Home बातम्या “मराठी सातासमुद्रापार” सोमवारी प्रकाशन

“मराठी सातासमुद्रापार” सोमवारी प्रकाशन

2

मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी परदेशातील मराठी बांधव कसे झटून योगदान देत आहेत हा पुस्तकाचा विषय असलेले, मेघना साने लिखित ‘मराठी सातासमुद्रापार‘ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, दिनांक ११ जुलै रोजी लोढा लगझूरिया, ठाणे येथे होणार आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार, संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे हस्ते होणार असून, न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टलचे संपादक, श्री. देवेंद्र भुजबळ व सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. प्रतिभा सराफ हे पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

मेघना साने यांनी परदेशस्थ मराठी कार्यकर्त्यांच्या, कलाकारांच्या व संस्थांच्या मुलाखती घेऊन तेथील मराठी जग वाचकांसमोर आणले आहे. अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळांचे कार्य व तेथे होणारी संमेलने याची बरीच प्रसिद्धी होत असते. पण तेथील पुढील पिढीसाठी मराठी भाषा शिकवण्यास मराठी शाळा काढण्यात आल्या आहेत व त्याचा अभ्यासक्रम कशा प्रकारे तयार करण्यात आला आहे याची उत्तम माहिती या पुस्तकातून मिळते.

ऑस्ट्रेलिया व जर्मनी येथे होणारे मराठी उपक्रम, मराठी रेडिओ स्टेशन, मराठी सण उत्सव हेही लेखिकेने टिपले आहेत. इस्रायलसारख्या देशात, जिथे सर्वत्र हिब्रू भाषेतून व्यवहार होतो तिथे मराठीला मायबोली समजणारा एक मोठा वर्ग आहे ही माहिती अचंबित करणारी आहे.

महाराष्ट्रात मराठी शाळा एकामागून एक बंद होत असताना परदेशस्थ मराठी नागरिकांनी मराठी रुजवण्यासाठी केलेले उपक्रम कौतुकास्पद वाटून मेघना साने यांनी हे पुस्तक लिहीले आहे.

तसेच महाराष्ट्रातील साहित्य, कला व शिक्षण क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी केलेल्या काही व्यक्तिमत्वाच्या कार्याचा परिचयही त्यांनी या पुस्तकातून करून दिला आहे. यातील काही लेख न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टल वर प्रसिध्द झाले आहेत.

‘ग्रंथाली’ प्रकाशित या पुस्तकाची प्रस्तावना सुप्रसिद्ध लेखिका अनुराधा नेरुरकर यांनी लिहिलेली असून पुस्तकाचे समर्पक मुखपृष्ठ चित्रकार सतीश भावसार यांनी तयार केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दूरदर्शन वृत्तनिवेदिका स्नेहा आघारकर या करणार आहेत. या प्रसंगी ‘ग्रंथाली’ चे विश्वस्त श्री. सुदेश हिंगलासपूरकर, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, ख्यातनाम नाटककार अशोक समेळ, सुप्रसिद्ध हास्य व्यन्ग चित्रकार, श्री. विवेक मेहेत्रे, ज्येष्ठ कवयित्री डॉ.अनुपमा उजगरे, शिकागो विद्यापीठाच्या मराठीच्या प्राध्यापिका डॉ. सुजाता महाजन यांची उपस्थिती लाभणार आहे.

– टीम एनएसटी ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. खुप खुप शुभेच्छा 🌹🌹 विदेशातही आपली मराठी भाषा जपली जातेय याचा आनंद वाटला 👌👌🌹🌹 धन्यवाद 🙏🙏

  2. मॅडम, आपल्या मराठी सातासमुद्रापार या पुस्तकाला मन:पूर्वक शुभेच्छा…आपले या पुस्तकातील अगोदर प्रकाशित झालेले लेख वाचून विदेशात जपलेला मराठी बाणा वाचून खूप अभिमान वाटतो.आपण लिहिलेले लेख वाचताना आपण घेतलेली प्रचंड मेहनत जाणवत होती. हार्दिक शुभेच्छा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version