आला श्रावण लाडका
दाटे आनंद मनात
घरी दारी चोहीकडे
चैतन्याची बरसात !!
पावसाच्या वर्षावाने
चराचर आनंदले
धरा हिरवाळली ही
अणू रेणू मोहरले !!
सणासुदीच्या पूजेने
श्रद्धा भक्तिला झळाळी
पारीजातकाचा लक्ष
बेल पत्रींची नव्हाळी !!
सप्तरंगांच्या कमानी
अंगणात नाचे मोर
पागोळ्यांच्या नादासवे
मन आनंद विभोर !!
उन पावसात रंगे
झिम्मा फुगडीचा दंगा
अवतरे रक्षणार्थ
पूजिताती बा श्रीरंगा !!
साजिऱ्या या श्रावणाची
जादू साऱ्या विश्वावरी
देती उल्हास आनंद
निसर्गाची रूपे न्यारी !!
— रचना : ज्योत्स्ना तानवडे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800