कवी अनिल
‘फुलवात’, ‘पेर्ते व्हा…’, ‘सांगाती’, ‘दशपदी’ हे चार काव्यसंग्रह, ‘प्रेम आणि जीवन’, ‘भग्नमूर्ती’, ‘निर्वासित चिनी मुलास’ ही तीन दीर्घकाव्ये वा खंडकाव्ये ही कवी अनिल यांची साहित्य संपदा आहे. त्याखेरीजही कवितेवर विपुल प्रमाणावर चिंतनात्मक लेखन त्यांनी केले आहे.
कवी अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुमावती या व्यासंगी जोडप्याचा एकमेकांना लिहिलेल्या पत्रव्यवहाराचा संग्रह ‘ कुसुमानिल ‘ नावाने प्रसिद्ध आहे.
विदर्भातील मूर्तिजापूर येथे ११ सप्टेंबर १९०१ रोजी
जन्म झालेल्या आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांनी, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने मराठी साहित्यात आपला ठसा उमटवला. त्यांना ‘ मुक्तछंद ‘ आणि ‘ दशपदी ‘ या काव्य प्रकाराचे प्रवर्तक मानले जाते. ‘ दशपदी ‘ ह्या संग्रहासाठी त्यांना
‘ साहित्य अकादमी ‘ पुरस्कार मिळाला होता. कवी अनिल यांना ‘ साहित्य अकादमी ‘ ची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती.
‘ कविता ‘ म्हणजे जाणीवांचे कोडे, अक्षरातून सोडवण्याचा केलेला प्रयत्न ! संवेदनेच्या उडणाऱ्या फुलपाखराच्या रंग-रूपाचे शब्दातून वर्णन करण्याचा केलेला प्रयत्न ! कविता म्हणजे अमूर्ताचे मूर्तात झालेले प्रकटीकरण ! मग हे असं जे इतकं उत्कट आहे; उस्फुर्त आहे, त्याला वृत्तादी बंधने पाळून व्यक्त करणे म्हणजे मुळातच ज्याचा जन्मच मनस्वीतेतून होतो त्यास शिस्तबद्ध वर्तनाची शिक्षा दिल्यासारखे नाही का ? कवितेने ‘ मुक्त ‘ असावे. स्फूर्तीतून आलेली वृत्तबद्धता वेगळी, आणि सक्तीतून आलेली वृत्तबद्धता वेगळी.
अशा मुक्त काव्याचे सृजन करणारे आणि मराठी वाङमयात ‘ मुक्तछंद ‘ शैलीचे प्रवर्तक मानले जाणारे कवी म्हणजे कवी अनिल ‘.
‘ अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना !’
प्रत्येक प्रेमी युगुलाने अनुभवलेले हे भावविश्व. प्रेमाचे रुसवे, कधी अबोले, त्या अबोल्यातही, त्याच्या कारणाच्या विचारा पेक्षा तो कधी एकदा तो संपेल याचीच लागलेली ओढ, प्रियकराने केलेली मनधरणी आणि जोवर त्या आर्जवी स्वरांतील सत्यता मनात खोल उतरत नाही तोवर सांभाळलेले ते अवसान. हे सारं प्रत्येकाच्या अनुभव विश्वाचा भाग आहे.
या कवितेतील पुढच्या ओळी…
‘ का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना !…’
गालांवरओघळणाऱ्या अश्रूंनी जणू मिठाची बाहुली तयार होत आहे आणि प्रियकराच्या उत्कट प्रेम सागरी ती नक्की विरघळणार याची खात्री आहे. एकदा त्याने मिठीत घेतले तर हा लटका राग, हे उसने अवसान गळून पडणार, ह्याची खात्री असल्याने ती मिठी टाळण्याचा उगाचच केलेला प्रयत्न !
मनात जे आणि जसं वाटतं आहे ते आणि तसंच चार ओळीत रंगवलेले हे चित्र !
कवी अनिल ‘ दशपदी ‘ रचनेचे सर्जनकार आहेत. ‘ दशपदी ‘ म्हणजे दहा चरणांची कविता. तिला आदि, मध्य आणि अंत आहे, जो त्या दहा ओळीतच सामावलेला आहे. अश्या दशपदी रचनांचा त्यांचा एक स्वतंत्र काव्यसंग्रह आहे.
कवी अनिल यांच्या ‘ मुक्तछंद ‘आणि ‘ दशपदी ‘ या रचना प्रकरांबद्दलच अधिक चर्विच्चर्वण करतांना समीक्षक किंवा इतर साहित्यकार आढळतात. परंतु कवी अनिल हे ‘ भावकवी ‘ आहेत. त्यांच्या कविता या ‘ भावकविता ‘ आहेत.
ह्या काव्यात, प्रतीक- प्रतिमा अल्प स्वरूपात आहेत किंवा काही ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकाराचा वापरही आहे परंतू बहुतांशी साध्या, सरळ शब्दांत व्यक्त होणे आहे. संस्कृत निरुक्त शब्द, अलंकारिक भाषा, पांडित्य असे कोणतेही संस्कार या कवितेवर नसूनही त्यांच्या कविता अर्थबहुल आहेत. वाचक ज्या संदर्भाने ती वाचेल, ती कविता ते रूप घेवून सामोरी येते. उदाहरणार्थ ‘ गाठ ‘ ही कविता
‘ आज अचानक गाठ पडे
भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीचकडे
नयन वळविता सहज कुठेतरि
एकाएकी तूच पुढे
आज अचानक गाठ पडे
दचकुनि जागत जीव नीजेतच
क्षणभर अंतरपट उघडे
आज अचानक गाठ पडे
नसता मनिमानसी अशी ही
अवचित दृष्टिस दृष्ट भिडे
आज अचानक गाठ पडे
गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागे मुरडे
आज अचानक गाठ पडे
निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे
आज अचानक गाठ पडे…’
ह्या कवितेचा सर्वमान्य संदर्भ ‘ त्याच्या मनातील ‘ ती ‘ किंवा तिच्या मनातील ‘ तो ‘ ह्यांची अनेक वर्षांनंतर अचानक झालेली भेट ‘ असा आहे. त्याच अर्थाने ही कविता अनेक ठिकाणी वाचली, गायली जाते. परंतू मला कायम वाटत आले आहे की कवी अनिलांच्या इतर कवितांप्रमाणे ही देखील अनेकार्थी आहे. त्याच्या मनातील ‘ ती ‘ म्हणजे ‘ त्याची ‘ कविता ‘ तर नसेल? किंवा तिच्या मनातील ‘ तो ‘ म्हणजे तिचा ‘ कृष्ण ‘ तर नसेल किंवा ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, मनुष्याच्या अचानक मनात आलेल्या मृत्यू भयाने भांबावून गेलेल्या अवस्थेचे तर वर्णन नसेल ?
कवितेचे हेच तर श्रेय असते की प्रत्येक वाचणाऱ्याला त्यात आपला चेहरा दिसायला हवा.
चैतन्यपूर्ण, पवित्र आणि हळवी अशी कवी अनिलांची कविता आहे. जीवनात त्या त्या वेळी जे चाललं असेल त्याचे लख्ख प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या कवितेत पहायला मिळतं. मुळात कवीवर्यांचा, कवितेच्या सृजनाबद्दलच इतका स्वच्छ दृष्टिकोन होता, जो त्यांच्या कवितेत दिसतो आणि ज्याचे वर्णन त्यांनी ‘ दशपदी ‘ ह्या संग्रहातील ‘ दशपदी- दर्शन ‘ ह्या प्रस्तावना स्वरूप लेखनात केले आहे.
कवीवर्य म्हणतात, ” माझ्या दशपदी रचनेबद्दल उद्देशून जर कोणी, ‘ हा एक नवीन रचना प्रयोग ते करीत आहेत अथवा त्यांनी केला आहे ‘ असा उल्लेख केला, तर त्यामागचा हेतू चांगलाच असतो, माझ्या कवितेला उचलून धरणाराही असू शकतो, पण मी कविता रचनेचे प्रयोग केले असे कोणी म्हटले की ते मला खटकते. बोचतेही. कारण मी एक प्रयोग म्हणून काव्याच्या क्षेत्रात काहीच केलेले नाही. प्रयोगासाठी प्रयोग तर नाहीच नाही. एक प्रयोग म्हणून काव्यसंभव होत नसतो.” यापुढे जाऊन स्वमनातील सर्जन व्यापार्यांचा मागोवा घेत असताना ते म्हणतात,” या दशपदी- कविता म्हणून बर्या, वाईट कशाही असोत पण माझ्या भावजीवनातल्या घटना आहेत.
एकेक आहे तो जिवंत क्षण
ऊन रक्ताने अनुभवलेला ”
त्यामुळे रचित किंवा कृत्रिम पद्धतीने, चमत्कार दर्शवण्याच्या उद्देशाने केलेले असे ह्या कवितेत काही नाही. ‘ घडवलेले ‘ असे काही नाही. जे आहे ते ‘ घडले ‘आहे.
त्यांची ‘हुरुप ‘ कविता…
तिचे शेवटचे कडवे आहे….
‘ शिणलेला आणि वैतागला मी
गोळा करताना वाळली पाने
मातीमध्ये हात मळवीत होतो
आहे का ह्या सुप्त मातीमध्येच
असे सामर्थ्य
स्पर्शानेच जागणारे चैतन्य ? ‘
पुन्हा तेच अर्थबाहुल्य. ह्या प्रतीक प्रतिमा तर नसाव्यात…सुप्त माती म्हणजे सुप्त मति तर अभिप्रेत नसावी ? वाळली पाने म्हणजे गतकाळातील स्मृती तर नसाव्यात
यापेक्षा अगदी वेगळी, अगदी तरल, अगदी हळवी कविता म्हणजे ‘ जुई ‘
पावसाची एक हलकीशी सर येवून गेली. आता अगदी हलकेच पाना-पाकळ्यांवर सावरून बसणारे थेंब तेवढे राहिले. त्यात ओलेती जुईची नाजूक वेल आणि तिचे केलेले हे वर्णन…
‘आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला
ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला…’
कवी अनिलांच्या सौंदर्यदृष्टीची साक्ष देणारी ही कविता आहे.
‘ तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे
जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे
कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत
शुभ्र शुचितेची सौजन्यकांती हिरवे लावण्य लेऊन येत
मादकता जाते मार्दवी विरून, सौंदर्य सोज्ज्वळाआड दडते
सोलीव सुखाचे स्वप्नच एक जीवाला जगतेपणी पडते! ‘
याशिवाय ‘ पावसा ‘ ह्या कवितेतही असेच रातराणीच्या शृंगाराचे वर्णन आहे. याशिवाय ‘ केळीचे सुकले बाग ‘, ‘ कुणी जाल का ‘, ‘ गगनी उगवला सायंतारा ‘, ‘ बाई ह्या पावसानं ‘, ‘ श्रावण झड बाहेरी ‘ अशी किती सुंदर भावगीते आहेत.
‘ हृदयीच्या अंधारात
लावियेली फुलवात
तुवा आपुलिये हाती
उजळली दिव्य ज्योती…
फुटे शब्द नि:शब्दाला
हृदयीच्या जिव्हाळ्याला
हृदयीच्या मंदिरात
लावियेली फुलवात ‘
असे म्हणत प्रसन्नचित्तता आणि उदात्त विचारसरणीचे गीत गाणाऱ्या ह्या कवीवर्यांच्या, त्यांना आयुष्यात सोसाव्या लागलेल्या क्लेशांचे व्यक्त स्वरूप असणाऱ्या ‘ आणीबाणी’, ‘ एक दिवस ‘ ह्या आणि इतर काही कविता आहेत. त्यामध्ये एक वैफल्याचा स्वरही कवीवर्य आळवून जातात. दशपदी मधीलच ‘ विराणी ‘ नावाची ही कविता…
‘ आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर
गुडघा गुडघा चिखल आणि ओढ्यांनाही पूर
नुसता गडद अंधकार वीज चमकत नाही
काळी माती काळे रान मला मीही दिसत नाही
हाती दिवा होता त्याची कधीच विझून गेली वात
कशानेही उजळत नाही अशी काळीकुट्ट रात
आहे ओळखीचे पुष्कळ काही दूर जवळ काही
असून नसून सारखेच मी कुठे हे कळत नाही
हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते
अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते ! ‘
कवीवर्य अनिल यांनी मुक्तछंदाचा पुरस्कार केला याचा अर्थ कवितेच्या मोकाटपणास प्रोत्साहन दिले असे मात्र मुळीच नाही. कवितेचा छंद आणि बंध, त्यातली गेयता त्यांनी सांभाळली. ‘ दशपदी ‘ काव्यसंग्रहात ही त्यांनी शेवटी ‘ दशपदी: स्थल- काल- छंद ‘ ह्यात प्रत्येक मुक्तछंदातील रचनेची योजना स्पष्ट केली आहे.
माझी एक आवडती कविता ‘ सांगाती ‘
मूळ तुकाराम महाराजांचा अभंग आहे तो असा :
‘ जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरुनिया ‘
त्यावर कवीवर्य म्हणतात :
‘ हाती हात धरुन माझा
चालवणारा कोण तू ?
जेथे जातो तेथे माझा
काय म्हणून सांगाती ?…’
‘ असा माझा हात धरुन चालवलेले मला मुळीच खपत नाही आणि त्यामुळे माझ्या स्वच्छंदाला कोचे पडतात ‘ असं पुढल्या ओळीत कवीवर्य लिहितात. मात्र ह्यानंतरच्या ओळीत व्यक्त होते ती परमेश्वरावरील दृढ भक्ती, ‘ तुझे असणे मला ठावूक असल्यानेच मी माझ्या दुःखाचा कांगावा करतो. ‘ यापुढे ते परमेश्वराला विनंती करतात की, ‘असे तुझ्यावर विसंबून राहणारे मन घडवू नकोस, माझ्या आयुष्याचे संघर्ष माझे मला लढू देत. त्याने व्यक्ती म्हणून माझा विकास होईल. मला प्रगल्भता येईल. देवत्व प्राप्त करण्याचा माझा उद्देश नाही परंतू देवस्वरूप होण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यात तू केवळ माझा आदर्श रहा.’
‘ खूप खूप माझी उंची एकाकीच
माझी मलाच वाढवू दे
तुझ्याहून नसली तरी तुझ्यासमान होऊ दे
तोवर असे दुरदुरुन, तुझा हात दूर करुन
मान उंच उभारुन
तुझ्याकडे धिटकारुन पाहू दे !’
किती सुंदर स्फुरण आहे हे.
कवीवर्य अनिल यांनी, ८ मे १९८२ रोजी आपली इहलोकीची कविता पूर्ण केली. कवीवर्य अनिल, आपल्याला आणि आपल्या पवित्र कवितेला मी वंदन करते आणि ज्या स्वतंत्र अस्तित्वाचे, स्वतंत्र कर्तृत्वाचे अभिवचन आपण परमेशाकडे मागितले होते, तोच रंग घेवून आलेली माझी कविता ‘ सावली ‘ आपल्या चरणी अर्पण करते.
सावली
सावलीकडे असतं सारं काही
आकार, उंची, वलय;
पण ‘तिचं’ असं स्थान नाही
असतच नाही;
की त्याला अस्तित्व नाही ?
जन्म तेजापोटी;
तरी कसं व्यक्तित्व नाही ?
मुकं मुकं राहणं;
सतत अशाश्वताचं भय
साथ करीत वाहणं;
सतत सांभाळायची लय
म्हणून प्रत्येक सावली थकून
संध्याकाळी विरत जाते
स्थान मिळवायच्या शर्यतीत
दुबळी ठरते; हरत जाते
सावले सावले,
टाक तू सावलीपणाची कात
नवी पहाट, नवा जन्म;
प्रकाश पडू दे आत
जुना काजळ सरू दे रंग
नवा उजळ करू दे दंग
नव्या तुझ्या रूपाच्या तूच पडशील प्रेमात
फार देखणी असते बरं निस्तेजावर मात !

– लेखन : डॉ. गौरी जोशी- कंसारा, न्यू जर्सी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ, +919869484800