Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्यमनातील कविता....

मनातील कविता….

कवीवर्य वसंत बापट

कवी, गीतकार, बाल साहित्यकार, स्वातंत्र्य सैनिक, प्राध्यापक, साप्ताहिकाचे संपादक, लोककला जोपासक अश्या बहु आयामी व्यक्तीमत्वाचे धनी म्हणजे कवीवर्य वसंत बापट. त्यांनी विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांचे बरोबर संपूर्ण महाराष्ट्रात काव्य वाचनाचे अनेक कार्यक्रम केले.

त्यांनी गद्य आणि पद्य अश्या दोन्ही प्रकारचे लेखन केले आहे.
त्यांचे प्रकाशित साहित्य : अकरावी दिशा, अनामिकाचे अभंग आणि इतर कविता, अबडक तबडक (बालकवितासंग्रह), अहा, देश कसा छान, आजची मराठी कविता (संपादित), आम्हा गरगर गिरकी (बालकवितासंग्रह), चंगा मंगा (बालकवितासंग्रह), ताणेबाणे, तेजसी, परीच्या राज्यात (बालकवितासंग्रह), प्रवासाच्या कविता, फिरकी(बालकवितासंग्रह), फुलराणीच्या कविता (बालकवितासंग्रह), बिजली, मानसी, मेघहृदय, रसिया, राजसी, शततारका, शतकांच्या सुवर्णमुद्रा, शिंग फुंकिले रणी, शूर मर्दाचा पोवाडा, सकीना, सेतू.

२५ जुलै १९२२ जन्मलेल्या, ह्या कवीवर्यांच्या जन्मशताब्दी वर्षास २५ जुलै पासून सुरुवात झाली आहे. त्या निमित्ताने त्यांना ही आदरांजली. 🙏🏻

‘छोटेसे बहिण भाऊ,
उदयाला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला,
नवीन आकार देऊ…’

अगदी नक्की आठवत नाही पण, बालभारतीच्या चौथी किंवा पाचवीच्या पुस्तकातील ही कविता. घरी पाहुणे मंडळी जमली की, माझा आणि माझ्या भावाचा त्यावर होणारा सामुहिक कार्यक्रम मात्र आजही लख्ख आठवतो. त्या वयात केवळ ‘पाठांतराचे प्रदर्शन‘ यासाठी होणारा हा कार्यक्रम असायचा. त्यात बऱ्याच वेळा ही कविता म्हणता म्हणता सुद्धा, बसण्याच्या जागेवरून, आवाजाच्या चढ-उतारावरून आणि कोणती ओळ एकदा म्हणायची आणि कोणती दोनदा, यात असलेल्या मतभेदांवरून आणि त्यामुळे झालेल्या चुकांवरून आम्ही बहिण-भाऊ एकमेकांकडे रागाच्या नजरेने बघत राहायचो.

ह्या पलीकडे फार कळण्याचं ते वयही नव्हतं परंतु त्यानंतर अनेक वर्षांनी जेव्हा पुन्हा ही कविता वाचनात आली तेंव्हा त्यातले शब्द, त्यातला निखळ आनंद आणि तोवर हरवून टाकलेलं बालपण या सगळ्याने मन भरून आलं.

‘मोकळ्या आभाळी जाऊ,
मोकळ्या गळ्याने गाऊ
निर्मळ मनाने, आनंद भराने,
आनंद देऊ अन् घेऊ…’

मोकळं आभाळ, मोकळा गळा आणि निर्मळ मन हेच खरे आनंद. हे चिरंतन आनंद आहेत आणि त्याचेच स्वप्न पहात मोठं व्हायला हवं, हे या कवीने केवळ चार ओळीत सांगितलं होतं, त्याची जाणीव आज होते आहे, त्याचं महत्त्व आज कळतं आहे.

कवीवर्य वसंत बापट !

कवीचे ‘वैशिष्ट्य‘ म्हणा, ओळख‘ म्हणा किंवा, मला जो शब्द अगदी चपखल वाटतो तो म्हणजे कवीचे ‘कवीपण‘, हे कसं असतं किंवा कसं दिसून येतं ? कवीपण म्हणजे नऊ ते पाच ची नोकरी नाही किंवा कागदावर सह्या करून पूर्ण केलेली औपचारिकता नाही. कवीपण म्हणजे कवीचं ‘असणं‘, कवीचं ‘जिवंतपण‘, जे त्याच्याबरोबर जन्म घेतं आणि त्याच्या बरोबरच हे जग सोडून जातं.

माझी वैद्यकी आणि मी वेगळी असू शकते, माझ्यातील नर्तिका आणि मी वेगळी असू शकते परंतु माझ्यातील कविता आणि ‘माझं असणं’, हे एक असतं ! म्हणून कोणत्याही कवीस स्फुरणासाठी सूक्ष्मपासून स्थूल पर्यंत आणि भौतिका पासून दैविका पर्यंत साऱ्या सार्‍यातून प्रेरणा मिळते, स्फुरण होते आणि रचना जन्म घेते. मग त्याला एकांतच हवा, निसर्गच हवा, आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणारा एखादा विचारच हवा, अशी कशा कशाची गरज नसते.

एक छोटंसं घर आणि त्यात असणारा नागमोडी ‘जिना’, जो इतरांना केवळ वरच्या मजल्यावर किंवा छतावर घेऊन जातो, पण तेच सोपान कवीला कल्पनाविश्वात घेऊन जाण्यासाठी पुरेसं असतं आणि त्यातूनच अशी गालांवर मिश्किल हसू, अंगावर रोमांच आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या सलगी साठी अधीर करणारी कविता जन्म घेते.

‘कळले आता घराघरांतुन
नागमोडी चा जिना कशाला
एक लाडके नाव ठेऊनी
हळूच जवळी ओढायला

जिना असावा अरूंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडधड…:

प्रेमाची भावना काल, आज आणि उद्या सारखीच ! तितकीच उत्कट आणि तितकीच अधीर करणारी! मात्र त्यातील मर्यादा, शालीनता ही या रचनेमध्ये ठायीठायी दिसते.

जवळीक, हृदयाची धडधड, आवेगाने जवळ ओढण्यातील लोभसवाणा अधीरेपणा हे यापूर्वी काव्यात आले नव्हते असे नाही परंतु ह्या कवीला त्यासाठी डोंगरदऱ्यांची, भाषेच्या अलंकारांची आवश्यकता भासली नाही. प्रेमाची अभिव्यक्ती इतकी सहज सुंदर ! ह्यात सामावलेला आहे तो दोघांना हवा हवासा वाटणारा परंतु इतरांचा मान राखणारा एकांत. त्यात मार्दव आहे आणि त्याच बरोबर प्रेमातील संयम असह्य होणं देखील आहे.

‘मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा…’

या दोन ओळींमध्ये किती हळूवार भाव.
अव्यक्ताचं लेणं लेवून केलेला हा शृंगार यापुढील दोन ओळीत मात्र धिटाईने व्यक्त होतो.

‘वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी…’

शेवटच्या चार ओळी ह्या कवीच्या मिश्कील, रांगड्या स्वभावाच्या आत लपलेल्या स्थिरचित्त व्यक्तिमत्वाचे, आयुष्याचे अंतिम सत्य ठाऊक असणाऱ्या आणि नुसतेच ठाऊक असणाऱ्या असे नव्हे तर ते आनंदाने स्वीकारणार्‍या संत स्वरूपाचे दर्शन घडवतात. ते देखील मुद्दाम काही उपदेश करण्याच्या हेतूने नव्हे तर अगदी सहज.

‘मी तर म्हणतों-स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे.’

कवीवर्य वसंत बापट यांचा महाविद्यालयीन शैक्षणिक काळातच  स्वातंत्र्य संग्रामाशी संबंध जोडला गेला. १९४२ साली झालेली देशव्यापी ‘चलेजाव चळवळ’. धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना मांडणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यात कवीवर्य बापट सहभागी झाले. त्यांनी भूमिगत होऊनही काम केले. अनेक स्वातंत्र्यसमर गीतांची त्यांनी रचना केली. ह्या कवीत असलेल्या साहसी व्यक्तिमत्त्वाने त्याकाळी बॉम्ब स्क्वॉड मध्ये काम केले.

काय काळ असेल तो ? भावनिक, शारीरिक, सामाजिक, सगळ्या जाणीवा स्वतःहून जमीनदोस्त करायच्या आणि त्यातून केवळ एक इमला उभा करायचा तो म्हणजे जाज्वल्य देशाभिमानाचा आणि त्यावर फडकवायचा तो भारत मातेच्या स्वातंत्र्याचा ध्वज ! आमच्या आजच्या पिढीला या भावनेचा अर्थ कधीतरी खऱ्या अर्थाने कळेल का ? इतिहास वाचायचा, शिकायचा हे वेगळं आणि प्रत्यक्ष स्वातंत्र्यसंग्रामाचा जो अग्नी पेटला होता, त्यातील एक होऊन आपल्या आयुष्याचीच समिधा करायची याची कल्पनादेखील करता येणं अशक्य आहे.

हे सारे सुरू असतानाच दुसरीकडे कवीवर्य बापटांची देशप्रेमाचा मोहोर फुललेली कविताही जन्माला येतच होती.

‘शिंग फुंकले रणी, वाजतात चौघडे
सज्ज व्हा उठा उठा सैन्य चालले पुढे
सैन्य चालले पुढे…’

राष्ट्र सेवा दलात कार्यरत असतानाही त्यांनी अनेक गाणी रचली

‘सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे…’

कवीवर्य वसंत बापट यांची ‘पोवाडे‘ ही देखील एक खासियत होती. जनजागृतीची मोहीम चालू होतीच त्यात या पोवड्यांनी भर घातली. त्यांनी स्थापन केलेल्या  ‘महाराष्ट्र शाहीर पथक’ या द्वारे सादर होणार्‍या अनेक लोककला, लोकनृत्य, लोकनाट्य यांचे लेखनही त्यांनीच केले.

याशिवाय कविता, बालसाहित्य, प्रवासवर्णने, लोकसाहित्य, गद्य-पद्य लेखन, राजकीय टीकात्मक लिखाण, समीक्षण, वर्तमानपत्र, साप्ताहिके, नियतकालिके इतक्या विविध प्रकारचे त्यांचे लेखन आहे.

प्रवासाच्या कविता‘ नावाचा त्यांचा एक काव्यसंग्रह आहे. आजवर मी किती प्रकारची आणि किती विविध शैलीतील प्रवास वर्णने वाचलेली आहेत. विनोदी शैलीतील, रहस्यमय, नजरेसमोर हुबेहूब चित्रे उभी करणारी, परंतु या अशा प्रकारचे प्रवास वर्णन केवळ कवी वसंत बापटच करू शकतात.

‘खांद्यावर पडशी घेऊन
देवदत्ताने घराचे दार उघडून घेतले
तेव्हा मध्यरात्र झाली होती
देवदत्त निघाला स्वप्न तीर्थांच्या अनोख्या यात्रेला…’

आणि यानंतर ते म्हणतात…

‘अमेरिके मी आलो आहे, मी तुझा देवदत्त
तहानलेल्या डोळ्यांचा अनाहूत अतिथीविशेष ‘

ह्याच संग्रहातील ग्रँड कॅनियन बद्दलची त्यांची रचना, त्यातल्या काही ओळी अशा…

‘ग्रँड कॅनियन करायची रीत तशी सोपी असते
सह्याद्रिचे तीन चार घाट कानशीने तासा नुसते…

आता राहिली विरुद्ध बाजू त्याच्यासाठी एक करा
हिमालयाचा पायथा आणून चिऱ्यावरती ठेवा चिरा…

आता हवी कोलोराडो पाताळगंगा करवत काठी
नर्मदा अलकनंदा करा मिश्रण त्याच्यासाठी…’

यातील प्रत्येक रचना वाचताना लक्षात येते ती कवीच्या मनाची तोल साधण्यासाठी चाललेली अखंड धडपड. कारण नेत्र आहेत ते अभूतपूर्व, भव्य दिव्य पाहून दिपून गेले आहेत आणि हृदय आहे ते देशप्रेम, देशाभिमानाने उचंबळून आलेलं आहे मग या दोन्हीचा समतोल साधणारी अशी आगळी वेगळी कविता प्रसवते.

त्यांची, मला अतिशय आवडणारी कविता म्हणजे  ‘कुंपण‘.

मुळात सर्वधर्मसमभाव, समाजवाद अश्या मातीने घडलेलं आणि त्यात संवेदनशील असणारं कवी मन. त्यामुळे घरात संस्कृत सुभाषिते आणि संस्कृत वाड्मय गंगेतील तीर्थोदकाचे स्नान घडूनही, अनुष्ठुप छंदाचा प्रसाद मिळूनही, या सगळ्याच्या पार जाणारे, व्याकरण, अलंकार, धर्म-कूळ, जात-पात, गरीब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य याच्या मर्यादा तोडून, वर उल्लेख केल्याप्रमाणे, केवळ, कवीचे ‘ कवीपण ‘ दाखवणारी कविता म्हणजे  ‘कुंपण’.
ही कविता मी इथे संपूर्ण लिहिते आहे.

आई आपल्या घराला
किती मोठं कुंपण
तारांमागे काटेरी
का गं राहतो आपण ?

पलीकडे कालव्याजवळ
मोडक्या तुटक्या झोपड्या
मुलं किती हडकुळी
कळकट बायाबापड्या

लोक अगदी घाणेरडे
चिवडतात घाण
पत्रावळीतले उष्टे म्हणजे
त्यांचे जेवणखाण

काळा काळा मुलगा एक
त्याची अगदी कमाल
हातानेच नाक पुसतो
खिशात नाही रुमाल

आंबा खाऊन फेकली मी
कुंपणाबाहेर कोय
त्याने म्हटले घेऊ का?
मी म्हटले होय

तेव्हापासून पोटात माझ्या
कुठंतरी टोचतय गं
झोपतांनाही गादीमध्ये
कुंपण मला बोचतंय गं

‘चिंता करितो विश्वाची ‘ म्हणणाऱ्या रामदास स्वामींच्या वैश्विक शांती, समानता आणि उद्धारासाठी अस्वस्थ असणाऱ्या मनात आणि या कवितेतील, कवीमनाचेच प्रतिबिंब असणाऱ्या निष्पाप बालमनात काय फरक आहे ?
अश्याचप्रकारचे पडसाद त्यांच्या ‘गगन सदन तेजोमय’ किंवा ‘देह मंदीर, चित्त मंदीर ‘ या कवितांमध्ये ही पहायला मिळतात.

कवीवर्य वसंत बापट यांच्या कवितेचं दोन ओळीत वर्णन करू ?
केवळ त्यांचेच शब्द वापरले तरच ते होवू शकेल…

…मी अहेतुकाचा हेतू
मी अपार्थिवाचा सेतू…

ज्या कवितेने मला कवीवर्य वसंत बापट यांची ओळख करून दिली आणि आयुष्याच्या मौल्यवान आनंदाची व्याख्या सांगितली होती, त्या कवितेची शिकवण आणि ते आनंद हातातून कधी निसटले कळलंच नाही.

कवीवर्य बापट, आपण म्हणता ना ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम…’ त्याप्रमाणे आता आयुष्याने दिलेल्या छड्यांनी कोणते निखळ आनंद गमावले हे कळण्याची विद्या आली आहे.

अशा या थोर कवीचा, मृत्यू १७ सप्टेंबर २००२ रोजी झाला.
त्यांनी दिलेल्या निखळ आनंदांची एकदा उजळणी करते आणि त्यात जे रमत होतं त्या माझ्या निष्पाप बाल मनाने आपल्याला वंदन करते.

आजची माझी कविता आपले चरणी अर्पण…

लहानपणी मन कसं…

आज कट्टी उद्या बट्टी कसं सहज जमत होतं,
लहानपणी मन कसं कशातही रमत होतं.

तळ्यातली होडी, रेवडीतली गोडी
मैत्रिणीची जोडी, भावंडांची खोडी
वाडाभर पळून अंग किती दमत होतं,
लहानपणी मन कसं कशातही रमत होतं.

लाटलेली पोळी, गोष्टीतली टोळी
पौर्णिमेची होळी, नागोबाची गोळी
सांज दिव्यापुढे डोकं आपोआप नमत होतं,
लहानपणी मन कसं कशातही रमत होतं.

भातुकली घरात, रंगावली दारात
लग्नाची वरात, लाडवाची परात
विमानाचं आकाशात वेगात जाणं गमत होतं,
लहानपणी मन कसं कशातही रमत होतं.

वाळूतली तर मजेतली भर
गारांची सर, परकराची जर
आपले बाबा शक्तिमान असं नक्की मत होतं,
लहानपणी मन कसं कशातही रमत होतं.

साधं सोपं जग तसं, कुशीत आईच्या गमत होतं,
आता खोट्या भासाच्या खुशीत मन दमत होतं,
मोठेपणीच खरी मजा लहानपणी मत होतं,
आता मोठेपण माझं लहानपणा नमत होतं,

भाबडं वैभव लहानपण साठवणीत जमत होतं,
आता मन भारावून त्या आठवणीत रमत होतं.

डॉ गौरी जोशी – कंसारा

– लेखन : डॉ. गौरी जोशी- कंसारा, न्यू जर्सी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800.

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. वसंत बापट यांच्या वरील लेख अप्रतिम. समर्पक गौरी जोशी मनस्वी आभार. भुजबळ सर. धन्यवाद

  2. खूप सविस्तर, समर्पक, अभ्यासपूर्ण आणि सखोल परीक्षण, विवेचन आणि रसग्रहण केलेले आहे गौरी ताईंनी. इतकी सुंदर उदाहरणे व सुंदर शब्दसौंदर्य वापरून ताईंनी आदरणीय बापट सरांचे समग्र व्यक्तिमत्त्व उभे केले. खऱ्या अर्थाने आज ताईंमुळे खरे बापट सरांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू मला कळले. तेव्हा थोर आहेतच पण आज खरी ओळख झाली.खूप खूप धन्यवाद, ताईसाहेब आणि आदरणीय भुजबळ सर, इतका सुंदर लेख प्रकाशित केल्याबद्दल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी