पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे
‘ ऐसा गा मी ब्रह्म’, ‘ माझे विद्यापीठ ‘, ‘ जाहीरनामा ‘ आणि ‘ नव्या माणसाचे आगमन ‘ असे त्यांचे चार काव्यसंग्रह आहेत. वयाच्या तिसाव्या वर्षापासून कवी नारायण सुर्वे कविता लेखन करू लागले असा उल्लेख आहे. सुमारे १४५ कविता त्यांनी लिहिल्या आहेत. याशिवाय अनेक हिंदी उर्दू कवितांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत.
कवितेने कुठे उगवावे, कुठे रुजावे याचे काही नियम नाहीत. तिला भाषा, विद्वत्ता, कुल, धर्म, जात, वंश असे संकुचित कुंपण मुळात मान्यच नाही. कविता रुजण्यासाठी लागते ते केवळ भुसभुशीत काळ्या मातीसारखे मन; ज्यात प्रत्येक अनुभव झिरपत-झिरपत जातो आणि त्याला शब्दांचे कोंब फुटून कविता जन्म घेते. कवितेचं नातं फक्त भावनेशी !
पौर्णिमेचे चांदणे, मोहरलेली वेल आणि उचंबळून आलेल्या शृंगारावर जशी कविता होवू शकते तशीच ती भुकेल्या पोटावर, शिवलेल्या ओठावर, कमजोर हातांवर आणि शिरजोर लाथांवरही होऊ शकते. ही अशी पिचलेल्या मनोवृत्तीला झुगारून देण्यासाठी, वर्षानुवर्षे अन्यायाच्या चादरी पांघरून झोपी गेलेल्या मनांना जागृत करण्यासाठी रचलेली कविता म्हणजे १५ ऑक्टोबर १९२६ रोजी एक वेगळेच भाग्य घेवून जन्माला आलेल्या अर्भकाची; कवीवर्य नारायण सुर्वे यांची कविता !
‘ रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे,…’
हा तो काळ जेंव्हा गिरणी कामगारांच्या रक्ताचं पाणी व्हायचं आणि ते झाल्यावरही दोन वेळच्या रोजीरोटीचा सवाल कसाबसा सुटायचा. उच्चभ्रू म्हणवल्या जाणाऱ्या समाजात मानाची वागणूक क्वचितच मिळायची. किडा-मुंगी प्रमाणे आयुष्य जगणं हा केवळ वाक्प्रचार नसून त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा कष्टकरी समाज होता. अशा कष्टकरी समाजाच्या, उपेक्षित समाजाच्या दुःखाला, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला आपल्या तप्त, ज्वलंत शब्दात उतरविण्याचे कार्य कवीवर्य नारायण सुर्वे यांनी केले. कवितेच्या शब्दांतून स्वतःचे व्यक्त होणे असते किंवा सुप्त समाजास प्रबोधन असते. ह्या दोन्हीपैकी एक ध्येय प्रत्येक कवीच्या कवितेचे असते. मात्र स्वतःचे व्यक्त होणे, सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणे आणि प्रबोधन करणे हे सर्व जिथे एकरूप होते अशी कविता म्हणजे कवीवर्य नारायण सुर्वे यांची कविता!
‘ रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे
याच साठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती खडगे मी देत आहे,
एकटाच आलो नाही युगाची ही साथ आहे
सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे ‘
रोजच्या आयुष्यात जे भोगलं ते या कवितेत उतरलं, जे अनुभवलं तेच सजलं आणि जे सोसलं तेच साकारलं. इतकी सच्ची अशी ही कविता आहे, झूट मान्य नसणारी…
‘ झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली, नाहीच असे नाही
असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही असे नाही…’
खोट्या जाणिवा, खोट्या कल्पना आणि खोट्या रचना यांच्या मोहाला बळी न पडता अंधारात नेटाने तेवणाऱ्या एका पणतीप्रमाणे तेवणारी, एक सत्य भावना, एक स्वतंत्र आणि स्वाभिमानी वृत्ती असणारी ही कविता !
‘ अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेतांना
विझता विझता स्वतःला सावरलेच नाही, असेही नाही ‘
जन्मदात्या माता-पित्याच्या छत्राखाली सुखरूप वाढलेल्या, सामाजिक, आर्थिक आणि भावनिक सुरक्षिततेच्या छत्राखाली जीवन जगणाऱ्या आपल्या सारख्यांना या सगळ्याला पारख्या असणार्या मनाच्या वेदना कधी तरी समजू शकतील का ? त्या पूर्णतः समजू शकणे अशक्य आहे पण असे दुःख व्यक्त करणाऱ्या रचना निदान त्याची कल्पना करायला तरी मदत करतात. त्या तशा विश्वाची एक करुण झलक देतात आणि मग त्यातही मानाने जगणाऱ्या, नीतीच्या मूल्यांचे जतन करणाऱ्या आणि श्रमाने परिवार चालवणाऱ्या मानवाचे दर्शन परमेश्वर दर्शना प्रमाणे वाटू लागते.
‘ दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली,
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली…
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले ‘
पोट भरलेले असले, निवांत झोप घेण्याची हक्काची जागा असली आणि उद्याच्या भाकरीची खात्री असली की सृष्टी सौंदर्य, श्रृंगार असे विचार डोक्यात रुंजी घालू लागतात पण जिथे जन्माला आलेल्या जीवाला मुळात जीवच टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागते त्यावेळी मग असे भट्टीत तावून सुलाखून निघालेले काव्य जन्म घेते.
‘ क्षितीज रुंद होत आहे
आज माझ्या वेदनेला
अर्थ नवा येत आहे
आणि मेघांच्या डफावर
थाप बिजली देत आहे…
आज माझ्या कोरड्या गा
शब्दात आग येत आहे
आणि नव्या सृजनाचे
क्षितीज रुंद होत आहे. ‘
कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांमधून त्यांना आलेल्या कटू जीवनानुभवांचे, त्यांनी आजूबाजूच्या समाजात पाहिलेल्या वेदनांचे दर्शन घडते. मात्र त्यात अगतिकता किंवा हतबलता नाही तर त्याउलट त्यातून अंगार घेवून पेटून उठून स्वतःसाठी नवे विश्व निर्माण करण्याची जिद्द आहे.
ह्या कवितेला यमक साधण्याचा हट्ट नाही, क्लिष्ट वृत्तांचे भावनेला जड होतील असे अलंकार घालण्याचा सोस नाही. तिला हवा आहे केवळ एक अस्सल दुःख मांडणारा राग आणि त्यातून निर्भीडपणास आलेली जाग!
शोषणग्रस्त समाजाचे त्यांच्या दुःखाचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या अनेक कविता आहेत. त्यात मुंबई, शीगवाला, बेतून दिलेले आयुष्य ह्या काही कविता आहेत.
काव्याला दलित, श्रमिक, असे कसे म्हणायचे ? मुळात ती तशी वृत्ती, तसे विचार मनात येण्यासाठी एकच आवश्यक असतं आणि ते म्हणजे मानवतावादाचा पुरस्कार करणारे हळवे मन. ‘ जगा आणि जगू द्या ‘ हा प्रत्येकाचा मंत्र आहे; असायला हवा. मग ते सांगणारे काव्य अमूक एका वर्गाचे रहात नाही; ते वैश्विक होते. दारिद्य्र, अन्याय, शोषण, संकुचितता, धर्मांधता या साऱ्याचा बहिष्कार करणारे हे काव्य आहे.
मात्र क्वचित कधीतरी त्याच मनात उमलणारे प्रेमही लख्ख दिसते. हा उमल ही नेहमीच्या मराठी कवितेपेक्षा अगदी वेगळा…खोल प्रेम आहे परंतू त्याला व्यावहारिकतेचा, परिस्थितीचा स्वीकार आणि सामना करण्याचा पदर आहे. मरण्या मिटण्याची केवळ भाषा करणारे अपंग प्रेम हे नाही…तर मरून मिटून त्यातून सृजन पावलेले, एक पवित्र उदात्त जोड असलेले हे प्रेम आहे.
‘ जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन
तेव्हा एक कर
तू निःशंकपणे डोळे पूस.
ठीकच आहे चार दिवस
उर धपापेल, गदगदेल
उतू जाणारे हुंदके आवर,
कढ आवर, नवे चुडे भर
उगिचच चीर वेदनेच्या नादी लागू नकोस
खुशाल खुशाल तुला आवडेल असे घर कर
मला स्मरून कर
हवे तर मला विस्मरून कर…’
‘ विश्वास ठेव ‘ नावाची कविता देखील अश्याच प्रेमाचा अनुभव करून देणारी आहे.
‘ इतका वाईट नाही मी; जितका आज समजतेस
दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस
तडजोड केली नाही जीवनाशी; हे असे दिवस आले
आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले…
आयुष्य घृणेत सरणार नाही; हवीच तर घृणाही ठेव.
ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.’
संवेदशीलतेचा परमोच्च बिंदू म्हणजे ज्या जन्मदात्या माऊलीने जन्म दिल्यावर लगेच त्याग करून सोडून दिले तिच्या बद्दल कवीवर्यानी काढलेले उद्गार. ते मी इथे जसेच्या तसे लिहीते आहे.
‘ ही जन्मदात्री आई तेव्हा माझी नाळ कापून, माझ्यापासून अलग झाली असेल तेव्हा तिच्या डोईवर आकाश फाटले असेल, भीषण वादळात सापडलेल्या ज्योतीसारखी ती थरथरत, कावरीबावरी होत शरमिंदी झाली असेल. स्त्रीला आपले बाळंतपणा जर सुखावह वाटत नसेल तर तिला त्याच्या सारखा मोठा शाप नाही; अशी स्त्री ह्या कुबट जगावर थुंकेल तरी नाहीतर सारी पोरे माझीच आहेत अशी माया तरी लावील. दुसरा तिला पर्याय नाही. तिने पुढे काय केले असेल हे तिचे तिलाच ठाऊक. ‘
त्यानंतर मात्र लगेच ज्या दुसऱ्या माऊलीने पदराखाली घेतले, माया लावली ती तिच्याहून मोठी आहे असे सांगत कवीवर्य म्हणतात…
‘ हंबरून वासराले चाटती जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय ‘
जिने आपला त्याग केला, कदाचित जगेल-मरेल ह्याचा विचार न करता सोडून दिले त्या स्त्री बद्दल इतकी क्षमाशीलता, सूड भावनेचा अभाव आणि तिच्या हतबलतेचा केलेला विचार कविवर्यांच्या अत्यंत हळव्या मनाचे दर्शन देतो आणि म्हणूनच मी म्हणते की कवितेची वर्गवारी करणे अयोग्य आहे. ती केवळ संवेदनशील ह्या एकाच वर्गाची असते. शक्य आहे की त्यातून साधले जाणारे परिणाम इतर अनेक वर्गांचे असू शकतात.
कवीवर्य नारायण सुर्वे, आपल्या कवितांद्वारे आपण अनेक ‘ सूर्यकुलातल्या लोकांच्या ‘ व्यथा बोलून दाखवल्यात. आणि अगदी तसेच कुठेही गुंतून, अडकून न पडता १६ ऑगस्ट २०१० रोजी ह्या जगाचा निरोप घेतलात. आपली कविता धारदार आहे, भेदून टाकण्याची क्षमता असणारी आहे. आपल्याला माझा प्रणाम 🙏🏻
आज मी मानवी जीवनाचे माप इथे मोजून दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. हे ‘ माप ‘ आपले चरणी अर्पण.
माप
आखुड रान
आखुड पान
आखुड गान
आखुड दान
जीवापेक्षा जड भान
चाकोरीला सारा मान
अनंत रान
अनंत पान
अनंत गान
अनंत दान
जीवाचंही हरपलं भान
लहरीला सारा मान
एक माप तनाचं !
एक माप मनाचं !

– लेखन : डॉ. गौरी जोशी-कंसारा. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
आपल्या इतक्या मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आणि भरभरून दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार 🙏🏻
असेच संवेदनशील मन मलाही लाभावे हीच कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या चरणी आणि आपल्या सर्व रसिकांचे चरणी प्रार्थना 🙏🏻
डॉ.गौरी मॅडम आपण कविवर्य कै. नारायण सुर्वे यांचा जीवन पट उलगडून दाखवला आणि त्यांच्या मनात समाजातील जातीयता, धर्मांधता, स्त्री-पुरुष भेदाभेद, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढत जाणारी दरी त्यांच्या प्रत्येकाच्या वेगळ्या समस्या यावर कविवर्यांनी आपल्या काव्य रचनेतुन नम्रपणे प्रहार केले आहेत. सर्व भारतीय जातीधर्माच्या भिंती पाडून मानवधर्म मानून समाज एक कसा होईल… यासाठी त्यांनी जीवनभर केलेल्या काव्यरचना…
जन्म झाल्याबरोबर नाळ तोडून आपल्या पोटच्या गोळ्याला कचराकुंडीत टाकताना आपल्या मातेच्या मनातील अनेक प्रकारच्या विवंचना त्यांनी आपल्या काव्यातून मांडल्या आहेत.ज्या अनामिक मातेने त्यांना जन्म दिला व टाकले त्याबद्दल त्यांनी आपल्या मातेचा तिरस्कार त्यांनी कधीच केला नाही. जीवनभर त्या मातेची ते प्रतिक्षा करत राहीले… फक्त एक च अपेक्षा की त्या मातेने मला एकदा तरी कुशीत घ्यावे….
कविवर्य नारायण सुर्वे खरोखरच नावाप्रमाणेच सुर्यासारखे प्रखर व स्वच्छ काव्यरचना करुन समाजमनातील समस्या मांडल्या…
डॉ.गौरी जोशी मॅडम खूपच छान…
आपले हार्दिक हार्दिक आभार