Wednesday, March 12, 2025
Homeलेखमराठी भाषा : मला काय वाटते ?

मराठी भाषा : मला काय वाटते ?

मातृभाषेबद्दल संपूर्ण जगात अनेक वर्षापासून चिंता व्यक्त केली जात आहे. १९२६ साली झालेल्या साहित्य संमेलनात विचारवंत राजवाडे यांनी मराठी भाषा लवकरच नष्ट होणार असे भाकीत केले होते.

युनोतर्फे केलेल्या पाहणीनुसार २००५ साली जगात ६९१२ भाषा बोलल्या जात होत्या. भाषा तज्ञांच्या मते दर पंधरा दिवसांनी जगातील एक भाषा कायमची नष्ट होते. ही खरोखरच चिंतेची बाब आहे.

भारतात एकूण १६५२ भाषा बोलल्या जातात. त्यापैकी ३३ भाषाच फक्त एक लाखाच्यावर लोक बोलतात. सरकार दरबारी २२ भाषांनाच मान्यता प्राप्त झाली आहे. हिंदी भाषा ३३ कोटी ७३ लाख, बंगाली ६ कोटी ५६ लाख, तेलगू ६ कोटी ६० लाख तर मराठी ६ कोटी २५ लाख लोक बोलतात.

मराठी बोलणाऱ्यांची तसेच वाचणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस घटत आहे. भाषा तज्ञांच्या मते भाषा नष्ट होत आहेत तशा त्या त्या संस्कृतीची माहिती, दृष्टिकोन, मूल्ये, माणसाशी निगडीत असलेल्या गोष्टीही नष्ट होत आहेत.

सध्या अनेक महाविद्यालयांत मराठी वाड्.मय मंडळाची फक्त स्थापना होते. परंतु कोणतेही उपक्रम राबवले जात नाहीत. याची सर्व विद्यापीठ पातळीवर गंभीरपणे नोंद घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी याबाबत कडक धोरण स्वीकारणे गरजेचे आहे. महाविद्यालयांना दर्जा देतांना त्या महाविद्यालयात मराठी वाड्:मय मंडळातर्फे कोणते उपक्रम राबवले जातात याबाबत चौकशी करावी. शक्य असेल तर माध्यमिक शाळेत सुध्दा मराठी वाड्मय मंडळ सुरू करून स्नेहसंमेलना सोबत एक दिवस “बालसाहित्य संमेलन” आयोजित करावे.

मराठी वाड्.मय मंडळातर्फे राबविण्यासारखे उपक्रम
१ – कार्यशाळा – काव्यलेखन , कथा – कादंबरी लेखन, एकांकिका लेखन, निबंध लेखन, कथाकथन इत्यादी कार्यशाळांचे आयोजन करावे.

२ – स्पर्धा – निबंध लेखन , कथा लेखन, काव्यलेखन, पुस्तक परीक्षण इत्यादी स्पर्धांचे आयोजन करावे.

३ – पुस्तक प्रदर्शन – प्रत्येक महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन व विक्रीची व्यवस्था करावी व विक्रीच्या दहा टक्के रक्कम मराठी वाड्.मय मंडळाच्या कार्यक्रमासाठी प्राचार्यांकडे जमा करावी.

४ – हस्तलिखित अथवा टंकलिखित प्रकाशित करणे –
साधारणपणे शंभर पानापर्यंत कथा , कविता , निबंध , व्यंगचित्र , साहित्यिकांचे अल्पचरित्र याचा समावेश असलेले हस्तलिखित अथवा टंकलिखित प्रकाशित करावे.

५ – दिन विशेष साजरे करावेत – २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांचा जन्म दिवस “मराठी भाषा गौरव दिन” अथवा “राजभाषा दिवस” आहे. २१ मार्च जागतिक “कविता दिन”, २७ मार्च “जागतिक रंगमंच दिन” तर २३ एप्रिल “जागतिक पुस्तक दिन” १५ ऑक्टोबर “वाचन प्रेरणा दिन” साजरे करावेत. त्यानिमित्त विविध स्पर्धा घेऊन साहित्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान ठेवावे.

६ – “विद्यार्थी साहित्य संमेलन” – ज्याप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयात दरवर्षी गॅदरिंग आयोजित करून करमणुकीचे कार्यक्रम घेतले जातात त्याचप्रमाणे वाड्.मय मंडळातर्फे “विद्यार्थी साहित्य संमेलन” आयोजित करावे. त्या महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख असलेल्या प्राध्यापकाला साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद द्यावे, प्राचार्यांच्या हस्ते उदघाटन करावे व इतर सर्व ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी द्यावी.

“राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाची आवश्यकता”

महाराष्ट्र शासनाने “वाचन प्रेरणा दिना”चे औचित्य साधून अमराठी लोकांमध्ये मराठी भाषेबाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे महानगरपालिका स्तरावर अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात ज्या महानगरपालिकेने चांगला प्रतिसाद दिला त्यांना पुरस्कार दिले. त्याच प्रमाणे शासनाच्या मराठी भाषा विभागाने प्रत्येक विद्यापीठाला विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यास सांगावे व सर्वोत्कृष्ट आयोजन करणाऱ्या विद्यापीठाला “१२ जानेवारी या युवा दिनाच्या” दिवशी सन्मानित करावे. तसेच राज्यातील ज्या महाविद्यालयात “मराठी वाड्.मय मंडळ” चांगले उपक्रम राबवत आहे अशा दहा महाविद्यालयांना सन्मानित करावे. जी महाविद्यालय उपक्रम राबवणार नाहीत त्यांच्या अनुदानात कपात करावी तसेच प्राचार्यांवर कारवाई करावी तरच मराठी भाषेची महती वाढेल.महाराष्ट्र शासनातर्फे दर वर्षी १२ जानेवारी या दिवशी “विद्यार्थी साहित्य संमेलन” आयोजित करून महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना सहभागी करून घेतले तर चांगले लेखक तयार होतील यात शंकाच नाही.

दिलीप गडकरी

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खूप छान लेख. खरोखर असे उपक्रम राबवायला हवेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम