नागपूर येथील ‘मन मंथन लेखन वाचन’ समूहाचे तीन दिवसीय तृतीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन नुकतेच हर्षोल्हासात आणि अतीव उत्साहात साजरे झाले.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ नाट्य लेखिका वर्षा विजय देशपांडे, डॉक्टरी पेशात असूनही वैद्यकशास्त्रासोबतच इतर साहित्यशास्त्रातही चौफेर लिखाण करून अमेरिकेतील बोस्टन आणि साऊथ आफ्रिकेपर्यंत झेंडा रोवणाऱ्या वैद्या माधुरी वाघ होत्या. तर अध्यक्ष म्हणून अकोला स्थित आनंदी गुरुकुल च्या संस्थापिका संचालिका व राष्ट्रपती पुरस्कारासोबतच अनेक सन्मान अतिशय लहान वयात पटकावणाऱ्या अष्टपैलू सौ दिपाली सोसे या लाभल्या.
तीनही मान्यवरांनी मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असून मराठी अमृताशी पैजा जिंकणारी भाषा असल्याने लहानपणापासूनच घराघरांमधून मराठीचा आग्रह धरायला हवा आणि लिखाणा सोबतच वाचनाचाही आग्रह धरावा व वाचताना समजून वाचायला हवे असे आग्रहपूर्वक सांगितले.
पहिल्या दिवशी परिचय सत्र व वनवन्ही दरम्यान अनेक साहित्यिक खेळ घेण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष श्री श्रीकांत विश्वेकर, प्रमुख पाहुणे श्री प्रकाश टिकेकर व श्री माधव गिरगांवकर होते. निवेदन सौ विणा मुळे यांचं होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी टाळ टिपऱ्यांच्या गजरात ध्वजारोहण, ग्रंथ पूजन करून ग्रंथदिंडी निघाली. पालखीचे भोई अतिशय उल्हासात ग्रंथाची पालखी खांद्यांवर मिरवीत होते. दीप प्रज्वलानंतर वाग्देवी पूजनाने संमेलनाचे विधीवत उद्घाटन झाले. त्यानंतर मनमंथन सन्मान व विविध स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. निवेदन शुभांगी तिवारी, मंजुषा विश्वेकर, अर्चना गिरगावकर, व मीरा घोंगे यांचे होते. आभार प्रदर्शन अलका टिकेकर यांचे होते.
दुपारी स्वरूची भोज आणि त्यानंतर साहित्य कट्टा अंतर्गत काव्यवाचन, कथाकथन, स्वगत, नाट्यअभिवाचन इत्यादी सादरीकरण झाले. साहित्य कट्ट्याचे अध्यक्ष डॉक्टर श्री सुनील देशपांडे होते. प्रमुख पाहुणे श्री विषपंत पांडे व श्री चंद्रकांत तुंगार होते. निवेदन सौ शुभदा साधू व सौ रश्मी देवगडे यांचे होते. आभार प्रदर्शन सौ स्मिता रेखडे यांचे होते. दुपारी चहापानानंतर चौथ्या सत्रात विविध कला दर्शन यात साहित्यिकांनी इतरही नृत्य, गायन, अभिनय इत्यादी कलांचे प्रदर्शन घडविले.

या सत्राचे अध्यक्ष श्री चंद्रकांत जुन्नरकर व प्रमुख पाहुणे श्री मोहन घोंगे व श्री माधव गिरगावकर होते. निवेदन मायाताई कारगिलवार व सौ मेधा घोंगे यांचे होते. आभार प्रदर्शन प्रतिमा तुंगार यांचे होते. रात्री स्वरूची भोजचा आस्वाद घेण्यात आला.
तिसऱ्या दिवशी सकाळी जड अंतकरणाने एकमेकांचा हृद्य निरोप घेण्यात आला. आणि समारंभाची सांगता झाली.
लॉकडाऊन काळात स्थापन केलेल्या या छोट्याशा रोपट्याने पाच वर्षात आपल्या फांद्या अवघ्या महाराष्ट्रभर पसरवल्या आहेत. अनेक साहित्यिक जुळत आहेत. हा आलेख उत्तरोत्तर चढत जावा हीच सदिच्छा प्रत्येक पाहुण्याने प्रकट केली.
हे संमेलन यशस्वी करण्यासाठी समूहाच्या संस्थापिका संचालिका सौ प्रेरणा प्रदीप वाडी, उपसंचालिका सौ वंदना विष्णू पांडे, स्वागताध्यक्ष सौ रश्मी कुलकर्णी, उपस्वागताध्यक्ष मंजुषा विश्वेकर, संमेलन प्रमुख प्रतिमा तुंगार, उपसंमेलन प्रमुख अलका टिकेकर, सचिव सौ मीरा घोंगे, उपसचिव सौ रेखा भिवगडे, कोषाध्यक्ष श्री विनोद मुळे, उपकोषाध्यक्ष कुमारी प्रीती दीक्षित, सर्वश्री प्रदीप वाडी, संदीप कुलकर्णी, चंद्रकांत तुंगार, श्रीकांत विश्वेकर यांसोबतच सर्वच सभासदांचाही हातभार होता.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800