मन वढाळ म्हणे बहिणाबाई
भूमीवरी कधी आकाशी जाई
पृथ्वी प्रदक्षिणाही घालून येई
कोपऱ्यातच मग लपून राही
आनंदाने गाणे गाता गाता
उदास कधी जाता जाता
फुरंगटोनी जाई कधी मधी
समजावण्यास लागे अवधी
आनंदाने कधी फुलपाखरू
असते कधी उधळलेला वारू
हत्तीचे असते अंगी कधी बळ
कधी पडते होऊनी निष्फळ
आठवणी भुतकाळातल्या
सतावती सदा वर्तमानाला
भविष्याला आडसर होती
विसरणे आपल्याच हाती
सांगड मन आणि बुद्धीची
साथ देई शरीरा उत्साहाची
घडतील चमत्कार जगती
तरतील बांधव अल्पमती
बांधा मनी एक खूणगाठ
जगेन जगवेन मानाने ताठ
नको मनी अविचारी विकार
होवू आनंद सागरावर स्वार

— रचना : डॉ.सौ अनुपमा पाटील. ठाणे
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800