शासनाचे नियोजित मराठी विद्यापीठ मानवजातीची काशी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे व्हावे, यासाठी अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र भूमीला भूषणावह असे, रिद्धपूर ही महानुभावांची काशी असून मराठीमधील सुरूवातीचे सर्व ग्रंथ याच परिसरात लिहिण्यात आलेले आहेत.
आजही रिद्धपूर येथे अनेक मठांमध्ये या ग्रंथांची हस्तलिखिते उपलब्ध आहेत. अशा या ऐतिहासिक व साहित्यिक नगरीत, नियोजित मराठी विद्यापीठ व्हावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. यासाठी मिशन आयएएसने पुढाकार घेतला असून, आजपासून महानुभाव पंथाचे ज्येष्ठ अभ्यासक श्री पुरुषोत्तम नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात केली आहे.
या स्वाक्षरी मोहिमेद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धव ठाकरे व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांना मराठी विद्यापीठ व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
रिद्धपूर येथे ही स्वाक्षरी मोहीम श्री कुणाल हरणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली असून अनेक मान्यवरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वर्धा येथील महात्मा गांधी विद्यापीठाचे उपकुलगुरु प्रा हनुमान प्रसाद शुक्ल, प्रकुलगुरु प्रा चंद्रकांत रागीट, विविध महंत, मान्यवर यांनी आतापर्यंत स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
– देवेंद्र भुजबळ, 9869484800.