Home साहित्य मयसभा

मयसभा

0

जगन्नियंता विश्र्वंभर तूं तुझीच ही करणी
विरोधातूनी चमत्कृतींनी नटली ही अवनी

उत्तुंग नभांतरी घेऊन जाती गगनभेदी हे गिरी
आकाशस्थां क्षणांत नेई पाताळी ती दरी

खळखळ नादत येई सरिता मधुर उदक उदरी
क्षारयुक्त ते नीर निर्मिले देवा तूं सागरी

भयासूर जणुं प्रचंड प्रस्तर कभिन्न ते काळे
बारीक वाळू पुळण किनारी मृत्तिकाही लोळे

निबिड अरण्ये वृक्ष राक्षसी खडे शिपाई हे
नाजूक लतिका त्यांस बिलगुनी हितगूज सांगतसे

खडबडीत त्या पर्वतरांगा उजाड माळराने
हरित कोमल तृणांकुरांची घातली आच्छादने

महाकाय क्रूर हिंस्त्र श्र्वापदे वनांत संचारिती
फुलपांखरे, कीटक, चिलटे उपवनी भिरभिरती

सदाहरित ठेवण्या सृष्टीला मेघा आमंत्रिले
ओढे, निर्झर, तटिनी देती सुखमय जीवन हे

पांचूच्या या हरित बनांतूनी वा-याचे गाणे
ताल देऊनी रंगून जाती डोलत ती पाने

ऋतुमासागणी फुलती गोजिरी इंद्रधनु पुष्पे
तुरट, आंबट, मधुर चवींची विविध रसाळ फळे

खगोलात हे तारे वसती ग्रहगोलांसंगती
चमकत चमकत एकापाठून अभ्यागत येती

दिनभर तापून काढी भास्कर समस्त विश्र्वाला
देण्या शीतलता जगताला योजी शशिबिंबाला

एकासम कधी दुजा नसावा किमया साधलीसे
विरोधातूनी प्रत्येकाचे विशेषत्व खुलतसे

स्वाती दामले

– रचना : स्वाती दामले.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version