Sunday, September 8, 2024
Homeसाहित्यमराठी दिन : काही कविता

मराठी दिन : काही कविता

१. मराठीचे वैभव

मराठीचे वैभव आपल्याच हातात आहे…
मराठीचा गौरव आज हेच सांगत आहे…

पर्यायी शब्दांचा वापर हवा कशाला…
ढीगभर मराठी शब्द आहेत उशाला…

दादा भाऊ ताई माई कुठे हरवून गेले…
अण्णा अप्पा नाना शब्द तसबिरीतच उरले…

बाजूला काढून टाकू अनावश्यक खडे…
कौतुकाने वाचू आपण मराठीचे धडे…

शेवटचं मराठी पुस्तक सांगा कधी वाचलं…
मराठी गाणं मनात शेवटचं कधी नाचलं…

कधी वाचली स्वतःहून एक मराठी कविता…
कधी वाहिली मराठमोळ्या सुरांची सरिता…

– रचना : स्मिता धारूरकर. पुणे

२. संस्कृतीची जपते नाळ मराठी
आणि आपुलकीचा पाठीवर हात मराठी

ऐंशी करावी शोभा हि साद मराठी
व्याकरणात गुंतलेली आद मराठी

ओवी अभंग कीर्तन ह्यांनी सजली मराठी
पोवाड्यांनी शूरवीरांची सांगे महती मराठी

साहित्यांनी सजला शृंगार मराठी
इथल्या विचारांनी हटला अंधार मराठी

शिक्षणाची पेटवली ज्योत मराठी
क्रांतीने घडवला इतिहास मराठी

जिने आपल्याला घडविले ती माय मराठी
ज्या महाराष्ट्राला समृद्ध केले ती मराठी

जी आहे तेवढी गोड तेवढी रांगडी मराठी
अन् इथल्या नसानसांत भिनते मराठी

म्हणून बोलून ठेवले आहे
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

— रचना : विनायक नलावडे. नवी मुंबई.

३. माय मराठी

काव्यप्रकार- अष्टाक्षरी

माय मराठी देखणी
दिसे साहित्य अंगणी
संस्कारांची मांदियाळी
शोभे ती मनरमणी ||१||

नाकी मराठमोळीची
नथ शोभे नाकावरी
तैसी भाषा सर्वोत्तम
झरेतल्या दुग्धसरी ||२||

काव्य रचनी गेयता
काना मात्रा अलंकार
नऊ रस घोटोनिया
लाभे शब्द घन सार ||३||

पुरणाचा घाट घाली
तैसे शोभते तबक
नाना रत्ने शब्दावली
ओळ भासावी सुबक ||४||

कुसुमेचा‌ जो अग्रज
तारा झळाळी अंबरी
भाषा बहुगुणी वाटे
गीत गाईन शर्वरी ||५||

भाषा अभिजात दर्जा
व्हावा त्वरित प्रदान
बाळकडू चाखताना
ग्रंथ पवित्रता छान ||६||

कालचक्र अखंडत्वे
रवी किरणांची स्वारी
तैसी वैखरी रसाळ
देई जनास उभारी ||७||

भाषा सुवर्ण अक्षरी
शोभे महाराष्ट्र प्रांती
प्रबोधनी भारूडाने
घडे स्वदेशाची क्रांती ||८||

ज्ञानेश्वरी प्राकृतात
गीता सांगे योगेश्वर
भागवत रामायण
बोध देती कवीश्वर ||९||

शब्द सुमनी ताटवे
बहरती उपवन
लावणीच्या ठसक्यात
सुखे रसिक रंजन ||१०||

— रचना : सौ.शोभा कोठावदे,. नवी मुंबई.

४. माय मराठी

माय मराठी आपुली
तिला अमॄताची गोडी
पंचपक्वान्नांचे ताट
गोड आंब्याच्या रे फोडी ।।१।।

किती संपन्न श्रीमंत
तिच्या समॄद्ध त्या बोली
भारदस्त तिचे शब्द
त्यांची अथांग ती खोली ।।२।।

शब्दालंकाराने पहा
कशी सजली नटली
अनुपम ते सौंदर्य
साऱ्या जगाला पटली ।।३।।

तिचा महिमा तो थोर
करू किती गुणगान
संपन्न तो इतिहास
ऐश्वर्याची मोठी खाण ।।४।।

ठायी सूर्याचे ते तेज
चंद्राची ती शीतलता
काळ्याभोर आकाशात
चमकावी विद्युल्लता ।।५।।

तिचा पसरे सुगंध
पिंगा घालती भ्रमर
तिला वाचवू जगवू
तिला करू रे अमर ।।६।।

सदा संवाद तिच्यात
आणू लेखनाला रूप
नऊ रसांनी भरली
गच्च काठोकाठ कूप ।।७।।

संदेशात देऊ तिला
उच्च मानाचे ते स्थान
गाऊ तिची गीते सदा
करू डोळे जीभ कान ।।८।।

लिहू कथा कादंबरी
काव्य प्रवासवर्णन
वैचारिक चिंतनात
ललितात ते दर्शन ।।९।।

ऐकू लिहू वाचू बोलू
माध्यमांतून वापरू
तीच कामधेनू गाय
तिचे आम्ही रे वासरू ।।१०।।

घेऊ हातात तो हात
वाढवू रे तिची कीर्ती
साऱ्या मनांत ठशीन
मराठीचीच रे मूर्ती
मग तिचीच रे मूर्ती ।।११।।

— रचना : प्रा. मोहन काळे. अकोला

५. मी मराठी

रंग मराठीचा जसा सावळा विठ्ठल
त्याच्या कंठी कोहिनूर करी ह्रदयाचे स्पंदन..!

माझ्या मराठीचा बाणा तसा लोण्याहून मऊ
आणि वज्राहून कठीण मूर्खासाठी पाठी खूण..!

इथे शिवबाचा धाक पाती शस्त्रास्तांची तेजी
रामदास, तुकोबांनी लावले स्वराज्याचे काजी…!

रोज दिवाळी, दसरा शिंग फुकतो मराठा
अंगी चैतन्याचा स्रोत छाती भिडते धडाडा..!!

क्रांतिकारकांच्या ओठी “वंदे मातरम”आरोळी
इथे थरारून उठे काळी मराठीची माती..!!

गाऊ मराठीची गीते साज श्रुगार मराठी
करा मराठीची बोली आत्मरंगात रंगनी…!!

असा मराठीचा टिळा चला लाऊनिया भाळी
ज्ञाना, तुकोबाचा वसा अशी असो भिक्षावळी…!!

— रचना : सुरेश कोकीळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments