Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यमराठी माणसाची भाषिक जबाबदारी

मराठी माणसाची भाषिक जबाबदारी

२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा होत आहे. या निमित्ताने, जेष्ठ साहित्यीक श्री दिलीप गडकरी यांचा हा विशेष लेख आपल्याला निश्चितच अंतर्मुख करेल…..

“परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका ॥
भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि आपल्या प्रगतिचे शिर कापु नका ॥”

या काव्यातून कुसुमाग्रज यांनी संदेश दिला आहे की इंग्रजी शिकलात तरी चालेल. भाषा ही लहान किंवा मोठी नसते. भाषा ही भाषा असते.एकापेक्षा अधिक भाषा आपल्याला आल्या पाहिजेत. पण ज्या मानसिकतेतून आपण इंग्रजीकडे वळत आहोत ते मात्र बरोबर नाही.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी भाषेवर हिंदी भाषेचे आक्रमण सुरू झाले. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला त्यामुळे हिंदीचा आदर करण्यास हरकत नाही परंतु दोन मराठी भाषिक आपापसात मराठीत बोलण्याऐवजी हिंदीत बोलू लागले तेव्हां ती धोक्याची घंटा आहे असे वाटू लागते.

महाराष्ट्रात परभाषिक विक्रेते आले त्यांना मराठी शिकणे गरजेचे होते जेव्हां सर्वांनी त्यांच्याशी मराठीत बोलण्यास सुरवात केली तेव्हां त्यांनी मराठी भाषा आत्मसात केली.

आपण मराठी भाषेची सध्या काय परिस्थीती आहे याचा विचार करू. महाराष्ट्रात मातृभाषेनुसार लोकसंखेच्या टक्केवारीच्या उपलब्ध आकडेवारी वरून मराठी भाषिकांची संख्या १९७१ साली ७६.५ टक्के, १९८१ मध्ये ७२.८ टक्के, १९९१ साली ७३.३ टक्के तर २००१ साली, मराठी भाषिकांचा टक्का ६८.८ टक्के इतका झाला. परंतु याच काळात हिंदी व इतर भाषिकांची संख्या वाढली. मराठी माणसे नोकरीनिमित्त परदेशांत अथवा परराज्यांत गेली असली तरी मराठी बोलणाऱ्यांची संख्यासुध्दा घटली आहे.

इंग्रज भारतातून गेले परंतु इंग्रजी भाषेचा पगडा अद्याप आहे. परदेशात अथवा इतर राज्यात नोकरी मिळण्यासाठी इंग्रजी आवश्यक असल्याने अनेकजण आपल्या मुलांना मातृभाषेत शिक्षण न देता इंग्रजी शाळेत घालत आहेत. त्यामुळे मराठीसह इतर भाषेच्या शाळा बंद पडत आहेत.

इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना मराठी भाषेविषयी आपुलकी वाटणार नाही. ते मराठी भाषेतील वाड्मयाचा आस्वाद सुध्दा घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना “श्यामच्या आई” तील संस्कार कळणार नाहीत. केशवसुत -कुसुमाग्रज यांच्या कविता त्यांच्या ओठांवर रेंगाळणार नाहीत. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा कळणार नाहीत आणि हीच परिस्थिती कायम राहिली तर मराठी भाषा मरणासन्न अवस्थेतच असेल.

खरं म्हणजे ९६ वर्षापूर्वी ही भिती इतिहासाचार्य राजवाडे यांनी १९२६ साली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदावरून मनोगत व्यक्त करताना केली होती. मराठी भाषेचे कैवारी असलेले त्याच काळातील एक कवी गंगाधर रामचंद्र मोगरे यांनी आपल्या एका कवितेत म्हटले आहे……

म्हणतात जे मराठी भाषा होणार ही नष्ट
मिळणार काय करुनी हिला वाचवावया कष्ट
त्यांना हेच पुसा की मरणोन्मुख होय आपुली माय म्हणुनी औषध काही पुत्रीदेऊ नये तिला काय ?

कवी मोगरे यांनी, मराठी भाषिकांची संख्या घटत आहे हे मान्य करून त्यावर ठोस पावले उचलली पाहिजेत असे सुचित केले आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या माणसांनी परराज्यात मराठी मंडळ स्थापन करून साहित्यिक चळवळ सुरू केली आहे. परदेशात राहूनही मराठी भाषा वाचवण्यासाठी अनेक देशांत प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेत मराठी नागरिकांतर्फे “लिटरामीट” हा उपक्रम राबवण्यात येतो. यात संशोधक, माहिती – तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ, विद्यापीठातील संशोधक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील मराठी व्यक्ती एकत्र येतात व मराठीत आपण लिहिलेलं साहित्य सादर करतात.
तसेच उत्तर अमेरिकेत ‘एकता’ नावांचा अंक दर तीन महिन्यांनी प्रकाशित केला जातो. हा उपक्रम गेले तीस वर्ष राबवला जात आहे.

परदेशात तसेच परराज्यात राहणारी मराठी माणसे मराठी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाची मराठी भाषा वाचवणे व तिला वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.

साहित्य संस्थांकडून अपेक्षा
१ – अनेकांतून एकता साधण्याचा प्रयत्न करावा
सध्या अनेक जिल्ह्यात, शहरांत विविध संस्थांच्यातर्फे साहित्यिक कार्यक्रम राबवले जातात. असे कार्यक्रम करायचे झाल्यास कार्यकर्ते मिळत नाहीत, देणगी जमा करणे कठीण जाते तसेच प्रेक्षक उपस्थित रहात नाहीत. त्यामुळे मराठी भाषा संवर्धन हा एकमेव उद्देश असणाऱ्या सर्व संस्थांनी एकत्र भव्यदिव्य उपक्रम राबवावेत.

२ — साहित्य संमेलनाचे विकेंद्रीकरण करावे – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नवोदितांना फारशी संधी मिळत नाही.त्यासाठी साहित्य संमेलन तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर आयोजित केली तर जास्तीत जास्त जणांना संधी मिळू शकेल.

३ — पुस्तक प्रकाशनासाठी सहकार्य करावे — अनेकजण विपुल लेखन करत असतात परंतु फारच थोडे जण पुस्तक प्रकाशित करतात.काही जणांना आर्थिक अडचण असते तर काहीजणांना प्रकाशक, वितरक यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. यासाठी साहित्यसंस्थांनी योग्य सहकार्य करावे.

–वाचनालये व ग्रंथालये सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत – शासनाने गाव तेथे ग्रंथालय योजना सुरू केली आहे. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी पंचवीस टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. ज्या गावांत ग्रंथालय नसेल तेथे सुरू करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत.

५ — लेखन कार्यशाळा सुरू कराव्यात — अनेकांना लेखनाची आवड असते पण योग्य मार्गदर्शनाअभावी ते लेखन करू शकत नाहीत. नवोदितांसाठी काव्य लेखन, कथा, कादंबरी, निबंध, नाटक, एकांकिका, कश्या लिहाव्या यासाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाले तर अनेक नवोदित दर्जेदार लेखन करू शकतील.

६ – शाळा व महाविद्यालय येथे वाड्मयमंडळ सुरू करावीत – लहान वयात वाड्मयाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळा व महाविद्यालय येथे वाड्मय मंडळ सुरू करावे.

७ – जागतिक पुस्तक दिन साजरा करावा – २३ एप्रिल हा जागतिक पुस्तकदिन म्हणून सर्व शाळा ,वाचनालय येथे साजरा करून विविध उपक्रम राबवावेत.

८ – पुस्तक वाचून प्रतिक्रिया द्याव्यात – वाचकांनी पुस्तक वाचल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात त्यामुळे लेखकाला प्रोत्साहन मिळते.समजा त्याच्या लेखनात दोष असतील तर ते दुरुस्त करता येतील. मित्रमंडळींना चांगल्या पुस्तकाची शिफारस करावी.

९ – बालसाहित्य संमेलनास प्रोत्साहन द्यावे – दरवर्षी शाळेत स्नेहसंमेलन आयोजित करून करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात.त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.त्याच प्रमाणे बालसाहित्य संमेलन आयोजित करून साहित्यिकांना बोलवावे त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल.

१० – बाल साहित्य निर्मितीस प्रोत्साहन द्यावे – मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली की त्यांना लेखनाची पण आवड निर्माण होते.त्यानां योग्य मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले तर तो मोठा साहित्यिक होऊ शकेल.

सर्वसामान्यांची जबाबदारी
कोणतीही संस्था सुरू करून उपक्रम राबवायचे असतील तर पुढील तीन गोष्टी जुळून याव्या लागतात.

– नेत्याचे नेत्रुत्व – तन , मन , धन अर्पण करून, झोकुन देऊन संस्था चालवण्याची तयारी असलेल्या व्यक्तीने पुढाकार घेतला तरच संस्था स्थापन होते.

– कार्यकर्त्यांचे कर्तुत्व – कोणतीही एक व्यक्ती संस्था सुरू करू शकत नाही तर त्याला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्या सहकार्यांची साथ आवश्यक असते.

– दात्याचे दातृत्व – कोणताही उपक्रम राबवायचा असला तर त्याला समाजाकडून निधी मिळणे आवश्यक आहे.

“महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा “हे बोलून चालणार नाही तर महाराष्ट्राची राज्यभाषा “मराठी” वाचवली पाहिजे. ती सर्व मराठी माणसांची जबाबदारी आहे. त्यासाठी खालील सवय लावून घेणे गरजेचे आहे.

साहित्य संस्थेत सहभागी व्हावे – आपल्या परिसरातील साहित्य संस्थेत सक्रिय सहभाग घ्यावा. जागोजागी वाचनकट्टा सुरू करून किमान आठवड्यातून एखादा कार्यक्रम तरी आयोजित करावा.

२ – कार्यक्रमास उपस्थित राहावे
सध्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम आयोजित करताना प्रेक्षक कसे जमवायचे ? हा प्रश्न पडतो. यासाठी प्रत्येक मराठी प्रेमींनी प्रत्येक मराठी कार्यक्रमास उपस्थित राहून आयोजकांना प्रोत्साहन द्यावे.

३- पुस्तके भेट द्या – सध्या मराठी पुस्तकांची विक्री होत नाही.यासाठी मराठी माणसांनी लग्न , वाढदिवस अश्या समारंभात पुस्तके भेट द्यावीत.

४ – मुलांना मराठी शाळेत घालावे — अनेक मानसशास्त्रज्ञांच्या मते मुलांना मातृभाषेत शिक्षण दिले तर त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास चांगला होतो.

५ – मराठीत बोला मराठीत लिहा – स्वभाषा म्हणजे आपल्या संस्कृतीशी जोडणारा सुवर्णसेतूच.त्यामुळे आपल्या मातृभाषेपासून दूर जाणे योग्य नाही. समाजाच्या अस्तित्वासाठी मातृभाषेचे संवर्धन होणे गरजेचे आहे.आपल्या कुटुंबात, मित्रमंडळ, सहकारी यांच्यात मराठी लिहिणे,  बोलणे गरजेचे आहे.

६ – समाज आणि मराठी
मराठी भाषेसाठी समाजातील आपले व्यवहार अगदी रस्त्यावर, भाजीबाजार, दुकाने, रेल्वे, बस, इत्यादी ठिकाणी बोलतानामराठी भाषा वापरावी. बहुसंख्य मराठी जनतेने असे केले तर समोरच्याला देखील ती शिकावीच लागेल.

७ – माहिती -सेवा – संवाद – मराठीत : आज माहिती, सेवा या सार्वजनिक क्षेत्रात मराठी भाषेच्या वापरासाठी प्रयत्न करायला हवेत. संपूर्ण जगात मराठी ही ही पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे. केंद्र शासन, राज्यशासन, न्यायालय, दूरदर्शन, जाहिरात सर्व बाबतीत जनतेशी संपर्क सेवा मराठी भाषेत करावी.

८- आर्थिक क्षेत्र – मराठी : बऱ्याचदा मराठीचा प्रश्न भावनिक वाटतो. मराठी केवळ साहित्य, कला, सांस्कृतिक एवढ्यापुरतीच न राहता ती संवाद, ज्ञान, रोजगार, नोकरी, व्यवहार, उद्योगाशी जोडलेली भाषा व्हावी. बीएसईची वेबसाईट मराठीत होणे, आय.टी. क्षेत्रातील कंपन्यांतील मराठी मंडळींनी प्रयत्न करावेत.

९ – माहिती तंत्रज्ञान – मराठी — आज संगणकाचे युग आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाची भाषा मराठी होण्याची गरज आहे.

१० – साहित्य – ज्ञान – संस्कृती – मराठी — मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठीत विविध भाषांतील साहित्यकोश, पाठ्यपुस्तके, ज्ञानविज्ञान, संशोधन मराठी भाषेत उपलब्ध व्हावेत.

११- शिक्षण- मराठी – अत्यंत मूलभूत व तात्काळ बदल, प्रयत्न, प्रयोग, उपाययोजना मराठी भाषेसाठी व्हाव्यात; सर्वच शाळांमध्ये किमान १० वी पर्यंत तरी मराठी भाषा अनिवार्य व्हावी.अगदी बिगर मराठी माध्यमांच्या शाळांतदेखील तसे प्रयत्न व्हावेत.

१२ – मराठीतील योग्य शब्दांचा वापर करावा   स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिले आहेत. Budget ला अंदाजपत्रक, Cycle ला दुचाकी. कुसुमाग्रजांनी ‘बेकेट’ च्या केलेल्या अनुवादात “सायक्लोरामा’ साठी “आकाशपडदा” हा शब्द वापरला आहे.

१३ – मराठी बोलताना जास्तीत जास्त मराठी शब्द वापरावे – एका व्यक्तीने दुसऱ्याला सांगितले की, “बाथरूममध्ये स्टँडवर ती बॉटल असेल बघ.” यात सहा शब्दांत चार इंग्रजी शब्द आहेत. त्या ऐवजी “न्हाणीघरातल्या फडताळात ती बाटली असेल बघ” हे वाक्य वापरले तर त्यात सर्व मराठी शब्द आहेत.

कोणतीही भाषा टिकणे व तिचा विकास होणे म्हणजे काय ? तर श्रवण, भाषण, संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अत्यंत विस्तृत, सखोल व व्यापक होत जाणे. ९६ वर्षांपूर्वी म्हणजे १९२६ साली राजवाडे यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विचार मांडताना मराठी टिकणार नाही असे भाकीत केले होते त्याला मराठीचे कैवारी कवी गंगाधर रामचंद्र मोगरे यांनी प्रत्युतर देऊन ठणकाऊन सांगितले होते की कोणत्याही भाषेच्या आक्रमणाने मराठी भाषा मरणार नाही थोडी कमकूवत झाली तर आम्ही त्यावर इलाज करू. मोगरे यांच्या विचाराशी सहमत असलेल्या अनेकांनी माय मराठीला वाचवले.

१४ फेब्रूवारी २००९ ते १६ फेब्रूवारी २००९ ला अमेरिकेत पहिले मराठी विश्वा साहित्य संमेलन आयोजित करून मराठी भाषा साता समुद्रापलीकडे पोहोचवली. राजवाडे यांनी मराठी भाषा मरणार असे भविष्य केले त्याला २०२६ साली शंभर वर्ष होणार आहेत. येत्या चार वर्षात सर्व मराठी जनांनी जीवाचे रान करून केंद्र सरकारवर दबाव टाकून मराठी भाषेला
“अभिजात दर्जा ” मिळवून देऊ. त्यासाठी आम्ही सर्वजण प्रतिज्ञा करु, “महाराष्ट्र माझा आहे आणि मी महाराष्ट्रचा आहे, मराठीत बोलणारे सारे माझे बांधव आहेत, माझ्या महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर माझे प्रेम आहे, मराठी भाषेतल्या समृध्द वाड्मयाचा मला अभिमान आहे, मराठी वाड्मयाची ध्वजा जगभर फडकवण्याचा मी प्रयत्न करीन, मराठी शिकवणाऱ्या व शिकणाऱ्या सर्वांचा मी मान राखीन, मराठी बोलणाऱ्या प्रत्येकाशी मी सौजन्याने वागेन, मराठी भाषा संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे, मराठी भाषेला  “अभिजात दर्जा” मिळण्यासाठी मी प्रयत्न करीन, मराठी भाषेची समृद्धी व वृध्दी यात माझे सौख्य सामावलेले आहे.

दिलीप गडकरी

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी, कर्जत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. दिलीप गडकरी यांचा मराठी भाषेसाठी लिहीलेला लेख खरोखरच
    बाणेदार आहे.आणि समस्येवर ऊपाय सांगणारा आहे

  2. वास्तव परिस्थितीची अतिशय समर्पक शब्दात जाणीव करून देणारा लेख
    खुप छान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments