बालकवी
१३ ऑगस्ट १८९० जन्मलेल्या आणि ५ मे १९१८ रोजी मृत्यू पावलेल्या ‘निसर्गकवी‘ या गौरवाचे मानकरी असणाऱ्या कवीवर्य त्र्यंबक बापुजी ठोंबरे उर्फ बालकवी यांनी आपल्या केवळ २८ वर्षाच्या आयुष्यात १६० हून अधिक कविता लिहिल्या. ह्यातील अनेक अप्रकाशित आहेत. अश्या महान, प्रतिभावंत कवीने इतके अल्पायुषी असावे ही एक शोकांतिका आहे. परंतू त्यांचे काव्य शाश्वत आहे, अजरामर आहे. बालकवींच्या कविते सारखी कविता पुन्हा होणे नाही. त्यांना ही आदरांजली 🙏🏻
‘औदुंबर’, ‘श्रावणमास’, ‘फुलराणी’, ‘आनंदी आनंद गडे’, ‘पारवा’, ‘तू तर चाफेकळी’, ‘निर्झरास’, ‘अरुण’, ‘शून्य मनाचा घुमट’ ह्या त्यांच्या अतिशय गाजलेल्या आणि रसिक मनावर राज्य करणाऱ्या कविता आहेत.
याशिवाय ‘तारकांचे गाणे’, ‘ते डोंगर सुंदर दूर दूर चे बाई’, ‘मेघांचा कापूस’ , ‘उदासीनता’, ‘बाल- विहग’, ‘निराशा’, ‘गाणाऱ्या पक्ष्यास ‘, ‘ खेड्यातील रात्र ‘, ‘ हरिण आणि गायन ‘, ‘ पाळणा ‘, ‘ पाऊस ‘ अश्या अनेक रचना आहेत. याशिवाय त्यांनी अनेक बालकविताही लिहिल्या आहेत.
‘बालपण’ म्हणजे नक्की काय ?
ह्या प्रश्नाची फार वेगवेगळी उत्तरे मिळणार नाहीत.
बालपण म्हणजे चिंतामुक्त वय, बालपण म्हणजे निष्पाप; निष्कपटी वृत्ती, बालपण म्हणजे भाबडेपणा, बालपण म्हणजे कोवळे मन, बालपण म्हणजे कच्ची; ओली माती, बालपण म्हणजे संस्कारक्षम वय. ह्या अश्याच आणि अगदी योग्यच असणाऱ्या उत्तरांच्या आजूबाजूस फिरणारी उत्तरे मिळतील. बालपण म्हणजे काय याचा विचार मी जेव्हा करते तेव्हा उत्तराची सुरुवात विरुद्ध दिशेने करते.
‘मोठेपण’ म्हणजे काय ?
वयाने मोठे होणे, प्रपंच, जबाबदाऱ्या सांभाळायला शिकणे, व्यवहारज्ञान वापरून या दुनियेत अगदी चपखल बसणे, तर्कबुद्धी, शास्त्रज्ञान, व्यासंग, पांडित्य वापरून अर्थार्जन करणे आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोजक्या शब्दात, मोजक्या भावनेत, चाकोरीबद्ध आणि शिस्तपूर्ण पद्धतीने व्यक्त होणे, ह्या सगळया मोठं झाल्याच्या खुणा आहेत. म्हणून मग…
वृत्तीतील संयमितता, चाकोरीत बसणारी शिस्तबद्धता आणि धूर्तपणातून येणारे व्यवहारज्ञान या सार्याचा अभाव म्हणजे बालपण !
मग याचा वयाशी संबंध असेलच असे नाही. असे ‘आत’ बालपण जपलेल्या फार कमी व्यक्ती आपल्याला भेटतात.
मराठी कविता विश्वात असे एक कवी आहेत की ज्यांच्या कविता वाचल्यानंतर त्यांच्यातील बालमन; भावनांचा संयमितपणा न मानणारे मन याची आणि अर्थातच त्यांना मिळालेल्या ‘बालकवी’ या उपाधीची परिपूर्ण ओळख पटते.
त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी पहिली कविता वयाच्या १३/१४ व्या वर्षी लिहिली असा उल्लेख आहे. जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कवी संमेलनात १९०७ साली म्हणजे त्यांच्या वयाच्या अवघ्या १६/१७ व्या वर्षी त्यांच्या काव्याने प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ‘बालकवी‘ ही उपाधी दिली. कदाचित त्यांच्या कोवळ्या वयातील काव्यवाचनाचा पराक्रम पाहून दिलेली ही उपाधी होती, परंतु माझ्या मते कीर्तिकर बुवांना दिव्यदृष्टी असणार आणि बालवृत्तीतील भावनेचा बांध अनावर होण्याचे साधर्म्य या कवीच्या काव्यात झळकणार याचे अंतर्ज्ञान होऊन ‘बालकवी’ ही उपाधी त्यांनी दिली असणार !

‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे…’ म्हणणाऱ्या ह्या कवी मनाची साक्ष बालवयातच पटायला लागली. घरातील सदस्यांकडून शिकायला मिळालेल्या संस्कृत रचानांचाही प्रभाव त्यांच्या कवितांवर दिसतो. जीवनातील काही काळ त्यांनी रेव्हरंड टिळक आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांच्या सहवासात काढला. मुळात कविता प्रसवण्याची क्षमता असणारे मन आणि त्यात असे दिग्गजांचे संस्कार. मग बालकवींच्या कवितेचे ‘फुलपाखरू’ गोड हसत, या वेलींवरून त्या वेलींवर मुक्त उडू लागले.
‘सूर्य किरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे तिकडे चोहीकडे…’
निसर्गसौंदर्याने नटलेली बालकवींची कविता ! त्यात चैतन्य आहे, उत्साह आहे, निसर्गाशी तादात्म्य पावलेले मन आहे आणि चित्रमयता आहे. सृष्टीतील प्रत्येक घटक जणू सजीव असल्याची, प्रत्येक घटकास भावभावना असल्याची जाणीव अश्या सौंदर्य सामर्थ्याने व्यक्त होते की, ही चित्रमयता, चलचित्र होऊन जाते.
‘श्रावण मासी हर्ष मानसी…’ या कवितेतील…
‘वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे…’
बालकवींनी जरी ‘नभोमंडपी कुणी भासे’ अशी कर्त्या बद्दल अनिश्चितात्मक अभिव्यक्ती केली असली तरीही आपल्या सर्वांना, ‘नभोमंडपी इंद्रधनूच्या गोफाचे मंगल तोरण’ कुणी बांधले आहे त्याचे उत्तर ठाऊक आहे. सृष्टीस स्वतःच्याच हातांनी असे लोभस सजवतांना तिच्या रूपाने भुलून गेल्याने कदाचित बालकवींना ह्या स्वतःच्याच कर्तेपणाचा विसर पडला असावा इतकंच.
‘ते डोंगर सुंदर दूरदूरचे बाई
पाहीन गडे त्या हिरव्या हिरव्या राई…
उडतील भरारा राघू बोलत बोल
आकाश मंडळी त्यांची माळ खुलेल
कुरणांतहि किलबिल करती बहिणी सात
मी बघेन भांडण कसले चाले त्यात…’
‘ मधु यामिनी ‘ , ‘ मेघांचा कापूस ‘, ‘ संध्या तारक ‘, ‘ निर्झरास ‘, ‘ आनंदी पक्षी ‘, ‘ पक्ष्यांचे गाणे ‘ अश्या किती किती कविता ज्या निसर्गाचे बोलकेपण सिद्ध करतात. निसर्गाच्या कणाकणात व्यापलेल्या ह्या समृध्दीने बेभान होवून त्याचे केलेले हे रसरशीत वर्णन.
बालकवींच्या कवितांमध्ये ज्या प्रतीक प्रतिमा दिसतात, त्या मूळ सौंदर्याला अधिक फुलवतात. त्यात बाधा आणीत नाहीत. ह्या प्रतीक प्रतिमा, कवितांवर गर्भितार्थ, व्यासंग, विद्वत्ता असे कोणतेही साज माळण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्याऐवजी, निसर्गाच्या रंग रूपावर, सौंदर्यावर केवळ भाळून जावून त्याच्या प्रेमात पडण्याचा हा सोहोळा असतो.
रचनाकाराने ही सृष्टी निर्मिली. त्यात अणू रेणूं पासून अंतराळापर्यंत जे जे आहे, त्याचे निरीक्षण हे कवीवर्य करतात आणि ते देखील सौंदर्यदृष्टीचे सूक्ष्मदर्शक वापरून ! मग दिव्य प्रतिभेने अतिशय तरल आणि नादमय शब्दांचा एक आविष्कार होतो आणि बालकवींची कविता जन्म घेते. सृष्टीतील भव्य दिव्याचा अभ्यास करण्यापेक्षा त्याच्याशी एकरूप होणं हेच त्यांच्या कवितेत अधिक दिसते.
‘फुलराणी‘…काय लिहू त्याबद्दल…
एक कलिका आणि तिला प्रणयाची हळूवार होणारी ओळख…आणि आस कोणाची तर बाहू पसरून उभ्या असणाऱ्या त्या गोजिरवाण्या रविकराची !
‘ गाउ लागले मंगलपाठ – सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा – कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, – वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर – नवरी ही फुलराणी सुंदर ! ‘
एक अजरामर मंगलगान असणारी ही कविता, जिथे सृष्टीतील घटक एकमेकांच्या प्रेमात; रंगात रंगलेले, कवीचे मन; त्यांची प्रतिभा त्या दृष्याच्या प्रेमात पडलेले आणि त्याचे शाब्दिक प्रकटीकरण म्हणजे, हा सोहोळा स्वतःच्या नेत्रांनी पहाण्यास अक्षम असणाऱ्या आपणा सारख्यांसाठी केलेले वर्णन.
महाभारतात, अंध धृतराष्ट्र युद्धभूमीवर जाऊ शकत नव्हता, संहार असो की विजय, पाहू शकत नव्हता, त्याला दिव्य दृष्टी प्राप्त संजय सारा वृत्तांत कथत असे, ज्यामुळे धृतराष्ट्राला युद्धाचे आंतरिक दर्शन घडत असे. यातील युद्ध, विनाश, संहार हे संदर्भ जरा वगळून टाकु यात. युद्धाच्या जागी मांडू सारी सृष्टी, विनाशाच्या जागी चैतन्य आणि संहाराच्या जागी विश्व कर्त्याने निर्मिलेले आणि प्रत्येक दिनी अधिकाधिक सुंदर होत जाणारे या धरेचे मांगल्य. परंतु आपण सारे आहोत अंध धृतराष्ट्र. हे पाहायला लागणाऱ्या दिव्यदृष्टीचे मानकरी केवळ बालकवी. त्यांनी वर्णावे, आपण ऐकावे आणि त्या सोहळ्यात जणू सामील झालो याची अनुभूती घ्यावी.
‘ घड्याळातला चिमणा काटा ‘, ‘ चिऊ चिऊ चिऊ ग चिमणीबाई ‘, ‘बोल बाई बोल ग’ , ‘ चांदोबा मजला देई ‘, ‘ घोडा घोडा ‘ अशा अनेक बाल कविताही त्यांनी लिहिल्या आहेत. तसेच गद्य लेखनही केले आहे.
‘ माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे…’
किंवा
‘दोष असती जगतात किती याचे
नसे मजला सामर्थ्य गणायाचे,
दोष माझा परि हाच मला वाटे
दोष बघता सत्प्रेम कसे आटे ?’
अश्या काही कवितांमधून तत्व चिंतन पर अभिव्यक्ती देखील दिसून येते.
‘प्रीत हवी तर’ ह्या कवितेत हेच बालकवी प्रेमाला तलवारीची धार, नागिणीची लसलसती प्रीत म्हणतात.
‘प्रीति हवी तर जीव आधि कर अपुला कुरबान,
प्रीति हवी तर तळहातावर घे कापुनि मान !…
स्त्रैणपणाच्या चार भावना नच पचती ज्याला
हीन जिवाने घेउ नये त्या जहरी प्याल्याला !’
प्रेमाची ही भावनाही टोकाची. जळून जावून केलेले प्रेम. काळजाला हात घालणारे प्रेम. उध्वस्त होऊन केलेले प्रेम.
मी वर उल्लेख केल्याप्रमाणे बाल भावनांना गणित समजत नाही. भावना कोणतीही असो ती उत्कटतेने व्यक्त होते. हास्य जसं निखळ असतं तसाच आकांतही धाय मोकलून केलेला असतो. निसर्गाने ज्याच्यावर मोहिनी घातली होती त्याच मनाची दुसरी बाजू मात्र शापित असल्याप्रमाणे उदास होती. त्यांच्या अनेक कवितांमधून ते औदासीन्य स्पष्ट दिसून येते.
अनुभवलेल्या दुःख आणि वेदनेतून होणारे आविष्कार प्रत्येकच कवीच्या कवितांमध्ये असतात, भावनांचे चढ उतार असतात, मानवी मनाच्या सगळ्या अवस्था असतात परंतू त्याची प्रत्येक अभिव्यक्ती इतक्या टोकाची हे बालकवींच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. म्हणून मी पुन्हा एकदा म्हणते…ह्या भावविश्वात संयम राखून केलेलं असं काहीच नाही.
मोद आणि खेद दोन्ही पराकोटीचं !
‘कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।…’
माझी अत्यंत लाडकी कविता…
‘हृदयाची गुंतागुंत’
त्यातील काही कडवी मी इथे लिहिते आहे. कवीच्या मनातील वैफल्य, निराशा, संभ्रमितावस्था याचे काळीज पिळवटून टाकणारे हे वर्णन…
‘ हृदयाची गुंतागुंत कशी उकलावी
ही तीव्र वेदना मनमनाची ठावी…
अंधार दाटला अपार भरला पूर
परी पार तयाच्या कोण मला नेणार ?’
अश्या कोणत्या वादळाशी कवीवर्य झुंजत असतील की ‘फुलराणी’ चे जनक असलेले बालकवी पुढल्या ओळींत म्हणतात…
‘मज रूचे न व्यापकता गगनाची
ती अनंततेची किरणे ग्रहगोलांची…’
सौंदर्यवादी दृष्टी असलेले बालकवी पुढील ओळीत आतल्या आत धाय मोकलून अश्रू ढाळत असल्याप्रमाणे भासतात.
‘हे ज्ञान मला अज्ञानापरि भासे,
मी सोडवितां तें उलटे बांधी फासे…
वैराग्य बरे की सुखद बरा अनुराग,
परि हाय प्रीतीचें उगाच माझे सोंग…
हा हाक मारतो उठवा मजला कोणी,
या भर निद्रेच्या दुस्तर गहनांतूनी.
दिन पक्ष मास ऋतु वर्ष भराभर गेले
हे रक्त जसेच्या तसेंच सांकळलेले- ‘
अश्याच प्रकारचे औदासीन्य, विटले पण त्यांच्या ‘दुबळे तरू’, ‘निराशा’, ‘पारवा’, ‘शून्य मनाचा घुमट’, ‘काळोख’, ‘अनंत’ अश्या कितीतरी कवितांमधून दिसून येते.
‘बोलवितात । विक्राळ यमाचे दूत,
गिरिशिखरावर आ पसरोनी,
काळ्या अंधारांत दडोनि,
किंवा पडक्या बुरुजावरूनी,
शब्द येतात । ‘चल नको बसूं जगतांत’
जणू ‘ यमाचे दूत ‘ बोलवितात म्हणून त्यांचा आदेश मानून, गूढ तो ‘ औदुंबर ‘, त्याचे ऐहिकाच्या ऐल तटावरील सौंदर्य पारलौकिकाच्या पैल तटावरून कसे दिसते हे न्याहाळण्यासाठी वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी, कित्येक कविता अपूर्ण सोडून बालकवींनी या जगाचा निरोप घेतला.
कवीवर्य बालकवी, आपल्या प्रतिभेच्या कणा इतकीही माझी पात्रता नाही परंतू बालपणात आपल्या ‘अरुण ‘ आणि ‘ फुलराणी ‘ ने केलेले संस्कार आजही उगवत्या सूर्याच्या अधिकाधिक प्रेमात पाडतात आणि त्यातून, वसुंधरा आणि रविकराचे मिलन घडवणारी ही अशी ‘ पहाट ‘ जन्माला येते. ही ‘ पहाट ‘ आपल्या चरणी अर्पण. ह्यावर आपल्या इतका कुणाचाही हक्क नाही…माझाही नाही. आपण त्याचा स्वीकार करावा ही प्रणाम पूर्वक विनंती 🙏🏻
पहाट
नीलांबर पाझरे ओंजळी सोन पिवळी शुभ्र पहाट,
जणू अर्घ्याचा पारदर्शी केशर मिश्रित क्षितिजा थाट !
पहाट नाम आपण द्यावे; ही तर रविह्रदयीची लाट,
गोजिरवाण्या वसुधे आळवी प्रियकर आदित्याचा घाट !
दिव्य तेज किरणांचा भासे सुरू होतो पृथ्वी प्रवास,
निद्रित सखीला उठवायाला सोनफुले उधळीत खास !
काळया डोंगर रांगा शिखरे सजवी सौभाग्याची लेणी,
जणू पृथ्वीच्या गळ्यात रुळले टपोर मंगळसूत्र मणी !
मंद मंद जे भासती वारे; फुंकर त्याची तिज नयनांवर,
अलगद थरथर पाने वेली पापणी थरथर खळी गालांवर !
दाट मुलायम दुलई धुक्याची लिप्त मेदिनी गात्रावरती,
खेचून घेई जरा असुये दावी हक्क तिज स्पर्शावरती !
तरीही भू नच उघडी नेत्रा, मग भानू जल तुषार शिंपी,
बिंदू दवांचे तिच्या कुंतले अन् काही त्या काये लिंपी !
हलके उघडूनी नयन दलाते धरी अबोला लटक्या रागे,
पक्ष्यांकरवी कांगावा लाडे,”गेले एकटे मज ठेवून मागे !
प्रणय प्रहर तर व्यतीत झाला; नको निरर्थक आता दंगे,
मजसम का कुणी कलिका दुसरी धुंडीली आकाशगंगे ?”
बाहू पसरून मिश्किल हासून ओढी तिज तो आवेषाने,
वदला,”अधिकच लोभस दिसशी वर्ण सुवर्ण होता द्वेषाने!
अविरत फिरशी माझ्याभवती नसे तुजला तुझीच भ्रांती,
जाणूनी सखये निजवून जातो; जरा मिळुदे तुज विश्रांती!
नीच काळोखासूर पाही चतुर्थ प्रहरी तुला गिळाया,
तिमिराशी रण लढतो आहे; केवळ तुजला कवळाया!
तरी चित्त न लागे, वाटे; अपहरील कपटी अंधारी,
म्हणूनी चंद्रा नेमुनी जातो प्रिये रक्षाया पहारकरी !
अपुली प्रिती,भक्ती जिंकी निस्तेजाच्या संग्रामाला,
मिठीत ये तू सर्वस्वाने; तोडी दुःसह या विरहाला !
आलिंगन अवनी अर्काचे अवघ्या विश्वा उजळीत नेई,
प्रकाशपर्व सोहोळा नेमे ओंजळी एक अंश देई !
निराकार भेट स्थिती तेजाची नित्य नवी पहाट फुलवी,
त्यांचेसम प्रेमी युगलांना साकार रूपे परतत्वे भुलवी !

– लेखन : डॉ. गौरी जोशी-कंसारा न्यू जर्सी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800
लेखिका अमेरिकेत, वाचक इंग्लंडमध्ये ,संपादक भारतात ! काय त्रिवेणी संगम आहे! हे विश्वची आपले घर ☺️ असंच जग एकत्र येत राहो,हीच मनःपूर्वक शुभेच्छा💐
अगदी बरोबर 😊
देवेंद्र जी आपले ही मनःपूर्वक आभार 🙏🏻
आपले मनापासून आभार 🙏🏻
आपल्या सारख्या रसिक वाचकांमुळे लेखनाचा हुरूप वाढतो. पुनश्च आभार 🙏🏻
नेहमीप्रमाणे फार सुंदर रसग्रहण केलं आहे. मी प्रत्येक रसग्रहण आवर्जुन वाचते. प्रतिसाद मात्र दरवेळी दिला जात नाही. सगळ्या कवींचा, त्यांच्या काव्याचा सखोल अभ्यास डाॅ. गौरी करतात. त्या स्वत: उत्तम कवी आहेत हे त्यांच्या शेवटच्या कवितेतून लक्षांत येतेच. असाच आनंद दरवेळी मिळो.