सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
१. ‘स्नेह गोडी ‘
सण संक्रांतीचा आला
निसर्गाचा वाणवसा
लाभो देवाजीची कृपा
भरो आनंदाने पसा ||
तीळ-गुळाची महती
लाभदायी आरोग्यास
एकमेका साद देती
गोड बोलावे हो खास ||
मस्त वाणीचा गोडवा
स्नेहाभावात भिजून
प्रेम देता-घेता सारे
जाती आनंदी होऊन ||
नातीगोती जपताना
भावनांचे संक्रमण
स्नेहभाव जागवुनी
करू मनाचे शिंपण ||
विसरूनी अढी, वैर
पुन्हा सारे गोड व्हावे
आयुष्याच्या आनंदात
पुन्हा नव्याने रमावे ||
— रचना : ज्योत्स्ना तानवडे. पुणे
२. मकरसंक्रांत
आले थंडीचे दिवस
घेवून स्निग्ध प्रेमाचा गोडवा
घेवून आली संक्रात घरा
चला देवू तिळगुळाचा गोडवा ||१||
कटू क्षणाला आता विसरा
करा चेहरा हसरा
शेजाररधर्म पाळू देवू लाडू
गोरगरिबांसंगे करू सण साजरा ||२||
जुने दुःख, राग,vमत्सर सोडू
गोडव्याने मैत्री जोडू
प्रेमाचे, स्निग्ध नाते
कायमचे जोडू ||३||
हळदिकुंकू देवूनी
स्रीचा मानपान देवू
सुगडी पुजूनी औक्षण करू
चला आनंद घेवू ||४||
— रचना : अंजली सामंत. डहाणू
३. हलवा
हलव्याचे चटके
खाल्लेत का कधी ?
तो बनवतांना
पाहिला का कधी ?
बिचारा एव्हढासा जीव
होरपळत असतो,
साखरेच्या पाकानी
फुलत रहातो…..
चटके खात खात
नाचत रहातो,
अंगावर काटे
मिरवत रहातो…
नाजूक साजूक
दिसतो छान,
दागिने बनून
सजतो फार..
तोच हा हलवा
मी देते तुम्हाला
गोडात शब्द घोळवा
तेच येतील कामाला !
— रचना : चित्रा मेहेंदळे.
४. पतंग
मकरसंक्रांतीचा सण म्हणजे पतंगोत्सव ! पतंगोत्सवात आनंद व उत्साहाची लयलूट असते.
निळ्या निळ्या नभात
पतंगापरि उडावे
आशा, आकांक्षांनी
मनास ह्या भरावे….
उंच उंच आकाशी
स्वप्नासवे झेपावे
मोह,मत्सर त्यजुनी
जीवनात रमावे….
चढऊतार आयुष्यातले
संयम,जिद्दीनं चढावे
पतंगासम उंच भरारीने
कां नाही गगनात उडावे ?
रचना:डाँ दक्षा पंडित
सँनडिआगो, अमेरिका
५. सण मकरसंक्रांतीचा
बोल मुखाने बोलूया
जसा गुळाचा गोडवा
नव्या आशेच्या धाग्याने
उंच पतंग उडवा
नाते जोडूया नव्याने
गुण स्वीकारू तिळाचे
सारे भूलून रुसवे
वाण देऊया प्रेमाचे
नव्या रूपात नव्याने
साऱ्या नटून थटून
क्षण आनंदी घालवू
वाण देण्यास भेटून
भारी खिचडी चवीस
धार तुपाची त्यावर
गुण असावे विविध
देतो संदेश त्योहार
उंच कितीही भरारी
धागा असावा हाताशी
जग जिंकावे प्रेमाने
नाते असावे मातीशी
— रचना : पूनम सुलाने- सिंगल
६. संक्रातीचा तिळगुळ
आहे सण संक्रातीचा
मान हळदी कुंकुला
सण हा सुहासिनींचा
तिळगुळ वाटण्याला
तीळ लावून भाकरी
सण असतो भोगीचा
वाण देण्या सौभाग्याला
गोड गोड बोलण्याचा
नव परिणीता नटे
हलव्याच्या दागिन्यांनी
संक्रातीला असे खास
काळी साडीच मानिनी
सूर्य उत्तरायणात
संक्रमणी प्रवेशतो
जातो मकर राशीत
दिन कनाने वाढतो
दिसे पतंग आकाशी
मन नाचे आनंदाने
सण असे संक्रातीचा
वाढे गोडवा प्रेमाने
— रचना : अनिसा सिकंदर. दौंड
७. मकरसंक्रान्त
घ्यावा संक्रान्तीचा हलवा
गोड बोलण्या तीळगूळ घ्यावा
स्नेह तीळातीळाने वाढतो
वृध्दिंगत परिचय होतो
द्वेषभाव दुजांप्रती सरतो
तीळगुळाचा संगम होतो
मान मनापासूनि द्यावा
तीळगूळाचा महिमा गावा
या तीळाची पहा मखलाशी
पाकामध्येच लपून राहशी
शोध घ्यावयास जे जाती
काटेच तया टोचती
स्नेह मनामध्ये झिरपावा
कटूबोला टाळून यावा
राजकारणी तीळगूळ न्यारा
निवडणूक आलीया द्वारा
झिजवूया घरांचा उंबरा
करू वास्तपुस्त सानथोरा
मान कलती करुनिया नमना
स्मितहास्य विलसते वदना
हात मिळवूनी म्हणती घ्यावा
आश्र्वासन तीळगूळ खावा
गोड बोल देती हो थारा
संक्रांत आलीया द्वारा
— रचना : स्वाती दामले.
— संपादन : सौ अलका भुजबळ. 9869484800