कवी बा. सी. मर्ढेकर
युगप्रवर्तक कवी, कादंबरीकार, साहित्य आणि सौंदर्यशास्त्र तत्वे याचे अभ्यासक, समीक्षक अश्या विविध भूमिका पार पाडणारे बाळ सीताराम मर्ढेकर अर्थात बा. सी. मर्ढेकर.
१ डिसेंबर १९०९ रोजी जन्मलेल्या कवीवर्य बा. सी. मर्ढेकर यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांना ही आदरांजली 🙏🏻
आपल्यासारख्यांचे अनेक पूर्वग्रह असतात. आणि साहित्य, कवी, कविता म्हटलं की तर असतातच !
लेखक म्हटलं की हा असा, कवी म्हटलं की तो तसा. विज्ञानपर लेख असा असावा आणि कविता तशी असावी. ‘ हे असे- ते तसे ‘ असण्याला जेव्हा तडा जातो आणि त्या भेगेतून एक आकाशाकडे झेपावणारे हिरवे देठ फुटते तेव्हा त्यास आपण नव्या युगाची नांदी किंवा युग प्रवर्तन असे म्हणतो.
असेच मराठी साहित्यात पारंपारिक रचनांच्या अभ्यासातून तयार झालेल्या भूमीवर ठराविक धारणांना भेग पाडून त्यात रोप रुजवणारे नवकवितेचे रचनाकार, युगप्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे कवी म्हणजे कवी बा. सी. मर्ढेकर.
कविता म्हणजे मोहक नाजूक शब्द असावेत, ‘जे न देखे रवि ते देखे कवी ‘ असे अप्रतिम आणि सौंदर्यपूर्ण कल्पना सामर्थ्य असावे, अलंकारिक संस्कृतज शब्द असावेत आणि क्षमा करा; परंतु सामान्य माणसाला स्वप्नवत वाटावं किंवा ‘ हे प्रकरण काही आपल्या आयुष्याशी मेळ खाणारं वाटत नाही ‘ असं काहीसं कवितेचे स्वरूप असणाऱ्या काळात एखादा गुलमोहर फुलावा तशी एक कविता फुलली.
गुलमोहर ज्या प्रमाणे भर उन्हाळ्यात त्या जीवघेण्या झळा सोसत उभा राहतो; अगदी कुठेही; मैदानात, भिंतीपलीकडे, कुंपणाच्या आत-बाहेर, कुठेही. इतर रोपे कशी प्रयत्नांनी, मशागत करून, त्यांची ‘ दखल ‘ घेऊन वाढवली जातात. गुलमोहर कोणी लावला, त्याचे इवलेसे रोप कधी होते ह्याबद्दल कोणी फार जागरूक किंवा उत्सुक असल्याचे दिसत नाही मात्र हाच गुलमोहर उन्हाच्या झळा सोसूनही रक्तवर्णी अतिशय सुंदर फुले फुलवतो. ही फुले देखील मकरंदाने भरलेली असतात. ही फुले भृंगांना, पक्षांना समाधान देणारी असूनही एखाद्या अंगारा प्रमाणे भासतात. सामान्य माणूस आणि गुलमोहर ह्यात किती विलक्षण साधर्म्य आहे…
कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांची कविता म्हणजे गुलमोहराचे आरक्तवर्णी फुललेले फूल आहे. सामान्याची कथा आणि व्यथा मांडणारी ही कविता आहे प्रत्येक जीवाच्या दैनंदिन शारीरिक आणि मानसिक कार्यावस्था आणि स्वप्नावस्था ह्यात झुलणारी आहे. प्रत्येकाची आहे! प्रत्येकाला त्याचे सार जीवन उपयोगी वाटावी अशी आहे, सुंदर आहे परंतु त्या सौंदर्याला पारंपारिक सौंदर्याच्या व्याख्या मान्य नाहीत.
‘ पिपात मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या,मुरगळल्याविण;
ओठावरती ओठ मिळाले;
माना पडल्या,आसक्तिविण.
गरिब बिचारे बिळात जगले,
पिपात मेले उचकी देउन;
दिवस साडला घार्या डोळी
गात्रलिग अन धुऊन घेउन.
जगायची पण सक्ति आहे;
मरायची पण सक्ति आहे;
उदासतेला जहारी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळे
ओठावरती जमले तेही
बेकलाइटी,बेकलाइटी!
ओठावरती ओठ लागले;
पिपात उदिर न्हाले!न्हाले ‘
मराठी कवितेला अश्या प्रतिमा आणि अशी मांडणी नवी होती. या कवितेचे अनेक अर्थ लावले गेले सामान्य मनुष्याच्या शूद्रतेचे केलेले वर्णन, त्याचे आयुष्यात येणे, शरीर धर्म पाळीत जगणे इथपासून ते ज्यू लोकांची जी निर्घृण हत्या केली गेली तिथपर्यंत…
कवितेचा आवाका इतका प्रचंड असणे हीच कवीवर्य मर्ढेकरांची खासियात आहे.
‘ ह्या दु:खाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि जळण्याची,
पण पुन्हा ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट
मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडुनि तिचे जरा ह्या कढईच्या दे
कुट्ट कपाळी ठोकुनि पक्के, काळे, बळकट
फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतुन कढईच्या ह्या फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट. ‘
‘ सर्वेपि सुखिनः सन्तु ‘ ही एक मानवतावादी प्रार्थना म्हणून परमोच्च असली तरी हे खरोखर शक्य आहे का ? इथे मात्र संपूर्ण सुखाने भरलेले आयुष्य असावे अशी मुळातच कवींची प्रार्थना नाही. मानवी आयुष्यात दुःख असणार ह्या वास्तवाचे कविवर्यांनी स्वागत आधीच केले आहे. आता केवळ ते मागताहेत ती शक्ती…ते दुःख सहन करण्याची आणि त्यातून अधिक तेजस्वी होण्याची !
‘ ह्या दु:खाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे…’
दुःखाचे डोंगर, दुःखाची दरी, दुःखाचा महासागर अश्या निसर्गातल्या सरधोपट प्रतिमा न वापरता ‘ कढई ‘ अशी सर्वसामान्य माणसाच्या प्रपंचाचा भाग असणारी वस्तू मर्ढेकरांनी निवडली. हे निवडणं अकारण आहे का ? कढई म्हणजे खोलगटपणा, त्यातून एकत्र आणण्याची वृत्ती. त्यात वेगवेगळे पदार्थ एकत्र आणण्याच्या गुणधर्मातून त्या कढईने तापून, तावून-सुलाखून निर्माण केलेला नवा पदार्थ. ही कढई देखील लोखंडाची. अधिक तापल्याने अधिकाधिक कणखर होत जाणारी. मनुष्याचे आयुष्य ही असेच असावे यासाठी ह्या अशा दुःखाच्या कढईची घडण कवी मागत आहेत.
यातल्या पुढल्या ओळींनी कायमच मला स्तब्ध केलं आहे.
‘ मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
एका ओळीत कुंतीचे संपूर्ण आयुष्य कविवर्यांनी उभे केले आहे. बालवयात दुर्वास ऋषींची मनापासून केलेली भक्ती आणि सेवा, त्यातून झालेली वरप्राप्ती, त्यानंतर घडलेली अगदी सूक्ष्म चूक आणि मिळालेला एक भयंकर शाप. एका अल्लड क्षणी त्या वराचा घेतलेला पडताळा. तेजस्वी दिवाकराच्या परमपवित्र आणि सर्वस्वार्पणाने केलेल्या भक्तीतून, स्मरणातून उदरी आलेला त्याच्या पित्या इतकाच तेजस्वी पुत्र. राणी कुंतीच्या भक्तीचे प्रत्येक रूप जगात अभिमानाने मिरवावे असे…पण प्रत्यक्षात मात्र ह्या मोलाच्या भक्तीचे भाळी म्लानतेचे आरोपच आले. उजळ माथ्याने मिरवावी अशी भक्ती कपाळ कुट्ट करणारी ठरली. प्रत्येकवेळी! मात्र तरीही तिने ते अखंड आणि अखेर पर्यंत निभावले. प्रत्येक वेळी तिचे झिजणे, तिचे जळणे, तिचे काळवंडणे जगाला दैवी देणगी देत गेले.
कवितेच्या ह्या दोन ओळींत आणि ‘ कढई ‘ प्रतिमा वापरून मनुष्य जीवनाच्या उदात्त तत्वज्ञानाचे कविवर्यांनी केलेले वर्णन मला निःशब्द करते.
‘ भंगुं दे काठिन्य माझें
आम्ल जाऊं दे मनीचें
येउं दे वाणींत माझ्या
सूर तूझ्या आवडीचे…
राहूं दे स्वातंत्र्य माझें
फक्त उच्चारांतले गा;
अक्षरां आकार तुझ्या
फुफ्फुसांचा वाहू दे गा…
जाऊ दे ‘ कार्पण्य ‘ ‘ मी ‘ चे
दे धरूं सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्र-काट्याची कसोटी…’
‘ माझे काठिण्य म्हणजे माझा मी पणा ! तो टळो, मनाचा आम्लपणा जावो म्हणजेच मनाचे तामस विकार टळो आणि देवा, तुला आवडतील असे सूर माझ्या वाणीत येवो. माझ्या वाणीचे केवळ उच्चार करण्याचे स्वातंत्र्य तू माझ्या शरीरी ठेव परंतू आकार घेणारी अक्षरे तुझ्यातून निर्माण झालेली असोत.’
मी एक नक्की मानते…प्रत्येक कवी, त्याच्याही कळत-नकळत, त्याच्या कवितेचे सर्वांगीण वर्णन कोणत्यातरी चार ओळीत करून जातो. ते शोधण्याची आपली तयारी आणि मानसिकता असावी लागते इतकंच! वरील रचनेतल्या
‘ जाऊ दे ‘ कार्पण्य ‘ ‘ मी ‘ चे
दे धरूं सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्र-काट्याची कसोटी ‘
ह्या चार ओळी मला मर्ढेकरांच्या कवितांचे सार वाटतात.
‘ कार्पण्य ‘ म्हणजे कृपणता मग ती वैचारिक असो, सामाजिक असो, साहित्यिक असो किंवा आत्मिक असो, ती एकदा झडली की नव्या जाणीवा, नव्या कल्पना आणि नव्या मानवांना कवटाळण्याचे बळ प्राप्त होते आणि मग असा स्वीकार एकदा केला की जीवनाच्या प्रत्येक पैलूत भावनेला आधुनिकतेची आणि शास्त्राची जोड मिळते.
कवीवर्य मर्ढेकर यांची कविता याहून काय वेगळी आहे ?
‘ नाही कोणी का कुणाचा | बापलेक मामा भाचा |
मग अर्थ काय बेंबीचा | विश्वचक्री ||
आई गोंजारते मुला | कासया हा बाप लळा |
बाईलप्रितीच्याही कळा | कशास्तव ||
कैसा बांधला देखावा | जननमरणांतून देवा |
कुशीकुशीत गिलावा | रक्तमांसी || …’
‘ जगी येणे एकटे आणि जाणेही एकटे. नाळ जर खऱ्या अर्थाने जोडलेली नाहीच तर बेंबीचा अर्थ तरी काय नक्की? जन्म आणि मृत्यू हेच तेवढे सत्य. ह्यात मध्ये जो आहे तो सारा देखावा, नात्यांचा लेप ! ‘
संतवचन वाटावी अशी ही रचना लिहिणाऱ्या कवी मर्ढेकरांनी ओवी आणि अभंगाच्या अनेक रचना केल्या आहेत. त्यात संत संप्रदायाने मानवोद्धारसाठी सांगितलेली तत्वे आणि सार अबाधित ठेवून त्याचे रुपडे आजच्या काळाशी मिळतेजुळते करण्याकडे मर्ढेकरांचा कल होता. प्रतिमा या नाविन्यपूर्ण आणि सामान्य जीवनाशी चपखल बसणाऱ्या असल्या की प्रत्येकाचीच नाळ त्या काव्याशी जोडली जाते. अश्या नाविन्यपूर्ण अभिव्यक्तीनेच कवी मर्ढेकरांनी आपले एक स्वतंत्र स्थान साहित्य विश्वात निर्माण केले.
‘ सकाळी उठोनी | चहा-कॉफी घ्यावी |
तशीच गाठावी | वीज गाडी ||
दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून |
दुपारी भोजन | हेची सार्थ ||
संध्याकाळ होता |भूक लागे तरी |
पोराबाळांवरी | ओकू नये ||
निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे |
होणारे वाटोळे | होईल ते ||…’
त्या काळातल्या नोकरीपेशा वर्गाचे, त्यांच्या जीवनाचे, त्यांच्या जाणिवांचे असे उपहासात्मक म्हणावे की विचार करण्यास प्रवृत्त करणारे म्हणावे असे चित्र कवींनी उभे केले आहे. मोठ्या अभंगाच्या पारंपारिक देहावर घातलेला हा असा आधुनिक पोषाख.
मुळात मला पुराण काव्य, नव काव्य असं काही फारसं मान्य नाही. हे भेद आपण मानतो ते काल सापेक्ष, रचना सापेक्ष, विषय सापेक्ष किंवा शब्द योजना सापेक्ष. मात्र मी अनेक लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, कवितेचा आत्मा म्हणजे त्यातला भाव…तो कसा नवा जुना असू शकतो ? जे आज ग्राह्य आहे ते उद्याही आहे. जे आज त्याज्य आहे ते उद्याही आहे.
आपल्या आवडत्या व्यक्तीने मिठीत घेतल्याने होणारा आनंद कोणत्याही वृत्तात, गझलेत, मुक्तछंदात व्यक्त केला तरी बदलेल कसा ? मानवी संवेदना त्रिकालाबाधित आहेत.
‘ दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळूनी गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा
अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस – मागे
वळुनि पाहणे विसरलीस का ?
विसरलीस का हिरवे धागे?…
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग
कोमल ओल्या आठवणींची
इथल्याच जर बुजली रांग…’
किमान ७०/७५ वर्षांपूर्वीची ही कविता असावी. ह्यातली प्रत्येक ओळ, ती प्रेमातली तळमळ, जीव व्याकूळ होण्याची अवस्था…आज तरी काय बदललं आहे ?
म्हणून मला वाटतं कवितेत नवं-जुनं असं काही नसतं. शुद्धाशुद्धाच्या जाणिवा मनात पक्क्या असल्या तर केवळ देह बदलतो; आत्मा नाही.
‘ आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातक चोचीने
प्यावा वर्षा ऋतू तरी…’
अशी पावसाच्या धारांनी चिंब झालेल्या सृष्टीचे वर्णन करणारी कविता असो किंवा
‘ किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
कितीतरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो…’
अशी भूतकाळाच्या आठवणींत रममाण करणारी कविता असो, ह्यात कवीवर्य मर्ढेकरांची अद्वितीय शैली दिसून येते.
त्यांच्या अनेक कवितांमधून जसा एक जोष, बेदरकारपणा, वास्तववाद दिसून येतो तसेच अनेक कवितांमधून एक हळवे, गूढ औदासीन्यही दिसून येते. कदाचित सामान्य माणसाचे पिचलेले आयुष्य, त्याची क्वचितच पूर्ण होणारी स्वप्नं, जी हुजुरी करणारी अल्पसंतुष्ट वृत्ती या सगळ्यातून आलेला जो तिटकारा होता, तो हे अश्या प्रकारचे औदासीन्य निर्माण करीत होता.
‘ गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;…
स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.
गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.
काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमिनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली…
गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला! ‘
वास्तववादी, व्यक्तिचित्र रंगवल्याप्रमाणे असणारी मात्र मनुष्याच्या वैचारिक, वैयक्तिक आणि सामाजिक विकासाला बसलेली खीळ, त्याच्या हतबलतेचे लख्ख रूप दाखवणारी ही कविता.
ही अशी वास्तव वादी कविता लिहिणारे कवी मर्ढेकर, वर उल्लेखिलेल्या ‘ पिपात मेले ओल्या उंदिर…’ सारखी आशयगर्भ कविता लिहिणारे कवी मर्ढेकर, काही रचना अश्या करतात की त्यांच्या कल्पना सामर्थ्याने थक्क व्हायला होतं.
‘ न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा
डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती…’
मुंबापुरीची एक रमणीय सकाळ, ह्या बंदराचे हे वर्णन. नव्या आशा आकांक्षांना जन्म देणारी मुंबापुरी…अगदी एखाद्या गर्भवती सारखी. कित्येक लोकांची स्वप्ने इथे जन्म घेतात. तो हुरूप त्यांना आयुष्यात पुढे पुढे जायला प्रेरित करतो. म्हणून ही मुंबई नगरी मोहक आहे.
आणि आता कविवर्यांची माझी अत्यंत लाडकी कविता ‘ शिशिरागम ‘
‘ शिशिरर्तुच्या पुनरागमें,
एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे
न कळे उगाच रडावया.
पानांत जीं निजलीं इथे
इवलीं सुकोमल पाखरें,
जातील सांग अता कुठे ?
निष्पर्ण झाडिंत कांपरे !…’
हेच ते औदासीन्य ! निर्भिडपणाच्या आत असणारा एक अतिशय संवेदनशील कोष. पाखरांचा आसरा असणारी ही पर्णे आता गळून गेली, आता ती पाखरे कुठे जातील ह्या विचाराने व्याकूळ झालेले कवीमन.
कविता−शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता, कादंबऱ्या− रात्रीचा दिवस , तांबडी माती , पाणी.
याशिवाय नाटके− नटश्रेष्ठ , संगीतिका−
कर्ण , संगम , औक्षण , बदकांचे गुपित.
तसेच समीक्षात्मक आणि सौंदर्याशास्त्रीय−
आर्ट्स अँड मॅन , टू लेक्चर्न ॲन इंस्थेटिक ऑफ लिटरेचर , सौंदर्य आणि साहित्य असे प्रकाशित साहित्य असलेल्या कवीवर्य मर्ढेकर यांची प्रतिभा असामान्य आहे. तिचे असे शब्दांत वर्णन करायचे म्हणजे गणपत वाण्याने पाहिलेल्या माडी बांधायच्या स्वप्नाहून अशक्य आहे. २० मार्च १९५६ रोजी
अकालीच मृत्यू झालेल्या, कविवर्य आपल्याला माझा प्रणाम 🙏🏻
आजची माझी कविता आपल्या चरणी अर्पण…
हे फार महाग आहे !
नको नको, जाऊदे
हे फार महाग आहे!
सकस आहे, चोख आहे;
हे अगदी रास्त आहे
पण त्याला मोजावा लागेल;
तो दाम मात्र जास्त आहे !
हलकं, स्वस्त;
असं काही नाही का?
टिकाउपणाची
उगा शंभरदा ग्वाही का?
टिकायला, मुरायला
इतका कोणाकडे वेळ
उबवणाराही चालेल;
एका रात्रीचा हवा खेळ!
बरं की बुरं
इथे कोण करतंय पर्वा
नफा की तोटा
तेवढं फक्त ठरवा
निबर असेल तरी चालेल
कारण तेच परवडेल
शेवटी हा ज्याच्या त्याच्या
ऐपतीचा भाग आहे
नको नको, जाऊदे
हे फार महाग आहे !

– लेखन : डॉ. गौरी जोशी – कंसारा. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800