‘भेट’ शब्द ओठावर येताच मन आळवू लागते, तुकारामांच्या अभंगांच्या ओळी, श्रुतींना ऐकू यायला लागतो तो गोड लता मंगेशकर यांचा आवाज,
भेटी लागी जीवा लागलीसे आस l
पाहे रात्रंदिवस वाट तुझी l
किती आर्तपणे तुकाराम महाराज पांडुरंगाला हाक देत आहेत. भुकेलेल्या बाळासारखी त्यांनाही पांडुरंगाच्या दर्शनाची भूक लागली आहे. जोपर्यंत जीवा शिवाची भेट होत नाही तोपर्यंत त्यांची भूक अतृप्तच राहणार आहे. भेटीनंतरची तुष्टता, तृप्तता, समाधान, आनंद, परमानंद, अनुभूती ती वेगळीच. त्यांचे वर्णन शब्दातीत.
भेट आणखी एका रूपात माझ्यासमोर येते, ती भरत भेट. प्रेम, वात्सल्य, त्याग, कर्तव्य कठोरता, यांचे मूर्तींत रूप असलेली नामधारी राजा भरत यांनी वनवासी रामाची – परम पुरुषाची – मर्यादा पुरुषोत्तमाची, घेतलेली गळा भेट. ही भावाभावांमधील प्रेमाची गाठ. वेगवेगळ्या भावनांनी ओथंबून वाहणारी ही भेट. आयोध्येवर अधिकार तुझाच, अयोध्येचा राजा तूच, असे दोघांनी म्हणत घडलेली ही भेट. ना लोभ, ना मोह, अशी निरलस, निर्विकार दोन मनांची ही भेट. ही भरत रामाची भेट कुठे, अन् एवढ्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्या भावांची न्यायालयात घडणारी खुन्नस भेट कुठे ? अशावेळी शब्द मुके होतात.
आणखी एक भेट कृष्ण- सुदाम्याची. ह्या हृदयीचे त्या हृदयी कळणारे कृष्ण आणि सुदामा. अगम्य सखये. मनात लालसा ठेवून घेतलेली भेट, ती भेट कसली ? ते मैत्र कसले ? पण सुदामा वेगळाच. म्हणून तर सुदाम्याचे मित्रपंक्तित स्थान श्रेष्ठ. भेटीला येणारा सुदामा निर्लोभी, पारदर्शी. मित्राने न मागता मित्राचे हृदय जाणून अनंत हस्ते देणारा तो सखा श्रीकृष्ण. दोघेही अलौकिक. दोघांमधले मित्र प्रेम न भूतो न भविष्यती असे. गरीबाचे सुदाम्याचे पोहे श्रीकृष्णाला अतिशय चविष्ट लागतात. या पोह्यांच्या प्रत्येक दाण्यात श्रीकृष्णाला प्रेम. प्रीती, वात्सल्य, माया, ममता अशा कितीतरी भावनांची अनुभूती मिळते. अशा कितीतरी भावनांच्या लाटा मनात उचंबळून येतात.
कृष्ण राधेच्या प्रेमाला नाव तरी कोणते द्यावे ? त्या दोन प्रेमिकांचे प्रेमच अनामिक. कृष्णाच्या वेणूची धून ऐकताच हातातले काम टाकून भान हरपून कृष्ण भेटीसाठी धावणारी राधा. जिथे तिथे दिसतो तिला तिचा सखा कृष्ण. अशी तल्लीन, कृष्णमय होणारी राधा, कृष्ण भक्ती रत होणारी राधा, कृष्णाला एकांतात भेटणारी राधा, कृष्णाची अद्वैत साधू पाहणारी राधा. म्हणूनच प्रेमात सरस ठरली ती राधा. ह्याच कारणासाठी कृष्ण नामाच्या आधी जोडले गेले ते राधेचे नाम. राधे कृष्ण. राधे कृष्ण. अशा कृष्ण नाम सागरात बुडालेली राधाकृष्ण यांची भेट.
मनोभावे आई-वडिलांच्या सेवेचे व्रत घेणारा पुंडलिक. आई-वडिलांच्या ठिकाणी पांडुरंगाला पाहून त्यांची तन्मयतेने सेवा करणारा पुंडलिक. अशी भक्ती पाहून पांडुरंगाचे हृदय द्रवले नाही तर नवलच. सेवेत खंड पडू नये म्हणून प्रत्यक्ष भेटीला पुंडलिकाच्या येतात पांडुरंग परब्रम्ह. स्वर्गातीत अशी ही पुंडलिक पांडुरंग भेट.
काही कारणांनी दुरावलेले, चुकलेले पाडस, सैरभैर झालेले पाडस. जीवाच्या आकांताने कासावीस होऊन पाडसाचा शोध घेणारी ती माय. दोघांची मने हळुवार, अलगद, ओली, भेटीसाठी आसुसलेली. प्रत्येक क्षण युगायुगाचा वाटत असतानाच अचानक घडून आलेली त्या माय लेकरांची भेट. क्षणार्धात डोळ्यातून सरसर ओघळणारे मोत्यांचे सर. सारे वर्णनातीतच.
डोंगर आपल्याकडे येत नाही. आपणास डोंगराकडे जावे लागते. तद्वत आपल्याला ज्ञानाने, अनुभवाने वयाने श्रेष्ठ असलेल्या व्यक्तींच्या भेटीस जावे लागते. त्या भेटीत मिळालेली जीवनाची सूत्रे कानात साठवून ठेवावीत असेच वाटते.
चांगदेव हे सामान्यतः ज्ञानेश्वरांबरोबर च्या भेटीमुळे ओळखले जातात. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई या चारही भावंडांना ज्ञान प्राप्त झाले. तेव्हा चांगदेव महाराजांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. म्हणून त्यांनी कोरी चिठ्ठी भावंडांना पाठवली. ती कोरी चिठ्ठी पाहून मुक्ताई म्हणाली ही चिट्ठी कोरी, तसेच चांगदेवांचे मडके अजूनही कोरेच आहे. पण या भावंडांकडून आलेल्या कागदावरचे काहीही त्यांना आकळेना. एकदा ह्या भावंडांना भेटून आपली योग शक्ती व्यक्तिशः दाखवण्याचा मोह चांगदेवांना झाला.
या भेटीसाठी वाघाच्या पाठीवर स्वार झाले आणि चाबूक म्हणून विषारी साप हातात घेतला. या भावंडांनी जेव्हा चांगदेवांची मिरवणूक आपल्या घराकडे येताना पाहिले, तेव्हा त्यांनी चांगदेवांचे गर्भाचे घर खाली करण्याचे ठरवले. ही चारही भावंडे ज्या भिंतीवर बसली होती, त्या भिंतीचा वाहन म्हणून वापर केला. भिंतीवर थाप मारताच ती भिंत चालू लागली. उपस्थित सर्वजण थक्क झाले. चांगदेव भावंडांचे शिष्य बनले .गर्व आणि अहंकाराला अशा प्रकारे मात केली. अशीही चांगदेव ज्ञानेश्वर यांची भेट.
आणखी एक जगप्रसिद्ध भेट आहे ती शिवाजी राजे आणि अफजल खान यांची भेट. खरंतर ही त्यांची सदिच्छा भेट असे अफजल खान वरवर तरी दाखवत होता. पण या भेटीची समाप्ती झाली, ती अफजलखानाचा कोथळा बाहेर काढूनच. तर अशीही अफजलखानाच्या अंतःकाळ ची भेट.
तुकाराम महाराज विठ्ठल भेटीची आस व्यक्त करताना म्हणतात, जसा चकोर पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो, पौर्णिमेचा चंद्र म्हणजे जणू त्याचे जीवनच असते. तसेच माझे मनही तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे. माहेराच्या ओढीने आसुसलेली लेक जशी दिवाळीची वाट पाहत असते. तसाच मीही- माझ्या माहेराची- पंढरीला जाण्याची वाट पाहत आहे.
अभंग गात, मुखावर पांडुरंगाचे नाम नाचवत, निर्विकल्प, निरुपादिक, निर्विकार अशा परब्रम्ह पांडुरंगाला भेटायला आषाढी एकादशीला लाखो वारकरी दरवर्षी पंढरीला जातात. अवघ्या जनी त्या पांडुरंगाला पाहणे आणि सर्वाभूती एक पांडुरंग दिसणे, यासारखी दुसरी अनुभूती कोणती ? तर अशीही भक्त आणि पांडुरंगाची भेट.
आणखी कितीतरी भेटी अशा आहेत ज्यात प्रत्यक्ष भेट घडत नसली तरी त्यातून आनंद मात्र मिळतो.
आठवा बरं 30-40 वर्षांपूर्वीची टेलिफोनिक किंवा दूरध्वनी वरून होणारी भेट. परदेशात शिकायला गेलेला लेक किंवा साजण यांचा फोन आला की घरच्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे होऊन जायचे. लेकाचे शब्द कानात साठवायला मातेचे कान आतुर असत. नुसत्या शब्दातून भेटीची आस पुरी व्हायची. तीच गत आत्ताच्या व्हिडिओ कॉल ची. अशा वर्चुअल भेटीतच आजकाल आनंद मानावा लागतो.
आणखी थोडा मागचा काळ आठवा बरं. जाता येता म्हणजे लांबूनच होणाऱ्या नजर भेटीवर प्रियकर- प्रेयसीला समाधान मानावे लागायचे. त्यात पण मजा असायची बरं का ! अशा भेटीची आतुरता काही औरच. आणि मग अशा पुनर्भेटी मुद्दाम घडवाव्या लागायच्या.
मोठे लोक, नेते, पुढारी कुठल्यातरी प्रदर्शनाला, कार्यक्रमाला भेट देतात. त्यांचं उद्घाटन करतात. पंतप्रधान मोदीजी वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन त्या देशांशी आपले संबंध चांगले ठेवतात. आठवा बरं, मोदीजी आणि ट्रम्प यांची भेट. ह्या भेटी म्हणजे एक राजकीय चालच. पण केवढी महत्त्वाची.
मी म्हटलं तसं आणखी थोडा काळ मागे जा. तेव्हा आता सारखे सगळ्यांच्या घरी किंवा आत्तासारखे सगळ्यांच्या हातात फोन नसायचे. तेव्हा तर लांब राहणाऱ्या जिवलगाशी, नात्यागोत्यांच्या मंडळींशी पत्र भेटच व्हायची. अशा या पत्र भेटीतून जे प्रत्यक्ष बोलता येत नसेल तेही अशा पत्र भेटीतून व्यक्त व्हायचे. ते शब्दच ब्रह्म होऊन जायचे. अशी आनंदाची भेट व्हायची पत्र भेट. तेव्हा एक पेन फ्रेंड म्हणूनही प्रकार असायचा. आजकाल अनेक इंटरनेट मित्रांच्या भेटी इंटरनेटवर होत असतात. त्यांना वर्चुअल भेटच म्हणायचं. पण त्यातले खरे मित्र किती हेही एक मोठे प्रश्नचिन्हच असते. ही जर एका मनाची दुसऱ्या मनाशी भेट असेल तर ती ग्रेट भेटच म्हणावी लागेल.
ध्यानीमनी नसताना अचानक होणारी मित्रांची, मैत्रिणींची, सग्या सोयऱ्यांची भेट आपल्याला आनंदाच्या तुषारांनी ओले चिंब करते. जाग्या झालेल्या आठवणींचा सुगंध पुढचे कितीतरी दिवस जगण्याची मोठी च्या मोठी ऊर्जा देऊन जातो. फार दिवसांनी भेटलेला मित्रांची भेट, फारच विरह सहन करावा लागला आहे अशांची भेट, ही गळाभेट असते, उराउरी भेट असते. अशा लोकांचे हस्तांदोलन करून होणाऱ्या भेटीवर समाधान कसे होणार ? ही भेट पाश्चात्य पद्धतीची भेट. वरवरची भेट. त्यांनी दोन मनांची भेट घडत असेल का ?
अगदी वयाची शंभरी गाठली तरी अगदी छोटीशी भेट आपल्याला झुळूक म्हणून गारवा देऊन जाते. आणि अचानक मिळालेल्या भेटीचे मोल औरच. पूर्वी राजे महाराजे यांनी खूष करण्यासाठी, त्यांची मर्जी राखण्यासाठी मोठमोठे नजरानणे भेट म्हणून द्यावे लागत असत. या भेटीचे दोन्हीकडचे हात स्वार्थाने लडबडलेले असत. मनापासून या भेटी दिल्या जात असतील का ?
लग्नात वधूची आई वराच्या आईस लग्नाला येताना किंवा रासनाहणाच्या वेळी देते ती भेट म्हणजे नजराण्याचा मान.
ठराविक श्वासानंतर मनुष्य परत कधीच कोणाच्या भेटीला येणार नसतो. तो आपली स्वर्गाची वाट अनुसरतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घडणारी ती असते अखेरची भेट.
कधीकधी कुण्या दोघांची भेट आपण घडवून आणतो, अगदी इच्छेने तर कधी अनिइच्छेने. मुद्दाम जाऊन कधी कोणाची गाठ भट पण घ्यावी लागते. मनात कामाचा हेतू धरून. भेट जेव्हा हवीहवीशी असते तेव्हा त्यात प्रचंड ओढ असते. अगदी जशी नदीच्या पाण्याला ओढ असते सागराच्या मीलनाची. मला वाटतं ही ओढच टेलीपथी साधते आणि भेट घडवून आणते.
रेडिओवरून, टीव्हीवरून किंवा कुठूनही लांबून आपल्यापर्यंत आवाज पोहोचतो तो हवेतल्या आवाजांच्या लहरीमुळे. अर्थात त्याबरोबर बाकीची यंत्रसामग्री असतेच. अशा ह्या हवेच्या योग्य लहरींमुळे रेडिओ किंवा टीव्ही कलाकारांशी भेट होते ती आवाज भेट.
काही वेळेला एखाद्या व्यक्तीची भेट टाळायची असते. कधी कोणीतरी कुणाचे पैसे देणे लागत असतो, कधी आपण घाईत असतो, वेळेवर कुठेतरी पोहोचायचे असते, पण आपली नजर, आपले डोळे यावेळी अगदी फितुरी करतात. त्या व्यक्तीच्या नजरेला आपली नजर भिडते. ओळखीची दाद देते आणि मग काय भेट टाळणे अशक्य होऊन बसते. तोंड चुकवून जाता येत नाही. याउलट काही वेळा गर्दीचा फायदा घेऊन, कोणाच्या आड लपून, लक्ष नाही असे दाखवून, कधी रस्ता ओलांडून, कधी थोडा रस्ता बदलून, ही भेट आपण टाळू शकतो.
कधी कधी वाटतं अल्लडशा एखाद्या क्षणी तुझी माझी गळाभेट व्हावी. कधी वाटतं तळमळणाऱ्या दोन हृदयांची भेट अगदी व्हावी थेट. ओढ असते मनाला त्या भेटीची, जिथे तुझी आणि माझी भेट असते खात्रीची.
अशा दोन प्रेमिकांची, दोन मित्रांची, दोन मैत्रिणींची, तळमळणाऱ्या आई लेकरांची भेट आणि कितीतरी नात्यांच्या भेटी, भक्ताची त्याच्या लाडक्या देवाशी, लवकरात लवकर भेट घडो.पण पहिली भेट आयुष्यात कधीच कोणी विसरत नाही. अंतःकरण बेभान होतं तेव्हा ते कोणालाच जुमानत नाही. खरं ना ? अशा या भेटींची शिदोरी घेऊनच आपण पुढची वाटचाल करीत असतो, खरं ना ?
– लेखन : शुभदा दीक्षित. पुणे
– संपादन : अलका भुजबळ ☎️ 9869484800
व्वा… निरनिराळ्या भेटीची दिलेली उदाहरणे वाचून अचंबित झालो.. भेट यावर एवढे भन्नाट स्व सुंदर लिहिलेले प्रथमच वाचले… धन्यवाद… शुभदाताई दिक्षित यांच्याकडून अशाच चांगल्या लिखाणाच्या प्रतिक्षेत आहे.