Friday, February 7, 2025
Homeसाहित्यमराठी कवितेतल॔ सुरेल स्वप्न : मंगेश पाडगांवकर

मराठी कवितेतल॔ सुरेल स्वप्न : मंगेश पाडगांवकर

पद्मभूषण कवी मंगेश पाडगांवकर यांची ९३ वी जयंती आजच आहे. त्यानिमित्ताने ही स्मरणांजली……

शब्दांशी खेळत, त्यांचं रूप मनसोक्त न्याहाळत, त्यांना हळुवारपणे गोंजारत, कवितांतून भावनांचे लावण्य फुलवणं, उलगडणं, निसर्गाच्या गळयात गळा घालून कविताभक्तीत रमणं ही पाडगांवकरांची जन्मजात वृत्ती. त्यामुळेच कुणाचा असा समज होऊ शकेल की; एखादी गांवरान तरुणी पाडगांवकरांशी सल्ला-मसलत करूनच सौंदर्य धारण करत असावी अथवा इवलासा सुरवंटंही आपली कात टाकून, कुठल्या रंगसंगतीने फुलपाखरू होत मी प्रेमिकांच्या हृदयाचा ठाव घेऊ शकेन ? असा विचार करत पाडगांवकर कवितेतून रंग शोधत असावा ! यातून हे सहज सिध्द होतं की; मंगेशांच्या कवितेवर कुसुमाग्रज-बोरकरांच्या प्रतिभेचे सालंकृत संस्कार होते व ते सत्य पाडगांवकरांनीही तत्त्वत:मान्य केलंच आहे ; मात्र पुढील सारी वाटचाल स्वतंत्रपणे त्यांची एकेरी हे तितकंच खरं. सबब पाडगांवकरांच्या पुस्तकांनी बघता बघता प्रसिध्दीची पन्नाशी ओलांडली.

तात्पर्य, त्यांच्या कारकीर्दीत त्यांना अगणित मान- सन्मान लाभले किंवा काहींपासून विन्मुखावं लागलं; पण हे खरं की; पाडगांवकरांना ‘ज्ञानपीठ’ च काय ‘नोबेल’ लाभलं असतं; तरी मला आश्चर्य वाटलं नसतं अशी त्यांची तपोसाधना होती.

ध्यानी-मनी नसता १९६५ साली हृदयीच्या पडद्याआड अंग धरू लागलेली माझी अल्लड प्रतिभा, लाजेची घडी मोडून ओठावर वावरू लागली आणि १९६७ मध्ये आईसोबत मुंबईला मामाकडे गेलो असता, षण्मुखानंद हॉलमधील कार्यक्रमात डोकावताच विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगांवकर ही दत्त-त्रयी दिसली व अरुण दाते-सुधा मलहोत्रा यांच्या मख्मली स्वरातलं–

शुक्रताराss, मंद वाssराss,
चांदणेss पाsण्यातुनी ss

या द्वंद्व-गीतात सचैल न्हाऊन मी घरी परतलो (तो आज या क्षणालाही भिजलेलाच आहे.) तिथून सरळ भोपाळच्या ६४ व्या अ.भा मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रित कवींत माझी वर्णी लागली. तिथेच वि.द.घाटे यांच्यासह सारेच दिग्गज कवी भेटले. त्यातलेच मंगेश पाडगांवकर जवळ येत मन-गाभाऱ्यात कधी उभे ठाकले ते उमजलंच नाही. मग आम्ही एकमेकांच्या प्रेमात डुंबतच गेलो. त्यांची अनेक पत्रं माझ्या काळजाच्या कप्प्यात जपून ठेवलेली. अर्थात ती साध्या कागदावर वा पोस्ट-कार्डावर असली; तरी आत मुरलेल्या अमूर्त ओलाव्यामुळे कधीच कोमेजणार नाहीत.

माझ्या घरातील महत्त्वाच्या घडामोडींत त्यांची दखल असे. ते मुंबईत अमेरिकन कल्चरल सेंटरला नोकरीत होते तेव्हा भेटीस गेल्या गेल्या विचारित–
“बेडेकर, नवं काय लिहिलं ? कविता वाचू नका, गाऊन दाखवा, तुमच्याकडे गीतांची तोंडं चांगली येतात”

अंतर्यामी पाडगांवकरांच्या इतक्या आठवणी रुजल्या आहेत की; आता त्या झाडाची हिरवीगार पानं हवेच्या झुळकीने हेलकाऊ लागलीत !

साधारणपणे १९८१-८२ साली नागपूरहून प्रसिध्द होणा-या “चर्चा” दिवाळी अंकात त्यांची व माझी कविता एकाच पानावर आणि ती त्यांनी नेमकी पुस्तकांच्या संगोपनार्थ लिहिलेली. तेव्हा मी इंदुरातील जेल रोडवर नुक्तीच “अलर्ट एडव्हर्टायझिंग” ही व्यावसायिक संस्था सुरू केलेली; वाटलं आपल्या स्टुडिओत एका पोस्टरवर तीच कविता ठळक हस्ताक्षरात लिहून का लावू नये ? सबब हाती मार्कर घेऊन माझ्या जग जाहीर हस्ताक्षरात लिहायला सुरुवात केली; मात्र हात क्षणभर थबकला. मग ठरवलं की; ही कविता थेट पाडगांवकरांच्याच हुबेहूब हस्ताक्षरांत लिहून, त्यांची सहीसूध्दा आपणच करावी. झालं, त्यांची मला आलेली सारी पत्रं बाहेर काढून पाहात पूर्ण कविता त्यांच्याच हस्ताक्षरशैलीत लिहून टाकली आणि खाली त्यांचीच अस्सल सहीही करून मोकळा.

लगेच त्या पोस्टरची एक झेरॉक्स काढून दिली पाठवून पाडगांवकरांना ! दोन-तीन दिवसांत रात्री मुंबईहून खुर्द त्यांचाच फोन– “बेडेकर, ही कविता मी तुम्हाला केव्हा लिहून दिली ?”
म्हटलं- “तुम्ही नव्हे, मीच लिहून तिच्याखाली तुमची सही केली.”
“काय म्हणता ! यशोदाला स येथील की; बेडेकरने माझ्या हस्ताक्षरात माझी कविता लिहिली आहे म्हणून !”
पुढे त्यांच्याहस्ते मुंबईत माझ्या पहिल्या “अंतर्याम” कविता-संग्रहाचं प्रकाशन दुस-या “आत्मनाद”
गीत-गझल -लावणी-अभंग संग्रहाची प्रस्तावना, नेमका माझ्या वाढदिवशी फोन असं कोड-कौतुक होत गेलं.
सहसा पाडगांवकर सकाळी ९ ला उठत; परंतु माझ्या वाढदिवशी ते रामप्रहरी ६ वाजता उठून मला फोन करीत.

असे भाग्ययोग येतच गेले.
तशात “अतिपरिचयात अवज्ञा” असा प्रकारही माझ्याकडून घडला. परभणी तील कवि-संमेलनात पाडगांवकर, नारायण सुर्वे, मी, साहेबराव ठाणगे असे काही कवी व्यासपीठावर.
कवि-संमेलन आटोपल्यानंतर रात्री पाडगांवकर मला व माझ्यासोबत असलेल्या प्र.द.जोशी या मित्राला चक्क ७५ कविता ऐकवून म्हणाले-
“बेडेकर, मी तुम्हाला भरपूर कविता ऐकवल्या ना ! तर आता माझं एक छोटंसं काम करा ना.”
म्हटलं: “सांगा.” : माझ्या या बुश-शर्टची घडी करून द्या, घरी गेल्यावर यशोदा विचारेल की; घडी करून का आणली नाही म्हणून !”
मी लगेच घडी करून दिली नंतर ते मुंबईले परतले अन् मी इंदूरला.
त्या काळात माझं “पत्र- सारांश” हे अंतर्देशीय मासिक सर्वत्र लोकप्रिय. काही महिन्यांनी त्याच्या दिडपानी दिवाळी अंकासाठी मी पाडगांवकरांची कविता मागितली व पत्राच्या शेवटी मिश्किलपणे लिहिलं- “मानधन म्हणून मी तुमच्या चार बुश-शर्ट्सच्या घड्या करून देईन”. ते वाचून कविवर्य भडकले व त्यांचं वरवर नरम वाटणारं पोस्ट- कार्ड अंगावर चालून आलं.

सन् २००८च्या एका दुपारी माझा भ्रमण-संवादी खणाणला. पलीकडून पाडगांवकर उद्गगारले – “बेडेकर, मी तुमच्यावर एक कविता लिहिली ती ऐकवतो.” म्हटलं-“ऐकवा.”
आणि तीच कविता त्यांनी ‘शब्द दर्वळ’ दिवाळी वार्षिकासाठी धाडली. मी चक्रावलो. कारण माझ्या त्या अंकात कधी माझी कविता नसतेच ! नाईलाजाने त्यांना फोन लावला.–
“पाडगांवकर,’ -शब्द दर्वळ’ मध्ये माझी कविता कधीच नसते, तर ही कशी छापू ? एक विनंती आहे.”
“सांगा”
“मला ही कविता ‘साभार परत’ पाठवायची परवानगी द्या.”
“दिली”
नंतर २००९ साली मुंबईला जाताना, त्यांचं मी केलेलं
जलरंगातलं पोर्ट्रेट जे या कथनाच्या शीर्षभागी आहे ते घेतलं नि CST वरून फोन टाकला–
“मी जेवायला येतोय.”
“या”
घरी पोचून ते चित्र हातात देताच, त्यांनी घरभर दाखवलं आणि जेवण आटोपताच पाडगांवकरांची तोफ गरजली–
“बेडेकरss, माsझी कविता ऐशी वर्षांत कुणी साभार परत पाठवली नव्हती.”
म्हटलं–
“पाडगांवकर, माझ्याच अंकात माझं गुणगान करणारी कविता बरी दिसली असती का ?”
माझ्याशी सहमत होत त्यांनी कधीही मानधन न मागता ‘शब्द दर्वळ’ मधून लागोपाठ १४ वर्ष कविता लेखन केलं. अशा महाकवीची ती ‘बरणी’ कविता मी अविरत ६ वर्ष छापली नाही ती नाहीच !

मात्र ऑगस्ट २०१५ त फोनवर यशोदावहिनींनी पाडगांवकरांच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल सांगितलं, तेव्हा माझ्या हट्टातून बाहेर येत, माझ्याकडे झेरॉक्सच्या रूपात जपून ठेवलेली ती ‘बरणी’ कविता मी २०१५च्या ‘शब्द दर्वळ’ दिवाळी वार्षिकात छापली व ती आपल्या डोळ्यांनी पाहूनच पाडगांवकरांनी ३० डिसेंबर २०१५ ला देह ठेवला. अन्यथा त्या अपराधापायी माझ्या मनाने माझा रात्रंदिवस अंत पाहिला असता !

मंगेश पाडगांवकरांचं ते उदात्त ॠण माझ्या मनोभूमीत असं काही रुजलंय की; “बेडेकरांच्या कविता स्वरांच्या पाहि-यांवरून खाली उतरत येतात” असं लेखी म्हणणारे पाडगांवकर आजही उरातून उमलणारी माझी प्रत्येक कविता आधी ऐकतात व नंतरच ती लोकाभिमुख होते अशी माझी समजूत आहे !

श्रीकृष्ण बेडेकर

– लेखन :-श्रीकृष्ण बेडेकर. इंदूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. श्रीकृष्ण बेडेकर यांचा कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचा लेख फारच सुंदर..
    प्रत्येक मराठी माणसाचं पाडगांवकरांच्या कवितेशी घट्ट नातं
    आहे.
    हा लेख वाचतांना त्यांच्या अनेक कविता मनात खळखळून गेल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी