Scientific Assembly) या संयुक्त आंतरराष्ट्रीय परिषदेत इचलकरंजी येथील युवा शास्त्रज्ञ प्रसन्न प्रकाश वायचळ यांनी ‘भूकंप – पूर्वानुमान आणि संभाव्य नुकसान टाळण्याचे उपाय’ या विषयावर ३ महत्वपूर्ण शोधनिबंध सादर केले.
या सादरीकरणात, श्री वायचळ यांनी ४ मार्च २०२१ रोजी न्यूझीलंड येथे झालेल्या एम ८-१ एवढ्या तीव्रतेच्या भूकंपाविषयी त्यांनी केलेल्या अनुमानाची माहिती दिली. त्या भूकंपामुळे त्सुनामीचा धोकाही उद्भवला होता. परंतु तीव्रता कमी असल्याने व ही त्सुनामी समुद्रकिनाऱ्यापासून दूर समुद्रात झाल्याने सुदैवाने हानी टळली होती. या संकटाची माहिती प्रसन्न वायचळ यांनी शोधून काढलेल्या यंत्रणेच्या साह्याने आधीच मिळाली होती.
श्री वायचळ यांनी केलेल्या सादरीकरणाची प्रसिद्ध जपानी शास्त्रज्ञ यासुहिदे होबरा, यांनी प्रशंसा करून त्यांना सविस्तर चर्चा करण्याचे आमंत्रण दिले आहे. यासुहिदे होबारा हे हैदराबाद परिषदेचे संयोजक होते. श्री. होबारा भूकंपविषयक पूर्वानुमान विषयक संशोधक असून त्यांचा या विषयाचा अभ्यास सुरू आहे.
अलीकडील काळात जगभरात काही ठिकाणी झालेल्या भूकंपाची माहितीही त्यांनी आठ – दहा दिवस आधीच दिल्याने विविध देशांतील शास्त्रज्ञांनी त्यांची वाहव्वा केली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे भूकंपप्रवण भागातील प्रशासन आणि नागरिक सावध होऊन संभाव्य जीवित आणि वित्त हानी टाळण्यात यश येणार आहे.
या परिषदेत जपान, जर्मनी, अमेरिका, ब्राझिल, इटली, भारत आदी ५७ देशांतील ८२८ शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. भारतातून या परिषदेत ११० शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला होता.
– टीम एनएसटी 9869484800