हल्ली बऱ्याच वेळा मी देवाशी बोलते. काल पहाटे देव मला म्हणाला, चल माझ्या बरोबर. मन तुझे “बाग बाग” करतो. मी पटकन तयार झाले आणि त्याचा हात घट्ट पकडून निघाले.
एका सुंदर नगरात प्रवेश केला मी. त्याच्या सुंदर मुर्तीकडे पाहत होते. सर्व आसमंतात तेजस्वी प्रकाश पसरला होता. त्या जगात प्रचंड आनंद होता. सगळीकडे आल्हाददायी वातावरण होते.
त्या स्वच्छ सुंदर, प्रकाशमयी वातावरणात हरवून गेले. सुंदर सुंदर मातीची घरे, छान रंगवलेल्या भिंती, प्रत्येकाच्या अंगणात सुवासिक फुले, घराघरातून धूपाचे
सुवास दरवळत होते. लांबून घंटानाद,
शंखनाद ऐकू येत होते. सर्व स्त्रिया मृदूभाषी, सौभाग्य अलंकारांनी नटलेल्या होत्या.
माझे प्रेमानी स्वागत झाले. सर्वच घरात पुरूषही आदराने वागत होते. काही आश्रम, काही गुरूकुल पाहिले मी. घराघरात एकमेकांप्रती मी प्रेम आणि आदर पाहिले. ते पाहून भरून आले मला.
स्त्रियांच्या हातातील बांगड्यांचे आवाज आणि पायातील पैंजणाचे आवाज मन प्रसन्न करत होते. साधे सोपे सुग्रास जेवण जेवले मी तिथे. मोठी मंडळी पुजा पाठ, जप ह्यात गुंतली होती. मी म्हटले देवाला, मला अशाच ठिकाणी राहायला आवडेल रे ! तो म्हणाला, अगं हे सगळे असेच होते तुमच्या पृथ्वीवर. परंतु तुम्ही सर्वानी वाट लावलीत. मानवाला बुद्धी देवून मीच चूक केली ह्याचाच पश्चाताप होतोय. सर्व सजीव सृष्टीला त्रास दिलात. घराच्या आणि पैशाच्या हव्यासा पोटी झाडांचा नाश केलात. सर्वत्र नकारात्मक वातावरण तुम्हीच घडवले.
आतातरी एक करा माझ्यासाठी, असे आयुष्य हवे असेल तर पृथ्वीमातेची माफी मागा. खुप भोगले तिने लेकरांना सांभाळून. आता तिची तग धरण्याची ताकद संपली. तुम्ही पैसा पैसा करता, पण तेच तुमच्या दुःखाचे आणि ऱ्हासाचे कारण आहे. आत्मे शुद्ध करायला जमतील का जे अत्यंत मलिन झालेत ते ? प्रेम करायला शिका. नका करू कोणाचा अपमान, फसवणूक. मानव धर्मात पुन्हा या. हाच धर्म होता तुमचा. विसरालात सगळे. बघा जमतंय का ? हे सगळे तुमच्यासाठीच आहे !
फुलांच्या ताटव्यातील घरे, प्रेम आणि आदर, सकारात्मक ऊर्जा हे सर्व तुम्हालाच निर्माण करायचे आहे. भरपूर झाडे लावा. कोंडलेला श्वास परत मिळेल. सोनेरी उजेड येईल तुमच्याकडे. नक्की सर्वांचे दिल गार्डन गार्डन होईल.
मला परत येताना रडू येत होते. पण यावे लागले. त्या सुवर्ण युगाची भटकंती करून आले हेच माझे भाग्य.
धन्यवाद दिले मी तेंव्हा माझे अश्रू त्याच्या हातावर पडले. म्हणाला, नको रडू मी आहे तुझ्यासाठी. तुझी साधना कधीच वाया जाणार नाही. मी तूझाच आहे.

– लेखन : शलाका कुलकर्णी. नेदरलँड्स
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800

निसर्गात त्याच्या नियमाप्रमाणेच राहावे, नुसत्या हव्यासने राहिलात तर हाती काहीच राहत नाही.👍