Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यमनातील कविता

मनातील कविता

आरती प्रभू
कवीवर्य चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू
हे कवी, कादंबरीकार, नाटककार, पटकथाकार होते.

‘ जोगवा ‘ , ‘ दिवेलागण ‘, ‘नक्षत्रांचे देणे ‘ हे काव्यसंग्रह, ‘अजगर ‘,  ‘ गणूराय आणि चानी ‘, ‘ त्रिशंकू ‘, ‘कोंडुरा ‘, ‘ रात्र काळी, घागर काळी ‘, ‘ पाषाण पालवी ‘, ‘ पिशाच्च ‘ अश्या कादंबऱ्या, ‘ चाफा आणि देवाची आई ‘, ‘ राखी पाखरू ‘, ‘ सनई ‘ असे कथा संग्रह, ‘ अजब न्याय वर्तुळाचा ‘, ‘ अभोगी ‘, ‘ अवध्य ‘
‘ एक शून्य बाजीराव ‘,
‘ कालाय तस्मै नमः’,
‘ रखेली ‘ , ‘ श्रीमंत पतीची राणी ‘,
‘ सगेसोयरे ‘, ‘ हयवदन ‘  अशी सरस नाटके त्यांनी लिहिली आहेत. याशिवाय त्यांची अनेक अप्रकाशित नाटके आहेत.

कवीवर्य आरती प्रभू यांच्या कवितेचे परिपूर्ण रसग्रहण करण्याचा माझा दावा नाही आणि तसा माझा प्रयत्नही नाही. परंतू मुळात ‘कवितेचा सर्वस्वी अर्थ कळणे ‘ असे काही अस्तित्वातच नसते. हा एक प्रवास असतो… कवीवर्यांच्याच शब्दांत सांगू ?
‘ प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा, जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना ‘ कवितेचे ही असेच असते.

मराठी, हिंदी कविता असो अथवा उर्दू शायरी किंवा गझल असो दुःख, कारुण्य, वैफल्य, विमनस्कता, नैराश्य हे रंग अनेक रचनाकारांच्या अनेक रचनांमध्ये दिसतात. बहुतांशी वेळा हेच रंग अधिक दिसतात.

असे का असावे ?
याचा विचार करतांना एक साधे उत्तर मला मिळते.
चैतन्य, आनंद, उत्साहाचे भागीदार-साथीदार अनेक असतात. चैतन्याचे नातेवाईक होण्यास, सुखाशी बंध जोडण्यास अनेक जण तयार असतात आणि मनुष्यासही निःशंक मनाने हे इतरांबरोबर वाटता येतात. नैराश्याचे तसे नसते.

मानवी मनाच्या हजार छटा ! प्रत्येकाचे वाटणे निराळे. प्रत्येकाचे दुःखाचे निकष निराळे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे दुःख इतरांसाठी दुःखच असेल असे नाही. बहुतांशी वेळा तो हास्याचा, चेष्टेचा विषय होतो आणि व्यर्थतेचा, उपहासाचा एक कुत्सित हुंकारच त्याचे वाटी येतो. यासाठीच मग हळव्या मनांच्या हळव्या वेदना उरातच जपल्या जातात. इतरांसमोर व्यक्त होणे व्यर्थ आहे ह्या भीतीने.

मात्र ‘ संवेदनशीलता ‘ नावाच्या धातूने बनलेले मनाचे पात्र फार लहान असते. जराश्या साचण्यानेही ओसंडून वाहू लागते आणि मग त्याचे रंग घेऊन अवतरते…
‘ झुरल्यात ऐशा राती, व्यथा तेवल्यात
ठिबकले दुःख भोळें ओल्या उजेडांत…’ म्हणणारी.

८ मार्च १९३० रोजी ह्या धरतीवर अवतरली कवीवर्य चिंतामणी त्र्यंबक खानोलकर अर्थात कवीवर्य आरती प्रभू यांची कविता !

कविश्रेष्ठ आरती प्रभू यांच्या अनेक कविता म्हणजे दुःखाने फुटलेल्या उमाळ्यांनी कोलमडून पडण्यापेक्षा त्या उमाळ्यांच्या माळा करुन, त्या चांदणमाळा मनाच्या आकाशी लावून त्याच्याच चांदण्यात न्हाऊन निघणे आहे.

‘ आहे गुणगुण
आहे मिणमिण
खंगतात रंग अस्तचलांतून;
केवळ धूसर शून्य नादहिन
किटतात पर्णें,
जिणे जीवघेणें,…’

‘ विचित्रसे दुःख ‘ म्हणत, जे न एखाद्या रागासारखे आळविता येत, न त्याच्या पेटण्याने मार्ग उजळत, केवळ एका शून्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व आहे…जे न नाकारता येत, न स्वीकारता येत… असे जीवघेणे जिणे कवीवर्य वर्णितात.

कवितेचे स्थान प्रत्येक कवीसाठी निरनिराळे असते. कुणासाठी ते ‘ कूजन ‘, कुणासाठी ते ‘ भजन ‘, कुणासाठी ते ‘ सृजन ‘ आणि कुणासाठी ते ‘ पूजन ‘ असते. परंतु या साऱ्या संकल्पना जिथे निम्न वाटतात अशा ‘ सात्विकतेचे अर्जन ‘ म्हणजे कवीवर्य आरती प्रभूंची  ‘ कविता ‘

‘ या माझ्या अजाण कवितेचा अपमान
कां करतां बाबांनो – कां ?
प्रेम हवंय का या कवितेचं ?
मग ते मागून मिळणार आहे का तुम्हांला ?
खूप काही द्यावं लागेल त्यासाठी.
काय काय द्याल ?
आत्म्याची बाग फुलवता येईल तुम्हांला ?
पण त्यासाठी तुम्हांला तुमचा आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल,
पण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला चांदण्या होऊन पारदर्शक करावे लागतील .
कराल ?…’

‘ आत्म्याची बाग ‘… किती जाणीवपूर्वक प्रयोजन आहे या शब्दाचं ! रानटी वेली, जंगली झुडपे तर कुठल्याही जमीनीवर पसरतात परंतू ‘ बाग ‘ म्हणजे जिथे सुंदर, सुशोभित, सुवासिक फुलझाडे असतात, जिथे नित्य मशागत होते. अनावश्यक फांद्या, पाने यांची छाटणी होते. योग्य खत पाणी दिले जाते. ‘ आत्म्याची बाग ‘ व्हावी असे वाटत असेल तर अशी मशागत नित्य करावी लागेल.

रानटी वेली, जंगली झुडपांप्रमाणे माजणारे विचार उपटून फेकून द्यावे लागतील. ‘ स्वातीचा थेंब ‘, ‘ चांदण्याहून पारदर्शक तळहात ‘ या सार्‍या उपमा निष्कपटी, सात्विक आणि सत्य वृत्तीचे द्योतक असणाऱ्या !

कवितेचे प्रेम मागुन मिळत नाही, त्यासाठी काय करावे लागेल हे सांगताना कवीवर्य एक महान कानमंत्र देऊन गेले आहेत.
कविता म्हणजे जीवनगाणे. जीवनात प्रेम मागून मिळणार नाही.  जर तीव्र कळकळ अंतरी असेल तर त्यासाठी ‘ आत्म्याची बाग ‘ करावी लागेल. तो आत्मा स्वातीच्या थेंबाप्रमाणे चांदण्या होऊन पारदर्शक तळहातावर घ्यावा लागेल. इतके स्वच्छ, शुद्ध, निर्भेळ आणि निष्कपटी अंतःकरण असेल तरच प्रेमाची प्राप्ती होईल.

कवीवर्यांच्या कवितांचे मुख्य वैशिष्ट्य असे की अनेक कविता दुःख, कारुण्य, मृत्यू यांच्याशी संलग्न असल्या तरी त्यातही एक समग्र जीवन दृष्टिकोन आहे. मनुष्याचा नैसर्गिक स्वभाव आहे दुःख कुरवाळीत बसणे. मात्र आरती प्रभूंमध्ये एक दैवी शक्ती आहे जी त्यांच्या कवितांमध्ये लख्ख दिसते. ते स्वतःच्याच दुःखाकडे त्रयस्थ भूमिकेतून पाहू शकतात आणि त्या दुःखानेच कसे आयुष्यास पूर्णत्व मिळाले अथवा आयुष्याची शोभा वाढवली, मनुष्यत्वाचा व्यासंग वाढवला आणि मृत्योत्तर कृतकृत्यता आणली हे अतिशय सुंदर शब्दांमध्ये ते व्यक्त करतात. त्यांची कविता म्हणजे एक प्रकारचे तत्वज्ञान निरूपणच !

‘ दुःख ना आनंदही अन् अंत ना आरंभही
नाव आहे चाललेली कालही अन् आजही
मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा
मी नव्हे की बिंब माझें! मी न माझा आरसा…

एकला मी नाही जैसा, नाही नाही मी दुणा
जीवनाला ऐल नाही, पैल तैसा, मध्य ना ‘

पुन्हा तोच, एखाद्या संताला शोभावा असा उदात्त दृष्टिकोन. जीवन यात्रा ही अशीच चालू रहाणार, ह्यात एकटेपण जितके पोकळ तितकेच दुकटेपणही.

याशिवाय त्यांची काही अजरामर गीते ‘ लवलव करी पातं, डोळं नाही थाऱ्याला ‘, ‘ ये रे घना ये रे घना ‘, ‘ नाही कशी म्हणू तुला…’, ‘ कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ‘, ‘ तू तेंव्हा तशी ‘, ‘ गेले द्यायचे राहून ‘. प्रत्येक गीताचा रंग वेगळा.

‘ सप्रेम द्या निरोप ‘ नावाची एक विलक्षण कविता…

तो एक वृद्ध माळी
गेला पिकून आहे
निद्रीस्त शांतकाय
आता पडून आहे

गुंफून शेज त्याची
हळूवार पाकळ्यांनी
हा वेल मोगऱ्याचा
पानी मिटून आहे

अंगावरी कळ्यांची
पसरून शाल गेला
सारा गुलाब आता
रोखून श्वास आहे…

बोले अखेरचे तो:
आलो ईथे रिकामा
“सप्रेम द्या निरोप,
बहरून जात आहे”

मनुष्याच्या जन्म घेण्याचेच मुळी प्रयोजन काय ? तर ‘काहीतरी फुलवणे ‘ ! मग ते त्याचे कर्म असो किंवा भावनांनी जोडली जाणारी नाती असोत. रुजवलेली रोपे, उमललेल्या कळ्या आणि फुललेली फुले जेंव्हा आनंद देतात तेंव्हा ते खरे त्या रोपांचे बहरणे नसून त्यास रुजवणाऱ्या हातांचे बहरणे असते. हीच कृतकृत्यता म्हणजे ही कविता! आयुष्याची वाट जिथून सुरू होईल ते कदाचित वाळवंट असेलही परंतु त्यातही आपल्या कर्माने आणि प्रेमाने कर्तृत्वाचे आणि सग्यासोयऱ्यांचे मळे फुलवणारा जीव जेव्हा एकदा शेवटचे वळून पहात असेल तेव्हा मग ‘ सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे ‘ म्हणणारी धन्यता दाटत असेल.

‘ जाहला सूर्यास्त राणी
खोल पाणी जातसे
दूरचा तो रानपक्षी
ऐल आता येतसे

अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा.’

ह्या कवितेतही अशीच अभिव्यक्ति…मृत्यू समोर उभा ठाकलेला असताना एक असा सुगंधित फुलोरा यावा की सारा पुढला प्रवास सुलभ व्हावा…हे वाचतांना डोळ्यांतून टपटप पाणी पडू लागते, मात्र ते शेवटच्या क्षणाच्या आर्ततेने आले आहेत की कृतकृत्यतेच्या सुखातून हे मात्र ठरवता येत नाही आणि हेच आरती प्रभूंच्या कवितांचे मर्म असावे. ‘ जाईन दूर गावा ‘,
‘ सांगेल राख माझी ‘ ह्या देखील ह्याच भावार्थाच्या कविता.

‘ समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायांशी पडते.

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे
मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे.

साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची…

डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे
असे काहीसे वाटते याला कसली गं नावे ?

हसशील, हास मला, मला हसूही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा ! ‘

कवीवर्यांच्या कवितांवर क्लिष्टतेचा, अनाकलनीयतेचा, गूढतेचा शेरा मारणारेही बरेच लोक आहेत. मला मुळात हा विचारच मान्य नाही. कुणाच्याच कवितांबद्दल नाही. कविता म्हणजे बातमीपत्र नव्हे. तिस मुद्द्यांमध्ये कसे मांडायचे ?

एखादी कविता अनाकलनीय आहे असे म्हणण्यापेक्षा, लक्ष आकलनांना तृप्ती देण्याची ताकद तिच्यात आहे असे म्हणणे अधिक योग्य नव्हे का ?
कविता म्हणजे दोर्‍याचा गुंता नव्हे की जो सोडवायला हवा. कविता म्हणजे रचनाकाराने स्वतःच्या दैवी देणगीतून निर्माण केलेले आणि स्वतः भोवती गुंफलेले रेशमाचे कोश आहेत. त्यातला कोणताही धागा हाती आला तरी तो तितकाच मुलायम असणार यात शंका नाही.

कवीवर्य आरती प्रभू यांनी २६ एप्रिल १९७६ रोजी, वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी ह्या जगाचा निरोप घेतला. त्यांचे आयुष्य खऱ्या अर्थाने ‘ बहरणे ‘ आहे.
‘ का ते कशास सांगू मांडून मी दुकान ?
शब्दास गंध सारे असतील की जडून. ‘
ह्या त्यांच्या कवितेच्या ओळींतील शब्द न् शब्द सत्य आहे.

कवीवर्य आरती प्रभू आपली कविता म्हणजे एक अनामिक हुरहुर लावणारी पोकळी आहे परंतू ती पोकळी इतकी विशाल आहे की त्यात सारे विश्व सामावून आहे. आपल्याला माझा प्रणाम 🙏🏻

कवीवर्य आपण म्हटले आहे
‘ घुसमटे खोल कळ किटेल्या शून्यांत,
फुटायाचा आहे कोंभ आसूंच्या थेंबांत. ‘

माझीही एक अशीच कळ जी खोल घुसमटते आहे तिस ‘ मूक मी ‘ व्यक्त करते आहे…

मूक मी
माझ्या मूक पणात लपविली शब्दांनी त्यांची गीते,
ते साधन होती दुनियेचे मी त्यांची वीणा होते.

गायली भजने सुरेल; भक्ती लेपूनी कृष्णा पुढती,
स्वर पाव्याचे विकता त्यांनी; मी मूक मंजिरी होते.

लोभ शोक क्रोध मोह; रुजविले शब्दांनी वर्मी,
परी वर्ज्य स्वरात रचता गीते; मी शांत अभंग होते.

शुष्क जनांचे निर्झर अंतरी; खळखळ शब्दा उरली,
वैशाखी विझवण्या वणवा; मग मी सचैल श्रावण होते.

शब्दी उरला अक्षर संचच, भाव विखुरला भ्रांती,
हळ हळती जेंव्हा मने शब्दांची; मी अश्रू अनावर होते.

डॉ गौरी जोशी – कंसारा

– लेखन : डॉ. गौरी जोशी- कंसारा, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments