केशवसुत
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी म्हणजे कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत होत.
केशवसुतांनी विद्यार्थि दशेतच काव्यलेखनास आरंभ केला होता. मात्र परिणामकारकतेच्या दृष्टीने हा काव्य रचनाकाल मुख्यत्वे १८८५ ते १९०५ असा मानला जातो.
केशवसुतांच्या १३५ ते १४० कविता आज उपलब्ध आहेत. त्यात स्वातंत्र्य, समता अश्या सामाजिक मुल्यांबरोबरच वैयक्तिक प्रेम, निसर्ग सानिध्य याचे वर्णन करणाऱ्या भाव कविताही आहेत.
इंग्रजी काव्यातील सुनीत हा छंद प्रकार त्यांनी मराठीत प्रथमच रूढ केला. शिवाय काही नवीन मात्रावृत्तेही त्यांनी प्रचलित केली.
केशवसुतांचा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर हरि नारायण आपटे यांनी १९१६ मध्ये प्रकाशित केला.
प्रसिध्द व्यक्ती, त्यांच्या जन्म – मृत्यु तिथि आणि त्यांच्या प्रवृत्ती याबद्दलचे मतभेद, वाद आपल्याला नवीन नाहीत. आज ज्या कवीवर्यांबद्दल मी लिहिते आहे त्यांच्या जन्मतारखेविषयी काही विवाद आहे म्हणे. एक मत आहे की त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १८६६ रोजी झाला तर दुसऱ्या गटाचे मत आहे की १५ मार्च १८६६ रोजी झाला. मी मात्र ह्या वादात, शोधात पडणार नाही. मला एकच कळतं…
सहस्त्र दलांनी युक्त आणि अत्यंत मोहक परिमल असणारे ब्रह्मकमळ अर्ध्या रात्री फुलते, कुणाच्या नकळत, जेंव्हा सारे जग निद्रितावस्थेत असते. त्या घटिकेचा प्रत्येकाचा निष्कर्ष स्वतःचा असू शकतो परंतू त्यामुळे त्याच्या दैवीपणात अंशानेही फरक होत नाही. भगवान विष्णूंच्या उदरातून उमलणारे ब्रह्मकमळ ! त्याच्या बहरण्याचे साक्षी व्हायचे असेल तर स्थल-काल, दिन-रात, अश्या भौतिकाचे भान हरपून जावून, केवळ त्याच्या बहरण्यात तल्लीन होवून, भावनेने बेभान व्हावे लागते.
ह्या, ‘केशवांचे’ उदरी फुललेल्या कमलाचेही कदाचित तसेच असावे. त्यांचा परिमल म्हणजे त्यांचे काव्य आणि तो अनुभवण्यास बाकी भौतिक तपशीलांच्या खोलात कशास जावे ?
कवीवर्य केशवसुत !
मराठी कवितेवरील पारंपारिकतेचे ओझे दूर करून तिला विषय आणि आशय दृष्टीने आधुनिकता प्रदान करणारे युगप्रवर्तक कवी म्हणजे कवी केशवसुत. आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून केशवसुतांचे महत्व अनन्य साधारण आहे.
सामाजिक समभाव, नाविन्याचा ध्यास, वैचारिक क्रांती यास प्रोत्साहन देणारे आणि मराठी काव्यास एक नवा मार्ग, एक नवी विचारप्रणाली आणि एक नवी परंपरा देणारे त्यांचे काव्य आहे. याशिवाय वैयक्तिक भावविश्व, निसर्ग याचेही रसाळ वर्णन त्यांच्या काव्यात आहे. त्यांच्या कवितानिर्मितीच्या काळाचा संदर्भ पाहिला तर तत्कालीन समाजाला ज्या बोधाची अत्यंतिक गरज होती तेच प्रदान करणारे त्यांचे काव्य आहे.
कवीवर्य केशवसुतांच्या काव्याचे, सृजन कालावधीच्या दृष्टीने निरीक्षण करता, सुरुवातीच्या कवितांवर संस्कृताचे संस्कार आहेत. सुरुवातीला जरी पारंपारिक रचना बंधाचे, संस्कृतज असे काव्य त्यांनी प्रसवले तरी त्यानंतर मात्र ह्या काव्यात आधुनिकतेच्या, उत्कर्षाच्या मुळ्या रुजल्या. समतेचे संदेश, कार्यनिष्ठता, पुरोगामी तत्वाचा पुरस्कार हे रंग काव्यात प्रकट झाले. वैयक्तिक भावभावना, कौटुंबिक प्रेम, पत्नी विषयक वाटणारी आसक्ती आणि प्रेम, निसर्ग घटकांद्वारे शिकवण, अशी अभिव्यक्तीही त्यांच्या काव्यात दिसून येते. इंग्रजी काव्याचे संस्कारही या काव्यावर आहेत. त्यातूनच पारंपारिक काव्याची चाकोरी मोडीत केशवसुतांनी क्रांतीची, ऐक्याची, समानतेची अर्थात युगप्रवर्तनाची ‘तुतारी‘ फुंकली.
‘ एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी…’
केवळ उपदेश नव्हे तर स्वकर्तृत्वाची मुहूर्तमेढ रोवणारे हे पहिले कडवे. जुलुमी रूढी आणि परंपरांच्या बेड्या तोडून मुक्त होणे आणि स्वतःसाठी उज्ज्वल भविष्य स्वतःच्या हातांनी घडवणारे, कर्तव्यपरायणता, संघर्ष, सामर्थ्य, याची पोलादी शस्त्रास्त्रे हाती देणारे आणि मनगटात बळ भरणारे हे काव्य.
‘ चमत्कार ! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी…’
ह्यात अचूकपणे वर्णिलेली आहे ती दैवविलासी, सनातनी, रुढीप्रिय आणि पर्यायाने स्वविकासास खीळ घालणारी वृत्ती आणि त्याचा केलेला धिक्कार.
‘ प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा ?
विक्रम काही करा, चला तर !…’
‘ हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो ! या त्वरा करा रे !
समतेचा ध्वज उंच धरा रे !
नीतीची द्वाही पसरा रे !
तुतारीच्या ह्या सुराबरोबर…’
ह्यांच्या कवितांचा कोणत्याही अमूक एका धर्म वैशिष्ट्यांवर टीका-ताशेरे करण्याचा उद्देश आहे असे मला वाटत नाही. प्रत्येक कडव्याबरोबर कर्मवाद, बुरसटलेल्या विचारांवर टीका, नेभळट अश्या अंधश्रद्धाळूपणावर केलेला वार यासारख्या ठिणग्या वर ठिणग्या पडत जातात आणि मानवतेच्या उत्कर्षाचा एक यज्ञ धगधगू लागतो.
‘उगवत असलेल्या सूर्यास‘ नावाची मालिनी अक्षरगणवृत्तातील कविता…
‘ उदयगिरिशिरी या त्वत्तुरंगी खुरांहीं
तुडवुनि उडवीली धूलि ही जैशी काहीं !
द्युति बघुनि अशी ती चित्त माझें रमून,
दिनकर ! मज बोधी तूज गाया नमून !
यात, प्रथम दोन चरणे कल्पनाविलास दर्शवणारी. खुरांनी उधळलेल्या धुलिकणांप्रमाणे गगनी पसरलेली प्रभा, रंग आणि उदयास येणारा तांबूस वर्णी दिनकर ! मात्र चौथ्या चरणात हीच कल्पना विलासाची मानसिकता एकदम बदलून त्याच दिनकराकडे त्याच्याच प्रभेप्रमाणे तेजस्वी बोधाची केलेली प्रार्थना !
‘ कवळुनि करजालें भूमिलागूनि, लाल
विलसितरूचिभासें फेंकितां तूं गुलाल
विकसिततरूमालाकेशपंक्तीत तीचे,
स्तवुनि फिरुनि तूंतें वन्दितों मी मरीचे !
पुन्हा तोच कल्पनारम्य आविष्कार !
मात्र चौथ्या कडव्याच्या चौथ्या चरणात ‘शरण तुजसि आलों मी असा नम्र दास !’ म्हणत त्या दिव्य प्रभेपुढे स्वीकारलेली भक्त भावना.
एकूणच निसर्ग, सृष्टी, काल यांच्या अनंततेपुढे केशवसुतांना मानवी मनाचे व्यापार, अतिशय संकुचिततेचे भासतात. त्यामुळे सृष्टीतील घटकांमध्येही ते सौंदर्या बरोबरच चैतन्य तत्व शोधतात आणि त्यातून प्रेरणा घेतात. स्वयंमग्न, स्वच्छंद ‘ फुलपाखरू ‘ अशीच एक कविता. केशवसुतांच्या निसर्ग कवितांतही केवळ सौंदर्य निर्मिती पेक्षा त्यातून मर्म आत्मसात करण्याकडे प्रवृत्ती दिसते.
गुणग्राहकता ही त्यांची वृत्ती असावी.
रसाच्या दृष्टीने पहाता अगदी भिन्न असणारी परंतू त्यांच्या निसर्ग कवितांचे यथोचित वर्णन करण्यासही सक्षम असणारी कविता ‘ आम्हीं कोण ‘ ह्यातील पहिल्याच चार चरणात एक महान सत्य, कवीचा ह्या निसर्ग मंडलाकडे, विश्र्वाकडे पहाण्याचा दृष्टीकोन दृगोचर होतो.
‘आम्हीं कोण म्हणूनी काय पुससी ? आम्हीं असू लाडके
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके…’
संस्कृत सुभाषिते किंवा वाङ्ममय वाचताना ज्याप्रमाणे संधी सोडवून, समासाचा विचार करून त्याप्रमाणे वाचन, चिंतन करावे लागते, तरच त्यातील मर्म उमगते त्याप्रमाणे हे काव्य आहे. ह्या काव्यात केवळ भावना आविष्कार किंवा रसग्रहण यापेक्षाही शास्त्रशुद्ध भाषा, व्याकरण आणि वृत्ते याद्वारे व्यक्त होणे दिसते.
मी याआधी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या अनेक कवितांवर इंग्रजी साहित्य आणि शैलीचा प्रभाव आहे.
‘मरणकाल‘ नावाची एक कविता.
Thomas Hood ह्यांचे ‘ The Death Bed ‘ नावाचे त्यांच्या बहिणीच्या मरणसमयी लिहिलेले मूळ काव्य आहे. ‘मरणकाल’ त्याचे रूपांतरण आहे.
‘आम्ही तीचें श्वसन रात्रभर सचिंत हो निरखियले
श्वसन तीचें मृदु मन्द मन्द जे अमुच्याकानी पडलें-
अम्हां त्यामुळे, तीचे बक्षी आयुष्याची लाट
हेलकावते खालवर, असे समजायाला वाट…’
‘ अमुच्या आशांनी भीतीला खोडसाळ हो म्हटलें,
तसें आमच्या भीतींनीही आशांला ठरवियलें !
आम्हांला ती भासे मेली जेव्हां ती निजलेली,
आणि अहह! निजलेली जेव्हा हाय! हाय! ती मेली….’
एक प्रकारची गूढ भिती, मरणासन्न अवस्थेचे वर्णन आणि अनामिक संघर्षानंतर मृत्युपुढे पत्करलेली शरणागती… रक्ताच्या- जीवाभावाच्या माणसांच्या मनात त्यावेळी चाललेली उलघाल… हे सारे योजलेल्या क्षमताशील शब्दांमुळे अंगावर शहारे आणणारे. यापलीकडे जाऊन शेवटचे कडवे…
‘ कारण, नंतर पहाट आली अंधुक उदास तैशी
आणि हिमाच्या वर्षावानें काकडलेली ऐशी,
शिव! शिव! तेव्हां स्तब्धें पक्ष्में तिचीं सर्वथा मिटली,
– तिची आमुचीहुनी निराळीच पहांट तेव्हां झाली ! ‘
काय रसग्रहण करू ह्याचे ?…उष्ण रक्तातील सारे चैतन्य शोषून घेवून जणू शैत्याने बाधीर्य आणणारे म्हणू की, मृत्युतील बाधीर्य, शैत्य क्षणभंगुर ठरवणारे आणि आत्म्याच्या ज्वलंत चैतन्याचा पुरावा देणारे म्हणू…
कवीवर्य केशवसुतांच्या काव्यात वैयक्तिक स्वरुपाचे, आत्माविष्कारी असेही विपुल काव्य आहे. ह्यात ‘दुर्मुखलेला‘ नावाच्या शालेय जीवनात सहन केलेल्या अवहेलनेतून जन्मलेल्या कवितेचा उल्लेख करते.
‘ माझे शुष्क खरेच हे मुख गुरो ! आहे तया पाहुनी
जाती प्रेक्षक सर्वही विरस ते चित्तामधी होऊनी;
हे सर्वां उघडे असूनि वदुनी का ते तुम्ही दाविले ?
तेणे भूषण कोणते मग तुम्हा संप्राप्त ते जाहले ?… ‘
स्वतःतील उणेपण स्वीकारणे भल्या भल्याना जमत नाही. ह्या शालेय वयीन मुलाने ते स्वीकारणे आणि केवळ स्वीकारणे इतकेच नव्हे तर त्याकडे असे त्रयस्थ भूमिकेतून पहाणे हे कविवर्यांना कसे जमले असेल ? काव्य स्फुरण जरी परिपक्व वयात झाले असेल तरी मुळात प्रेरणा तसेच असणार, संवेदनही तसेच असणार ! आंतरिक सौंदर्यास प्राधान्य देणारे कवीचे मन पुढच्या प्रत्येक कडव्यात व्यक्त होते. संत चोखामेळा यांच्या ‘ ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ‘ ह्या अभंगाचा रंग प्रत्येक कडव्यात दिसतो.
‘आईकरिता शोक ‘ नावाची मातृवियोगाच्या असह्य वेदनेतून साकारलेली कविता, ‘ घराकडील गोष्टी ‘ कवितेत आपल्या पित्याबद्दल ‘ अतिपूज्य ‘ असे संबोधन देवून ‘ मी क्षणभरही त्यांचा पुत्र शोभणार नाही ‘ असे म्हणून काढलेले हृदय उचंबळून आणणारे उद्गार, ‘ प्रियेचे ध्यान ‘ नावाची पत्नीच्या विरहातून साकारलेली कविता, ह्या अश्याच वैयक्तिक प्रेमाची अनुभूती करून देणाऱ्या…
‘प्रियेचे ध्यान‘ ह्या कवितेतील काही ओळी अश्या…
‘ गमे तूंते ध्याया मज न दुसरी आकृती बरी,
रतीचे वेळीच्या शिरती हृदयीं अन्यहि जरी;
म्हणूनियां वाटे मज अनुभवें याच सखये, –
सुखाहूनी दुःखा स्मरति बहुदा बध्द ह्रदये !
अहा ! अंकी माझे तुज बघतसें मी बसलिस,
शिरा स्कंधी माझे लववुनि गडें तूं पडलिस,
वियोगाचे तर्के रडत असतां, अश्रू सुदती !
तुझे, माझ्या वक्षी टपटप बघें मी उतरतो !
ह्यात त्या दोघांचे एकमेकांवीण कासावीस होणे आणि त्यातून आलेली एकरूपता विलक्षण सुंदर !
आता यानंतर एक अशी कविता जिचे स्थान माझ्यासाठी केवळ सर्वधर्मसमभाव, उदात्त मनुष्यतावाद यापेक्षा कितीतरी मोठे आहे. कवीच्या भोगण्यातून कवितेचे प्रजनन होते आणि ती कविता पुन्हा एकदा जो भोगेल त्यास तिचे आकलन होते. ती कविता म्हणजे ‘नवा शिपाई‘
‘ नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,
कोण मला वठणीला आणू शकतो तें मी पाहें !
ब्राह्मण नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा,
तेच पतीत की जे आखडिती प्रदेश साकल्याचा
खादाड असे माझी भूक
चतकोराने मला न सुख;
कूपातिल मी नच मंडूक;
मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !
कोण मला वठणीला आणू शकतो तें मी पाहें !
यापुढले कडवे म्हणजे माझ्या आयुष्याचे ब्रीदवाक्य आहे. पदवी शिक्षणक्रम पूर्ण करून मी बाहेरच्या जगात पाऊल टाकतच होते आणि परदेशगमन झाले. आरंभीचा काही काळ एका विचित्र मनोवस्थेत गेला परंतू त्यानंतर हळू हळू लक्षात येवू लागले की देश ‘ परका ‘ असला तरी लोक खूप ‘ आपले ‘ असतात. केशवसुतांच्या पुढल्या उक्ती मी प्रत्यक्षात जगल्या आहेत, आजवर जगते आहे.
‘ जिकडे जावें तिकडे माझी भावंडे आहेत
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत;…
ती माझी, मी त्यांचा, एकच ओघ अम्हांतुनी वाहे !
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें !
कवीवर्य केशवसुतांच्या अश्या किती दिव्य कविता आहेत, किती कवितांचा उल्लेख करू, कितींचे रसग्रहण करू ? त्यांच्या कवितांनी मला तल्लीन केले आहे, नादमय केले आहे, अगदी ‘झपूर्झा’ स्थिती आली आहे.
लेखाचे आरंभी मी कविवर्यांना ब्रह्मकमळाची उपमा दिली खरी परंतू एक गोष्ट आता लक्षात येते आहे ती म्हणजे ब्रह्मकमळ सूर्योदयापूर्वी कोमेजून जाते. त्याचे आयुष्य फार अल्प असते. सूर्योदयापूर्वी… प्रकाश झोत पडण्याच्या आत…प्रसिद्धी मिळण्याच्या आत ! कोणतीही कविता प्रकाशित होण्यापूर्वी, ७ नोव्हेंबर १९०५ रोजी, वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी हे कमलपुष्प कोमेजले.
कवीवर्य केशवसुत, आपल्या अनेक कविता ‘ कवी, कविता, कवित्व ‘ ह्यावर भाष्य करतात. आपल्या, ‘कविता आणि कवी ‘,’ कवितेचे प्रयोजन ‘, ‘ काव्य कोणाचे ‘ या आणि अश्या अनेक कविता कवीच्या मानसिकतेचे दर्शन देणाऱ्या आहेत. आपले काव्य महान आहे, प्रामाण्यवादातून जन्मलेले आहे. आपल्याला माझा प्रणाम 🙏🏻
‘कविता आणि कवी‘ ह्या कवितेत आपण म्हटले आहे
‘करुनिया काव्य जनांत आणणे
न मुख्य हा हेतु तदीय मी म्हणे;
करुनि तें दंग मनात गुंगणे,
तदीय हा सुंदर हेतु मी म्हणें…’
परंतू इतके उदात्त धोरण अजून साध्य होवू शकले नाही कारण, माझे ठायी आपल्यासारखी कणभरही योग्यता नाही. आहेत केवळ भोळ्या भाबड्या जाणीवा…सुखाच्या आणि दुःखाच्या !
मनातल्या जाणीवा पोहोचवण्यास जेंव्हा आपलेच शब्द अपुरे पडतात तेंव्हा त्या अपूर्णत्वाची वेदना घेवून ‘कवीचे दुःख‘ असे नव्याने अवतरते. हे अवतरण आपल्या चरणी अर्पण करते.
कवीचे दुःख
रिते व्यथांचे माप करण्या,
मनास पुन्हा धीर देण्या,
चार ओळी कवी लिहू पहातो,
चष्मा लावून त्यात वाचक
स्वतःलाच शोधू पहातो.
घालमेल कधी मनाची,
तळमळ त्या तीव्र क्षणाची,
कागदात कवी मोजू पहातो,
विचारवंत वाचक त्यात
समाज मुद्दे वेचू पहातो.
व्यक्त शब्दातून होण्याचा,
एक शुद्ध स्वर गाण्याचा,
सोहोळा असा अपूर्ण रहातो,
ओलावून मने इतरांची
ओघळून कवी वहात रहातो.

– लेखन : डॉ. गौरी जोशी- कंसारा
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800