भगवान श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाद्वारे सर्वधर्म समभावाची शिकवण देवून सर्व जाती धर्माला एकतेचा संदेश दिला आहे. महानुभाव पंथाचा हा विचार प्रागतिक स्वरूपाचा असल्याने देशाला पुढे घेवून जाणारा आहे. तसेच रिद्धपूर येथे मराठीतील लिळाचरित्र या आद्य ग्रंथाची निर्मिती झाली असून मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथेच झाले पाहिजे यासाठी शासन स्तरावर निश्चितच प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
श्री चक्रधर स्वामी अष्टशताद्बी जन्मोत्सावानिमित्त तीन दिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलन नाशिक येथे सुरू आहे. या संमेलानाच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमास ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे, देवयानी फरांदे, सिमा हिरे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब सानप, आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, कविश्वर कुलाचार्य विद्वांस बाब, महंत कारंजेकर बाबा, संमेलन स्वागत समितीचे सदस्य दिनकर पाटील, दत्ता गायकवाड यांच्यासह संत, महंत, तपस्विनी, पुजारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री फडणवीस पुढे म्हणाले की, श्री चक्रधर स्वामी यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता अवतार धारण करून ज्ञानाची परिभाषा व अहिंसेचा मुलमंत्र देण्याचे काम आपल्या विचारातून केले आहे. वेगवेगळ्या समाजातील लोकांना जोडून अखंड मानव जात एक असल्याची शिकवण त्यांनी दिली. यासोबतच महानुभाव पंथामध्ये महिलांना देखील समान स्थान देवून साधनेत त्यांना प्राधान्य दिले आहे. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी चमत्काराच्या मागील वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला पटवून दिला आहे. आठशे वर्षांपूर्वी कर्मकांडांच्या काळात श्री चक्रधर स्वामींचे वैज्ञानिक दृष्टि असलेले समतेचे विचार सर्वांसाठी मैलाचा दगड ठरला आहे.
मराठी भाषेतील आद्य ग्रंथ लिळाचरित्राच्या निर्मितीसोबतच महानुभाव पंथाचे ६५०० ग्रंथ तयार झाले आहेत. ते मराठी भाषेच्या समृद्धीसाठी महत्वाचे आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, महानुभाव संमेलनाच्या निमित्ताने मिनी कुंभमेळ्याचा अनुभव होत आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कोणत्याही प्रकारचा जाती-धर्माचा भेद न करता जनतेच्या सेवेला महत्व देवून सर्वांना सामावून घेण्याचे काम केले आहे . या संमेलनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी मंत्री एकनाथ खडसे, यांनीही महानुभाव पंथाच्या महानुभव पंथाच्या विविध विचारांचा आढावा घेतला. तसेच महानुभव तीर्थक्षेत्रांच्या विकास व्हावा, यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. यावेळी महंत कारंजेकर बाबा यांनी शासनाकडे पंथाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा केला. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वांस बाबा यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी संमेलनाचे प्रमुख आयोजक दिनकर अण्णा पाटील यांनी महानुभाव पंथाच्या विविध ठरावांचे वाचन करून या मागण्या शासनाने मान्य कराव्यात अशी मागणी केली, या ठरावांचे वाचन सुरू असताना उपस्थित हजारो भाविकांनी पंचकृष्ण नावाचा जयघोष केला. याप्रसंगी दत्ता गायकवाड आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महंत चिरडेबाबा यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी मुसळधार पाऊस सुरू असतानाही भाविकांनी अत्यंत उत्साहात व शांततेत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाच्या सुरूवातीला महानुभाव पंथाच्या सप्तग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनाच्या शोभा यात्रेला महानुभाव पंथाचा ध्वज दाखवून प्रारंभ केला.
व्यासपीठावर आमदार आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल आहेर, गिरीश पालवे, विविध संत, महंत, मान्यवर उपस्थित होते.

– लेखन : मुकुंद बाविस्कर. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर माहिती मिळाली आपल्यामुळे