महान कवयित्री बहिणाबाई
‘निसर्ग कन्या’ अशी गौरवाची उपाधी लाभलेल्या बहिणाबाई चौधरी. अधिकांश खानदेशी, अहिराणी भाषेत आणि मराठी भाषेत काव्य रचना करणाऱ्या बहिणाबाई चौधरी…. ..
रूढार्थाने अशिक्षित असणाऱ्या बहिणाबाईंचा जन्म २४ ऑगस्ट, १८८० रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना औपचारिक शिक्षणाचा गंध नसला तरी त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या, निसर्ग रंगविणाऱ्या कविता अनेक विद्वान, व्यासंगी कवी आणि साहित्यकारांनी देखील वंदनीय मानलेल्या आहेत.
घरातील आणि शेतातील कामे करीत असताना त्यांना काव्य सुचत असे. स्त्री मनाच्या भावना, माहेरची ओढ, शेत, शेतकरी जीवन असे मध्यवर्ती विषय आणि त्या भोवती फिरणारी त्यांची कविता. निसर्ग, घर, विहीर, पिके, शेती अशा आसपास असणाऱ्या घटकांद्वारे त्यांनी आयुष्याचे यथार्थ वर्णन केले आहे. अनेक ओव्या, अभंग याची रचना त्यांनी केली.
बहिणाबाई लिहू शकत नव्हत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या कवितांची हस्तलिखते स्वरूपात नोंद करून ठेवली. त्यांच्या काव्यात आत्मोन्नतीचे सोनेरी किरण आहेत. उच्चशिक्षितांना देखील कष्टाने साध्य होणारी कविता बहिणाबाईंच्या आत झऱ्याप्रमाणे खळखळत होती. २४ ऑगस्ट रोजी त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने ही त्यांना आदरांजली 🙏🏻
मी जेंव्हा जेंव्हा महान कवी आणि कवयित्री यांच्या कवितांचे वाचन करत असे, त्यांच्या शैलीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असे, तेंव्हा तेंव्हा त्यात माझा पहिला प्रयत्न असायचा तो, ‘कविता म्हणजे नक्की काय ?’ हे शोधण्याचा. अनेक साहित्यकार मान्यवरांनी ‘कविता‘ हा सर्वात अवघड साहित्यप्रकार असल्याचे नमूद केले आहे. मग अशा दुष्कर, दुर्ज्ञेय प्रकाराचे स्फुरण कसे होत असेल ? त्यासाठी काय भांडवल लागते ? कशाचा अभ्यास करावा लागतो ? नक्की काय वाचलं की आपल्यालाही कविता स्फुरतील ? अशा अनेक शंका, प्रश्न माझ्या मनात कायम उमटत असत. त्यावेळी
बहिणाबाईंच्या कविता वाचून मी अचंबित होत असे. त्यांच्या निसर्गदत्त प्रतिभेने मी नेहमीच स्तंभित होत आली आहे.
गोड खानदेशी – अहिराणी भाषेत अधिकाधिक असणारी, काळी माती, शेत, शेतकरी, प्राणी, पक्षी, ह्याच्या भोवती फिरणारी, साधी-सोपी परंतु महान पांडित्याचे दर्शन घडवणारी बहिणाबाईंची कविता. अंतरंग उजळून टाकणारी कविता !
रोजच्या जीवनाद्वारे आणि त्यात आसपास असणाऱ्या वस्तूंच्या प्रतिमास्वरूप वापराद्वारे महान संदेश देणारे हे काव्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या कर्तेपणाच्या जाणीवेचा जराही लवलेश नसणारे हे काव्य आहे. सहज एखादं गाणं गुणगुणावं तसं स्फुरलेलं परंतु अध्यात्माच्या तत्वज्ञानाशी जोडणारं हे काव्य !
‘मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावर…
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मंतर…’
आधुनिक युगात ‘मेंटल/सायकॉलॉजिकल स्टेटस् अँड प्रॉब्लेमस्’ या विषयावर चर्चा करणाऱ्या कितीतरी शैक्षणिक संस्था आणि पुस्तके उपलब्ध आहेत. याच्याही पुढे जाऊन याचा संबंध ‘स्पिरीच्युअल ग्रोथ’ शीही जोडला जातो.
पातंजल योगसुत्रातही ‘योगश्चित्तवृत्तीनिरोधः’ अशी योग शास्त्राची व्याख्या केलेली जाते. अष्टांग योगातही, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे टप्पे सांगितले जातात. हे सारे ज्ञान, मग ते प्राचीन असो अथवा अर्वाचीन, सांगणारे लोक महर्षी होते, आहेत परंतु हेच सारे ज्ञान ह्या आमच्या ऋषीतुल्य माऊलीने केवळ ‘मन वढाय वढाय‘ ह्या एका कवितेत सांगितले आहे.
‘ मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात…’
मनाची चंचलावस्था सांगणाऱ्या इतक्या साध्या,सोप्या आणि इतक्या सुंदर ओळी आणिक इतर वाचनात आल्याचं मला आठवतच नाही. यापुढे जावून त्या विधात्याला प्रश्न करतात…
‘ देवा आसं कसं मन
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तुले
असं सपनं पडलं ! ‘
मनाला, ‘ ईश्वरास जागेपणी पडलेल्या स्वप्नाची ‘ दिलेली नितांत सुंदर उपमा किती आतून उमटली असेल ! त्यासाठी भाषेचा अभ्यास, व्याकरण, समास, वृत्त, अलंकार असल्या कोणत्याही कुबड्यांची त्यांना गरज नव्हती. ह्या स्फुरणास क्षितिजापार नेऊन, शिवाहून सत्य आणि स्वर्गाहून सुंदर अश्या काव्य निर्मितीस त्यांच्या प्रतिभेचा अश्वच समर्थ होता.
बहिणाबाईंच्या कवितेची प्रत्येक ओळ ज्ञानाचे भांडार आहे. आपल्यासारख्या, उसन्या ज्ञानावर उभ्या असणाऱ्यांनी बहिणाबाईंना ‘निरक्षर’ म्हणावे ? आपली तेवढी पात्रता तरी आहे का ? ‘अक्षराची‘ आपली व्याख्या वर्णमालेत सामावलेली, कारण आपलं मन म्हणजे ‘जसा खाकसचा दाना’, परंतु ‘अ-क्षर’ म्हणजे विश्वाच्या अंतापर्यंत जे टिकून राहील ते, ह्या, अक्षराच्या मूलभूत व्याख्येचे काव्य रूपात प्रकटीकरण करणाऱ्या, ‘त्यांत आभाय मायेना ‘ अश्या विशाल प्रतिभावंत मनाच्या बहिणाबाई !
‘कशाला काय म्हणूं नही ?’ हे सांगताना बहिणाबाई म्हणतात…
‘ निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हनूं नहीं
आंखडला दानासाठी
त्याले हात म्हनूं नहीं…
येहरींतून ये रीती
तिले मोट म्हनूं नहीं
केली सोताची भरती
त्याले पोट म्हनूं नहीं…’
सारे दर्शनकार एकत्र आल्यानंतर होणाऱ्या ज्ञान प्राप्तीच्या तोडीची असणारी परंतु कानाला, मनाला मात्र कुणीतरी प्रेमाने कुशीत घेऊन गाणं म्हटल्याप्रमाणे वाटणारी बहिणाबाईंची कविता !
‘ अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर…
अरे संसार संसार
म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल
मधी गोडंब्याचा ठेवा…
देखा संसार संसार
दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार
सुखा दुःखाचा बेपार ‘
भाकरी करताना हाताला लागलेल्या चटक्यातून सुचलेलं हे काव्य आहे? त्या एका चटक्यातून जीवनातील होरपळवून टाकणाऱ्या चटक्यांचे वर्णन आणि त्यातूनही अतिशय अनमोल असणारा आशावाद जोपासणारे, संसारास ‘ जादूगार ‘ म्हणणारे काव्य प्रसवणे, ही किमया केवळ बहिणाबाईच करू शकतात.
‘ मानसा मानसा
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर…
मानसा मानसा,
कधी व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस ! ‘
मनुष्य वृत्ती आणि त्यात आढळणारे दोष ह्याचं असं वर्णन, जे आत्मपरिक्षणास उद्द्युक्त करतं.
‘ अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाले टांगला…
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले दिले रे देवानं
दोन हात, दहा बोटं ‘
‘ एक पक्षीण जर आपल्या पिलांसाठी ही कारागिरी करू शकते तर अंग प्रत्यंगांनी परिपूर्ण असणाऱ्या माणसास कर्माचे वाटेवर चालताना कोणत्याच अडथळ्याने निराश व्हायला नको ‘ हे सांगणारी ही कविता.
बहिणाबाई स्वतः शेतात काम करीत असत. त्यामुळे शेतकरी, त्यांचे जीवन, त्यांच्या कथा आणि व्यथा यावर भाष्य करणाऱ्या त्यांच्या रचना तर इतक्या सुंदर आहेत…
‘ काया काया शेतामंधी
घाम जिरव जिरव
तव्हा उगलं उगलं
कायामधुन हिरवं !
किंवा
‘ असा राजा शेतकरी चाल्लारे अलवाणी
देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकीसनी ‘
उभारी, उमेद यासाठी आणखी कोणत्या ओळी हव्यात?
‘पायाखाले काटे गेले वाकीसनी’ म्हणताना, यामध्ये आपण जीवन संग्रामाला सामोरे जाण्याचा, दुर्दम्य प्रयत्नातून होणाऱ्या ध्येयप्राप्तीचा महामंत्र देतो आहोत याची तिळमात्र जाणीवही या काव्याला नाही. म्हणूनच मला वाटतं ‘ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ‘ असतात. त्या ‘ संतपण ‘ जन्मतः घेऊन येतात. अगदी त्याप्रमाणे ‘ जगाच्या कल्याणा बहिणाईंची कविता ‘, ही कविता त्या घेऊन आल्या होत्या. वैयक्तिक अनुभूती मधून जन्मलेली, कृत्रिम सजावटीचा आधार न घेणारी, आकलनशक्तीस सहज उलगडणारी परंतु उलगडत जाताना कृष्णाने आपले विराट रूप दर्शन द्यावे आणि गीतोपदेशाद्वारे जीवात्म्यास परमात्म्याची भेट घडवणारे सिद्धांत सांगावे, अगदी त्याप्रमाणे असणारी बहिणाबाईंची कविता !
‘नको लागूं जीवा, सदा मतलबापाठीं
हिरीताचं देनं घेनं नही पोटासाठीं…’
‘ आला सास गेला सास जिवा तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं एका श्वासाचं अंतर… ‘
‘ देव कुठे, देव कुठे आभायाच्या आरपार,
देव कुठे, देव कुठे तुज्या बुबयामधी रं…!!
स्वार्थशून्यता, आसक्तीविरहित जीवन आणि चराचरात व्यापून राहिलेल्या परमेश्वराचे अस्तित्व बाहेर शोधण्यापेक्षा अंतरी शोधण्याचा दिलेला संदेश. एक गोष्ट मला वारंवार भारावून टाकते, ती म्हणजे, हे सगळं वर्णन, जे आपण शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो, प्रत्यक्ष कवयित्रीने मात्र त्याच रचना अगदी सहजासहजी प्रसवल्या आहेत. ती रचना जेंव्हा प्रजात होत असेल तेंव्हा कवयित्रीने रचनेस दिली असेल केवळ त्यांची
‘ माया ‘ ! हीच माया आपल्याला नकळत संसार मायेपासून विभक्त व्हायला शिकवते.
बहिणाबाईंनी ओवी, अभंग अशाही अनेक रचना केल्या. त्या मौखिक स्वरूपात होत्या. प्रत्येक रचनेची लेखी स्वरूपात नोंद केली गेलीच असं नाही. त्यामुळे कित्येक रचना काळाच्या ओघात लोप पावल्या. हे वाक्य लिहिताना मला आत जी हळहळ वाटते आहे त्याचे वर्णन मी करूच शकत नाही.
‘ लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली
देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला…
राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब काय सान्गे पंचागन
नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ ‘
अल्प वयात आलेल्या वैधव्यातून उमटलेल्या कारुण्याची अशी छटाही त्यांच्या काव्यात आढळते परंतु त्यातही गलितगात्र होण्याची वृत्ती नाही. मनगटात बळ भरणारे, लढण्याची उर्मी देणारे, दैववादी वृत्ती पेक्षा कर्मवादी वृत्तीचा स्वीकार करण्याचा संदेश देणारे हे काव्य आहे.
बहिणाबाईंनी काही विनोदी काव्य रचना देखील केलेल्या आहेत. त्यात सहज सुंदर शैलीतील विनोद आहे. त्यात त्यांनी काही व्यक्तिचित्रणे केलेली आहेत. ‘ मुनीर नावाचा शिपाई ’, ‘ छोटू भय्याचे पोट ‘ त्याचे वर्णन करणारी कविता, ‘ काळया पोरीला ’ उद्देशून केलेली कविता अशी त्याची काही उदाहरणे आहेत.
‘ धरीत्रीच्या कुशीमधीं
बीय बियानं निजलि
वऱ्हे पसरली माती
जशी शाल पांघरली
ऊन वार् याशीं खेयतां
एका एका कोंबातून
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन…’
अश्या, कल्पनेच्या फुलांनी डवरलेल्याही काही कविता आहेत परंतू त्यातही केवळ सौंदर्य निर्मिती हा उद्देश नसून, विश्र्वकर्त्याची भक्ति आणि त्याचे दर्शन ठायी ठायी घडवणारी वृत्ती आहे. ‘ आला पह्यला पाऊस ‘, ‘ उपननी उपननी ‘, ‘ पेरणी पेरणी ‘ , ह्या आणि यासारख्या इतर अनेक रचनाही अशाच; वरकरणी पाहता केवळ शेतात काम करणार्या हातांनी अनुभवलेली माती, श्रमातून फुलणारा स्वेद, काळया मातीचा पावलांना होणारा आणि आभाळाचा आणि पावसाचा मनाला होणारा स्पर्श दाखवल्या प्रमाणे भासणाऱ्या परंतु शेवटच्या एका कडव्यात; चार ओळीत दैदिप्यमान वेदांताचे दर्शन घडवणाऱ्या रचना.
ह्या साऱ्या कविता आणि ओव्या, घरात किंवा शेतात काम करीत असताना बहिणाबाई गात असत. त्यांचे पुत्र ज्येष्ठ कवीवर्य सोपानदेव चौधरी हे ह्या रचना लिहून ठेवत असत.

१९५० च्या सुमारास असं हस्तलिखित घेवून ते एका महामेरू कडे गेले. ज्याने त्यांना ‘ ह्या कविता म्हणजे शंभर नंबरी सोनं आहे आणि ते महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे ‘ असे सांगितले. त्यानंतर ह्या कविता प्रकाशित केल्या गेल्या. त्या प्रकाशनातही ह्या महामेरूचाच पुढाकार होता. त्या साहित्यातील महामेरूचे नाव ‘ आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ‘.

त्यामुळे ह्या आदरांजलीचे पहिले फूल मी बहिणाबाईंच्या चरणी जरी अर्पण करीत असले तरी येताना आज मी दोन अधिक फूले घेवून आले आहे. एक कवीवर्य सोपानदेव चौधरी यांच्या चरणी वहाण्यासाठी कारण त्यांनी हे काव्य लिखित स्वरूपात आणले आणि त्यानंतरचे फूल आहे ते आचार्य अत्रे यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी. केवळ त्यांच्यामुळे हे असे दैवी काव्य आमच्या पर्यंत पोहोचू शकले.
आता माझी आवडती कविता..
‘माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपीतं पेरली !
माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता-भागवत
पावसात सामावतं माटीमधी उगवतं !
अरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक
हिरिदात सूर्यबापा दाये अरूपाचं रूप !
तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमंधी
देवा तुझं येनंजानं वारा सांगे कानामधी.
फुलामधी समावला धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय?
किती रंगवशी रंग रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात.
धर्ती मधल्या रसानं जीभ माझी सवादते
तव्हा तोंडातली चव पिंडामधी ठाव घेते. ‘
बहिणाबाई, आपण देवास निसर्गात, कर्मात आणि अंतरात शोधण्याचा संदेश दिलात. आपण स्वतःच सरस्वती रूप आहात.
माझ्या सारख्या अज्ञ बालिकेला पडलेला प्रश्न, ‘ कवितेचे सृजन करण्यास कोणता अभ्यास करावा लागतो?’ याचे उत्तर आपण आपल्या कवितांमधून साक्षात्कार घडावा असे दिले आहे.
बहिणाबाई शरीर रूपाने जरी ३ डिसेंबर १९५१ रोजी आपल्याला सोडून गेल्या तरी माझ्या सारख्या कवयित्रीला जणू सांगून गेल्या की, “अगं वेडे, कवितेच्या सृजनासाठी ‘ अभ्यास ‘ नाही ‘ ध्यास’ असावा लागतो.” हा ‘ ध्यास ‘ मनी सतत जागता रहावा असा ‘ जोगवा ‘ मी आपल्याकडे मागते आणि काव्य लक्ष्मी, काव्य सरस्वती आणि काव्य दुर्गेचे रूप असणाऱ्या आपल्याला वंदन करून माझी ही कविता आपल्या चरणी अर्पण करते 🙏🏻
जोगवा
निर्मिला तू देह माझा
मृत्तिकाघट नसे वेगळा,
स्थापित हो तू अंतरी;
सफल नव माह सोहोळा.
कर कमल दल तू हृदय माझे
जया उमलती भावना,
विराजित हो तू त्यावरी;
अवतरुदे कविता रमा.
शब्दा करी तू कुन्देन्दु माझ्या
करी बुद्धी वीणा स्वरदा,
वासित हो तू त्यावरी;
अवतरुदे काव्य शारदा.
करी प्रेरणेचा व्याघ्र माझ्या
करी प्रतिभेचा केसरी,
आरूढ हो तू त्यावरी;
अवतरुदे काव्य शांकरी.
दे दर्शने तू कवितेत माझ्या
दे शक्तिरूपे मज ईश्वरी,
दे अशी संवेदना की;
घडो काव्य परमेश्वरी.

– लेखन : डॉ. गौरी जोशी- कंसारा, न्यु जर्सी, अमेरिका