Sunday, July 13, 2025
Homeलेखमन….. रेशम रेशम

मन….. रेशम रेशम

जाळ कुठलही असो दाट झालं की वीण जितकी घट्ट होत जाते त्याच अस्तित्व तितकच आवळत जातं. एकमेकात गुंफलेली वीण किती सुंदर दिसते पण प्रत्येक धागा किती ताणलेला, गुदमरलेला आणि स्वतःच सर्वस्व हरलेला असतो. आणि मोकळे झाले सगळे की मग तुटतात, विरहात हरवतात.साथ हवी तर खरी पण श्वास कोंडत जाणारी पण नको आणि विरहाने हरवणारी पण नको.

“नाती” म्हणजे मानवी जीवनाचा आत्मा आहे. नाती रक्ताची असू देत नाहीतर ऋणानुबंधाची, मैत्रीची असो मानवी मन निरंतर नात्यांच्यात शोधात असतं.पण प्रत्येकाला त्याच्या मना प्रमाणे माणसं हवी असतात. ही मनाप्रमाणे हवी असलेली माणसं एकदा भेटली की, ती जपून ठेवण्याच्या प्रयत्नात आपणच कधी कधी ही नाती अवघड करून घेतो का ? याची जाणीव असणं तितकच महत्त्वाचं ठरतं. नाती कितीही जवळची असली तरी श्वास घेण्यास थोडी मोकळीक आवश्यक असते. बंधन रेशमी असावं पण गुदमरून जाण्या इतकं पण घट्ट नसावं.

पालक आणि पाल्य यांचं नातं म्हणजे एक पिढीचं अंतर असणारं पण तरी वेगळ्याच आवरणात जगणारं नातं आहे. मुलं जशी जशी मोठी होत जातात तसे तसे अनेक अनेक विचार भेद पालक आणि पाल्यात निर्माण होत जातात. काळानुसार तत्व, मान्यता, बरं, वाईट, खरं, खोटं यात देखील मोठा बदल होत जातो. जुन्या पिढीला हा बदल पाचवण्याचं आव्हान पेलावं लागतं तर, नवीन पिढीला जन्या पिढीच्या विचारांशी जुळवून घेताना घुसमट सहन करावी लागते. आणि या प्रक्रियेतून जाताना दोन्ही पिढीला मानसिक तणाव याला सामोरे जावं लागतं.

या मानसिक तणावाचं व्यवस्थापन करताना दोन्ही पिढीची तारांबळ उडत असते. आणि यातून त्यांच्या नाते संबंधाची घडी विस्कटत जाते. संवाद कमी कमी होत जातात त्यामुळे सुसंवाद घडून येणं अशक्य होत जातं. पुढे ही तेढ वाढत जाते. पण असं होत असताना पालक आणि पाल्य मनातून एकटे होत जातात. नात्यातली ऊब, ओलावा कमी होत गेल्या मुळे संबंधातील कोरडेपणा मुळे नाती खचत जातात. एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा, आपली अधुरी स्वप्न मुलांच्या डोळ्यात भरण्याचा अट्टाहास, यावर काय उपाय शोधता येईल. याचा विचार करता, पालक आणि मुलांमध्ये संवाद आणि समन्वय असणं अत्यंत आवश्यक आहे.दहावीचे बारावीचे निकाल लागले की ज्या मुलांना साधारणतः सत्तर टक्क्यांपासून नव्वद टक्क्यांपर्यंत मार्क पडतात असे पालक व त्यांची मुले देखील रिझल्टबाबत तेवढी समाधानी दिसत नाहीत, नाखूष असतात. रिझल्टनंतरही त्यांच्या घरामध्ये तणावाचे वातावरण कायम असतं.

दहावीचे वर्ष नेमके पौगंडावस्थेतील नाजूक काळातच येते. त्यामुळे या काळात मुलांमध्ये मानसिक व शारीरिक अशा दोन्ही स्तरांवर बदल होत असतात. अशा वेळी स्वतःला उत्तम मार्क पाडून सिद्ध करण्याचे दडपण मुलांवर नकळत येतं. त्यामुळे मुलांशी योग्य पद्धतीने संवाद साधणं व त्यांना समजून घेणं ही जबाबदारी पालकांची आहे. निकालानंतर कुठली शाखा निवडावी, यामध्येदेखील पालक व मुलांमध्ये एकमत असावे. विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी, व्यक्तिमत्त्व, अॅप्टिट्यूड, त्याच्यामधील प्रॅक्टिकल इंटेलिजन्स, अभ्यासक्रमाची उपयुक्तता अशा अनेक गोष्टींचा सारासार विचार करूनच शाखा निवडावी. करिअर कौन्सेलरची मदतही जरूर घ्यावी.

शिक्षणानंतर कुठले काम करायला त्याला आवडेल, याचाही जरूर विचार व्हावा. आपला पाल्य एकमेवद्वितीय आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे इतरांशी त्याची तुलना करून पाल्याचा आत्मविश्वास कमी होईल असे वागू नये. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला विविध रंगी पैलू पाडण्यासाठी तुम्ही त्याचे मित्र व मेंटॉर किंवा मार्गदर्शक बनणे अपेक्षित आहे. आपण मुलाचे पालक आहोत मालक नाही, याची जाणीव असणं गरजेचं आहे.

मुलांनी पण आई वडीला पेक्षा जास्त कोणीही त्यांच्यावर प्रेम करू शकत नाही आणि त्यांची काळजी घेऊ शकत नाही याची जाणीव कायम ठेवावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं पालक आणि पाल्य यांनी एकमेकांना थोडं सैल सोडून देणं कधी कधी नात्याला एक नावीन्यपूर्ण किनार लावून जाते.

दुधात गुलाबाच्या पाकळ्यांचा रंग मिसळावा तशीच होती ‘ती’. आपलं पहिलं पाऊल ठेवलं होतं अनघाने. अनोळखी दाराच्या उंबरठ्यावर. वृद्धाश्रमात केअर टेकर म्हणून आज तीचा पहिला दिवस होता. ती सगळ्यांना भेटायला डायनींग एरिया मध्ये गेली. तिथे सासऱ्यांना बघून तिच्या हातातलं रजिस्टर निसटलं. तिच्याचमुळे त्यांचा मुलगा वारला असा समज त्यांनी करून घेतला होता. ते पाच वर्षांपूर्वी मुलगा गेल्या पासून इथे वृद्धाश्रमातच होते. अनघाने दुसरं लग्न केलं नव्हतं. आज तिच्या डोळ्यात आपल्या मुलाची सावली बघत होते ते. खुर्चीवरून उठून अंगणात जाऊ लागताच त्यांचा तोल गेला, काठी हाती घेण्याचा प्रयत्न करताना तोल संभाळताना अनघाने त्यांना आधार दिला. तिच्या खांद्ययाचा स्पर्श तेवढाच सक्षम वाटला जेवढा रिटायरमेंटला डोळ्यात पाणी आल्यायवर मुलाने घट्ट हात धरला होता…
असं ही एक भावनात्मक नातं असू शकतं. मानलं, जपलं तर असे सुरेख रेशमी बंध आयुष्यभरासाठी बांधले जातात.

डॉ राणी खेडीकर

– लेखन : डॉ राणी खेडीकर, बालमानस तज्ञ, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments