Friday, November 22, 2024
Homeलेखमनात घर केलेले घर

मनात घर केलेले घर

आमचं घर म्हणाल तर खेड्यात. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे. पण आपल्याला आपले घर खूप आवडते.

आमचं घर ही तसेच. समोर छोट अंगण मग दरवाजा. मग मोठे अंगण. त्यात तगरीची झाडे. सदाफुली, तुळस, पांढरा जास्वांद, कुंडित गुलाब, मनी प्लांट वगैरे..

मग ओसरी..माजघर .. तिथेच सुंदर देवघर.त्यात उजळलेले देवांचे मुखवटे. फुलांचे घातलेले हार.सुंदर उदबत्ती. धुपाचा गंध.सारे वातावरण प्रसन्न होत असे.

मग स्वयंपाक घर. तिथं गॅस आणि चूल ही. मग छोटी उपासाची खोली. तिथला गॅस केवळ चहा पाणी, उपासाचे पदार्थ करण्यासाठी वापरल्या जाई.

त्याच खोलीत भिंतीवर लॉफ्ट मध्ये खूप चिनी मातीच्या बरण्या असत. त्यात खूप प्रकारची लोणची माझी आई घालायची. आंबा, लिंबू, गोड लोणचे, तक्कु, साखरआंबा, मोरआवळा, भोकर, कार्ले अशी विविध लोणची असत.

पाटावर बसून आम्ही जेवत असू. रोज वदनी कवळ ने सुरवात व्हायची. जेवण साधं पण रुचकर असे.रोज नवी कोशिंबीर, लोणचे, असे.  प्रत्येक सण साजरा केला जात असे.

आमच्या घरी खूप सोवळे ओवळे पाळल्या जाई.पण जातीभेद नसे. आपले परके भेदभाव न्हवता. माझे आई बाबा दोघेही शिक्षक होते. शिस्त होती, पण प्रेम होते.

घरात वर तीन माड्या होत्या. त्यावर दोन गच्या होत्या. उन्हाळयात आम्ही गच्चीवर झोपत असू. असंख्य चांदण्यांनी भरलेलं आकाश. शांत शीतल वारा. चमकता चंद्र खूप सुखद वाटायचे. उन्हाळयात आम्ही सर्व मित्रमंडळी पत्ते, अस्ट चंग खेळत असू. मग आई कच्चा चिवडा, कधी उकडपेंडी, कधी फोडणीचे मुरमुरे असा खाऊ करून देत असे.

मधल्या घरात बंगई म्हणजे पाळणा होता. त्यावर बसून झोके घेणे, गाणी म्हणणे, पाढे म्हणणे असे उपक्रम चालायचे.

शाळा, घर, लायब्ररी, पुस्तक, खेळ मैंत्रिणी छान आणि सुरक्षित जग होत ते. घराला धाबे असल्याने घर उन्हाळयात तापत नसे.
घरात फरशी असली तरी दर रविवारी फरशी धुणे हे काम सर्व मिळुन करायचे.

दिवस सरत जातात. माणसा सोबत घरालाही वृध्दत्व येते. माझं लग्न झालं. आई वडील रिटायर्ड झाले. ते घर विकले. मनाला असंख्य वेदना झाल्या. सारे बालपण, तारुण्य तिथं गेलं. खूप सुख दुःख, कष्ट आनंद त्या घराने पाहिले होते. पण कालाय तस्मै नमः.हेच खरे !
आज तिथं कुणी नाही. आई वडील ही गेले. ज्याने घर घेतले त्याने नवे बांधकाम केले. मनात ती खोल जखम आहे. पण ते सुंदर माझे घरकुल अजूनही माझ्या मनात आहे.

अनुपमा मुंजे

– लेखन : अनुपमा मुंजे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments