तव नयनातील आरशात मी
एक अनामिक ओढ पाहिली,
माझ्या अंतरी नकळत तेव्हा
एक अलगद तार छेडली…
झंकारत ती मनी सदोदित,
पुन्हा,पुन्हा मी गीत गातसे
अद्भुत, अलौकिक आनंदाचे
हृदय मंदिरी आवर्तन होत असे….
कसली ओढ ही, मला न कळले
सदैव मनी समाधान राहिले
परी ऋतूचक्रासवे बहरत जाता
अंतरंगीचे गूढ जाणिले…
वसंतातील कोवळीक ती
की ग्रीष्म रसरसशितता..
वर्षाऋतूतील समर्पण असे
अन् शारदीय शितलता …
सतत त्यांचा संगतीत मन
सृजनतेस बिलगून राही,
अनेकविध रंगीत छटांचा..
अनोखे इंद्रधनुष्य पाही…..

– रचना : साधना आठल्ये.🍁