भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण हैदराबाद संस्थान पोलिस कारवाई करून निजामाच्या जोखडातून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मुक्त करण्यात आले.
हैदराबाद संस्थानात असलेल्या मराठवाड्यात; तत्कालीन मंत्री श्री. दिवाकर रावते यांच्या पुढाकाराने १७ सप्टेंबर १९९८ रोजी नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानात हुतात्मा स्मृती स्तंभाच्या अनावरणाचा सर्वपक्षीय भव्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास तत्कालिन विधानसभेचे अध्यक्ष दत्ताजी नलावडे, मुख्यमंत्री मनोहर जोशी, नांदेडचे पालकमंत्री श्री.दिवाकर रावते, ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचे सहकारी उपस्थित होते.
तेव्हापासून दरवर्षी संपूर्ण मराठवाड्यात १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्रामदिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. या निमित्ताने जागविलेल्या या काही आठवणी. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
आज १७ सप्टेंबर ! मराठवाडा मुक्ती संग्रामदिन !! अर्थात हैद्राबाद स्टेट मुक्त होऊन आज ७७ वर्ष झाली.
संपूर्ण मराठवाड्यात मुक्ती दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. मला काल पासून हुरहूर लागून राहिली होती की मी लातूरला असते तर तिथल्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले असते. पण इथे, पर मुलखात मला काहीच करता येत नाही.
महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधील कलबुर्गी सहित काही जिल्हे निजाम व रझाकाराच्या टाचेखाली चिरडली गेली होती. त्या अन्याय, अत्याचाराच्या खूणा आजही बुजल्या गेल्या नाहीत. मागास मराठवाडा हा जो शिक्का बसलेला आहे तो अद्याप पुसला गेला नाही. त्या विरोधात पेटलेल्या स्वातंत्र्य संग्रामात माझे सासरे कै.भाऊराव वाडकर यांचेही मोलाचे योगदान राहिले आहे. आज ही आमच्या घरी त्या विषयी भरभरुन चर्चा होत असते. सर्व वर्तमानपत्रात अनेक लेखांनी गर्दी केलेली असते. मी थोडीशी अस्वस्थच होते.
सकाळी बागेत फिरायला गेले. काल पासून पावसाने उघडीप दिल्यामुळे महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मी जाताच साऱ्याच जमल्या. आम्ही सर्वांनी योग प्राणायाम केला. मराठवाड्यातील फक्त तीन चार महिला, बाकी पश्चिम महाराष्ट्र व अदर स्टेटच्या होत्या. त्यांना मराठवाडा मुक्तीदिन आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात महिलांच्या योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली.
शाळेत असताना आपण इतिहास वाचलेला असतो पण काळाच्या ओघात विसर पडतो. प्रामुख्याने सर्वत्र पुरुषांच्या कर्तृत्वाच्या इतिहासाची उजळणी होते परंतु महिलांनी दिलेल्या योगदान, समर्पण अन् त्याग या विषयी फारसं बोललं जात नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वयंस्फूर्तीने सहभागी महिला स्वातंत्र्य सेनानी चे स्मरण होता आज ही अंगावर शहारे उभे राहतात.

शिक्षणाचे अति अल्प प्रमाण असतांना ही ज्या सुशिक्षित, धडाडी महिलांनी संपूर्ण मराठवाडा पिंजून काढीत महिलांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटविली. त्या ठिणगीचे वणव्यात कधी रुपांतर झाले हे कोणालाच कळले नाही. श्रीमती सुशीलाबाई दिवाण, ताराबाई परांजपे, दगडाबाई शेळके, भागीरथीबाई साकोळकर, आशाताई वाघमारे, गीताबाई चारठाणकर, प्रतिभा वैशंपायन, गोदावरीबाई टेके, अशा असंख्य महिलांनी सामान्यातल्या सामान्य महिलांना सोबत घेत पुरुषांच्या खांद्याला खांदा देत स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले. निजाम आणि रझाकारांना टक्कर देत पळता भुई थोडी केली. या महिलांच्या धाडसाचे, शौर्याचे, अंगभूत कल्पकतेने पोलिसांच्या हातावर तुरी देत त्या आपले काम फत्ते करण्यात यशस्वी ठरल्या होत्या.
या स्वातंत्र्य सेनानी महिलांचा पराक्रम, निर्भयता आणि चातुर्याच्या घटना ऐकून साऱ्या जणी रोमांचित झाल्या. बाईला संधी मिळाली तर ती काय करु शकते याची ही ज्वलंत उदाहरणे आहेत. हे प्रसंग अतिशय प्रेरणादायी आहेत. आजच्या पिढीला हा इतिहास माहित होणे गरजेचे आहे. इतिहास वाचणे वेगळे आणि प्रभावीपणे ऐकणे वेगळे, याची मला छान प्रचिती आली. स्त्रीशक्तीच्या अनोख्या कर्तृत्वाला सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात अज्ञात सर्व हुतात्म्यांना सलामी देत दोन मिनिटे उभे राहून विनम्र अभिवादन केले. देशभक्तीपर घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. मन आनंदी व प्रफुल्लित झाले.
“आम्ही मैत्रिणी” ग्रुपच्या सर्व महिलांनी या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला. या सर्वच मैत्रिणींना रोजच काही तरी नवं नवं हवं असतं. संघटित शक्ती बलशाली असते याची मला नेहमीच प्रचिती येत असते. प्रार्थना व राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!

— लेखन : डॉ प्रभा वाडकर. लातूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800