नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिवाळी निमित्त नुकताच सानपाड्यातील सीताराम मास्टर उद्यानातील सकाळच्या ६.३०, ७.०५, ७.५० या ग्रुप्समधील सदस्य, तसेच इतर नागरिकांसोबत दिलखुलास संवाद साधला.

मंदाताईंनी सुरुवातीस सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन, मार्गदर्शन करताना सांगितले की, बेलापूर मतदार संघात नेहमी कायदा व सुव्यवस्था नांदत असते, ही अतिशय अभिमानाची बाब असून आपल्या कोणत्याही समस्या असतील त्यासाठी मला प्रत्यक्ष येऊन भेटा, त्या ताबडतोब सोडविल्या जातील. सरकारदरबारी केवळ पत्र देऊन प्रश्न सुटत नाही तर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो, असे अधोरेखित करून त्यांनी सानपाड्यामधील पाण्याचा प्रश्न, ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयाचा कालावधी पाच वर्ष करणे या महत्त्वपूर्ण मागण्या ताबडतोब सोडविल्या जातील, अशी ग्वाही त्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने दिली.
आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याच्या आणि काम करणाऱ्या उमेदवारांनाच निवडून द्या, असे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.

मराठवाड्यात पुरामुळे अनेकांचे नुकसान झाले असून, अतिवृष्टीमुळे चिखली या गावात ९० टक्के लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. लोकांकडे जे काय होते, ते सर्व पुरात वाहून गेले. चिखली हे गाव मी दत्तक घेतले असून, दिवाळीत पुरणपोळी करतात. त्यासाठी या गावातील ३०० पूरग्रस्तांना दिवाळीत सणासाठी सहा लाख रुपयाचे साहित्य दिले आहे. आपणही सानपाड्यात सर्वांनी एकत्रित प्रभात फेरी काढून थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे जी काय रक्कम जमेल ती आपण पूरग्रस्तांना देऊ. त्यामुळे नवी मुंबई सानपाड्यातून समाजाला एक चांगला संदेश जाईल, असेही त्या म्हणाल्या.

या संवादात महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, नवी मुंबई शिवसेनेचे (उबाठा) उपशहरप्रमुख अजय पवार, भाजपचे नवी मुंबई शहर अध्यक्ष पांडुरंग आमले, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, उपाध्यक्ष श्री विठ्ठल गव्हाणे, उपाध्यक्षा डॉ. विजया गोसावी आदींनी मन मोकळेपणाने भाग घेतला. श्री आबा जगताप यांनी आभार मानले.
या संवादानंतर सर्व उपस्थितांना मंदाताईंतर्फे दिवाळीची मिठाई देण्यात आली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
