हल्लीच्या मुलांची शालेय पुस्तकं बघितली की मला माझ्या बालपणातील शालेय पुस्तकं आठवतात.
शालेय पुस्तकांची पहिली ओळख पहिलीतच झाली. एकही रंगीत चित्रे असलेली पुस्तकं नव्हती त्यावेळी.
मे महिन्याच्या अखेरीस खास ह्या पुस्तकांच्या खरेदीला बाहेर पडत असू. दुकानात प्रचंड गर्दी असे. एकदाची पुस्तकं खरेदी झाली की घरी आल्यावर कोण उत्साह असायचा. सगळी पुस्तकं एकेक करत छान उघडून त्यावर मायेनं हात फिरवून भरभरून सुगंध घ्यायचा. जसा पहिला पाऊस पडला की मातीचा गंध जसा भरभरून घेतो ना अगदी तस्साच. म्हणून पुन्हा पुन्हा पुस्तकं उघडायची. मग कव्हर घालण्याचा कार्यक्रम होत असे. ते झालं की त्यावर टपोऱ्या अक्षरात नाव, इयत्ता, तुकडी, विषय लिहून झालं की ती देखणी पुस्तकं डोळे भरून बघत दप्तरात विराजमान व्हायची.
सुरुवातीच्या शाळेच्या दिवसात अगदी खूप काळजी घ्यायची पुस्तकांची.आणि मग..एकेक पान लागले गळाया..अशी अवस्था होत जायची.
प्रत्येक विषयाचं पुस्तक अगदी पेन्सिल, पेन ह्यांनी भरून जायचं म्हणजे मराठीचे शिक्षक हे जे शब्दार्थ सांगतील ते ते दोन ओळींच्या मधे लिहीत जायचं. पृष्ठ क्रमांक च्या भोवती मोठ्ठं वर्तुळ आणि Imp अशा लाल पेन्सिल च्या खुणा तर पुस्तकभर मानाने मिरवत असायच्या. परीक्षेच्या वेळी तेव्हढच वाचायचं. आणि लेखक, कवी ह्यांना ही सोडायचं नाही. कोणाला मिशीच काढ, कोणाला कुंकू असं काहीबाही रंगवून ठेवायचं.
भाषांची पुस्तकं अशा प्रकारे भरली की इतिहास, त्यातल्या गोंधळ उडविणाऱ्या सन, राजांचा कालखंड, लढाया, अशा सगळ्या खाणाखुणा नीट करून ठेवायच्या. भूगोल, शास्त्र ह्यांची पण तीच तऱ्हा. त्यात गणिताचं पुस्तक अगदी क्लिष्ट.
पण Imp ची लाल खूण पाहिजेच. असं सगळ्या पुस्तकांना सालंकृत केलं की मग मात्र ही पुस्तकं आपल्या घरातल्या माणसासारखी आपली वाटायला लागायची.
मग पुस्तकात मोरपिस, पिंपळाचं पान, फुलं, चॉकलेट ची चांदी अस ठेवत होतो. परिक्षेच्या वेळी एखादं पुस्तक हरवत असे. मग नवीन पुस्तक हवं म्हणून भुणभुण करायची आणि नवीन पुस्तकावर खाणाखुणा काहीच नसल्याने चांगलीच तारांबळ उडायची. मग मैत्रिणीला लाडीगोडी लावून ते पुस्तक मिळवायचं आणि भराभर पुन्हा खाणाखुणा करून भरवून टाकायचं.
परिक्षा संपली की काही दिवस बघायचं पण नाही पुस्तकांकडे. रिझल्ट लागला की मात्र ही जिवाभावाची पुस्तकं आठवायची मग कोणी आपल्या लहान बहिणीला, मैत्रिणीला देताना छान मायेनं त्यावर हात फिरवीत, “घे ग बाई, सगळं लिहून खुणा करून ठेवलंय. तुला काहीच करायला नको. फक्त मधली मधली पानं गळालीत. तेव्हढी घे चिकटवून” असा प्रेमाचा सल्ला द्यायचा.
आम्हीही अशी पुस्तकं घेत असू. पण नव्या कोऱ्या पुस्तकाचा सुगंध घेण्यासाठीच मला नवीन पुस्तकं खूप आवडायची. हल्लीची सुंदर चित्र असलेली रंगीत पुस्तकं बघितली की हेवा वाटतो अगदी. पण आम्ही आमची कल्पकता वापरून सजवलेल्या पुस्तकांची मजा वेगळीच होती .
एखादीची पुस्तकं अगदी वर्षाच्या शेवटपर्यंत कोरी करकरीत असायची. मग आम्ही अगदी ‘बिचारी’ अशा नजरेने बघत असू.
त्यानंतर कित्तीतरी अवांतर पुस्तकं वाचली. अजून वाचन चालूच आहे. पण नवीन पुस्तक आणलं की अजूनही मी ते पुस्तक लगेच उघडून त्याचा सुगंध भरभरून घेते आणि मला आठवतात ते शाळेतील रम्य दिवस. त्या शालेय पुस्तकांच्या आठवणी…आणि रंगवून टाकलेली माझी शालेय पुस्तकं….

– लेखन : नीता देशपांडे.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800